बांगलादेशातील बेबंदशाही !

विवेक मराठी    26-Dec-2025   
Total Views |

Bangladesh violence 
येत्या एक-दोन महिन्यांत बांगलादेशात काय-काय होते हे सांगता येणे कठीण असले तरी भारतविरोधी व हिंदुविरोधी वातावरण तापवत ठेवले जाईल यात शंका नाही. अशावेळी भारताने केवळ सतर्क राहून चालणार नाही; चिकन नेकसारख्या व्यूहात्मक महत्त्वाच्या ठिकाणांवर गस्त व सैनिकी तैनाती वाढवावी लागेल. बांगलादेशातून होणारी अवैध घुसखोरी व हतबल निर्वासित अशी विभागणी नेटाने करावी लागेल. बांगलादेशाची विद्यमान राजवट केवळ विध्वंसक नव्हे तर विकृत आहे. येत्या फेब्रुवारीत निवडणुका झाल्याच तरी कदाचित पात्रे बदलतील; धोरणे नाही. तेव्हा बांगलादेशची सूत्रे पुढेही भारतद्वेष्ट्यांच्या हातातच राहण्याचा संभव आहे आणि बेबंदशाही अशीच सुरू राहील हेही खरे. अशा वेळी त्या देशातील हिंदुंचे संरक्षण हे भारताचे नैतिक कर्तव्य ठरते.
गेल्या वर्षी (2024) ऑगस्ट महिन्यात बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना परागंदा होऊन भारतात आश्रय घ्यायला लागला होता. बांगलादेशात झालेल्या जनउद्रेकात परकीय हात असल्याचा संशय व्यक्त होत असला तरी शेख हसीना यांच्या राजवटीचे अपयश देखील त्यास कारणीभूत ठरले होते हे नाकारता येणार नाही. त्यानंतर तेथे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्या सरकारचे सल्लागार 85 वर्षीय मोहम्मद युनूस हे नोबेल पारितोषिक विजेता अर्थतज्ज्ञ; पण शेख हसीना यांचे ते कट्टर विरोधक. त्यामुळे अर्थतज्ज्ञ असण्यापेक्षा त्यांचा हसीनाविरोध हाच त्यांच्या कारभाराचा केंद्रबिंदू ठरेल असा कयास व्यक्त होत होताच. तशी भीती व्यक्त करणार्‍यांना युनूस यांनी निराश केले नाही.
 
 
युनूस राजवटीची लक्तरे
 
गेल्या वर्ष-सव्वा वर्षात युनूस यांच्या कारभाराने बांगलादेशाची पुरती वाताहत केली आहेच; पण त्या देशाची वाटचाल कट्टरतावादाकडे होण्यास त्यांच्या राजवटीने खतपाणी घातले आहे. परिणामतः तेथील हिंदू वा अन्य अल्पसंख्याकांची ससेहोलपट थांबण्याची चिन्हे नाहीत. तरीही युनूस यांना त्याची फिकीर नाही. नुकताच बांगलादेशात हिंसाचाराचा जो आगडोंब उसळला त्यातून देखील युनूस राजवटीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. येत्या फेब्रुवारी 2026 मध्ये त्या देशात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वातावरणात होणार आणि त्यानंतर बांगलादेशाची अवस्था कशी होणार हा भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. युनूस यांनी बांगलादेशाला चीन व पाकिस्तानच्या कह्यात नेण्याचे अवलंबिलेले धोरण; निवडणुकांनंतर तेथे कट्टरतावादी शक्ती सत्तेत येण्याची दाट शक्यता यांमुळे भारताला सतर्क राहावे लागेल. याचे कारण पूर्व व पश्चिम अशा दोन्ही सीमांवर भारतविरोधी सत्ता असतील. या स्थितीला बांगलादेश गेल्या वर्षभरात कसा आला याच्या तपशिलात जाण्याचे कारण नाही. पण ताज्या घडामोडींनी युनूस यांच्या इराद्यांवर प्रश्नचिन्ह लावले आहे यात शंका नाही. तेव्हा त्या घडामोडींची दखल घेणे गरजेचे.
 
Bangladesh violence
 
ताज्या हिंसाचाराला निमित्त ठरले शरीफ ओस्मान हादी या विद्यार्थी नेत्याच्या झालेल्या हत्येचे. हादी याच्यावर 12 डिसेंबर रोजी ढाक्यात दिवसाढवळ्या काही मुखवटाधारी हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारात हादी गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सुरुवातीस बांगलादेशातच उपचार करण्यात आले; पण प्रकृती गंभीर बनल्याने त्याला सिंगापूर येथे पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले. तेथे 18 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हादी याच्या मारेकर्‍यांना पकडण्यात यावे अशी मागणी केली. येथपर्यंत आक्षेप घ्यावे असे काही नव्हते. मात्र या निदर्शनांना हिंसक वळण लागले. भारतविरोध व हिंदुविरोध अशी या हिंसाचाराची व्यवच्छेदक लक्षणे होती. या आगीत तेल ओतण्याचे काम युनूस राजवटीने केले. वास्तविक हा हादी म्हणजे काही मुरलेला नेता वगैरे नव्हे. गेल्या वर्षी बांगलादेशात झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता. त्या उद्रेकाचे अपत्य म्हणजे हादी सारखे नवखे नेते. त्या उठावात भाग घेतलेल्या विद्यार्थी नेत्यांनी नंतर ‘नॅशनल सिटिझन पार्टी’ नावाच्या पक्षाची स्थापना केली व सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेण्याचा निर्णय घेतला. 27 वर्षीय नाहिद इस्लाम हा त्या पक्षाचा नेता. सर्वेक्षणांनुसार या पक्षाला जनतेचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही; पण तरीही हिंसाचाराचा आगडोंब उसळावा म्हणून त्याच्या हत्येचे निमित्त करण्यात आले.
 
 
हादीच्या हत्येनंतरचा हैदोस
 
हादी हा एका खासगी विद्यापीठात अध्यापन करीत असे व एक कवी म्हणूनही त्याचा परिचय होता. बांगलादेशचे राष्ट्रीय कवी काझी नझरुल इस्लाम हे त्याचे आदर्श असे म्हटले जाते. खिलाफत चळवळीचे विरोधक; काँग्रेसच्या सौम्य भूमिकेचे टीकाकार अशी इस्लाम यांची ओळख. ते भारतात वास्तव्याला होते; पण बांगलादेश मुक्त झाल्यावर भारत सरकारच्या सहमतीनंतर त्यांना बांगलादेशाने नवस्वतंत्र देशात सन्मानाने नेले; त्यांना राष्ट्रीय कवीचा मान दिला. त्यांच्या निधनानंतर (1976) श्रद्धांजली म्हणून भारतीय संसदेने मिनिटभराचे मौन राखले होते. नझरुल यांच्या पत्नीच्या दफन स्थळाजवळ त्यांच्याही पार्थिवाचे दफन व्हावे म्हणून भारताने बांगलादेश सरकारला विनंती केली होती; पण त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता. हा तपशील नमूद करण्याचे कारण म्हणजे हादीने यापैकी कोणताही आदर्श घेतलेला नाही याची कल्पना यावी. एखाद्याचे उदात्तीकरण करण्याचा सवंगपणा करायचा निर्धार केला की नसणारे गुणही त्या व्यक्तीला चिकटवले जातात.
 

Bangladesh violence 
 
हादीचा खून झाल्यानंतर ते निमित्त करीत भारतविरोधी व हिंदुविरोधी हल्ल्यांचे पेवच फुटले. त्यांस चिथावणी दिली ती स्वतः युनूस व नॅशनल सिटिझन पार्टी तसेच इन्कलाब मंच या संघटनेने. या सर्वांनी मिळून हादीच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या रोषाची दिशा हिंदू व भारतावरील रोषाकडे जाणीवपूर्वक वळविली. युनूस यांनी हा हत्येचा हेतू आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा असल्याचे विधान केले. मात्र त्यामुळे संशयाची सुई आपल्याकडे व खालिद झिया यांचा बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी तसेच जमात-इ-इस्लाम या पक्षांकडे वळते याचे भान युनूस यांना राहिले नाही. ज्या निवडणुकांतून शेख हसीना यांच्या अवामी लीगला तेथील निवडणूक आयोगाने बाद ठरविले आहे त्या निवडणुकांना काय वैधता लाभणार आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कोणती मान्यता लाभणार हा प्रश्नच आहे. शेख हसीना यांना ढाक्यातील आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने थेट फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून उमटलेल्या प्रतिक्रिया युनूस यांना आरसा दाखविणार्‍या होत्या. निवडणुकीत भाग घेण्यावर अवामी लीग पक्षावर निर्बंध घालण्यात आल्यानंतर त्या निर्णयाचा निषेध करण्याकरिता हजारो पक्ष समर्थक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा त्या पक्षाची ताकद तळागाळात कायम आहे हे उघड होते. अशा पक्षावर निर्बंध घालणे हा वावदूकपणा झाला. मात्र त्यामुळेच निवडणुकीच्या काळात हिंसाचार होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. काहीही करून निवडणुका लांबविण्यासाठी युनूस राजवटीने तर हादी हत्या प्रकरण घडवून आणले नसावे हा प्रश्न विचारला जातो आहे तो उगाच नव्हे. त्यातच युनूस यांनी हादीवर इतकी स्तुतीसुमने उधळली की, ते पाहून कोणीही अचंबित व्हावे. हादीवर अंत्यसंस्कार करण्यात आले; तेव्हा युनूस स्वतः तेथे उपस्थित होते. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी हादीने हौतात्म्य पत्करल्याची भावना व्यक्त केली. येथेच त्यांचा इरादा शंकास्पद ठरतो. आपल्या राजवटीत अशा हत्या होतात याचे वैषम्य वाटण्याऐवजी युनूस यांनी या संधीचा भारतविरोधी भावनांना चिथावणी देण्यासाठी उपयोग केला. हादी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली; त्याच्या सन्मानार्थ शासकीय सुटी जाहीर करण्यात आली होती; राष्ट्रध्वज अर्ध्यावर झुकविण्यात आला होता आणि हादीसाठी मशिदींमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. यावर कडी म्हणजे हादीची स्वप्ने पूर्ण करण्याची ग्वाही युनूस यांनी दिली. हादीची कोणती स्वप्ने युनूस पूर्ण करू इच्छितात? इस्लामी कट्टरतावादाचे? भारतद्वेषाचे? स्त्रीद्वेष्टेपणाचे? झुंडशाहीचे?
 
 
अल्पसंख्याक हिंदू लक्ष्य
 
युनूस यांनी जेव्हा अंतरिम सरकारचे सल्लागार म्हणून धुरा सांभाळली तेव्हा त्यांच्याकडून मुख्यतः दोनच अपेक्षा होत्या. एक; शेख हसीना परागंदा झाल्यानंतर देशाची कायदा-सुव्यवस्था स्थिती पूर्वपदावर आणणे आणि दोन; शक्य तितक्या लवकर मुक्त व निष्पक्ष निवडणुका संपन्न करणे. या दोन्ही बाबतीत युनूस सपशेल अपेशी ठरले आहेत; उलटपक्षी बांगलादेशाला त्यांनी कडेलोटाच्या स्थितीत नेऊन ठेवले आहे. हादीच्या मृत्यूचे निमित्त करीत आंदोलकांनी बांगलादेशातील काही वृत्तपत्रांच्या कार्यालयांना लक्ष्य केले. त्यामुळे पत्रकारांचे जीव धोक्यात आले. ज्या दैनिकांच्या कार्यालयांवर हल्ले करण्यात आले ती दैनिके काही शेख हसीना समर्थक वा भारतधार्जिणी नव्हेत. पण तरीही हे हल्ले करण्यात आले. या सार्‍या वातावरणाने सार्‍या देशभर एक प्रकारचा विखार निर्माण केला आहे. परिणामतः आंदोलक बेभान होऊन हल्ले करू लागले आहेत. त्यांची मजल ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालय तसेच चित्तगाँव येथील भारतीय उप उच्चायुक्तालय कार्यालयांवर हल्ला करण्यापर्यंत गेली. भारताला शेवटी व्हिसा देण्याची प्रक्रिया स्थगित करावी लागली. याला एक कारण म्हणजे हादीच्या हत्येत भारताचा हात असल्याची युनूस प्रशासनाने तसेच अन्य संघटनांनी हेतुपुरस्सर निर्माण केलेली शंका.
 

Bangladesh violence 
 
युनूस यांनी हादीचे मारेकरी अवामी लीगशी संबंधित असल्याचे सूतोवाच केले; म्हणजेच एका अर्थाने भारताचा संबंध त्यांनी जोडला. परंतु बांगलादेश परराष्ट्र विभाग त्यापुढे एक पाऊल गेला. हादीचे मारेकरी भारतात पळून गेले तर त्यांना प्रवेश नाकारावा आणि त्यांना आश्रय देऊ नये या प्रकारचे निवेदन त्या मंत्रालयाने जारी केले. त्यातच आणखी एका विद्यार्थी नेत्यावर खुलना येथे गोळीबार झाला व तो गंभीर जखमी झाला. तेव्हा यामागे भारताचा हात आहे असे वातावरण तयार करण्यात आले. युनूस यांची चीन, पाकिस्तान अशा भारतविरोधी देशांशी वाढणारी सलगी पाहता हेही त्यांनी हेतुपुरस्सर केले नसेलच याची शाश्वती नाही. यातच भर पडली ती नॅशनल सिटीझन पार्टीचा नेता हसनत अब्दुल्लाच्या एका प्रक्षोभक वक्तव्याची. ईशान्य भारतातील फुटीरतावाद्यांना बांगलादेशात आश्रय देण्याचा इशारा त्याने दिला. निवडणुकांपूर्वी दोन महिने ही भाषा जो पक्ष करतो त्या पक्षाच्या हादी या उमेदवाराच्या हत्येवरून बांगलादेशात आगडोंब उसळला हा योगायोग नव्हे. त्याचीच परिणती हिंदुंवर हल्ले होण्यात झाली. युनूस राजवट सुरू झाल्यापासून बांगलादेशात सातत्याने हिंदू नागरिक; मंदिरे यांच्यावर होणार्‍या हल्ल्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहेच; हादी हत्येचे निमित्त करून दीपू चंद्र दास या 27 वर्षीय तरुणाला ज्या निर्घृण पद्धतीने जमावाने ठार केले, ती घटना बांगलादेशात नृशंस प्रवृत्ती किती डोईजड झाल्या आहेत याचा प्रत्यय देणारी आहे.
 
 
एका कपड्यांच्या कारखान्यात काम करणार्‍या दीपूने ईशनिंदा केली असा आरोप करीत तेथील इस्लामी कर्मचार्‍यांनी दीपूला ओढत रस्त्यावर आणले. त्याला विवस्त्र करण्यात आले; मग त्याला एका दोराने लटकविण्यात आले; जमावाने केलेल्या हिंसेचा (लिंचिंग) तो लक्ष्य ठरला. मग त्याला पेटवून देण्यात आले. मुख्य म्हणजे या संपूर्ण घटनेचा जल्लोष आणि चित्रीकरण तेथे उपस्थित असणारे करीत होते. तालिबानी मनोवृत्ती यापेक्षा निराळी काय असते? आता पोलिसांनी बारा जणांना ताब्यात घेतले असले तरी दीपूला ज्या कथित गुन्ह्यामुळे लक्ष्य करण्यात आले होते ते कृत्य त्याने केल्याचा - म्हणजेच इस्लामविरोधी वक्तव्य केल्याचा किंवा तशी कोणतीही ’पोस्ट’ समाजमाध्यमांवर टाकल्याचा- पुरावा यंत्रणांना मिळालेला नाही. तेव्हा याची जबाबदारी आता युनूस यांनीच घ्यायला हवी. याचे कारण बांगलादेशात जमात इ इस्लामवरील बंदी त्यांनी उठवली; हादीसारख्यांना मोकाट स्वातंत्र्य त्यांनी दिले; भारताशी कटुता त्यांनी घेतली. सत्ताधीश जेव्हा अशा भूमिका घेतो तेव्हा देशातील कट्टरतावाद्यांना योग्य तो संदेश मिळतो आणि अनेकदा सूर्यापेक्षा वाळू तापते त्याप्रमाणे अशा कट्टरतावादी शक्ती अधिकच मोकाट सुटतात. बांगलादेशात तेच झाले आहे. बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषदेने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षीच्या केवळ पहिल्या सहामाहीत त्या देशात अल्पसंख्यांकांवर 258 हल्ले झाले. त्यांत 27 मृत्यू झाले; लैंगिक अत्याचाराच्या 20 घटना घडल्या; उपासना स्थळांवर हल्ल्यांच्या 59 घटना घडल्या; घरे व उद्योजकांच्या कार्यालयांवर हल्ल्यांच्या 87 घटना घडल्या. युनूस यांचे अपयश अधोरेखित करणारे व त्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह लावणारे हे चित्र आहे.
 
 
हिंदुंचे संरक्षण गरजेचे
 
बांगलादेशामधील हिंसाचार व हिंदुंना लक्ष्य केल्याच्या घटना यांचे पडसाद भारतात उमटणे स्वाभाविक. बांगलादेशाचे दिल्लीस्थित उच्चायुक्तालय तसेच कोलकाता येथील उपउच्चायुक्तालय येथे हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने केली. भोपाळपासून मुंबई व हैदराबादपर्यंत मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलनेही निदर्शने केली. भारतीयांना बांगलादेशातील हिंदुंच्या स्थितीविषयी असणारी चिंता आणि त्यामुळे उत्पन्न होणार रोष त्यातून प्रकट झाला. शेख हसीना यांचे बांगलादेशला प्रत्यार्पण करावे अशी मागणी त्या देशाने केली आहे. पण तसे करण्यास तेथील स्थिती किती प्रतिकूल आहे हेच ताज्या हिंसाचाराने स्पष्ट केले आहे. चीनचा दौरा करून भारतविरोधी गरळ ओकणारे युनूस यांनी बांगलादेशमध्ये अराजकसदृश स्थिती निर्माण होण्यास हातभार लावला आहे. स्थिती त्यांच्या नियंत्रणात राहिलेली नाही आणि कट्टरतावाद्यांना मोकळे रान मिळाले आहे. त्याचे दुष्परिणाम त्या देशाला बराच काळ सोसावे लागतील. भारत हाच खरे तर बांगलादेशचा सर्वांत जवळचा मित्र. पण युनूस यांचा नाठाळपणा असा की, त्यांनी भारत व हिंदुविरोधी भूमिका स्वीकारली.
 
 
येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी त्या देशात सार्वत्रिक निवडणुका होतील. निवडणुकांचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर रोजी जाहीर केले आणि दुसर्‍याच दिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी हादीची हत्या झाली. त्याच्या हत्येच्या निमित्ताने भारतविरोधी भावनांना चिथावणी देण्याचा लाभ होणार्‍या शक्ती म्हणजे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय; जमात इ इस्लाम वा बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी हे पक्ष. याचे कारण निवडणुकीत ज्या मतदारसंघातून हादी उमेदवार होता त्या मतदारसंघात हेच दोन पक्षही रिंगणात आहेत. येत्या एक-दोन महिन्यांत तेथे आणखी काय काय होते हे सांगता येणे कठीण असले तरी भारतविरोधी व हिंदुविरोधी वातावरण तापवत ठेवले जाईल यात शंका नाही. अशावेळी भारताने केवळ सतर्क राहून चालणार नाही; चिकन नेकसारख्या व्यूहात्मक महत्त्वाच्या ठिकाणांवर गस्त व सैनिकी तैनाती वाढवावी लागेल. बांगलादेशातून होणारी अवैध घुसखोरी व हतबल निर्वासित अशी विभागणी नेटाने करावी लागेल.
 
 
बांगलादेशाची विद्यामान राजवट केवळ विध्वंसक नव्हे तर विकृत आहे. येत्या फेब्रुवारीत निवडणुका झाल्याच तरी कदाचित पात्रे बदलतील; धोरणे नाही. तेव्हा बांगलादेशची सूत्रे पुढेही भारतद्वेष्ट्यांच्या हातातच राहण्याचा संभव आहे आणि बेबंदशाही अशीच सुरू राहील हेही खरे. अशावेळी त्या देशातील हिंदुंचे संरक्षण हे भारताचे नैतिक कर्तव्य ठरते.

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार