संघाच्या मुशीतून निघालेल्या अनेक स्वयंसेवकांच्या रूपातील रत्ने अतिशय निःस्वार्थ, निर्लेप, समर्पित भावनेने ईशान्य भारतात कार्य करीत आहेत. ‘निर्माणों के पावन युग मे, हम चरित्र निर्माण ना भूले‘ ची शिकवण देणारा संघ आणि संघकार्य हे देवकार्य मानून आपल्या सेवेची समिधा राष्ट्रनिर्माण यज्ञात अर्पण करणार्या अनेक ज्ञात-अज्ञात प्रचारकांची ओळख ज्येष्ठ संघस्वयंसेवक असलेल्या सुनील किटकरू लिखित ‘वार्ता ईशान्य भारताची’ पुस्तक करून देते.
’एक भारत श्रेष्ठ भारत’ निर्माणकार्यास कटिबद्ध असलेल्या भारताच्या पूर्वोत्तर सीमावर्ती भागातील जनता, सैनिक व ईशान्य भारतासाठी कार्यरत ज्ञात, अज्ञात संघस्वयंसेवकांना मनोभावे समर्पित असलेल्या सुनील किटकरूंचा ’वार्ता ईशान्य भारताची’ अनुभव आणि निरीक्षण संग्रह, भारतीय ही ओळख असणार्या, मराठीची जाण असणार्याचा, ईशान्य भारताशी आत्मीय संबंध जोडणारा ’धागा’ म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. उत्तर पूर्वांचल क्षेत्र प्रचारक उल्हासजी कुलकर्णी यांच्या प्रस्तावनेतून आणि लेखकाच्या मनोगतातून भारताच्या सुरक्षा, कला, क्रीडा, पर्यावरण या सगळ्याच बाबतीत महत्त्वपूर्ण असणार्या ईशान्येकडील तळमळीच्या हाकांना साद देण्याची कळकळ जाणवते. स्वातंत्र्योत्तर काळात कितीतरी वर्षे दुर्लक्षित राहिलेली ही सात राज्ये आज विकासाच्या मार्गावर अग्रेसर होतांना, विकासाची पायवाट तयार करून देण्यासाठी ’असू आम्ही सुखाने पत्थर पायातील’ म्हणत प्रसिद्धी, पैसा अशा कशाचीही पर्वा न करणार्या अनेक प्रचारक, स्वयंसेवकांप्रति प्रचंड आदराची भावना निर्माण होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, ’उजळूनी आज दाऊ भवितव्य मातृभूचे’ असणारी कटिबद्धता अधोरेखित होते.
पुस्तकाचे नाव - वार्ता ईशान्य भारताची (समाज, संस्कृती आणि राष्ट्रीय जन मन)
लेखक - सुनील किटकरू
प्रकाशक - नरकेसरी प्रकाशन
पृष्ठसंख्या - 256 मूल्य - 200/-
संपर्क - 9890489978
ईशान्य भारताच्या पटलावर दुर्लक्षित भाग म्हणून एकीकडे अशिक्षा, बंडखोरी, मागासलेपणा, गरिबी तर दुसरीकडे मोहात पाडणारे निसर्गाचे सुंदर रंग, जंगलाची श्रीमंती, कला व आदिवासी संस्कृतीची गुंफण असा प्रचंड टोकाचा विरोधाभास पुस्तक वाचताना ठायी ठायी जाणवतो. जंगलामध्ये राहणार्या आदिवासींमध्ये आणि छोट्या छोट्या गावांमध्ये राहणार्या गावकर्यांमध्ये त्यांच्यातलेच एक होऊन सहज वावरण्याचा मंत्र घेऊन अनेक संघ प्रचारकांची ओळख होताना, महाराष्ट्रातील जनार्दनपंत चिंचाळकर आणि भैयाजी काणे यांनी राष्ट्रभक्तीचा प्रवाह या भागात कसा सुरू केला ते वाचताना ध्येयपूर्तीसाठी आव्हाने पेलत धारण केलेली लवचीकता पाहून वाचक अचंबित होतात. व्यावहारिक वेदांत सेवेतून जगणारे, हिंदू संघटनेसाठी, ’पायात भिंगरी, तोंडात साखर, हृदयात आग आणि डोक्यावर बर्फ’ ठेवून वावरणारे अनेक संघप्रचारक लोकांमध्येे लोकांसारखेच राहून साधेपणाने परिवर्तन कसे घडवितात याची अनेक उदाहरणे पुस्तकात बोलकी होतात.
स्वतंत्र आसामसाठी, स्वतंत्र नागालँडसाठी अल्फा, आसू सारख्या संघटनांच्या विद्रोही मानसिकतेशी लढताना, हत्यासत्र, अपहरण, धमक्यांसारख्या परिस्थितींना शांतपणे हाताळत आपल्या मायभूमीच्या अस्तित्वासाठी धीराने तोंड देणारे संघाचे प्रचारक, स्वयंसेवकांचे प्रयत्न वाचले की, संस्कारांची माणसाच्या व्यक्तिमत्त्वावरील पकड किती मजबूत असू शकते आणि असते याचा साक्षात्कार होतो. सुदूर केरळ प्रांतातील मुरली मनोहर यांचे आसामातील अपहरण, पुणे, महाराष्ट्रातून आलेले प्रमोद दीक्षित यांची हत्या, उत्तर प्रदेशातून आलेल्या ओमप्रकाश चतुर्वेदी व मधु मंगल शर्मांची हत्या अशा कितीतरी धक्क्यांनंतर मूळचे मुंबईचे सुनील देवधर जेव्हा त्रिपुराच्या भाजपा विजयाने प्रसिद्धीच्या झोतात येतात तेव्हा त्यामागे तत्त्वरूप झालेल्या अनेक सेवाव्रतींच्या सेवेची ती पावती असते. अशोक आणि अलका वर्णेकरांसारखे उच्चशिक्षित पती-पत्नी आसामच्या छोट्याश्या गावी जाऊन आपले उर्वरित आयुष्य देशबांधवांच्या प्रगतीसाठी भास्कर संस्कार केंद्र आणि भास्कर ज्ञानपीठाच्या रूपात अर्पण करतात. त्या साधनेस लागणारी विचारांची बैठक, निःस्वार्थाचे सौंदर्य, निग्रहाचे सातत्य ठळकपणे जाणवते. आदिवासींमध्ये राहून, त्यांच्या मुलांना साबण लावून अंघोळ घालण्यापासून ते पौरोहित्य शिकण्यास तयार करणे म्हणजे तपाची फलश्रुती. यातून मिळणारे समाधान असे की तेथील मुले सेवाकार्यात अव्वल आहेत, व्यसनांच्या दूर जात आहेत, शिकून सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहेत. यात जगण्याचे साफल्य मानणारी अशी माणसे अनेकांना ऊर्जा देऊन जातात.
भारतातील स्त्री सक्षमीकरणाचे रंग कायमच वेगळ्या छटांनी रंगले आहेत. मेघालयातील मातृसत्ताक पद्धतीत लिंगभेद हे आव्हान नाही. भारताच्या इतर भागातून येथे सेवाकार्यात समरस झालेल्या ’ईशान्येच्या तेजशलाकां’मध्ये मराठवाड्याच्या राष्ट्र सेविका समितीच्या प्रचारिका सुनीता हळदेकर, जळगावच्या विवेकानंद केंद्राचे काम करणार्या मीरा कुलकर्णी ह्यांनी विपरित वातावरणला तोंड देत सेवाकार्य सुरू ठेवले. आसामात 300च्या वर शाखा सुरू करण्याच्या त्यांच्या प्रवासाची कल्पनाच अचंबित करून जाते. आसामच्या पहिल्या महिला आयपीएस संयुक्ता पराशर, महिला अर्बन को. बँक सुरू करणाऱी लखमी बरुआ, गेंड्याच्या विष्ठेपासून कागद तयार करणारी निशा बोरा, माऊंट एव्हरेस्ट पाच दिवसांत दोनदा सर करणारी अंशु जमसेंपा, दक्षिण कोरियात संशोधक म्हणून काम करणारी स्मृती गुरुंग आदि स्त्रीशक्ती व सक्षमीकरणाची उदाहरणे बनली आहेत. मृत्यूला सोहळा मानून जन्म-मृत्यूला समान समजणारा हा जनजाती समाज तत्त्वज्ञानाच्या बाबतीत देखील आधुनिक दिसतो.
ख्रिश्चन मिशनरींच्या वादळी आव्हानाला तोंड देताना, ईशान्येकडील विषम राजनैतिक व सामाजिक वातावरणातील जनजातीचे पारंपरिक श्रद्धास्थान डगमगू न देणे महाकठीण. परंतु वसंतराव भटांनी हे आव्हान पेलले. भारत सरकारच्या पद्म पुरस्कारांमध्ये ही असंख्य नावे नसली तरी त्याची अशा सेवाव्रतींनी कधीच पर्वा केली नाही. आपले जीवन समाजासाठी समर्पित करीत राहिले.
ईशान्य भारतातील समाज जोडून त्यांच्यातील नवीन पिढीला घडवण्याची जबाबदारी विदर्भातील सक्षम प्रांत घेतात. असे 44 छात्रावास संपूर्ण देशभरात चालतात. मेघालयचा पेड्रिन, जनजातीचा पहिला आयएएस आमस्ट्राँग जेमे, अरुणाचलचा पहिला आयएएस रॉबिन हिबुला हे येथील तरुण पिढीचे यशवंत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात ईशान्य भारताचे योगदान अप्रसिद्ध राहिले. आसामची कनकलता, नागाराणी राणी गाईदिन्ल्यूू, मणिपूरचे टीकेंद्रजीत आदी नावे उर्वरित भारतासाठी अनोळखी राहिलीत.
नागालँडचे नागा, अरुणाचलचे न्यिशी, न्योकुम, मिझोरामचे मिझो, आसामचे बोडो, त्रिपुरातील जमातीया, चकमा, कुकी इत्यादी आदिवासी कला, क्रीडा, तत्त्वज्ञान, श्रद्धा ह्या सगळ्याच बाबतीत अग्रेसर आहेत. पर्यावरणात देवत्व शोधणारे हे भारतीय बांधव आपली स्वतःची ओळख अनेक वर्षे शाबूत ठेवून होते. मात्र आज मतांतरणाच्या घोंगावणार्या वादळात ’नागालँड फॉर क्राइस्ट’ सारख्या परिणामांना सामोरे जात आहेत. बदलणार्या ह्या परिस्थितीत भारताचा सीमावर्ती प्रदेश भविष्यकाळात धोकादायक ठरू शकतो ह्या जाणिवेतून संघाने केलेले तळमळीचे कार्य पुस्तकात ठिकठिकाणी अधोरेखित होते.
पुस्तकात ‘विस्मयकारक मिझोराम’, ‘ऊर्जावान मणिपूर‘, ’साद देणारे अरुणाचल‘ अशा अनेक छटांनी ईशान्य भारत समोर येत वाचकांना भारताच्या अत्यंत संवेदनशील प्रांताची विविध पैलूंनी ओळख करून देतो. ‘भारत मेरा घर‘ सारखे चाललेले समर्पित प्रकल्प ह्या भागांच्या दशा बदलवून विकासाच्या नव्या दिशा दाखवित आहेत. त्यांच्या व्यथा संवेदनशीलतेने भारतीयांनी ऐकाव्यात. त्यांना आर्थिक, सरकारी मदतीची वाट आहेच परंतु त्याचबरोबर त्यांचे चेहरे चीनमधील लोकांसारखे दिसतात म्हणून ‘चीनी’ म्हणून त्यांच्याच देशांत हिणवल्या गेल्याचे दुःखही आहे.
आमचेच बांधव म्हणून आपण त्यांना आपलेसे करणे हा विचार महत्त्वाचा आहे. प्रसिद्धीसाठी हपापलेल्या माणसांचे जग आजूबाजूला सतत ठळक होताना, संघाच्या मुशीतून निघालेली ही रत्ने अतिशय निःस्वार्थ, निर्लेप, समर्पित आणि राष्ट्रभक्त आहेत. ‘निर्माणों के पावन युग में, हम चरित्र निर्माण ना भूले‘ ची शिकवण देणारा संघ आणि संघकार्य देवकार्य मानून आपल्या सेवेची समिधा राष्ट्रनिर्माण यज्ञात अर्पण करणार्या अनेक ज्ञात-अज्ञात प्रचारकांची ओळख पुस्तक करून देते. अवश्य वाचावे या सदरात मोडणारे हे पुस्तक आहे.