सावरकर पुतळ्याच्या निमित्ताने...

विवेक मराठी    17-Dec-2025   
Total Views |
@अक्षय जोग
नुकताच अंदमानमधील सावरकरांच्या ज्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तो आतापर्यंतचा सावरकरांचा अंदमानातील चौथा पुतळा आहे. या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मोदी सरकारमधील मोठे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतात याला एक वेगळे महत्त्व आहे. यातून एक गोष्ट अधोरेखित होते की, विद्यमान सरकार हे सावरकर विचार मानणारे आहे. सावरकरांचा आदर करणारे सरकार आह. हे या सरकारने आपल्या कृतीतून वेळोवेळी आणि उघडपणे दाखवून दिले आहे.

savarkar
 
नुकतेच अंदमान-निकोबारमधील श्रीविजयापुरम (पूर्वीचे पोर्ट ब्लेअर) मधील बियोदनाबाद येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे.
 
 
हा काही अंदमानमधील सावरकरांचा पहिला पुतळा नाही. सेल्युलर कारागृहासमोर वीर सावरकर पार्क आहे, तिथे विनायक दामोदर सावरकर, इंदुभूषण रॉय, बाबा भान सिंह, पंडित राम रखा, महावीर सिंह, मोहन किशोर नामदास, मोहित मोइत्रा या काही क्रांतिकारकांचे पुतळे आधीपासून आहेत. अंदमानमधील वीर सावरकर विमानतळाच्या येथे एक अर्धपुतळा होता आणि आता 2023 मध्ये वीर सावरकर विमानतळावरच सावरकरांचा भव्य पूर्ण पुतळा उभारण्यात आला आहे. म्हणजे अंदमानमधील हा सावरकरांचा चौथा पुतळा आहे. आताच्या सावरकर पुतळा अनावरण कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि मोदी सरकारमधील मोठे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतात याला एक वेगळे महत्त्व आहे.
 
 
2004 मध्ये ’की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने’ हे सावरकरांचे वाक्य असलेला फलक ’स्वातंत्र्यज्योत’ स्वरूपात सेल्युलर कारागृहात वाजपेयी सरकारमधील भाजपाचे तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या पुढाकाराने उभारण्यात आला होता. नंतर 2004 मध्येच सत्तापरिवर्तन झाले आणि काँग्रेसचे तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणीशंकर अय्यर यांनी फलक काढून टाकला आणि सावरकरांवर टीकादेखील केली होती. नंतर बारा वर्षांनी 2016 मध्ये मोदी सरकारने पुन्हा तो फलक ’स्वातंत्र्यज्योत’ स्वरूपात सेल्युलर कारागृहात लावला. म्हणजे आम्ही सावरकरांना मानतो, त्यांचा आदर करतो हे या सरकारने आपल्या कृतीतून वेळोवेळी आणि उघडपणे दाखवून दिले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी पोर्ट ब्लेअरचे श्रीविजयापुरम, रॉस बेटाचे नेताजी सुभाषचंद्र बोस व्दीप, हॅवलॉक बेटाचे स्वराज द्वीप आणि नील बेटाचे शहीद द्वीप असे नामांतर करण्यात आले आहे. आधीची जी नावं होती ती ज्यांनी भारताला पारतंत्र्यात ठेवले, गुलामगिरीत ठेवले, भारतीय जनतेवर अत्याचार केले, भारताला लुटले त्यांनी ठेवलेली किंवा त्यांच्या अधिकार्‍यांवरून ठेवलेली नावे होती. म्हणजे ही नावे एकप्रकारे वसाहतवादाचे प्रतिकच होती. भारत 1947 मध्ये स्वतंत्र होऊन देखील ही नावे तशीच ठेवण्यात आली होती. पण इतक्या वर्षांनी का होईना ही नावे बदलणे म्हणजे वसाहतवादाच्या उरल्यासुरल्या खुणा पुसून Decolonization (वसाहतवादमुक्ती)च्या दिशेने देश वाटचाल करत असल्याचे द्योतक आहे.
 

savarkar 
 
आणखी दुसर्‍या अर्थाने देखील या घटनेला महत्त्व आहे. ते म्हणजे सावरकर जेव्हा याच अंदमानमधील सेल्युलर कारागृहात जन्मठेप भोगत होते, तेव्हा सेल्युलर कारागृहातील कोलूसारख्या भयानक अमानवी शिक्षा आणि हालअपेष्टांमुळे आधीच शारीरिक आणि मानसिकरित्या राजबंदी खचलेले असत. त्यात तेथील क्रूर जेलर बारी नेहमी राजबंदींचा अपमान करून त्यांचे अजून मानसिकरित्या खच्चीकरण करत असे. त्यांच्या मनातील देशप्रेम, देशभक्ती नष्ट व्हावी यासाठी बारी नेहमी प्रयत्नशील असे. त्याच्या याच जाचामुळे इंदुभूषण रॉयसारख्या राजबंदीने छळ असह्य होऊन आत्महत्या केली होती.
 
ने मजसी ने परत मातृभूमीला.....गीतरचना दिनांक तपशील

दरवर्षी 10 डिसेंबरला असा मेसेज फिरत असतो की, सावरकरांनी दि. 10 डिसेंबर 1909 ला ’ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे गीत रचले. पण हा दिनांक चुकीचा आहे. धिंग्रा प्रकरण, स्वतःवर कोसळलेली अनेक संकटे यामुळे सावरकरांच्या प्रकृतीवर परिणाम झाला, त्यामुळे वायुपालट म्हणून सावरकर दि. 29 जुलै 1909 ब्रायटनला गेले आणि तिथे ते 10-12 दिवस राहिले होते. (संदर्भ: करंदीकर, शिवराम लक्ष्मण. सावरकर-चरित्र, प्रकाशक- शिवराम लक्ष्मण करंदीकर, पुणे, पुनर्मुद्रण, 1947, पृष्ठ 285 आणि जोशी, विष्णु श्रीधर. क्रांतिकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, मुंबई, 1985, पृष्ठ 284.) या 10-12 दिवसांतच एके दिवशी ते बिपिनचंद्र पाल यांचा मुलगा निरंजन पाल यांच्यासह ब्रायटनच्या सागर किनार्‍यावर फिरायला गेलेले असताना सावरकरांना ’ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ हे अजरामर काव्य सुचले. म्हणजे या काव्यरचनेचा निश्चित दिनांक ज्ञात नसला तरी महिना ज्ञात आहे आणि हा महिना डिसेंबर नसून जुलै शेवटचा आठवडा किंवा ऑगस्ट पहिला आठवडा आहे.
 
 
एकदा असेच बारी राजबंदींना खूप अपमानस्पद बोलला. आता पुन्हा कोणी या मानसिक खच्चीकरणामुळे आत्महत्या करू नये म्हणून त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक होते. स्वतः सावरकरांनी अनादी मी, अनंत मी हे कवचमंत्रासारखे काव्य रचून आपले मनोबल खंबीर राखले होते. तेच सावरकर या बारीच्या बोलण्याने अजून मनोबल ढासळलेल्या राजबंदींना धीर द्यायला पुढे आले आणि म्हणाले, तुम्ही धीर खचू देऊ नका. आज आपण परवश आहोत. आज आपला या जगतात अपमान होईल. पण असाही एक दिवस क्वचित येईल की, अंदमानच्या याच कारागारात राजबंदींचे पुतळे उभारले जातील आणि येथे हे राजबंदी राहत असत म्हणून हजारो लोक यात्रेस लोटतील! (संदर्भ: समग्र सावरकर वाड्मय- खंड 2, संपादक - बाळाराव सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई, पृष्ठ क्रमांक 129.) आणि आज सावरकरांचे ते वाक्य तंतोतंत खरे ठरत असल्याची प्रचिती येतेय. आज तिथे सावरकरांसह देशस्वातंत्र्यासाठी यातना भोगलेल्या देशभक्तांचे पुतळे उभारले जात आहेत आणि भाविक जनता जशी धार्मिक तीर्थयात्रेला जाते तशीच देशप्रेमी जनता अंदमानमधील सेल्युलर कारागृहाच्या राष्ट्रीय तीर्थयात्रेला जात आहे.
 
 
तसेच सावरकरांना जेव्हा 50 वर्षांच्या दोन जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांना जन्मठेप भोगण्यासाठी अंदमानला धाडण्यात आले, तेव्हा अंदमानमध्ये पाऊल ठेवताच त्यांच्या मनात 50 वर्षांच्या दोन जन्मठेपेमुळे स्वाभाविकपणे येणारी निराशा, दु:ख, राग, वैफल्यता असे काहीही विचार न येता, त्यांच्या मनात विचार आला की, अंदमान बेट हे नैसर्गिक संरक्षक तट असून इथे स्वतंत्र भारताच्या नावीक दलाचा तळ असायला हवा. डोळ्यांसमोर 50 वर्षांची जन्मठेप असताना सतत देशाचा विचार करणार्‍या सावरकरांच्या मनात स्वतंत्र भारताच्या सुरक्षेचा विचार आला, कारण त्यांना निश्चिती होती की, त्यांना 50 वर्षांची जन्मठेप झालेली असली तरी 50 वर्षे ब्रिटिशांचे राज्यच भारतावर राहणार नाहीये; आपले शूर भारतीय त्याआधीच भारताला स्वतंत्र करतील आणि झालेही तसेच. अशा दूरदृष्टीच्या सावरकरांना अंदमानमध्ये पुतळा उभारून मानवंदना देणे, कृतज्ञता व्यक्त करणे हे नक्कीच प्रशंसनीय आहे.
 
 
 
 
 

अक्षय जोग

सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद, भारतीय स्वातंत्र्यलढा व क्रांतिकारक ह्या विषयाचे अभ्यासक. www.savarkar.org संकेतस्थळाच्या कार्यात सहभाग. विश्व संवाद केंद्र, पुणे कार्यकारिणी सदस्य.