@सुरेश द. साठे
9822823653
पुस्तकाचे नाव : कोकणातील संघकार्य
प्रकाशक : कोकण विकास प्रतिष्ठान
लेखक : सुरेश दत्तात्रेय साठे
मूल्य : 150
विजयादशमी (दसरा) 1925 पासून विदर्भात नागपूरला संघाचे कार्य सुरू झाले. पूजनीय डॉ. के. ब. हेडगेवार यांनी विदर्भाच्या बाहेर संघविस्ताराचा निर्णय करून काही युवक कार्यकर्त्यांची तशी योजनाही केली. माधवराव मुळ्ये आपल्या मोठ्या बहिणीकडे नागपुरात असताना संघशाखेत नित्य जात असत. पण घरच्या ओढगस्तीच्या परिस्थितीमुळे त्यांना आपल्या गावी कोकणात ओझरखोल येथे येण्याचा आग्रह त्यांची बहीण व नातेवाईकांनी केला. डॉक्टरांनी माधवरावांची मनस्थिती जाणून त्यांना घरच्यांच्या सांगण्याप्रमाणे कोकणात घरी जाऊन व्यवसाय सांभाळत संघकार्य करण्याची सूचना केली.
कोकणात संघकार्य सुरू करण्याचा हा आदेश मानून वयाच्या 21 व्या वर्षी 1932 च्या जून महिन्यात माधवराव ओझरखोल येथे आले. काही दिवस गावी राहून ते मग चिपळूणला आले. चिपळूणातील सोमण यांनी माधवरावांना स्टोन्ह, सायकल, पेट्रोमॅक्स रिपेरींग इ.चे छोटे दुकान सुरू करून दिले. 1932 मध्ये भैरीमंदिराजवळील कन्याशाळेच्या जागेत माधवरावांनी संघाची शाखा सुरू केली. जवळच युनायटेड हायस्कूल होते. तेथील मुलेही या शाखेत येऊ लागली. प्रारंभीचे तीन महिने खेळ, व्यायाम, स्तोत्र म्हणणे असेच कार्यक्रम चालत असत. माधवरावांनी हुतुतू, लंगडी या खेळांबरोबर क्रिकेटही सुरू केले. स्वयंसेवकांची संख्या वाढत गेली. डिसेंबर मध्ये शाखेवर भगवा ध्वज लावून संघ प्रार्थना होऊ लागली. या युनायटेड हायस्कूल येथे दापोली, दाभोळ, गुहागर, खेड, माखजन येथूनही विद्यार्थी शिकायला येत असत. त्यातील काही शाखेवर यायचे. त्यांचाही माधवरावांशी संबंध आला व मैत्री जमली. याचा माधवरावांना पुढे शाखाविस्तारासाठी उपयोग झाला.
दापोली, दाभोळ, गुहागर येथील मित्रांच्या घरी जाण्याचा आनंदही माधवरावांना मिळू लागला. त्यांचे व्यवसायाकडे फारसे लक्ष नव्हते. नाक्यावर बसायला सुरक्षित जागा हवी, याच मर्यादित हेतूने हा व्हल्कनायझींगचा व्यवसाय करीत होते. अर्थप्राप्तीपेक्षा मित्रपरिवार जोडण्यातच त्यांना समाधान मिळत असे. अंतू चितळे, दत्तू बापट, सदू पांचाळ, भास्कर चितळे, सदू गुरव, वामन पालांडे, शिवराम मुरकर, विठ्ठल शिर्के, नाथा बेडेकर, विनायक साठे, मधुकर बर्वे असे शालेय विद्यार्थी हाताशी धरून त्यांनी संघशाखा स्थिर केली.
माधवरावांना व्यावसायिकांसाठी स्वतंत्र शाखा सुरू करण्याची कल्पना सुचली. या सर्वांना सकाळची वेळ सोयीची वाटली. कारण काही तरुण व्यवसायी व नोकरदार सकाळचा व्यायाम करतात हे माधवराव पाहात असत. सहस्त्रबुद्धे मास्तर, साठे वकील इ.शी चर्चा करून 28 फेब्रुवारी 1933 मध्ये चिपळूणात माधवरावांनी पहिली प्रभात शाखा सुरू केली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. डिसेंबर 1933 मध्ये माधवराव रत्नागिरीस गेले. तेव्हा तेथे समतानंद गद्रे आणि स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर यांची भेट झाली. डॉ. हेडगेवारांनी सुचविल्याप्रमाणे आपण चिपळूण व अन्यत्र संघशाखा सुरू करीत असल्याचे त्यांनी सावरकरांना सांगितले. तात्यारावांनाही हे ऐकून समाधान वाटले. माखजन, चिपळूण, गुहागर, दापोली भागांत शाखा काढण्यास कोणतीच अडचण येणार नाही, असे सावरकरांनीही म्हटले. माधवरावांच्या तडफेचे कौतुक करून समाज कार्यकर्ते भागोजीराव कीर यांनी केले. समतानंद गद्रे यांच्या झुणकाभाकर मोहिमेचे एकूण काम माधवरावांना या रत्नागिरी भेटीत पाहायला मिळाले. अवघ्या बावीस वर्षांचा हा युवक पूर्ण विश्वासाने संघाच्या आवश्यकतेविषयी ठामपणे बोलतो याचेच सर्वांना कौतुक वाटे.
बाबाराव सावरकर, लोकनायक बापूजी अणे, न. चिं. केळकर, डॉ. मुंजे, डॉ. हेडगेवार यांच्याबद्दल केसरी, नवाकाळमध्ये छापून येत असे. हे लोकांनी वाचले होते. तसेच या सर्व क्रांतिवीरांबद्दल ऐकलेही होते. या सर्वांचा संघाला आशीर्वाद असल्याचे ऐकून लोकांना संघाबद्दल ओढ उत्पन्न होणे अगदी स्वाभाविक होते. देशभक्तांचे संघटन उभे करण्याचा उद्देश माधवरावांनी सर्वांसमोर ठेवला. संघ हा जातीय नाही व राजकीय नाही, हे डॉक्टरांनी सांगितलेले महत्त्वाचे ब्रीदवाक्य माधवरावांनी नीट लक्षात ठेवले होते. त्याचाच उच्चार त्यांनी केला व अधिकाधिक बाल-युवकांना एकत्रित करण्यास प्रारंभ केला.
चिपळूणात संघशाखा सुरू झाल्या व फेब्रुवारी 1933 मध्ये एक प्रभात शाखाही सुरू झाली हे डॉक्टरांना समजल्यावर त्यांनी चिपळूणला भेट दिली. समवेत बाबाराव सावरकर होते. या वेळी डॉक्टरांना भेटावयाला चिपळूणातील काँग्रेसचे तसेच हिंदुमहासभेचे कार्यकर्तेही आले होते. डॉक्टरांनी संघस्थापनेमागील भूमिका समजावून सांगितली. हिंदुस्थानला स्वतंत्र करण्यासाठी सर्वांनीच एकवटून प्रयत्न करणे जरुरीचे असल्याचे ते म्हणाले. आपल्या मातृभूमीला सन्मानाने पुन्हा सुस्थितीत नेण्यासाठी चारित्र्यवान, धैर्यवान तरुण पिढीही आपण उभी केली पाहिजे. त्यासाठी स्वदेशी, स्वावलंबन, स्वभाषा, स्वधर्म या सर्वांचे संस्कार करणे अगत्याचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. म्हणूनच नागरिकांनी रोज आपली मुले या शाखेत पाठवली पाहिजेत, असे आवाहन केले.
या भेटीमुळे माधवरावांना फार मोठा दिलासा मिळाला. काम करण्याला हुरूप आला. पुढे माधवरावांनी गुहागर, दाभोळ, माखजन, खेड, लवेल, चिपळूण, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, देवगड, राजापूर येथेही शाखा सुरू केल्या. अनेक स्थानिक युवक तयार केले. 1940 पर्यंत दापोली ते सावंतवाडी पर्यंत शाखा सुरू झाल्या. माधवरावांचा साधारणतः 1935 च्या मध्यावर महाड, श्रीवर्धन, रोहा, पेण, पनवेल असा प्रवास झाला. तेथील मंडलिक, ठोसर, लिमये, भावे, मालुसरे, मोरे, सावंत, धारप वकील, पुरोहित, धारिया, डोंगरे, डॉ. चितळे, दोशी वकील, गोरेगावचे गोखले, मुरुडचे दांडेकर, दिवेआगरचे बापट, ओजाळे इत्यादी मंडळी त्यांना भेटली. संघाच्या कामाविषयी त्यांनाही आस्था वाटू लागली. पुढे त्यातील काहींनी रायगड जिल्ह्यातील संघविस्तारालाही हातभार लावला.
माधवरावांनी विविध उपक्रम, कार्यक्रमांद्वारे बाल-किशोर- युवकांना आपलेसे केले आणि संघात स्थिर केले. अगदी अल्प काळात त्यांनी 20 स्थानी शाखा सुरू केल्या. या शाखांची जबाबदारी सांभाळणारे तरुण व पालकत्व स्वीकारणारी ज्येष्ठ मंडळी उभी केली. 1938 मध्ये महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आले. घरांचे, दुकानांचे व बागायती शेतीचे अतोनात नुकसान झाले. माधवरावांनी संघाच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र काम केले. रत्नागिरीचे मोरोपंत जोशी यांनी त्यांच्या बलवंत साप्ताहिकात तसेच खाडिलकरांच्या नवाकाळने, पुण्याच्या केसरीने या पूरग्रस्त मदतकार्याबद्दल संघाची स्तुती केली होती. या नैसर्गिक आपत्तीच्या विमोचनार्थ आपलेपणाने झटणार्या संघस्वयंसेवकांच्या वृत्तीचे समस्त कोकणवासियांना विशेष कौतुक वाटू लागले. डॉक्टरांपर्यंत माधवरावांच्या कार्यकर्तृत्वाची वार्ता गेली. डॉक्टरांना कोकणात जाऊन संघकार्य स्थिर झालेले पाहण्याची ओढ लागली आणि 1937च्या फेब्रुवारी महिन्यात डॉक्टर व सांगलीचे काशीनाथपंत लिमये या उभयतांनी चिपळूणला भेट दिली. येथे झालेल्या बैठकीत पुरुषोत्तम नीलकंठ तथा अप्पा साठे वकील यांची चिपळूणच्या संघचालकपदी नियुक्ती केली. पुढे अप्पा कोकण विभाग संघचालक झाले. इस्लामपूरहून बारदानाच्या व्यवसायासाठी आलेले प्रेमजीभाई आसर, खवटीचे भोसले, खोपडचे शिर्के, धामणंदचे पालांडे, दहिवलीचे घाग, चिपळूणचे मोरेश्वर जोशी, नाना देशमुख, खेरशेतचे माधव केळकर, मापातले तांबट, शंकर गांधी, मामा मोडक, कानडे मास्तर, पागेवरचे रानडे, मोरवण्याचे पुरुषोत्तम तांबे अशा अनेकांशी परिचय झाला. मधुकर बर्वे, अण्णा चितळे, दत्तोपंत व त्यांचे बंधू बापू बापट आणि यातच माधवराव यांचा परस्परांशी स्नेह पाहून डॉक्टरांना भरून आले व ते म्हणाले, नागपूर, वर्धा यानंतर मी खरा संघ इथे पाहतो आहे.
1940पर्यंत कोकणात 45स्थानी शाखा चालू झाल्या. 1937 ते 1940पर्यंत सहा तरुण प्रचारक म्हणून सावंतवाडी ते रोहा गावापर्यंत महत्त्वाच्या स्थानी पूर्णवेळ काम करू लागले. कोकणात 1943पासून नियमित प्रचारक संघकार्यार्थ येत आहेत. आज अखंड रत्नागिरी जिल्ह्यात 1000पेक्षा अधिक गावांत संघ पोचलेला आहे. स्थानिक कार्यकर्ते संघाच्या विविध उपक्रमांना गती देत आहेत. सुमारे 125चे वर आजवर प्रचारक, विस्तारक म्हणून या भागात कार्यप्रवृत्त झाले आहेत. कोकणातील राजकारण, सामाजिक संघटना, संस्था, सांस्कृतिक कामे, शैक्षणिक संस्था, मंदिर व्यवस्थापन, वाचनालये, उद्योग-व्यापार, शेती-बागायती आदी सर्वच क्षेत्रांत मोठ्या संख्येने जागोजागी संघ परिवार सक्षमपणे कार्यप्रवण आहे. समाजाच्या सर्व स्तरांत संघस्वयंसेवक क्रियाशील आहेत. कोकणातील जनमानसावर संघविचाराचा प्रभाव निश्चितच अनुभवाला येतो. तळागाळातही निष्ठावान कार्यकर्ते आढळतात.
कोकण भौगोलिकदृष्ट्या तसा डोंगराळ भाग आहे. एकीकडे सह्याद्री डोंगराचा उंचवटा तर दुसरीकडे अथांग सागर! गावागावातील वाड्या (वसत्या) एकमेकांपासून अंतरावर आहेत. प्रवासाची साधने मर्यादित आहेत. पावसाळ्यात नाले भरून वाहतात. अशा या गावांतून प्रवास करून संघशाखा चालविणे, धार्मिक स्थानांमध्ये कार्यक्रम घडवून आणणे बरेच कठीण असते. पंचक्रोशीचे काही मेळावे, समारंभ योजावयाचे तर बरीच मेहनत करावी लागते. तरीही गेली 92 वर्षे स्थानोस्थानी संघपोषक कार्य नियमितपणे चालू आहे. हिंदुत्वाचा जागर हे या कोकणाचे वैशिष्ट्य आहे. शिमगा, गणेशोत्सव हे मोठे सण उत्साहात साजरे होतात तसेच गावातील मंदिरात नाम सप्ताहही होतात. सर्वसाधारण व्यक्ती गरीब आहे पण त्यांच्या मनाची श्रीमंती ठायी ठायी आढळते. याच भूमीतून महर्षी कर्वे, पा.वा. काणे, लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकर, वीर सावरकर, रँग्लर परांजपे, बाळशास्त्री जांभेकर, अप्पासो पटवर्धन, श्रीमंत भागोजी कीर, समतानंद गद्रे, कर्नल जगन्नाथराव भोसले अशी सर्व समाजाला ललामभूत ठरणारी नररत्ने लाभली. पूजनीय श्रीगुरुजी, माधवराव मुळ्ये, एकनाथजी रानडे, लक्ष्मणराव भिडे, तात्या बापट, वसंतराव ओक, नामदेव घाटगे, भाली सातर्डेकर, श्रीकृष्ण भिडे, नाना पालकर, श्रीकांतजी जोशी, शिवरामपंत जोगळेकर, गजानन बापट, श्रीराम साठे, अनंतराव काळे, रामभाऊ बोंडाळे, केशवराव दीक्षित या सर्व आयुष्यभर संघकार्य करणार्या प्रचारकांच्या पूर्व पिढीतील ज्येष्ठ कुटुंबीय याच कोकणातले होते. संघकार्यासाठी आयुष्य वेचण्याची थोर परंपरा आजही जपली जात आहे. हे विचारधन जपण्याचा प्रयत्न कोकणातील संघकार्याची 92 वर्षांची वाटचाल या ग्रंथ प्रकाशनात झाला आणि त्याचे विमोचन गत महिन्यात घटस्थापनेचे दिवशी अ. भा. कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांचे हस्ते चिपळूणात एका समारंभात झाले.