विसंवादातून संवादाकडे गोदावरी संवाद-2025

विवेक मराठी    12-Dec-2025
Total Views |
@कौमुदी परांजपे
9405307941

godavari samvad 2025 
सत्य हेच मूळ आहे. सत्याहून मोठे काही नाही आणि सत्य हाच विमर्श याच प्रेरणेतून आयाम, नाशिकने सर्जनशीलता आणि समाज सक्षमीकरणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गोदावरी संवाद! मागील दोन वर्षांप्रमाणे यावर्षी ही नाशिककरांनी ‘गोदावरी संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक उत्कृष्ट आणि सुप्रसिद्ध वक्त्यांना आमंत्रित केले. आयाम, नाशिकच्या व्यासपीठावरून या प्रसिद्ध वक्ते, मार्गदर्शक, सामजिक कार्यकर्ते यांनी व्याख्यानातून आणि चर्चेतून केलेल्या जागराने नाशिककरांना अनेक सत्य विमर्शांची जाणीव करून दिली आहे. गोदावरी नदीच्या किनार्‍यावरून पाहताना असेच जाणवले की, हा विचारप्रवाह असाच अखंड प्रवाहित राहणार आहे.
“संवादेच जायते मैत्री, विसंवादेच जायते शत्रुत्व''
 
जेव्हा संवाद घडतो तेव्हा मैत्री निर्माण होते. विसंवादातून मात्र फक्त आणि फक्त शत्रुत्व उत्पन्न होते. आताची आपली परीस्थिती अशीच आहे ना? आपल्या देशात अनेक विसंवाद आहेत. जातींमध्ये, परिवारांमध्ये, पर्यावरण जागरणासंदर्भात आणि अशा कितीतरी गोष्टींमध्ये. पण या सगळ्यातून काय हाती लागते? समाजात निर्माण होणारी दुफळी. या सगळ्या विसंवादाच्या कोलाहलात खरा संवाद हरवतो. देशासंबंधी जे खरे प्रश्न आहेत त्याकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. समाजातील दुफळी निर्माण करणारे घटक आताच्या तरुण पिढीला भ्रमित करत आहेत. अशावेळी गोदावरी संवाद सारख्या कार्यक्रमाचा विचार होतो, तेव्हा त्यामागची कल्पना काय असते? हो! अशा कल्पनांची सध्या आपल्याला आत्यंतिक गरज आहे कारण या आधारावरच आपली मानसिकता बदलणार आहे. आपली संस्कृती पुन्हा एकदा रुजणार आहे, फुलणार आहे. समाजातील विसंवाद दूर होण्यासाठी आयाम नाशिक सारख्या विचारमंचाची आत्यंतिक गरज आहे. एखादी नवीन कल्पना समाजात रुजविण्यासाठी परिपक्वतेची गरज असते. त्याशिवाय समाज ती कल्पना स्वीकारत नाही. ही परिपक्वता रुजविण्याचे काम आयाम नाशिक करत आहे. या विचारमंथनाचे व्यासपीठ म्हणजे ‘गोदावरी संवाद-2025‘!
 
 
हा कार्यक्रम दिनांक 6 आणि 7 डिसेंबर रोजी नाशिक येथे संपन्न झाला. गोदावरी संवाद कार्यक्रमाच्या समन्वयक शेफाली वैद्य यांनी ‘गोदावरी संवाद’ या नावामागची पार्श्वभूमी त्यात दरवर्षी तरुणांचा मिळणारा वाढता प्रतिसाद आणि पंच परिवर्तनातील स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण आणि नागरी कर्तव्य या पाच बिंदूंची गरज आणि व्यापकता समजावली.
 

godavari samvad 2025 
 
शनिवारी म्हणजेच 6 डिसेंबर 2025 रोजी या कार्यक्रमाची चार सत्रे पार पडली. प्रथम सत्रात ‘कालातीत भारत’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात संशोधक, वक्ता आणि इतिहास तज्ज्ञ निलेश ओक, प्रख्यात लेखिका, भारतीय महाकाव्य संशोधक अमी गणात्रा आणि मेजर (निवृत्त), वक्ता, लेखिका मोहिनी गर्गे यांनी सहभाग घेतला. इतिहास हा फक्त शिकण्यासाठी नसावा त्यातून आपण काय शिकतोय? हे फार महत्त्वाचे आहे. रामायण, महाभारत यांसारख्या ग्रथांतून आपल्याला अनेक जीवन मूल्ये शिकायला मिळतात. मुळात आपले महाग्रंथ हे फक्त धर्मप्रसारासाठी नसून एक परिपक्व विचारसरणी समाजात उत्पन्न व्हावी यासाठी रचलेले आहेत. त्यातील प्रत्येक प्रसंगाची, पात्राची, परिस्थितीची कारणमीमांसा समाजात व्हावी. तरच आपल्या पुढील पिढीला त्यातले सत्य समजेल. आपल्या या संस्कृतीचे जतन करणे हेच पुढील काळात आपले ध्येय असावे. त्यासाठी योग्य आणि सत्य संदर्भ तरुणांपर्यंत जाणे गरजेचे आहे. या चर्चेतून आपल्या महाग्रंथासंदर्भात अनेक तथ्ये या तज्ज्ञांनी समोर आणली.
 
 
दुसर्‍या सत्रात पद्मश्री चैत्राम पवार यांची शेफाली वैद्य यांनी मुलाखत घेतली. विषय होता ‘मातीला प्राण आणि गावाला स्वप्न देणारा अवलिया‘! यात चैत्राम पवार यांनी बारीपाडा या गावात झालेल्या विकासाबद्दल, तिथल्या संघटित समाजाबद्दल, वनसंपदेबद्दल आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने केलेल्या समाज परिवर्तनाबद्दल विस्तृत माहिती दिली. आपले राहणीमान जर साधे असेल तर आपल्या गरजाही मर्यादित रहातात. इतर सजीवांसोबत सहजीवनाचा निश्चय केला की इतर प्राणीमात्रांचा आपल्याला त्रास होत नाही. बारीपाडा येथील आधीची परिस्थिती आणि आताची वनसंपदा यामधला प्रवास खुद्द हे सर्व घडवून आणणार्‍या या अवलियाच्या तोंडून ऐकणे म्हणजे याची देही याची डोळा संतदर्शन झाल्याचा अनुभव श्रोत्यांनी घेतला.
 
 
तिसरे सत्र अतिशय रंजक झाले ते प्रसिद्ध वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या अ‍ॅड. विभावरी बिडवे यांनी घेतलेल्या मुलाखतीने. तशीवळलीीं ढहरीं डहरशिव र छरींळेप - ङरु, ङशसरलू, ङळषश ङशरवशीीहळि या विषयावर अनेक प्रश्नांना उज्ज्वल निकम यांनी अतिशय विस्तृत उत्तरे दिली. मुंबई हल्ला, अतिरेकी कसाबची शिक्षा त्यातून कायद्यातल्या काही उणिवा आणि त्यावर सामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका या सर्वांवर त्यांनी परखड मत व्यक्त केले. आपला हेतू प्रमाणिक असेल तर जगातील कोणतीही केस अवघड नाही, कोणताही पुरावा गोळा करणे अवघड जात नाही. मग तो कसाबचा खटला असो, की कोठेवाडी प्रकरण. मुंबई मधील 26/11 चा भ्याड हल्ला त्यानंतर ती केस निकम सरांकडे येणे, आरोपपत्र दाखल करणे, ती फास्ट ट्रॅकवर न टाकण्यामागची कारणमीमांसा, खटल्याचा निकाल हे सगळे उज्ज्वल निकम यांनी अगदी खुलासेवार स्पष्ट केले. पुढे अबू सालेमचा खटला, त्यातील घडामोडी यावरही प्रकाश टाकला. एकूणच असे संवेदनशील आणि महत्वपूर्ण खटले लढताना बघावे लागणारे बारीक तपशील, त्यामागचा कायद्याचा अथक अभ्यास आणि कमालीचे मानसिक धैर्य याची प्रचिती या मुलाखतीतून आली.
 
 
चौथ्या सत्रात र्उीर्श्रीीींरश्र चरीुळीा थेज्ञशळीा - ऋराळश्रू, ऋरळींह ऋीशशवेा र्ीपवशी ढहीशरीं या विषयावर प्रसिद्ध वैज्ञानिक, जैविकयुद्ध तज्ज्ञ डॉ. मृण्मयी भूषण यांनी जैविक युद्धाचा इतिहास, व्यापकता, भयानकता, कधी कधी आणि कसा त्याचा उपयोग राज्यकर्त्यांनी केला आणि यापुढे या सगळ्या विषयात आपण कसे सजग राहावे हे अतिशय समर्पकपणे सांगितले. याच विषयात पुढे प्रसिद्ध लेखक, अभिनेता, वक्ता दीपक करंजीकर यांनी वोकीझम, मार्क्सवाद त्याचे समाजावरील विपरीत परिणाम इतिहासातील अनेक दाखले देऊन समजावले. सद्यस्थितीत भारत या सगळ्याला किती समर्थपणे तोंड देत आहे हे सांगितले.
 

godavari samvad 2025 
 
रविवारी दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या प्रथम सत्रात सुप्रसिद्ध वक्ते, लेखक डॉ. आनंद रंगनाथन आणि प्रसिद्ध वक्ते व लेखक अभिजित जोग यांचे चर्चासत्र झाले. अतिशय अभ्यासपूर्ण आणि रंजक झालेल्या चर्चासत्रात अनेक महत्त्वपूर्ण आणि ज्वलंत अशा प्रश्नांवर चर्चा झाली. स्वबोध, शत्रूबोध, भारतबोध या विषयांवर चर्चा झाली. आधी स्वबोध झाला तर शत्रूबोध होईल आणि मग त्यातून राष्ट्रबोध होईल हेच सत्य आहे. आपण इतरांना दोष न देता आपल्यातील दोष ओळखावे. आपण दुर्बल होतो म्हणून ते आपल्याला विचलित करतात. भारत कोण होता? आणि आता काय आहे? यावर लक्ष केंद्रित न करता आपण जितक्या लवकर या दोलायमान स्थितीतून बाहेर पडू तेवढ्या लवकर आपले प्रश्न सुटतील. इंग्रज जाऊन इतकी वर्षे झाली तरीही त्यांनी बनविलेले कायदे तसेच आहेत, न्याय व्यवस्था तशीच आहे मग प्रश्न सुटणार कसे? गरज आहे ती लवकरात लवकर हे कायदे बदलले जाण्याची कारण जितक्या लवकर हे होईल तेवढी आपण उत्तम व्यवस्था निर्माण करू शकतो. डॉ. आनंद रंगनाथन आणि अभिजित जोग यांच्या या चर्चेने श्रोत्यांना अक्षरश: खिळवून ठेवले होते.
 
 
दुसर्‍या सत्रात उत्तम आणि अध्यात्मिक वक्ते आचार्य मिथिलेश नंदिनी शरण यांनी ‘अमृत थेंबापासून ते आखाडा परंपरेपर्यंत - सिंहस्थ कुंभमेळ्याचा स्वर्णीम इतिहास’ या विषयावर मार्गदर्शन केले. भारतीय ज्ञानपरंपरेत जन्म-मृत्यू या संकल्पना, मानवी जीवनाचा अध्यात्मिक अर्थ, कुंभ मेळ्याच्या परंपरेची सुरुवात, त्याचा अर्थ, कुंभ मिळविण्यासाठी झालेला संघर्ष या सार्‍याची अत्यंत विस्तृत आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली. आपण भारतीय किती भाग्यवान आहोत ज्यांना धर्माची, वेदांची इतकी समृद्ध परंपरा लाभली आहे. हे व्याख्यान देताना त्यांनी वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता यातले दाखले दिले. यावेळी कुंभ मेळ्यातील आखाडा संप्रदाय यांचीही माहिती दिली.
 
 
तिसर्‍या सत्रात ’घेरलेला भारत’ या चर्चासत्रात दीपक करंजीकर, अभिजीत जोग आणि शेफाली वैद्य यांनी अनेक महत्वाच्या विषयांची चर्चा केली. प्राचीन काळापासून भारत अनेक आक्रमणांनी घेरला होता. इस्लामी आक्रमकांनी मात्र भारताच्या संस्कृतीवर घाला घातला. पुढे इंग्रजांनी तेच केले. भारतीय लोकांची मानसिकता भारतीय राहू नये ही काळजी घेतली गेली. आता भारत जसजसा प्रगती करेल तसतसे त्याला घेरणे वाढणार आहे. अनेक परकीय संस्था देशांतर्गत बाबींमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतील. भारताला आतून पोखरायला सुरुवात होईल. खोटे विमर्श येतील परंतु आपण विचलित न होता प्रबळपणे आणि एक होऊन याला तोंड दिले पाहिजे. म्हणूनच आपण आता अनेक पर्याय शोधत आहोत, आत्मनिर्भर होत आहोत.
 
 
कार्यक्रमाच्या समारोपात राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांना यावर्षीचा स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान प्रदान करण्यात आला, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्यानंतर त्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सामाजिक समरसता या विषयावर अविस्मरणीय कीर्तन झाले. सामाजिक समरसता जर असेल तर समाजात दुफळी निर्माण करणे अवघड आहे. जसे प्रभू श्रीराम वानर सेना, सुग्रीव आणि विभीषण यांच्यातला सेतू झाले. छत्रपती शिवाजी महाराज गागाभट्ट आणि शिवा महाला यांच्यातला सेतू बनले तसेच समाजातल्या विविध जातींमध्ये सेतू निर्माणाचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या रत्नागिरी पर्वात केले. यावेळी आफळेबुवांनी इतिहासातील अनेक दाखले, घटना यांचे संदर्भ दिले. आजच्या पिढीला या सार्‍या आदर्शांचा विसर पडला आहे. त्यांना आपला हा उज्ज्वल इतिहास पुन्हा एकदा नव्याने सांगण्याची गरज आहे. मग ते माध्यम कीर्तनाचे असो की रील्सचे, त्यातून जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.
 
 
सत्यमूलनि सर्वाणि सत्यान्नास्ति परं पदम्॥
 
सत्य हेच मूळ आहे. सत्याहून मोठे काही नाही आणि सत्य हाच विमर्श याच प्रेरणेतून आयाम, नाशिकने सर्जनशीलता आणि समाज सक्षमीकरणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गोदावरी संवाद! मागील दोन वर्षांप्रमाणे यावर्षी ही नाशिककरांनी ‘गोदावरी संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक उत्कृष्ट आणि सुप्रसिद्ध वक्त्यांना आमंत्रित केले. आयाम, नाशिकच्या व्यासपीठावरून या प्रसिद्ध वक्ते, मार्गदर्शक, सामजिक कार्यकर्ते यांनी व्याख्यानातून आणि चर्चेतून केलेल्या जागराने नाशिककरांना अनेक सत्य विमर्शांची जाणीव करून दिली आहे. गोदावरी नदीच्या किनार्‍यावरून पाहताना असेच जाणवले की, हा विचारप्रवाह असाच अखंड प्रवाहित राहणार आहे, पुढील वर्षापर्यंत!!