‘देआसरा फाउंडेशन’ उद्योजकतेच्या प्रवासातला सच्चा मित्र!

विवेक मराठी    17-Dec-2025
Total Views |
- अजय कौटिकवार
डिजिटल एडिटर, यशस्वी उद्योजक
 
 
deAsra Foundation
 
देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ
 
उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्यासाठी मदत करणं आणि त्यातून नवे रोजगार निर्माण करणं.
 
 
ज्या समाजाने आपल्याला दिलं, त्या समाजासाठी सुध्दा आपण काहीतरी देणं लागतो अशा भावनेतून सामाजात व्यापक प्रभाव पडेल, बदल घडेल असं काम करण्याचा निर्णय डॉ. आनंद देशपांडे यांनी वयाच्या 50व्या वर्षी घेतला आणि क्षेत्र निवडलं उद्योजकतेचं.डॉ. आनंद म्हणतात, चांगलं काम करायला निवृत्त होण्याची वाट पाहायची नसते, हे मी बिल गेट्स कडून शिकलो. लोकसंख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यात तरुणांची संख्या सर्वात जास्त. त्यांच्या हाताला काम पाहिजे. त्यासाठी जॉब्सची गरज आहे. सरकार आणि मोठ्या कंपन्या जॉब्स देतात. पण गरज एवढी जास्त आहे की, त्यांनाही मर्यादा येतात. सर्वात जास्त जॉब्स तयार होतात ते छोट्या उद्योगांमध्ये. त्यामुळे देआसरा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही रोजगारनिर्मिती करणार्‍या छोट्या उद्योगांना मदत करण्याचा उपक्रम घेतला आहे. साधारणपणे 1 कोटीपर्यंतच्या उद्योगांना देआसरा मदत करतं.
 
 
आकडेवारी जर बघितली तर असं लक्षात येतं की, भारतात रजिस्टर केलेल्या 95 टक्के उद्योगांमध्ये 20 पेक्षा कमी कर्मचारी आहेत आणि त्यातले जवळपास 60% कर्मचारी अशा छोट्या उद्योगांमध्ये आहेत. पण त्यांच्यासाठी दुर्दैवानं फारसं कुणी काही करत नाही. अशा छोट्या उद्योजकांसाठी देआसरा फाउंडेशन काम करतं. गेल्या काही वर्षात चार लाखांपेक्षा जास्त लोक देआसराच्या प्लॅटफॉर्मवर आलेत. या सर्व लोकांना त्यांच्या गरजेनुसार देआसराने मदत केली किंवा त्यांनी देआसराच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मदत घेतली. देआसरामुळे उद्योजकांची भरभराट झाली, नवे रोजगार निर्माण झाले. संपत्ती निर्माण झाली, नवे रोजगार निर्माण करण्यात आम्ही हातभार लावू शकलो, ही खूपच समाधान देणारी गोष्ट आहे. पैशांमधून संपत्ती निर्माण होते आणि संपत्तीमधून संपन्नता निर्माण होते.
 
 
deAsra Foundation
 
देआसरा फाउंडेशन नेमकं काय करतं?
 
 
या उद्योगांना नेमकी कशाची गरज आहे? त्यांना काय पाहिजे? याचा देआसराच्या टीमने सखोल अभ्यास केला. या उद्योजकांना ज्या गोष्टींची जास्त गरज असते अशी 80 ते 100 कारणं त्यांनी शोधून काढली. त्यावरची उत्तरं शोधली आणि एक सिस्टिम तयार केली.
 
 
या उद्योजकांना मुख्य गरज असते ती
 
नव्या संधी
 
सुलभ कर्ज
 
ग्राहक मिळवणं
 
आणि मार्केटशी जोडून घेणं
 
आपण एक उदाहरण पाहू या. समजा, एखाद्या तरुणाला नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्यासमोर पहिला प्रश्न असतो की, आपल्या डोक्यात असलेले बिझनेस आयडिया योग्य आहे की नाही. कर्ज कसं मिळवायचं, त्यासाठी काही लायसन्सेस हवे असतात ते कसे काढायचे, भांडवल कसं उभारायचं? असे अनेक प्रश्न असतात. अशा तरुणाने जर मदतीसाठी देआसराशी संपर्क साधला तर देआसरा त्याला या प्रवासात सर्व टप्प्यांवर मदत करते. बिझनेस प्लान तयार करण्यापासून ते सोशल मीडिया मार्केटिंग कशी करावी इथपर्यंत प्रत्येक टप्प्यावर उद्योजकला इथे मदत मिळते.
 
टीमवर्क
 
त्यासाठी देआसराकडे 40 जणांची एक टीम आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी देआसराने आपल्यासोबत जोडलेली आहे. ते एक्सपर्ट उद्योजकांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर एखाद्या उद्योजकाची उलाढाल वर्षाला 20 लाख आहे आणि ती त्याला 1 कोटींवर न्यायची असेल तर त्याला एका ग्रोथ प्लान आणि स्ट्रॅटेजीची गरज असते. त्यासाठी सुद्धा देआसरा त्याला संपूर्ण मदत करते.
 
 
 
डिजिटल प्लॅटफॉर्म
 
कोविडच्या दोन वर्षात सर्वच क्षेत्रात प्रचंड बदल झाले. हाच बदल लक्षात घेऊन देआसराने आपल्या सर्वच सिस्टिम्स डिजिटल केल्यात. त्यामुळे देआसराच्या कामाची पोहोच देशभर वाढली. देशातल्या कुठल्याही कोपर्‍यातून आता देआसराशी कनेक्ट होता येतं, मदत मिळवता येते. याबाबतची सगळी माहिती www.deasra.in या वेबसाईटवर उलब्ध आहे. तिथे जावून देआसरा सोबत तुम्ही कनेक्ट होऊ शकता.
 
कौशल्य शिका
 
डिजिटल होतानाच देआसरा फाउंडेशनने उद्योजकांसोबतचा थेट संपर्क सोडलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशभर उद्योजक मेळावे, लोन रेडीनेस कार्यशाळा, लायसन्स काढून देण्याचे ड्राईव्ह, असे अनेक उपक्रम देआसरा राबत असतं. त्याचा शेकडो उद्योजकांना फायदा मिळतो. उद्योग करताना अनेक स्किल्सची सुद्धा खूप गरज असते जसं की कॅशफ्लो मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट, सोशल मीडिया मार्केटिंग, गुगल बिझनेस, एचआर संबंधित गोष्टी अशा सगळ्यांसाठी देआसरा कायम ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्यशाळा घेत असते.
 
Dream Big
देआसरा सतत नवं नवे प्रयोग करत असतं. बदलती गरज, आधीचा अनुभव, त्यामुळे मिळालेले धडे अशा सगळ्या अनुभवांची गोळाबेरीज करून या प्रयोगांना आकार दिला जातो. व्यवसाय करत असताना एका टप्प्यावरून दुसर्‍या टप्प्यावर झेप घेण्यासाठी थोड्या नव्या व्हिजनची गरज असते. सध्याची चौकट मोडून नवी चौकट तयार करावी लागते. यालाच आम्ही म्हणतो Dream Big म्हणजेच मोठी स्वप्न पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घ्या. या प्रोजेक्टमध्ये उद्योजकांना नवी झेप घेण्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील यासाठी देआसरा सध्या मदत करतेय. या सगळ्या संदर्भातले उत्तम पॉडकास्ट देआसराच्या या 
www.deasra.inया वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळतील.
 
 
‘यशस्वी उद्योजक’
‘यशस्वी उद्योजक’ (www.yashaswiudyojak.com)हा देआसराचा डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्म आहे.‘यशस्वी उद्योजक’ हे फेसबुक, इन्स्टाग्राम, YouTube, एक्स( ट्विटर) वरही उपलब्ध आहे. यात उद्योजकांच्या यशोगाथा, त्यांच्या मुलाखती, पॉडकास्ट अशा खूप गोष्टी असतात. माझी तुम्हाला विनंती आहे की, ‘यशस्वी उद्योजक’ तुम्ही सबस्क्राईब करावं. एवढच नाही तर तुम्ही त्यासाठी स्टोरीज सुद्धा देऊ शकता. त्यात सहभागी होऊ शकता.
 
 
इन्सपायर
 
उद्योजकतेची प्रेरणा ही नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, त्यांचा माइंडसेट हा उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप्स यांच्याविषयी अनुकूल व्हावा, नोकरी करत असताना सुद्धा त्यांनी अधिक व्यावसायिक पद्धतीने काम करावं या हेतूने देआसराने कॉलेजच्या मुलांसाठी खास ‘इन्सपायर’ हा उपक्रम तयार केलाय. महाराष्ट्रातल्या अनेक कॉलेजेस, आयटीआयमध्ये हा उपक्रम सुरू आहे आणि त्याला विद्यार्थ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. हा उपक्रम सतत सुरू राहावा यासाठी देआसरा त्या कॉलेजमधल्या शिक्षकांनाही खास प्रशिक्षण देतं. त्यामुळे ही शिक्षक मंडळी दरवर्षी आपल्या मुलांना त्या सगळ्या गोष्टी शिकवू शकतील आणि त्यात सातत्य सुद्धा राहील. हे सगळं ज्ञान फक्त आपल्यापुरतीच ठेवायचं ही देआसराची भावना नाही. एका संस्थेवर ते अवलंबून न राहाता एक सिस्टिम तयार करण्यावर देआसराचा कायम भर राहिला आहे.
 
संस्थांचं नेटवर्क
उद्योजकतेच्या कामात सर्वांनी एकत्र येत, मिळून पुढे जावं, आपल्या अनुभवांचं आदान-प्रदान व्हावं यासाठी देआसराने देशभरात उद्योजकता आणि त्याच्याशी संबंधित काम करणार्‍या विविध सामाजिक संस्था, संघटना, सरकारी संस्था यांच्याशी जोडून घेतलं आहे. देशपातळीवर अशा 150 पेक्षा जास्त संस्थांसोबत देआसरा आज काम करते आहे. त्याचा परिणाम म्हणजे समविचारी आणि समआचारी संस्थांचं एक मोठं नेटवर्क आज देशभरामध्ये तयार झालं असून अनेक उपक्रम सुरू आहेत.
 
देआसरा पुरस्कार
 
छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी देआसरा फाउंडेशन दरवर्षी पाच उद्योजकांना देआसरा पुरस्कार प्रदान करते. उद्योग क्षेत्रात हे पुरस्कार अतिशय प्रतिष्ठेचे समजले जातात. तज्ज्ञांची पुरस्कार समिती या पुरस्काराची निवड करते आणि पुण्यात एका दिमाखदार समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जातात. पुण्यातल्या सांस्कृतिक क्षेत्रातला हा एक मोठा कार्यक्रम असतो.
 
 
उद्योजकता विकास, नवी रोजगार निर्मिती हे काही एखादी फक्त सरकार, संस्था, व्यक्ती किंवा संघटनेचं काम नाही. त्यासाठी सगळ्यांची मदत हवी आहे. तुमच्या मदतीचं, सहकार्याचं, मार्गदर्शनाचं आणि योगदानाचं कायम स्वागत आहे.