सोळा संस्कारांपैकी चार संस्कार म्हणजे एक चतुर्थांश संस्कार हे शिक्षणाशी संबंधित आहेत. यातील पहिला संस्कार म्हणजे विद्यारंभ संस्कार होय. अर्थात शिक्षणाची सुरुवात. विद्यारंभ संस्कारला अक्षरारंभ किंवा पाटीपूजन असे देखील म्हटले जाते. या संस्काराचा उद्देश असा आहे की, मुलाचा/मुलीचा बौद्धिक आणि आध्यात्मिक विकास व्हावा. बर्याच ठिकाणी हा संस्कार विजयादशमीला केला जातो.
पाहता पाहता ध्रुव पाच वर्षांचा झाला. आता त्याला शाळेत घालायचे, त्याचे शिक्षण सुरू करायचे, म्हणून रजनीकांत आणि रोहिणीने विद्यारंभ संस्कार करायचे ठरवले. त्याची आजी अनसूया म्हणाली, “लवकरच दसरा येत आहे. शिक्षण सुरू करण्यासाठी हा चांगला मुहूर्त आहे. त्याच दिवशी आपण ध्रुवचा विद्यारंभ संस्कार करूया!“ मग काय, लगेच तयारी सुरू झाली. पूजेच्या दिवशी सकाळी रोहिणीने ध्रुवला अभ्यंगस्नान घातले. नवीन कपडे घातले. गळ्यात माळ घातली. त्याचे औक्षण केले. ध्रुव आजी-आजोबा आणि आई-बाबांच्या पाया पडला.
इतके होईतो गुरुजींनी पूजास्थानी सरस्वती आणि गणपतीची प्रतिमा ठेवली. सोबत कलम, दौत, पाटी, पेन्सिल, वही आदि लेखनसाहित्य ठेवले. रजनीकांतने ध्रुवला गुरूजींच्या समोर बसवले. त्याला सांगितले, “बाळा, आता गुरूंना ‘माझ्या डोळ्यांत ज्ञानरूपी अंजन घालून, माझ्यामधील अज्ञानाच्या अंधाराचा नाश करावा!’ अशी विनंती करून त्यांना नमस्कार कर!''
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः॥
ध्रुव गुरूंच्या पाया पडला.
मग गुरूंनी पाटीवर खालील मंत्र लिहिले -
श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्ये नमः।
श्रीकुलदेवतायै नमः। श्रीगुरुभ्यो नमः।
श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः।
ॐ नमः सिद्धम्।
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः।
क ख ग घ ङ।
च छ ज झ ञ।
ट ठ ड़ ढ ण।
त थ द ध न।
प फ ब भ म।
य र ल व श ष स ह।
ध्रुवला सोबत घेऊन, एकेका अक्षरावर बोट गिरवून गुरूजींनी त्याच्याकडून ती सर्व अक्षरे म्हणवून घेतली. गणपतीची आणि सरस्वतीची पूजा करून प्रार्थना केली - “हे विशालाक्षी, मला विद्या दे!“
ॐ सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि।
विश्ववन्द्ये विशालाक्षि विद्यां देहि नमोऽस्तुते॥
त्यावर, रजनीकांतने ध्रुवला गुरूंना आणि लेखनसाहित्याला नमस्कार करून प्रदक्षिणा घालण्यास सांगितले.
अशा प्रकारे, ध्रुवच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला!
16 संस्कारांपैकी 4 संस्कार, अर्थात एक चतुर्थांश संस्कार शिक्षणाचे आहेत -
1. विद्यारंभ / अक्षरारंभ
2. उपनयन / मुंज
3. वेदारंभ
4. समावर्तन / स्नातक
यातील पहिला संस्कार - विद्यारंभ, अर्थात शिक्षणाची सुरुवात. साधारणपणे 4 ते 6 या वयात हा संस्कार केला जातो. या संस्कारात गणपती आणि सरस्वतीची पूजा केली जाते. अक्षरांची तसेच लेखनसाहित्याची पूजा केली जाते. या संस्काराचा उद्देश असा आहे - मुलाचा/मुलीचा बौद्धिक आणि आध्यात्मिक विकास व्हावा. बर्याच ठिकाणी हा संस्कार विजयादशमीला केला जातो. या दिवशी दुर्गामातेने महिषासुराचा वध केला - तसे विद्यावान होऊन, ज्ञानवान होऊन मुलाने अज्ञानरूपी महिषासुरावर विजय प्राप्त करावा. घरी अथवा सरस्वतीच्या मंदिरात हा संस्कार केला जातो.
या संस्कारापासून मुलाच्या शिक्षणाची सुरुवात होते. अक्षरओळख, लिहिणे, वाचणे, मोजणे, पाढे, बेरीज-वजाबाकी, सुभाषिते आदी गोष्टी त्याला शिकवल्या जातात. या शिक्षणात मुलाच्या मानसिक आणि बौद्धिक विकासावर भर दिला जातो. तसेच त्याला नैतिक मूल्यांची शिकवण दिली जाते. सोबत त्याचा आध्यात्मिक विकास पण व्हावा याकरिता संस्कार कथा शिकवल्या जातात.
विद्यारंभ संस्कारला अक्षरारंभ किंवा पाटीपूजन असे देखील म्हटले जाते. अक्षरांचा महिमा भगवद्गीतेत सांगताना भगवान म्हणतात - अक्षराणामकारोऽस्मि- अक्षरांमध्ये मी पहिले अक्षर ‘अ’ आहे. तर ‘ओमित्येकाक्षरं ब्रह्म’ म्हणजेच ॐ हेच एक अक्षर ब्रह्म आहे.
तांत्रिक साधनामध्ये शंकराचार्य म्हणतात -
अकचटतपयायैः सप्तभि वर्णवर्गेर्विरचितमुखबाहापादमध्याख्यहृत्का।
सकल जगदधीशा शाश्वता विश्वयोनिर्वितरतु परिशुद्धिं चेतसः शारदा वः ॥
अ, क, च, ट, त, प आणि य- हे सात वर्ण वर्ग जिचे मुख, दोन बाहू, दोन पाय, मध्यभाग आणि हृदय आहेत ती विश्वजननी शारदा - आमच्या चेतनेला शुद्ध करो! बोललेल्या शब्दाला जसे महत्त्व आहे, तसे अक्षरांना देखील अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे.
विद्यारंभ संस्कारानंतर बालकाचे प्राथमिक शिक्षण सुरू होते. 5-6 वर्षे हे शिक्षण चालत असे. पूर्वी गुरुजी घरी येऊन, सगळ्याच लहान मुलांना शिकवत असत किंवा मुलांना पाठशाळेत पाठवले जात असे. पुढच्या शिक्षणासाठी मात्र गुरूंच्या घरी राहून शिकत असत. आज गायन, वादन, नृत्य या क्षेत्रांत गुरुगृही राहून शिकण्याची पद्धत टिकून राहिली आहे. मात्र पूर्वी वेदाध्ययन असो, धनुर्वेद असो, आयुर्वेद असो, अर्थशास्त्र असो, धर्मशास्त्र असो, स्थापत्यशास्त्र असो, शिल्पशास्त्र असो वा कोणतीही कारागिरी असो, सर्वजण गुरूंच्या सोबत राहून शिकत असत. सर्वसाधारणपणे शिक्षणाच्या सुरुवातीला एक प्रवेश प्रक्रिया होती. गुरू आपल्या शिष्याला पारखून घेत असत. त्याला खरोखरच शिकण्याची तहान असेल तर त्याच्या हाताला गंडा/धागा बांधला जात असे.
भारतीय ज्ञानसंस्थेचा पाया गुरू-शिष्य परंपरेवर उभा आहे. यामध्ये शिष्य गुरूजवळ राहतो, गुरू जे सांगतात ते ऐकतो, ग्रहण करतो. गुरु कसे बोलतात, कसे वागतात ते त्यांच्या आचरणातून शिकतो. गुरू सांगतील तेव्हा झोपेतून उठणे, ते सांगतील तेव्हा झोप घेणे. स्वतःवर इतका संयम ठेवणे की, आधी गुरु आणि नंतर मी - याने अहंकाराचं पूर्ण समर्पण केले जात असे. गुरुगृही राहून शिकणे म्हणजे घड्याळानुसार चालणारा 45 मिनिटे/1 तासाचा वर्ग नाही. हा वर्ग आठवड्याचे सातही दिवस - चोवीस तास चालत असे. जेव्हा गुरूंना असं वाटत असे की, हा योग्य शिष्य आहे, तेव्हाच ते त्याला गंडा बांधत असत.
मला असे वाटते की, उपनयन विधीमध्ये गळ्यात घातल्या जाणार्या यज्ञोपवीतासारखाच हा गंडा पवित्र असतो. गुरूंची सतत आठवण करून देणारा. त्यांनी काय शिकवले आहे, काय करायचे आहे, कसे वागायचे आहे, आपले ज्ञान समाजाच्या हितासाठी कसे वापरायचे आहे - याची आठवण करून देणारा.
पुढील लेखात - उपनयन ...