पुणे पुस्तक महोत्सवाची गजबजलेली पंढरी

विवेक मराठी    26-Dec-2025   
Total Views |
Book Festival
या वर्षी ‘पुणे पुस्तक महोत्सव 2025’च्या आनंदाने ‘चळवळी’चं रूप घेतलं आहे. ही चळवळ स्वयंप्रेरणेने उभी राहते आहे. समाजातली दरी दूर व्हायला, मी अमुक-तमुक असा अभिनिवेश न बाळगता आपण फक्त ‘वाचक’ आहोत आणि ‘पुस्तकं’ ही आपली पंढरी आहे आणि पुस्तक महोत्सव ही दिंडी आहे, असा भाव या महोत्सवाने वाचकांच्या मनात उभा राहिला आहे. या दिंडीत वाचक भक्तिभाव मनात ठेवून येत राहतील, वाचन परंपरा अविरत चालू राहील आणि पंढरी सदैव गजबजत राहील, अशी आशा वाटते आहे.
वाचन संस्कृतीला दिशा देणारा, अनेकांची वाचनाची भूक समजून घेणारा आणि वाचनाला अधिकाधिक चालना देणारा ‘पुणे पुस्तक महोत्सव 2025’ हा 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2025 या काळात पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये झाला. साधारणत: 800 प्रकाशन संस्था, लेखक आणि असंख्य वाचक यांचा हा आता वार्षिक मेळावा झाला आहे. गेल्या तीन वर्षांत या महोत्सवाची वाढत गेलेली लोकप्रियता आपल्याला हेच सांगते. 9 दिवस सतत वाचनाचा विचार करणारा, चांगलं-सकस वाचनाची आस असणारा, समकालीन वास्तवाचा वेध घेणार्‍या लेखनाचा, तसंच ‘वेगळं’ काही प्रकाशित होतं आहे का? याचा शोध घेणारा वाचक हे दुर्मीळ असणारं चित्र या महोत्सवानिमित्ताने समोर आलंं.
 
 
तरुणांनी आपली लेक्चर्स संपल्यावर ‘कॉफी शॉप’ला भेट देण्याऐवजी ‘पुस्तक महोत्सवा’त पुस्तक बघत वेळ घालवणं, पुस्तकं हाताळणं, कुतुहलाने अनेक स्टॉल्सना भेट देणं, तरुण लेखकांशी संवाद साधण्यासाठी धडपडणं, आपल्याला काय करता येईल? स्वयंसेवक म्हणून काम करता येईल अशी विचारणा करणं, प्रत्यक्ष नऊ दिवस महोत्सवात कामं करणं हे चित्रही अतिशय आल्हाददायक आहे. पुस्तक महोत्सवाच्यानिमित्ताने तरुणाईची होणारी ही मानसिक जडणघडणही अत्यंत महत्त्वाची आहे.
 
 
वय वर्षे तीन ते 80 असा वयोगट, वेगवेगळ्या पेशातल्या व्यक्ती, विविध विचारधारा असणार्‍या व्यक्ती यांनी एकाच छताखाली एकत्र यावं, पुस्तकं बघावीत, एकमेकांशी चर्चा करावी, गप्पा माराव्यात आणि वाचनासंदर्भात, पुस्तकासंदर्भातल्या आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करावी हे वाचन संस्कृतीच्या दृष्टीने अतिशय आशादायी चित्र आहे. खरं तर पुस्तकाला ‘वाचक’ नाही, वाचन संस्कृती लयाला चालली आहे, या पुढचा पुस्तक न वाचणारा समाज कसा असेल? अशी अनाठायी चिंता व्यक्त करून एकंदर वाचन संस्कृतीला गालबोट लावणार्‍या नकारात्मक विचाराला पुस्तक महोत्सवाच्या रूपाने चपराक दिलेली आहे, याकडेही लक्ष दिलंं पाहिजे.
 
Book Festival 
 
या महोत्सवात अनेकविध विषयांवरची, अनेकविध साहित्य प्रकारांची पुस्तकं उपलब्ध होती. 2023 साली सुरू झालेल्या या महोत्सवात आशय, विषय आणि प्रकाराचं वैविध्य आल्यास नवल ते काय? गेल्या दोन वर्षांतील महोत्सवातील विक्रीची चढती कमान लक्षात घेऊन या वर्षे अनेक प्रकाशकांनी साधारणत: जूनपासून नवीन विषय, नवीन लेखक, नवीन साहित्य प्रकार अशा दृष्टीने पुस्तकांची निर्मिती सुरू केली. ‘साहित्य व्यवहार’ समाजापासून फटकून असतो. तो ‘प्रोफेशनल’ व्यवसाय नाही, अशी टिप्पणी प्रकाशकांच्या या कृतीने मोडून काढलेली. महोत्सवाच्या व्यापक रूपामुळेही हे शक्य झालेलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. एकूणच तिथे उपस्थित असणारा प्रकाशक-लेखक-वाचक आनंदी असण्याचाही तो एक परिपाक आहे, असं वाटतं.
महोत्सवानिमित्त लेखक-वाचक यांच्यात ‘संवाद’ वाढला. पूर्वापार, वाचक-लेखक यांच्यात असलेली ‘दरी’ या महोत्सवाच्या निमित्ताने कमी झाल्याचंही लक्षात आलं. दोघेही एकमेकांना भेटायला उत्सुक असल्याचं आणि त्याच वेळी आनंदी असण्याचं एक वेगळच दृश्य यानिमित्ताने पाहता आलं. वाचक-लेखक यांच्यात वाढलेल्या संवादाने सोशल मीडियाही या महोत्सवाच्या देखणेपणाने ओथंबून वाहायला लागला. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, इन्स्टाग्राम, फेसबुक ही अ‍ॅप्स उघडली, की फक्त ‘पुणे पुस्तक महोत्सव’च दिसत होता. त्यानंतर तो अनेक दिवस ओथंबूनच वाहतो आहे. अशी लोकप्रियता खचितच एखाद्याच महोत्सवाला मिळते. त्यामागे अर्थातच असतात, ते आयोजकांचे अथक परिश्रम, कंटेंटचा केलेला विचार, कार्यक्रमांची कल्पक मांडणी आणि हे सगळं करत असताना सर्व वयोगटातल्या वाचक प्रेक्षकांचा केलेला विचारही. चांगला हेतू मनाशी बाळगला, की यश आपोआपच चालत येतं, असं म्हणतात. त्याच हेतूंशी आजची युवा पिढी जोडली जातेय, हे महोत्सवाचं आणखी एक यश आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचा युवकांनी सांभाळलेला सोशल मीडिया हे याचं एक देखणं उदाहरण आहे.
 
Book Festival 
 
 
‘पुणे पुस्तक महोत्सव’ असं नाव असलं तरी पुण्याबरोबरीनेच परभणी, नाशिक, धुळे, विदर्भ, कोकण, मुंबई या ठिकाणांहून जाणीवपूर्वक येणारे वाचकही या महोत्सवाची एक आशादायक, सकारात्मक बाजू आहेत. तिथे आलेल्या कुणाही अनोळखी वाचकाशी बोलण्याची मुभा आणि विषय फक्त ‘वाचन’ आणि ‘पुस्तक’ असल्याने एकमेकांशी कनेक्ट होण्याची सहजता अनुभवण्यासारखीच होती. ग्रामीण भागांमध्ये पुस्तकांची अनुपलब्धता आणि पुण्यात पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने ‘एकदाच पुस्तकं घेता येतील’ या विचाराने आलेले शिक्षक, ग्रंथपाल, वाचन चळवळ कार्यकर्ते यांच्यासाठी तर पुस्तक महोत्सव ही एक पर्वणीच आहे. मुलांना वर्षभर पुरतील एवढी पुस्तकं घेऊन जाणं आणि त्यांना चांगलं, सकस वाचायला उपलब्ध करून देण्याची संधी या निमित्ताने मिळाल्याची भावनाही ग्रामीण भागातून आलेल्या अनेकांनी व्यक्त केली. ग्रामीण भागांमध्ये वाचनाची गंगोत्री नेण्याची, वाचनासाठी सहज साहित्य उपलब्ध होण्याची किमयाही पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने साधली जाते आहे.
 
ट्रॅव्हल ट्रॉली बॅग घेऊन येणारी, दोन-दोन, चार-चार पोती पुस्तक घेऊन जाणारी माणसं पाहिली, की आनंद आपसूकच होत होता. मनाला एक दिलासा मिळत होता. अर्थात सक्षम, समर्थ वाचक घडवण्यासाठी आणि त्यातून अधिकच प्रेरणा घेण्यासाठी आयोजित केलेेल्या लिट फेस्टचंही महत्त्व तितकंच आहे. यावर्षी साहित्यकेंद्री झालेले परिसंवाद, चर्चासत्र आणि एकूणच साहित्यिक विचारांची देवाणघेवाण अतिशय मर्मज्ञ होती. याच बरोबरीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही एक वेगळं महत्त्व होतं. या सांस्कृतिक कार्यक्रमांचा साहित्याशी असणारा सहसंबंधही वाखाणण्याजोगा होता. तरुणांनी या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही अलोट गर्दी करणं, उत्स्फूर्त प्रतिसाद देणं, चांगलं ते टिपून घेणं आणि नवीन पिढी आपल्या सांस्कृतिक संचितापासून फटकून वागते, हा आरोप इथे उपस्थित असलेल्या तरुणाईने खोडून काढलेेला आहे.
 

Book Festival 
 
‘लेखक मंच’ तर पुस्तक प्रकाशनहोत्र असल्याप्रमाणे सुरू होता. तिथे असलेलं नेटकं, नेमकं नियोजन आणि कमी प्रसिद्धी होऊनही तिथे असलेला, सातत्याने उपलब्ध असणारा प्रेक्षक हीदेखील एक जमेची बाजूची आहे. मुलांसाठी असणारा चिल्ड्रन्स कॉर्नर, तिथे झालेली वेगवेगळी सत्रे आणि मुलांचे झालेले मनोरंजन, मुलांना मिळालेला आनंदही महत्त्वाचा आहे.
 
 
महोत्सवाचं व्यापक स्वरूप बघता नियोजनात काही त्रुटी असणं अत्यंत स्वाभाविक आहे. या त्रुटी थोडा अधिक प्रयत्न केल्यास निश्चितच कमी होऊ शकतात. आयोजक एन.बी.टी. आणि राजेश पांडे पुढच्या वर्षी त्या कमी करतील, लोकांकडून आलेल्या सूचनांचा ते सकारात्मक विचार करतील असं चिन्हही आहे. कारण, गेल्या तीन वर्षांत स्टॉलच्या मांडणीत झालेला बदल, आलेला सुसूत्रपणा, पार्किंगची मोठ्या प्रमाणात केलेली व्यवस्था, ठिकठिकाणी केलेली मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था हे यावर्षीच्या महोत्सवात विचारपूर्वक केलेलं जाणवत होतं. पुढच्या वर्षी यात अधिक सूत्रबद्धपणा येईल, अशी खात्री आहे.
 
 
वाचक म्हणून काही अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या, त्यातली एक अपेक्षा तर हाडाच्या वाचकाची आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी बेंच. वाचकांच्या या अपेक्षा, पुढच्या वर्षीचा पुस्तक महोत्सव अधिक जोमाने होणार आहे, याची चुणूक आहेत.
यंदा सगळ्यात मोठी एक अडचण जाणवली ती, स्टॉल मॅप नसल्याची. अनेकांना मोबाईल स्कॅन करून मॅप बघण्याची सुविधा आहे, हेदेखील माहीत नव्हतं. पुढच्या वर्षी या मॅपची व्यवस्था असल्यास महोत्सवाला गालबोटही लागणार नाही. यासंदर्भातला प्रचार-प्रसाराचा एखादा व्हिडिओ आधी प्रसारित झाल्यास अशा सोयी, व्यवस्थापकीय गोष्टी उपलब्ध असल्याचं वाचकांना आधीच कळू शकेल आणि वाचक अधिक निर्धास्तपणे दिवसभर पुस्तक महोत्सवात थांबायचं आहे, या तयारीने येतील.
 
 
फर्ग्युसनला असणारा ऐतिहासिक वारसा आणि अशा वारशाच्या, वाचनाच्या, शिक्षणाची तळमळ असणार्‍या वास्तूत पुणे पुस्तक महोत्सव रुजला आहे. तो असाच बहरत, फुलत राहील, अशी सकारात्मक आशा या वर्षीच्या पुस्तक महोत्सवाच्या यशामुळे वाढली.
 
 
साहित्य व्यवहारातल्या प्रकाशक, लेेखक आणि वाचक यांना या महोत्सवाने केंद्रस्थान मिळवून दिलं आहे. त्यातून साहित्य व्यवहाराला, साहित्य विश्वाला सकारात्मक ऊर्जादेखील मिळते आहे. या ऊर्जेने सगळेच आनंदी होत आहेत. या आनंदाची लागण, दोन वर्षे होतेच आहे. या वर्षी या आनंदाने ‘चळवळी’चं रूप घेतलं आहे. ही चळवळ स्वयंप्रेरणेने उभी राहते आहे, याचा आनंद जास्त आहे. समाजातली दरी दूर व्हायला, मी अमुक-तमुक असा अभिनिवेश न बाळगता आपण फक्त ‘वाचक’ आहोत आणि ‘पुस्तकं’ ही आपली पंढरी आहे आणि पुस्तक महोत्सव ही दिंडी आहे, असा भाव या महोत्सवाने वाचकांच्या मनात उभा राहिला आहे. या दिंडीत वाचक भक्तिभाव मनात ठेवून येत राहतील, वाचन परंपरा अविरत चालू राहील आणि पंढरी सदैव गजबजत राहील, अशी आशा वाटते आहे.