एका पक्ष्याचे तीन सल्ले

विवेक मराठी    30-Dec-2025   
Total Views |
BMC
गेली काही वर्षे ते रोज रडत आहेत की, माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, माझे चिन्ह पळवले, मी त्यांना क्षमा करणार नाही. आपल्या कथेतील पक्षी शिकार्‍याला म्हणतो की, जे हातात होते आणि जे गेले त्याबद्दल शोक करीत बसू नये. उद्धवजींचा शोक अजूनही चालू आहे. राजकारणात तो टिकून राहतो, जो येणार्‍या पिढीच्या आशाआकांक्षा काय आहेत, हे नीट समजून घेतो. त्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील, अशा प्रकारचा पक्षाचा कार्यक्रम तयार करतो. त्यांना विश्वास देतो की, तुमच्यासमोर असलेले प्रश्न माझा पक्ष सोडवील. जो राजनेता यापैकी काही करीत नाही, त्याला जे गेले त्याचा शोक करीत राहण्यापलीकडे काही उरत नाही.
एका लोककथेपासून लेखाची सुरूवात करूया. एक शिकारी होता. त्याने एके दिवशी एका पक्ष्याला पकडले. तो पक्षी अतिशय सुंदर होता. पक्ष्याला वाटले की, आता आपले जीवन संपणार, परंतु पक्षी बुद्धिमान होता, त्याने धीर सोडला नाही. तो शिकार्‍याला म्हणाला,“शिकारी दादा, तुम्ही मोठ्या प्राण्यांची शिकार करून भरपूर मांस खाता. मी एवढा चिटुकला, माझ्या शरीरातून तुम्हाला काय मांस मिळणार?”
 
पक्षी पुढे म्हणाला,“तुम्ही जर मला प्राणदान दिले तर, मी तुम्हाला तीन मौलिक गोष्टी सांगीन.”
 
शिकारी त्या पक्ष्याच्या बोलण्यावर भाळला. पक्ष्याला त्याने हाताच्या मनगटावर ठेवले आणि तो म्हणाला,“मी तुला सोडतो पण मला तीन मौलिक गोष्टी सांग.”
 
त्यावर पक्षी म्हणाला,“पहिली गोष्ट मी मनगटावर बसून सांगेन, दुसरी गोष्ट घराच्या छतावर बसून सांगेन आणि तिसरी गोष्ट झाडाच्या उंच शेंड्यावर बसून सांगेन.”
 
मनगटावर बसल्याबसल्या त्याने शिकार्‍याला सांगितले,“कोणाच्याही फालतू बोलण्यावर चुकूनही विश्वास ठेवू नये. विशेषकरून जो बंदीवान झाला आहे, त्याच्या बोलण्यावर तर अजिबात विश्वास ठेऊ नये, हे पहिले शहाणपण आहे.” असे म्हणून तो पक्षी घराच्या छतावर गेला.
 
छतावरून तो म्हणाला,“जे आपल्या हाती होते, ते निसटून गेले, याचा खेद करू नये. भूतकाळ आठवून रडत बसू नये.” यानंतर तो झाडाच्या उंच शेंड्यावर गेला आणि तिथून तो शिकार्‍याला म्हणाला,“तू मला सोडून एक चूक केलीस. माझ्या पोटात अमूल्य वजनाचे रत्न आहे. ते तुला जर प्राप्त झाले असते तर तू खूप श्रीमंत झाला असतास.”
 
हे ऐकल्यानंतर शिकारी खूप अस्वस्थ झाला. शोक करू लागला. तेव्हा तो पक्षी म्हणाला,“अरे मी सांगितलेल्या शहाणपणाच्या दोन गोष्टींचा काही उपयोग झालेला दिसत नाही. बंदिवानाच्या अवास्तव बोलण्यावर विश्वास ठेवू नये, पक्ष्याच्या पोटात कधी वजनदार रत्न राहू शकते का, एवढे तुला कळत नाही का? त्याचा काही उपयोग झाला नाही आणि दुसरे शहाणपण तुला सांगितले भूतकाळाची आठवण करून रडत बसू नये.”
 
यावर तो शिकारी म्हणाला,“ठीक आहे, आता तिसरे शहाणपण सांग.” पक्षी म्हणाला,“मूर्ख माणसांना उपदेश करू नये. वाळवंटात जर बी पेरले तर त्याचा काही उपयोग नसतो. ते कधीच उगवणारे नसते. त्याप्रमाणे मूर्खाला उपदेश करून काही उपयोग नसतो, तो वाया जातो.”
 
 
BMC
 
ही लोककथा आठवण्याचे कारण, आजची उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अवस्था आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. नगरपरिषद निवडणुकीत नगण्य यश प्राप्त झाले. महानगरपालिका निवडणुकीत अपयशाची हॅट्रीक होणार का, अशी चर्चा चालू आहे. त्यांच्या या अवस्थेला ते स्वतः जबाबदार आहेत. राजकीय पक्ष परिस्थितीचे अपत्य म्हणून उभे राहते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली. महाराष्ट्र राज्य झाले, पण मराठी माणसाला न्याय मिळत नाही, अशी सर्वसामान्य भावना होती. त्या भावनेला बाळासाहेबांनी साथ दिली आणि बघता बघता शिवसेना वाढत गेली. 1985-86साली देशात हिंदुत्वाचे वारे वाहू लागले. बाळासाहेबांनी मराठीला हिंदुत्वाची जोड दिली, त्यामुळे शिवसेनेचा विस्तार झाला. मराठी भाषिकांशिवाय अन्य भाषिकही शिवसेनेत सामील होऊ लागले. नंतर भाजपादेखील हिंदुत्ववादी झाला. आणि शिवसेना-भाजपाची युती झाली आणि ती पुढे 25वर्षे टिकली.
 
सर्वभक्षी काळापुढे काहीही टिकत नाही. वयोमानाप्रमाणे बाळासाहेब स्वर्गवासी झाले. सामाजिक, राजकीय परिस्थितीदेखील झपाट्याने बदलत गेली. एकेकाळी प्रबळ असलेल्या काँग्रेसची जागा (राजकीय स्पेस) भाजपाने व्यापायला सुरूवात केली. बाळासाहेब ठाकरे यांचे कौशल्यपूर्ण राजकारण, परिस्थितीचा अचूक अंदाज, वैचारिक निष्ठा, वारसा हक्काने उद्धव यांच्याकडे आली नाही, तशी ती कधीही येत नसते. एकतर ती अंगभूत असावी लागते किंवा प्रयत्न करून मिळवावी लागते. उद्धव ठाकरे या दोन्ही बाबतीत अयशस्वी झालेले आहेत.
 
 
मुख्यमंत्रीपदाच्या मोहासाठी त्यांनी भाजपाशी असलेले संबंध तोडले. राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँग्रेस यांच्याशी मैत्री केली. मुख्यमंत्रीपद मिळाले, पण ते टिकविता आले नाही. पक्ष फुटला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हदेखील त्यांना मिळाले. म्हणजे बाळासाहेबांचे वारस एकनाथ शिंदे झाले. उद्धव ठाकरे नातेसंबंधानेच वारस उरले.
गेली दोन वर्षे ते रोज रडत आहेत की, माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, माझे चिन्ह पळवले, मी त्यांना क्षमा करणार नाही. आपल्या कथेतील पक्षी शिकार्‍याला म्हणतो की, जे हातात होते आणि जे गेले त्याबद्दल शोक करीत बसू नये. उद्धवजींचा शोक अजूनही चालू आहे.
 
 
राजकारणात तो टिकून राहतो, जो येणार्‍या पिढीच्या आशाआकांक्षा काय आहेत, हे नीट समजून घेतो. त्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील, अशा प्रकारचा पक्षाचा कार्यक्रम तयार करतो. त्यांना विश्वास देतो की, तुमच्यासमोर असलेले प्रश्न माझा पक्ष सोडवील. जो राजनेता यापैकी काही करीत नाही, त्याला जे गेले त्याचा शोक करीत राहण्यापलीकडे काही उरत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भावनिक आवाहनावर उभी केली. ते भावनिक आवाहन स्वीकारण्याची तेव्हाच्या पिढीची मानसिकता होती. राजकीय, सामाजिक परिस्थिती त्यासाठी अनुकूल होती, आज यापैकी काहीही राहिलेले नाही. मराठी माणूस, मराठी माणूस या तुणतुण्याची तार तुटलेली आहे. आजचा मराठी युवक बदलत्या आर्थिक परिस्थितीने आणि तंत्रज्ञानाने ज्या नवनवीन संधी उपलब्ध केलेल्या आहेत, त्या आत्मसात करण्याच्या मागे लागला आहे. त्याला मराठी अस्मिता, मराठी अस्मिता ऐकवून काही उपयोग नाही.
 
 
भाजपाशी काडीमोड घेत असताना त्यांना जे गुरूदेव भेटले, ते गुरूदेव त्यांनीच निर्माण केलेल्या पिंजर्‍यामध्ये अडकलेले गुरूदेव होते. त्यांचा पिंजरा हा सेक्युलॅरिझमचा पिंजरा आहे. या पिंजर्‍याचा एक भाग जातवादी राजकारणाचा आहे. दुसरा भाग मुस्लीम तुष्टीकरणाचा आहे आणि तिसरा भाग हिंदू आस्थांची टिंगळटवाळी करण्याचा आहे. आपल्या कथेतील पक्षी सांगतो की, बंदिवानाच्या बोलण्यावर फार विश्वास ठेवू नये. एकतर तो फसवेल नाही तर दिशाभूल करील. लोकसभा निवडणुकीत मुसलमानांची मते मिळाली, विधानसभा निवडणुकीत मुसलमानांनी पाठ फिरवली, नगरपरिषदांच्या निवडणुकीत मुसलमान फिरकलेदेखील नाहीत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुसलमान ढुंकूनही बघणार नाहीत. स्वनिर्मित सेक्युलर बंदिवासात असलेल्यांचा सहवास असले की असच होते. अडीच वर्षासाठी खुर्ची मिळाली आणि इथून पुढे जन्माचा विजनवास आलेला आहे. बंदिवानांचे सल्ले ऐकण्याचे हे परिणाम असतात.
 
 
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कर्तृत्वत्वान सहकारी उभे केले, त्यांचे सल्ले ऐकले. अनेक निर्णय सामूहिकपणे घेतले. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोलाचा स्तंभ झाले. बाळासाहेबांचे सर्व सहकारी आता कुठे आहेत? त्यांच्या सल्ल्यांचा काही उपयोग झाला का?, का तेही आपल्या कथेतील पक्ष्याप्रमाणे म्हणतात की, वाळवंटात बी पेरून काही उपयोग नाही, त्याला कधी अंकुर येणार नाही.
 
बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा महाराष्ट्रात जिवंत राहिला पाहिजे. कणखर हिंदुत्ववादी शक्ती म्हणून तिचे अस्तित्व कायम राहिले पाहिजे. निवडणुका येतात आणि जातात, जय-पराजय होत राहतात, पण भावी काळात हिंदू समाजाला आपल्या अस्तित्वरक्षणासाठी, मूल्यरक्षणासाठी, संग्राम करावा लागणार आहे. त्याची सिद्धता माझा बाप पळवला, माझा पक्ष पळवला या रडगाण्याने होणार नाही. त्यासाठी पोलादी मनगट आणि निधड्या छातीचेच नेतृत्व हवे.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.