@ मल्हारीकांत देशमुख
9834119712
या वर्षीचा 101वा दत्तजयंती संगीत महोत्सव मराठवाड्याच्या राजधानीत म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित झाल्यामुळे त्याची व्यापकता विस्तारली. दि. 5 ते 7 डिसेंबर दरम्यान ’एमजीएम’च्या रुक्मिणी सभागृहात संपन्न झालेल्या या स्वरोत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंत सहभागी झाले होते. शहरातील अन्य कलासाधकांचा सहभाग, रसिकश्रोत्यांचा प्रतिसाद पाहता हा महोत्सव मराठवाड्यातील सवाई गंधर्व ठरू शकतो, ही आशा बाळगायला हरकत नाही.
1925 साली कै. त्र्यंबक नारायण कुळकर्णी यांनी जालना जिल्ह्यातील भणंग जळगांव येथे दत्तजयंती संगीत महोत्सव सुरू केला होता. त्यांच्या पश्चात गायनाचार्य कै. गोविंदराव जळगावकर यांनी तो अंबड येथे आणला. पदरमोड करून अनेक वर्षे चालवित वाढविला. त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अरविंद जळगावकर यांनी त्यांचा लोकोत्सव केला खरा, परंतु नुकतेच त्यांचेही निधन झाले. अंबडसारख्या छोट्या शहरात पाहुणे कलावंतांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी संयोजन समितीने हा महोत्सव संभाजीनगर येथे हलविण्याचे धाडस दाखविले आणि या वर्षीचा 101वा महोत्सव थाटात संपन्न झाला.
कलावंतांच्या तीन पिढ्यांचा सहभाग
या वर्षीच्या महोत्सवात 18 वर्षांच्या शुभम तोडकर युवा कलावंतापासून ते 87वर्षे वयाच्या व्हायोलिनवादक विदुषी एन.राजम् यांसारखे कलावंत सहभागी झाले होते. पं. सतीश व्यास, पं. अजय पोहनकर, पं. राम देशपांडे, पं. रतन मोहन शर्मा सारख्या ख्यातकीर्त बुजुर्ग कलावंतांच्या पहिल्या फळीने आपल्या लौकिकाला साजेसे सादरीकरण केले.
पं. रघुनंदन पणशीकर, पं. शौनक अभिषेकी, निषाद व्यास, संदेश खेडेकर, सुनील कुलकर्णी, विश्वनाथ दाशरथे ही दुसरी फळी आपापली छाप सोडून गेली. पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी (पुणे), उस्ताद राशिद खान यांचे सुपुत्र अरमान खान (कोलकाता), अनिरूद्ध ऐठल (बेंगलोर), वैष्णवी जोशी (नाशिक) या तिसर्या पिढीच्या युवा कलावंतांनी सादरीकरणात दाखविलेली तडफ वाखाणण्याजोगी होती. अनिरूद्ध ऐठल या युवकाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. तालमणी उद्धव बापू आपेगांवकर यांचे मृदंगवादन बहारदार झाले.
स्थानिक कलावंतांनी रंग भरला...
मराठवाड्यातील प्रतिभाशाली तरुण संगीतसाधक अभिजित अपस्तंभ, शुभम तोडकर, प्रज्ञा कामतीकर, मानसी देशपांडे, शाश्वती चव्हाण या मराठवाड्यातील नवोदित कलावंतांच्या प्रस्तुतीकरणाचे रसिक श्रोत्यांकडून कौतुक व स्वागत झाले.
सरकारदरबारी वजन बाळगून असणारे संयोजन समितीतील सचिव सुनील कुलकर्णी हे गोविंदराव गुरूजींचे निष्ठावान शिष्य व धडाडीचे कार्यकर्ते. ज्यांच्या प्रयत्नातून अंबड येथे गुरूजींच्या नावे नाट्यमंदिराची उभारणी झाली. त्यांच्या पुढाकाराने अंबड महोत्सव संभाजीनगरात आला. स्वत: उत्तम गायक असणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्व कार्यक्रमाचा ’बॅकबोन’ म्हटले तरी चालेल. उद्घाटनाच्या दिवशी स्वतःच्या कुटुंबात दुर्दैवी घटना घडलेली असताना हा कार्यकर्ता अवघ्या चार तासांत पुन्हा कामाला भिडला. वैयक्तिक दु:ख बाजूला सारून स्मितमुखानेच वावरत राहिला. त्यांना साथ देणार्या धनंजय जळगांवकर, महेश कुलकर्णी, विश्वनाथ दाशरथे, विजय कोठोडे, महेश वाघमारे, अविनाश थिगळे, महेश कुलकर्णी, सुमेधा अकोलकर या ’लगान’ च्या टीमने महोत्सव पेलून धरला.
महिला कलावंतांचा दबदबा
महोत्सवात संख्येने मोजक्याच असणार्या महिला कलावंतांनी महोत्सवावर आपली छाप सोडली. शास्त्रीय नर्तिका अभिनेत्री शर्वरी जेमेनिस यांचे सादरीकरण सर्वाधिक गर्दी खेचणारा ठरला. प्रेक्षागृह तुडुंब भरले होते. शुद्ध बाज, आमद, थाट, तत्कार, मुद्राभिनय, लालित्यपूर्ण पदन्यास, लयकारीयुक्त प्रस्तुतीकरण, आकर्षक कथाभाग त्यांच्या सादरीकरणाचे बलस्थान ठरले. त्यांनी नृत्याभिनयातून श्रीकृष्णाच्या माखनचोरीचा प्रसंग, नवराबायकोचे संगीतमय भांडण अतिशय सुरेख सादर केले. त्यांना गायनाची संगत मनोज देसाई, निखिल पाटील, वैष्णवी देशपांडे यांनी केली. डॉ. अबोली सुलाखे व अपर्णा देवधर या भगिनींची सरोद व सतारची जुगलबंदी अतिशय सुरेख अशी होती. त्यांनी आपल्या प्रस्तुतीकरणाची सांगता दत्तदिगंबराच्या नामस्मरणाने केली हे रसिकांना अधिक भावले. अंतिम सत्रातील पद्मश्री एन. राजम् व त्यांची नात रागिणी राजम् यांनी व्हायोलीनवर खेळकर स्वरूपात सादर केलेला दरबारी रसिकांच्या कायम स्मरणात राहणारा होता त्यांना तबला संगत करणारे मुकुंदराज देव या मोठ्या कलावंताचा विनम्रभाव नजरेत भरला.
महोत्सवाचे नजरेत भरणारे वेगळेपण...
* एवढे विशाल आयोजन असतानाही हा महोत्सव रसिकांसाठी विनाशुल्क होता हे विशेष... विशुद्ध शास्त्रीय संगीताला समर्पित असा हा मराठवाड्यातील एकमेव महोत्सव.
* स्वरंगेतरम हे नावीन्यपूर्ण संशोधनात्मक स्वागत नृत्य सादर झाले. ज्यात कर्नाटकी नृत्य भरतनाट्यम आणि हिंदुस्तानी स्वरमालिका गायन याचा सुंदर मिलाफ
* बनारसी टप्पा स्वतःचा वेगळा सुगंध दरवळत सादर केला गेला.
* तंतुवाद्यांवर ‘दिगंबरा दिगंबरा’चा जयघोष.
* ’चारताल की सवारी’ या 11 मात्रांच्या तालामध्ये महोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच विलंबित ख्याल गायन झाले.
* विविध संगीत संस्थांचे विद्यार्थी नांदीच्या माध्यमातून महोत्सवात संगीत पंढरीचे वारकरी म्हणून जोडले गेले.
* वय वर्षे चाळीसपेक्षा कमी वयाचे कलाकार, सहकलाकार, स्वयंसेवक आणि दर्दी श्रोते या महोत्सवाचे आकर्षण ठरले .
* उत्तर भारतीतील हवेली संगीत उपशास्त्रीय प्रकाराची झलक अनुभवायला मिळाली.
* सहवादक कलाकार बहुतांश मराठवाड्यातील होते. प्रत्येक सत्रात किमान एका स्थानिकाला संधी देण्यात आली.
* महोत्सवात दरम्यान दि. 6रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी मंचावर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.