समर्पणवृत्तीचा आविष्कार

विवेक मराठी    20-Dec-2025
Total Views |
 
@प्रा. डॉ. पद्माकर जोशी
 
rss 
एखाद्या छोट्याशा झरोक्यातून एखादे मनोहर, विस्तीर्ण व विविधरंगी दृश्य दिसावे तसे या पुस्तकाचे स्वरूप आहे. प्रातिनिधिक स्वरूपात निवडलेल्या या स्वयंसेवकांच्या कार्याचा आढावा घेताना, स्वयंसेवकांच्या समर्पित व निर्मोही मनोवृत्तीची कल्पना तर येतेच, संघकार्याचा विस्तीर्ण पट पण जाणवतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय कल्पक आहे. या पुस्तकातील सगळीच माणसे प्रेरणादायी आहेत. फक्त प्रत्येकाचे कार्यक्षेत्र निराळे, कुणाच्या कार्याचा आवाका मोठा तर कोणाचा मर्यादित, पण समर्पण वृत्ती आणि राष्ट्र व समाज यांच्यावरचे प्रेम सारखेच.
पुस्तकाचे नाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा
लेखकाचे नाव : अ‍ॅड. मिलिंद मधुकर चिंधडे
प्रकाशकाचे नाव : वैशाली प्रकाशन
किंमत : रु. 210/-
पृष्ठे : 128

नाशिक येथील सुप्रसिद्ध विधीज्ञ व प्राध्यापक अ‍ॅड. मिलिंद चिंधडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या शीर्षकाचे पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध केले असून त्यास पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत वैचारिक समूह प्रमुख दिलीप क्षीरसागर यांची प्रस्तावना लाभली आहे. ऑक्टोबर 2025मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघास 100 वर्षे पूर्ण झाली त्यामुळे हे पुस्तक अत्यंत योग्य वेळी प्रसिद्ध झाले आहे, असे म्हणावे लागेल. या पुस्तकाचे पहिले वैशिष्ट्य हे की, ज्या 50 स्वयंसेवकांचा परिचय लेखकाने करून दिला आहे, त्यातल्या बर्‍याच जणांशी लेखकाचे व्यक्तिगत स्नेहसंबंध आहेत. त्यामुळे या लेखांमध्ये कोरडा संशोधकी अलिप्तपणा न जाणवता व्यक्तिगत स्नेहाचा झरा वाहताना दिसतो. पण म्हणून लेखकाने कुठेही अतिरंजित मांडणी केलेली नाही. या अनेक स्वयंसेवकांनी प्रतिकूल परिस्थितीत संघकार्याची धुरा कशी वाहिली, ते लेखकाला अवगत असल्याचे जाणवते.
 
राजकीय पक्षात फक्त उच्चपदस्थांचीच दखल घेतली जाते पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रत्येक जण महत्त्वाचा समजला जातो. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आधीपासूनच प्रसिद्धिपराङ्मुख असल्याने अगदी मोजक्याच लोकांची वर्तमानपत्रातून दखल घेतलेली आपल्याला जाणवते. त्याचा कोणताही सोस न बाळगता सगळे स्वयंसेवक आपापले काम शांतपणे करत राहतात. लेखकाने ज्या 50 संघस्वयंसेवकांचा परिचय करून दिला आहे त्यांची निवड अत्यंत चोखंदळपणे केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जरी या सगळ्यांना एकत्र बांधणारे सूत्र बनले असले तरी जवळपास प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगळे आहे. उदाहरणार्थ, ललित लेखक हा जरी प्रत्यक्ष समाजकार्य करत नसला तरी गुरुनाथ नाईक यांनी आपल्या रहस्यकथांमधून देशविरोधी शक्तींचा पराभव दाखवून तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. क्रांतिवीर नावाची स्वातंत्र्यसंग्रामाची चित्र रेखाटणारी कादंबरी पण नाईक यांनी लिहिली होती.
 
 
राष्ट्रसेवेप्रती समर्पित प्रसिद्धीपासून दूर राहणारी एखाद्या कार्याला वाहून घेण्यासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणारी अशी स्वयंसेवकांची पिढी निर्माण करून, त्यांनी विविध केलेल्या कार्याच्या माध्यमातून पुन्हा संघस्वयंसेवकाची नवीन पिढी घडवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मध्यवर्ती सूत्र असल्यामुळे लेखकाने अशा स्वयंसेवकांची निवड केली आहे. गणेशमूर्ती विकून अर्थार्जन करणारे आणि तरीही संघमिलन नावाचे पाक्षिक काढणारे अहिल्यानगरचे जयंत तांबोळी, आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करणारे डॉ. अंबादास कुलकर्णी, कुटुंबातील 27 वर्षीय मुलगा प्रतीक याचे अचानक दुःखद निधन झाल्यावर त्याचा देह अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला दान देण्याचा निर्णय घेणारे नागपूरचे सप्रे कुटुंबीय, राजकीय क्षेत्रात काम करत असूनही वाचनाचा व्यासंग जोपासणारे आणि गाव तेथे वाचनालय ही चळवळ चालवणारे आमदार प्रतापदादा सोनवणे, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ यांच्या माध्यमातून शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष आखाड्यात उतरून लढा देत असतानाच 35 हिंदी व 10 इंग्रजी पुस्तके लिहिणारे कामगार नेते दत्तोपंत ठेंगडी, कुठल्याही रुग्णाची पैशाकरता अडवणूक न करणारे आणि पुढेही सात वर्षे नगरपालिकेत आदर्श नगरसेवक म्हणून मान्यता पावलेले डॉ. द. बा. डोंगरे अशी कितीतरी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आपल्याला येथे भेटतात. तसे पाहिले तर, या पुस्तकातील सगळीच माणसे प्रेरणादायी आहेत. फक्त प्रत्येकाचे कार्यक्षेत्र निराळे, कुणाच्या कार्याचा आवाका मोठा तर कोणाचा मर्यादित, पण समर्पण वृत्ती आणि राष्ट्र व समाज यांच्यावरचे प्रेम सारखेच.
 
पुस्तकात दोनच महिला कार्यकर्त्यांचा परिचय आलेला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे स्वरूप पाहता संघाचे स्वयंसेवक ठिकठिकाणी मुक्कामी राहात असताना त्यांच्या निवासाची व जेवणाखाण्याची सोय करण्याचे असे पडद्यामागचे पण महत्त्वाचे कार्य हजारो महिलांनी प्रतिकूल परिस्थितीतही चोखपणे पार पाडले आहे. आज अगदी सासू-सासर्‍यांचा सुद्धा सांभाळ न करणार्‍या मुली पाहिल्यावर, ज्या महिलांनी नवर्‍याबरोबर किंवा दिराबरोबर घरी आलेल्या स्वयंसेवकांना रात्रीबेरात्री, अगदी पहाटे स्वयंपाक करून जेवू घातले त्यांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. अशा महिलांचे या पुस्तकातील प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे भानूआजी. वयाच्या 40 व्या वर्षी पतीनिधनानंतर त्या 56 वर्ष जगल्या. आणीबाणीच्या काळात मुलगा तुरुंगात असताना भानूआजी व त्यांच्या जाऊबाई इंदुताई यांनी अनेक स्वयंसेवकांची आपुलकीने काळजी घेतली म्हणून स्वतःच्या आजीचे उदाहरण देत लेखक म्हणतात, कायम कोणीतरी एक जण म्हणजे बहुतेक संघाचे प्रचारक तेथे मुक्कामाला असायचे. या सर्व महिलांनी आपल्या संसाराबरोबरच संघाचा संसार वाहिला.
 
 
थोडेसे वेगळ्या प्रकारचे कार्य डॉ. निशिगंधा मोगल यांच्यासारख्या महिलांनी केले. त्या भारतीय जनता पक्षाबरोबरच दुर्गावाहिनी, विश्व हिंदू परिषद यांचेदेखील काम करत. नाशिकला बाळासाहेब देवरस आले की त्यांच्याकडेच मुक्कामाला असत. केंद्रीय नेत्यांची संघ शिक्षा वर्गात होणारी बौद्धिके ऐकण्याची संधी महिलांना मिळावी, अशी मागणी ताईंनी सातत्याने केली व ती मान्य करण्यात आली. वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यावर स्त्रीधनाचा मोह न राहिल्याने ताईंनी त्यांचे दागिने विकून 20 लाख रुपये उभे केले व ते सैन्य निधीला अर्पण केले.
 
एखाद्या छोट्याशा झरोक्यातून एखादे मनोहर, विस्तीर्ण व विविधरंगी दृश्य दिसावे तसे या पुस्तकाचे स्वरूप आहे. प्रातिनिधिक स्वरूपात निवडलेल्या या स्वयंसेवकांच्या कार्याचा आढावा घेताना, स्वयंसेवकांच्या समर्पित व निर्मोही मनोवृत्तीची कल्पना तर येतेच, संघकार्याचा विस्तीर्ण पट पण जाणवतो आणि अगदी सामान्यातल्या सामान्य माणूस सुद्धा देश परिवर्तनाच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलून अनेकांचे प्रेरणास्थान होऊ शकतो, हे पण लक्षात येते. संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते नानाराव ढोबळे हे संघकार्य करीत असताना त्यांचा समाजातील दुर्लक्षित असलेल्या अनेक लोकांशी संबंध आला आणि त्यांची समर्पण वृत्ती, राष्ट्रनिष्ठा पाहून नाना भारावून गेले. त्यांची उदाहरणे समाजासमोर यावीत म्हणून नानांनी समाजतळातील मोती हे पुस्तक लिहिले. त्यावरही लेखकाने पुस्तकात लिहिले आहे.
 
 
पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय कल्पक आहे. केंद्रस्थानी संघाचे प्रमुख नेतृत्त्व त्यांच्या आदेशानुसार संघकार्याचा ध्वज हातात घेऊन त्या कार्याची धुरा वाहणारा सामान्य स्वयंसेवक. याच्या आजूबाजूला पुस्तकात ज्यांच्यावर लेख आहेत अशा स्वयंसेवकांची छायाचित्रे आणि या सगळ्याला असलेली भगव्या रंगाची पार्श्वभूमी असलेले मुखपृष्ठ, पुस्तकाची संकल्पना लगेच स्पष्ट करते. प्रत्येक लेखाच्या शीर्षकातून त्या स्वयंसेवकाचे योगदान व कार्यक्षेत्र स्पष्ट होते. यातून लेखकाचे सखोल चिंतन दिसते. सामान्य स्वयंसेवकांच्या त्यागाची व योगदानाची दखल प्रकर्षाने घेणार्‍या या पुस्तकाला संघावरील विविध पुस्तकांमध्ये महत्त्वाचे स्थान असेल, यात काहीच शंका नाही.