बांबू , सृष्टी आणि दृष्टी

विवेक मराठी    20-Dec-2025
Total Views |

डॉ. हेमंत बेडेकर
9767200905
जगामध्ये सर्वांत जास्त बांबू क्षेत्र हे आशियामध्ये आहे. आशियात एकूण बांबू क्षेत्रापैकी सर्वार्ंत जास्त क्षेत्र भारत आणि चीनमध्ये आहे. भारतातील जम्मू-काश्मीर व लडाख हा प्रदेश सोडला तर बाकी सर्व प्रांतामध्ये बांबू विविधता आढळते. आपल्या देशात बांबू आणि बांबू उद्योग यांचे जर गावोगावी जाळे विणले गेले तर खेड्यांमध्ये अधिक चांगले वातावरण निर्माण होऊन असंख्य हातांना काम मिळेल. असे झाले तर आपल्या देशाच्या आर्थिक विकासात उल्लेखनीय भर पडेल.

bamboo
 
आपण या आधीच्या लेखात बांबू समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आता या भागात भारत आणि चीन याबरोबर जगाच्या इतर भागात काय परिस्थिती आहे ते पाहू.
 
 
बांबूच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे त्याला लाकूडसदृश गवत असेही म्हटले जाते. ते आहे गवत पण, फुले लवकर येत नाहीत. गवतासारखे वार्षिक फुले येण्याचा गुणधर्म त्यात नाही. काही गुणधर्म लाकडासारखे आहेत. फुलोर्‍यावर येण्याचा कालावधी हा प्रजातीनुसार बदलतो. फुले आल्यानंतर सहसा झाड किंवा बेट मरते, पण काही प्रजातीत दरवर्षी फुले येऊनही बेट मरत नाही. फुले येण्याचा कालावधी हा एक वर्षपासून ते 100 वर्षार्ंपर्यंत असू शकतो. काही प्रजातीत फुले येऊनही बी धरत नाही. त्यामुळे त्या बेटातून वर्षानुवर्षे बांबू मिळत राहतात. उदाहरणार्थ, सह्याद्रीत वाढणारे मेस, माणगा आणि त्यांचे उपप्रकार. कुडाळजवळील कसालच्या राणे गुरुजी आणि कोकणातील असंख्य बांबू उत्पादकांनी हे अनुभवले आहे.
 
 
असा हा बहुगुणी बांबू. हा तर नारळासारखा कल्पवृक्षच आहे. मूळ, कंद, खोड (आपण ज्याला बांबू म्हणतो), फांद्या, प्राथमिक प्रक्रिया करताना तयार होणारा भुसा, पाने असा एकूण एक उपयुक्त असणारा बांबू जगाच्या पाठीवर सर्व विषुववृत्तीय प्रदेश, कर्क वृत्त ते मकर वृत्त यामधील उष्ण कटिबंधातील प्रदेश आणि समशीतोष्ण प्रदेश अशा भागात जगभर पसरला आहे. हा बांबू सर्व खंडांत आढळतो. आता प्रत्येक प्रदेशात प्रामुख्याने आढळणारे देश आणि बांबूचा अढळ याबद्दलची माहिती घेऊया.
 

bamboo 
 
देशोदेशीचा बांबू
 
या बांबूच्या जगभरात सर्व प्रकारच्या म्हणजेच वेली, झुडूप प्रकारातल्या आणि आपल्याला बांबू म्हणून परिचित असलेल्या अशा सर्व मिळून 2017 सालच्या गणनेनुसार 121 प्रजाती आणि 1600 पेक्षा अधिक जाती आहेत. जगभरातील वनस्पती शास्त्रज्ञ त्यांच्या बांबू फुलण्याच्या अभ्यासानुसार यात भर घालत असतात. एवढ्या जाती असल्या तरी 60-70 जातीच व्यापारीदृष्ट्या उपयुक्त आहेत. नुकत्याच आढळलेल्या बांबूच्या जीवाश्मामुळे बांबू अतिप्राचीन आहे हे सिद्ध झाले. बांबू नैसर्गिकरित्या जंगलात आढळतो पण अनेक शतकांपासून त्याची लागवड केली जाते. आपल्याला कोकण, सातपुडा आणि गडचिरोली अशा जंगलामध्ये तो आढळतो. तसेच कोकण आणि प. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात तो मेस, माणगा यांच्या स्वरूपात लागवड करून वाढवलेला आहे. हेच जगातील चीन, आफ्रिकेतील काही देश आणि द. अमेरिकेतील काही देशांमध्ये, भारतातील पूर्वोत्तर राज्ये व इतर हिमालयीन राज्यात पण आढळते. आशिया हे बांबूचे एक महत्त्वाचे उगमस्थान मानले जाते. याबद्दलची सविस्तर माहिती वर्षानुवर्षे गोळा केली जाते. जगभराचा विचार केला तर बांबू लागवडीखालील क्षेत्रापैकी आशिया खंडात 65 ते 70 टक्के, आफ्रिका खंडात 4-7 टक्के, अमेरिका खंडात 28 टक्के व उरलेले 2 टक्के क्षेत्र हे ऑस्ट्रेलिया आणि इतर बेटांमध्ये आहे.
 
 
जागतिक अन्नधान्य संघटनेच्या 2020च्या गणनेनुसार जगभरात एकूण 35 दशलक्ष हेक्टरहून जास्त क्षेत्र बांबू खाली आहे. यात नैसर्गिकरित्या जंगलात वाढणारा आणि बांबू लागवडीखालील क्षेत्राचा समावेश आहे. यातील सुमारे 25 दशलक्ष हेक्टर आशिया खंडात, 5.4 दशलक्ष दक्षिण अमेरिकेतील देशात व 4.6 दशलक्ष आफ्रिका खंडात आहे. आफ्रिकेतील क्षेत्र कमी होऊनसुद्धा गेल्या 30 वर्षात चीन, भारत यातील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रामुख्याने व्यापारी लागवड झाल्याने जगभरच्या बांबू खालील क्षेत्रात वाढ झालेली नाही.
 

bamboo 
 
जगामध्ये सर्वांत जास्त बांबू क्षेत्र हे आशियामध्ये आहे. जगातील एकूण बांबू क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र भारत आणि चीनमध्ये आहे. भारतातील जम्मू-काश्मीर व लडाख हा प्रदेश सोडला तर बाकी सर्व प्रांतामध्ये बांबू विविधता आढळते. चीनमध्ये समशीतोष्ण कटिबंधातील दक्षिणेच्या काही प्रांतात बांबू आहे. त्याचबरोबर म्यानमार, बांगलादेश, थायलंडपासून ते फिलिपिन्सपर्यंत सर्वत्र बांबू उपलब्ध आहे. जगभरातील 1600 जातींपैकी सुमारे 70 टक्के जाती आशिया खंडात आढळतात. यामध्ये ‘एकपाद‘ व ‘छद्मपाद‘ अशा दोन्ही जातींचा समावेश आहे. भारतात प्रामुख्याने छद्मपाद जाती आढळतात. हिमालयातील प्रांत आणि पूर्वोत्तर भारतात काही प्रमाणात एकपाद बांबू आढळतो. तर चीन मध्ये एकपाद बांबू प्रामुख्याने आणि दक्षिणेतील प्रांतात छद्मपाद उपलब्ध असतो. छद्म्पाद बांबू हा बेटाने वाढतो तर एकपाद बांबू सरळ रेषेत वाढतो. चीनमधला मोसो हा एकपाद आहे तर आपला मानवेल, काटस, मेस, माणगा हे छद्मपाद आहेत.
 
 
आशिया खंडात खालील देशात प्रामुख्याने वनांमध्ये आणि लागवडीखालील बांबू उपलब्ध आहे. बांगलादेश, कंबोडिया, चीन, भारत, इंडोनेशिया, जपान, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपाइन्स, द. कोरिया, थायलंड आणि व्हिएतनाम, पाकिस्तान, पापुआ न्युगिनी. यापैकी चीनने बांबू उद्योगाकडे फार गंभीरपणे लक्ष घातले आणि अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम आखून ठरवून गेल्या 60-70 वर्षांत आपल्या बांबू लागवडीत वाढ केली. चीनने आपल्या संशोधनाच्या आधारावर एकूण क्षेत्र, हेक्टरी उत्पन्न व बांबू उद्योग यामध्ये शास्त्रीय व तंत्रज्ञानावर भर देऊन देदिप्यमान प्रगती केली आहे. याबद्दल सविस्तरपणे आपण पुढील भागात पाहाणारच आहोत.
 
 
चीनमध्ये प्रामुख्याने मोसो बांबू लावला व वापरला जातो. सरकारने दिलेले प्रोत्साहन व चीनी लोकांची ध्येयासक्ती ही यासाठी उपयोगी पडलेली आहे. बांबूच्या प्रत्येक भागाचा वापर कसा करावा हे चीनने उत्कृष्टपणे दाखवलेले आहे. बांबूला खर्‍या अर्थाने हस्तकलेतून बाहेर काढून त्याचे व्यापारांत रूपांतर कसे करायचे हे जगाला दाखवून दिले. परिणामतः आज बांबू उत्पादनात व व्यापारात चीन आघाडीवर आहे.
 
 
चीनच्या तुलनेत आपण फार उशिरा जागे झालो. आजही बांबू खालील क्षेत्र जगात सर्वांत जास्त असले तरी हेक्टरी उत्पादन खूप कमी असल्यामुळे आपण खूप मागे आहोत. त्यातल्या त्यात एवढेच समाधान की नीती आयोगाने दखल घेतल्यामुळे व बांबू अभियानामुळे आता बांबू हा सकल उत्पन्नात भर घालण्यासाठी सज्ज होतो आहे. राष्ट्रीय बांबू अभियान आणि बर्‍याच राज्यांनी आपापली बांबू धोरणे निश्चित करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राने नुकतेच असे धोरण जाहीर केले आहे. शेतकर्‍यांना विविध सवलती जाहीर करून बांबू लागवडीला प्रोत्साहन जाहीर केल्यामुळे बांबू लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे. आजच्या घटकेला भारतातील बांबूचे एकूण क्षेत्र अंदाजे 158 दशलक्ष हेक्टर आहे.
 
 
इंडोनेशियामध्ये बांबूचे सखोल सर्वेक्षण झाले नव्हते. तरीही एका अंदाजानुसार सुमारे 85-90 दशलक्ष हेक्टर एवढे बांबू क्षेत्र आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षात 1000 बांबू खेडी असा एक आगळावेगळा उपक्रम राबवला जातो आहे. यामध्ये 1000 खेडी, तिथले हवामान व जमीन यांचा वापर करून पडीक जमिनीत योग्य बांबूची लागवड करून त्यावर उद्योग उभे करण्याचा उपक्रम एका पर्यावरणाशी निगडीत संस्थेने योजला आहे. त्याचे फलित चांगले येताना दिसत आहे. असेच प्रयत्न आता आशियातील इतर देशही करताना दिसत आहे. याचप्रमाणे आफ्रिकेतील अनेक देशात बांबू नैसर्गिक आढळतो.अनेक ठिकाणी लागवडीचे मोठे प्रयत्न झाले आहेत.
 
 
त्यामध्ये प्रामुख्याने इथिओपिया, केनिया, नायजेरिया, युगांडा, टांझानिया, झिम्बाब्वे, अल्जेरिया आणि टोगो या देशांचा समावेश होतो. आफ्रिकेत छद्मपाद जाती लावल्या जातात. द.अमेरिकेत ब्राझील, चिली, कोलंबिया, इक्वेडोर, मेक्सिको आणि पेरू या देशात बांबू नैसर्गिक वाढलेला आहे आणि लागवडीखालील आहे.
 
 
नैसर्गिकरित्या जंगलात बांबू आढळत असल्याने आणि त्यांची शास्त्रीय पद्धतीने लागवड करण्याचे तंत्र विकसित करण्याला चीन सकट सर्वांनाच वेळ द्यावा लागला. मुळात जंगलातील बांबूच्या वापरावर जंगलांच्या कायद्याने बर्‍याच मर्यादा होत्या आणि आहेत. तरीही भारतामध्ये डेहराडूनच्या वन संशोधन केंद्राने आणि त्याच्या इतर संशोधन संस्थांनी गेल्या शतकात मोलाची भर घातली. पण हे संशोधन फक्त संशोधन संस्थापर्यंतच सीमित राहिले. इंग्रजांनी वन कायद्यात बांबूची गणना गवत अशी न करता झाड म्हणून केली होती. ते स्वरूप बदलायला विसाव्या शतकातील दुसरे दशक उजाडले. तेव्हापासून बांबूने भरारी घ्यायला सुरुवात केली. आता बांबूचा विविध अंगाने रोपवाटिका ते विविध वस्तुनिर्मिती हा भारतातील प्रवास सुरू झाला. अजूनही अनेकांना बांबूच्या अमर्याद उपयोगांचा आवाका कळत नाही. चीन, व्हिएतनाम, थायलंड अशा देशांनी केलेली प्रगती थक्क करून टाकणारी आहे.
 
मूल्यसंवर्धन
 
मुळातच बांबूच्या 95 टक्के भागांचा वेगवेगळ्या कारणासाठी वापर होतो ही कल्पनाच करता येत नाही. उरलेला 5 टक्के भाग पाण्याच्या व बारीक भुश्याच्या स्वरूपात प्रक्रिया करताना उडून जातो. संपूर्ण बांबूचा जरी वापर करायचा म्हटले तरी चित्र थोडे वेगळे असते.
 

bamboo 
 
आपण उदबत्तीच्या काडीचे उदाहरण घेऊ. शंभर किलो योग्य बांबूपासून सुमारे 12 ते 20 किलो एवढी उदबत्ती तयार होते. म्हणजेच 100 किलो बांबू वापरला तर 80-88 टक्के बांबूचा भुसा, साले, पेरे असे भाग वेगळे करावे लागतात. म्हणजेच एवढा भाग उदबत्तीच्या कामाचा नाही. साहजिकच 100 किलो बांबूची किंमत व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि मशिनरीचा खर्च 12-20 किलो काडीवर पडतो. हेच जर या वाया जाणार्‍या बांबूचाही वापर केला गेला तर काडीची किंमत कमी होते. हेच चीनने केले. यापासून आपण काय-काय बनवू शकतो याचा विचार केला तर उदबत्तीवर लावायच्या लेपापासून ते पार्टिकल बोर्ड, कोळसा, अक्टीवेटेड कार्बन, ऊर्जानिर्मितीसाठी लागणार्‍या पेलेत्स, सी.एन.जी वायू, इथेनाल ते अगदी आपल्या मोटारगाड्यांचा आतला दर्शनी भाग व स्टीअरिंग व्हील्स आणि अशा असंख्य वस्तू निर्माण करू शकतो. दहा-पंधरा उदबत्ती कारखाने किंवा असे मूलभूत पदार्थ तयार करणार्‍या कारखान्यातला वाया जाणारा भुसा एकत्र केला तर त्यापासून असे असंख्य कारखाने चालवता येतात. आपोआपच मूल्यसंवर्धन होऊन देशात वापरण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम माल तयार होतो.
 
 
चीनने हेच केले. मग आपण का नाही करायचे. मुळातच बांबूचा 100 टक्के वापर करायला लागलो तर एका अंदाजानुसार काही हजार कोटी रुपयांची भर आपण देशाच्या तिजोरीत घालू शकतो.
 
 
बांबू संदर्भातील माहिती घ्यायला लागलो तर, एक वाक्य नेहमी आढळते. बांबूचे सुमारे 1200 उद्योग आहेत. खरं तर 1200 प्रकारच्या वस्तू बांबूपासून तयार होतात, पण एकेका प्रकारच्या शेकडो वस्तू अशा एकेका प्रकारात मोडतात. अगदी आपण सूप या परंपरागत वापरातील वस्तूचा विचार केला तर भारतातच कमीतकमी 15 ते 20 प्रकार आढळतील. हीच गोष्ट टोपल्या, रोळ्या अशा आपला घरात वापरायच्या गोष्टींची आहे. अशा प्रकारच्या वस्तू निर्मितीचे जर छोटे-मोठे कारखाने काढले गेले तर गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याकडे आपण सहज वाटचाल करू शकू.
 
 
गेल्या 50-60 वर्षांतील जिथे बांबू निर्माण होतो अशा खेड्यापाड्यांतून आपण लहानमोठ्या यंत्रांचा वापर करून असे असंख्य उद्योग निर्माण करू शकू. यासाठी फार कार्यकुशलतेची जरुरी नसते. एखाद-दुसर्‍या दिवसाच्या प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती करता येते. आपले बारा बलुतेदार हे त्याकाळातल्या खेड्यामधले उद्योजकच होतेच की, मग हे करणे अवघड आहे का?
 
सुदैवाने प्रवरानगरचा साखर कारखाना उभा राहात असताना लेखकाने पाहिला आहे. एका साखर कारखान्याच्या आधाराने किती लोकांना रोजगार मिळतो हे अनुभवले आहे. ऊस हे औद्योगिक पीक आहे. एक साखर कारखाना किती लोकांना जगवतो. ऊस लागवड, तोड, त्याची कारखान्यापर्यंत वाहतूक प्रत्यक्ष कारखाना चालवणे, त्यातून साखरनिर्मिती, त्याच्या मळीपासून अल्कोहोल, खत पाचाटापासून कागद अशा साखळीतून प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतोच. त्याचप्रमाणे अप्रत्यक्ष सुरू झालेले टायर गाड्यांचे उत्पादन, कुक्कुटपालन, डेअरी असे अनेक उद्योग निर्माण होतात. साहजिकच त्या त्या प्रदेशाचे अर्थशास्त्र बदलून जाते. गेल्या साठ-सत्तर वर्षांत प्रत्येक तालुक्यातल्या अशा उद्योगामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील खेडेगावांचे रूपडे बदलताना आपण सर्वांनी पाहिले आहे. असंख्य ग्रामीण उद्योग, तिथला खेळता पैसा आपोआपच शिक्षणाची प्रगती, आरोग्यसेवेची उपलब्धता, नागरी सुधारणा असे दैनंदिन जीवनाशी निगडीत असंख्य बदल पाहिले आहेत. त्याचबरोबर खेड्यांकडून शहराकडे जाण्याचे प्रमाण थोडे तरी कमी झाले आहे. बांबू आणि बांबू उद्योग यांचे जर गावोगावी जाळे विणले गेले तर उल्लेखलेल्ल्या गोष्टी घडतील. खेड्यांमध्ये अधिक चांगले वातावरण निर्माण होऊन असंख्य हाताना काम देता येईल आणि आपल्या देशाच्या आर्थिक विकासात उल्लेखनीय भर पडेल.
 
 
यासाठी हवामान अनुकूल व योग्य प्रकारच्या वरकस किंवा पडीक जमिनीत वाढणार्‍या जातींची निवड करायला हवी. खेडे किंवा 5-10 खेड्यांचा समूह केंद्रस्थानी ठेवून असंख्य बांबू वस्तू उत्पादने व त्यातून निघणार्‍या तथाकथित वाया जाणार्‍या बांबूपासून तयार होणार्‍या वस्तू यावर आधारित उद्योगांची साखळी निर्माण करायला हवी. भारतातील सर्व भागात हे शक्य आहे. आपल्याकडे असलेल्या सुमारे 30-35 टक्के पडीक जमिनींचा वापर केल्यास हवामान बदलाला सुयोग्य असे उत्तरही देता येईल.
 
 
यासाठी बांबूच्या प्रत्येक भागाचा वापर होणे आवश्यक आहे. हे कसे करता येते ते पाहू. आपल्याकडे आज असलेला बांबू हा साधारण 25 ते 30 फुटांचा असतो. कोणताही तोडलेला बांबू घेतला तर तो बुंध्याला जाड असतो व वर निमुळता होत जातो. वरचा जो 5-10 फुटाचा शेंडा आहे तो जागेवरच वेगळा काढला तर त्याचा भाजीपाला पिकासाठी आधार म्हणून उपयोगी पडतो. आजच्या घटकेला याची खूप मोठी बाजारपेठ आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील विदर्भातील काही जिल्हे या ठिकाणी याची खूप मोठी गरज आहे.
 
 
हीच गोष्ट वरून 8 फूट ते 15 फूट बांबूच्या भागाची. बर्‍याच फळबागातील झाडांना व वेलींना आधारासाठी हा भाग लागतो. वरील 15 फूट वापरल्यावर उरलेल्या बांबूचे 6 फुटाचे 2,3 तुकडे करून त्यापासून बांबूच्या पट्ट्या किंवा काड्या काढल्या जातात याचा उपयोग चटया, बांबू प्लाय आणि उदबत्तीची काडी किंवा पडदे यासाठी वापरता येतो. बांबूतला हा भाग सर्वांत उपयुक्त असतो. बुंध्याचा वरचा भाग आणि कंद यापासून भरपूर हस्तकलेच्या वस्तू निर्माण होतात. दरवर्षी जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये नवीन कोंब येतात. या कोबांचा वापर आजही पूर्वोत्तर भारतात मोठ्या प्रमाणात लोणची करणे वा इतर पदार्थामध्ये केला जातो. आपल्याकडे बंगळुरूच्या एका संशोधन संस्थेने यावर काम केले आहे. आपल्याकडील कोणत्याही जातीच्या कोबांचा वापर करता येतो, यावर एक पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.
 
 
याशिवाय फांद्या, पाने, अशा सर्व भागांचा वापर करणारे कारखाने गावागावात उभे राहू शकतात. आसाममध्ये बांबूचा उपयोग करून इथेनॉल निर्मिती करणारा कारखाना सरकारने सुरू केला आहे. यामुळे खनिज तेलाची आयात कमी करून परकीय चलन वाचवले जाते आहे. विविध प्रकारचा कोळसा, सी.एन.जी, पानांपासून विशिष्ट प्रकारची औषध आणि कापडही तयार करता येते. भारतात आज हे मोठ्या प्रमाणात आयात होते. तेच जर भारतात तयार झाले तर आपण परकीय चलन वाचवू शकू आणि मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करू शकू.
 
संचालक, वेणू वेध बांबू संशोधन संस्था, पुणे.