‘उंच माझी सावली गं!गाथा ‘ती’च्या स्वप्नातील वास्तवांची’

विवेक मराठी    05-Dec-2025   
Total Views |

Vasundhara Sanjeevani Mandal
“माझा फोटो काढण्यापेक्षा हा डोईवरचा हंडा कसा खाली उतरवता येईल, हे बघा म्हणजे झालं.” हे भर उन्हात डोईवर हंड्याच्या दुडी घेऊन जाणार्‍या एका माऊलीचे शब्द आनंद भागवत यांच्या जिव्हारी लागले. आणि तीच ठिणगी, प्रेरणा झाली ती वसुंधरा संजीवनी मंडळ ही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) सुरू करण्यामागे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, भातसा आणि वैतरणा हे तीन मोठे तलाव मुंबईनजीकच्या ठाणे जिल्ह्यात असूनही या जिल्ह्यातील शहापूर-मुरबाड येथे मात्र पाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर मात करण्यासाठी पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती हा विचार घेऊन पाण्यासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण कामे आनंद भागवतकाका यांच्या संस्थेेमार्फत सुरू झाली.
 
 
काम चांगले असेल तर अनेक हात त्या कामासाठी आणि अनेक हात मदत देण्यासाठी आपसूकच पुढे येतात, हे वसुंधरा संजीवनीच्या आजवरच्या वाटचालीकडे पाहिले तर लक्षात येते. या कामाने महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला, गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार यांमुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली आली. अनेक चेक डॅम, बंधारे बांधण्यात आले. अनेक अल्पभूधारक शेतकरी श्रीमंत झाले, दरडोई उत्पन्न वाढले. यातून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळाली. पाण्याच्या संवर्धनासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे वसुंधरेमार्फत करण्यात आली. मात्र संस्थेचे काम केवळ पाणी प्रश्नापुरते सीमित राहिले नाही. स्थानिक गरजा लक्षात घेत कामाला अनेक आयाम जोडले गेले.
 
 
शहापूर-मुरबाड हे आदिवासीबहुल भाग. हा समाज अत्यंत मेहनती असला तरी इतर समाजापासून तुटलेला. त्यामुळे आत्मविश्वासाची प्रचंड कमतरता आणि मागसलेपणही खूप. पुरुषांमध्ये व्यसनाधीनता आणि महिला दिवसरात्र काबाडकष्ट करणार्‍या, त्यामुळे मुलांच्या आरोग्याची, शिक्षणाची वानवा. वसुंधरा संस्थेने दारिद्—यरेषा ओलांडून वर आलेल्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षण द्यायला हवं हे लक्षात घेऊन घरांमधल्या मुलींवर लक्ष केंद्रित केलं. एक मुलगी शिकली तर ती घरादाराला पुढे नेते या प्रत्ययाला येणार्‍या वास्तवातून मुलींच्या भविष्याला आकार देण्यासाठी किशोरी विकास प्रकल्प सुरू झाला.
 

Vasundhara Sanjeevani Mandal 
 
विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हा प्रकल्प सुरू होऊन वर्ष पूर्ण झाले नसले तरी ज्या पद्धतीने किशोरी विकास प्रकल्पातील मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे तो वाखाणण्यासारखा आहे. याचे दर्शन झाले ते 29 नोव्हेंबर 2025 रोजी गडकरी रंगायतन ठाणे येथे पार पडलेल्या ‘उंच माझी सावली गं! गाथा ‘ती’च्या स्वप्नातील वास्तवांची’ या सांस्कृतिक कार्यक्रमात. एखाद्या शाळेत स्नेहमिलनाचे कार्यक्रम होतात, तसाच काहीतरी हा सांस्कृतिक कार्यक्रम असेल असे प्रथम वाटले. पण तसे मुळीच नव्हते, त्या भागातील सामाजिक, आर्थिक, सर्वांत म्हणजे त्या समाजाची मानसिक स्थिती पाहिली तर लक्षात येईल की, हा प्रवास मी कोण (माणूसपणाच्या जाणीवेचा अभाव) इथपासून ते मी एक भारतीय समाजाचा घटक आहे इथपर्यंतचा अनेक मैलांचा प्रवास आहे.
 
 
कार्यक्रमाची सुरुवात, अवघे 91 वर्षाचे तरुण असलेले वसुंधरा संजीवनीचे संस्थापक आनंद भागवतकाका आणि अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलन करून झाली. स्वागतगीतानंतर किशोरी विकास प्रकल्पाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. हे आकर्षक बोधचिन्ह अख तंत्रज्ञान वापरून तयार केलेले होते. देशभक्तीपर गीत, छत्रपती शिवरायांचा पोवाडा, स्त्री जन्माची कहाणी दर्शविणारे नृत्य, किशोरी विकास प्रकल्पाची यशोगाथा मांडणारी नाटिका, तारपा नृत्य, मंगळागौर, सक्षम-सबल आणि समृद्ध नारीशक्तीचे तेज प्रकट करणारे पथनाट्य, एकल नृत्य अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रम किशोरी विकास प्रकल्पातील मुलींनी आत्मविश्वासपूर्वक सादर केले. त्यामुळेच ‘उंच माझी सावली गं! गाथा ‘ती’च्या स्वप्नातील वास्तवांची’ हे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे शीर्षक सार्थ ठरले. या प्रकल्पात सहभागी असलेल्यांपैकी तीन मुलींनी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीन भाषांतून आपापले मनोगत मांडले.
 
 
“असू आम्ही सुखाने पत्थर पायातील... या संघ संस्कारात आम्ही वाढलेलो आहोत. त्यामुळे केलेल्या कामामुळे मनात अहंकार बाळगण्याची सुतराम शक्यता नाही. अखेरपर्यंत समाजकल्याणासाठी काम करीत राहण्याची शिकवण रा. स्व. संघाकडून मिळाली आहे. माझ्यापरिने मी प्रयत्न करतोच आहे आणि तुमची साथ म्हणजे माझ्या या कामाला मिळालेली ऊर्जा आहे. किशोरी प्रकल्पातील मुली आणि या प्रकल्पाचे एकहाती काम पाहणारी कविता व तिच्यासोबत अनेक किशोरीताई यांचे कार्य पाहून मलाही ऊर्जा मिळते. यांना ताई म्हणण्याचं कारण असं की, शिक्षिका म्हटलं की, थोडा दुरावा आणि अंतर पडतं. पण ताई म्हटलं की, आपलेपणा वाटतो. या किशोरीताई अल्प मानधन मिळत असूनही श्रद्धेेपोटी काम करतात आणि म्हणूनच या प्रकल्पाला अल्पावधीतच यश प्राप्त झाले आहे,” असे उद्गार भागवतकाकांनी या प्रसंगी काढले.
 
 
“हे लाभलेलं यश केवळ माझं नाही तर या सगळ्याजणींचं आहे,” असं नम्रपणे नमूद करत त्यांनी आणखी एका प्रकल्पाचे सूतोवाच केले. तो म्हणजे युवा पिढीला व्यसनापासून प्रवृत्त करण्यासाठी युवा विकास प्रकल्प. संस्थेला कार्यकर्त्यांची आणि दात्यांची साथ लाभली तर हा प्रकल्पही यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेल्या मान्यवरांपैकी काहींनी आपले मनोगतही व्यक्त केले. जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले, “कोणताही समाजवर्ग असो त्यातील बहुतांश तरुण हा व्यसनाधीनतेकडे वळताना दिसतो, ही समाजासाठी गंभीर चिंतेची बाब आहे. भागवतकाकांनी युवा विकास प्रकल्पाची घोषणा करून यावर सकारात्मक उत्तर शोधले आहे. तसेच हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहता येणारी पिढी उत्तम घडविण्याचे काम हा प्रकल्प करीत आहे.”
 
माजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, “प्रकल्पाच्या बीजारोपणापासून ते वृक्ष होतानाच्या स्थितीपर्यंतचा मी साक्षीदार आहे याचा मला अभिमान आहे. आज प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेले काम आणि पार पडलेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे सर्वांचा आत्मविश्वास दुणावल्याची पावती आहे आणि किशोरी प्रकल्पाचे हे यश आहे. आगामी युवा विकास प्रकल्पालाही माझ्या शुभेच्छा देत आहे.”
 
“समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे ते कार्य करणार्‍या अशा संस्था-संघटनांच्या कामाला आणि ते काम करणार्‍या व्यक्तींना आम्ही मदतीच्या रूपाने कार्यात हातभार लावू शकतो, हे आमच्यासाठी आनंददायी आहे. एलआयसी ही नेहमीच राष्ट्रहितैषी कामात अग्रेसर असते. आनंद भागवत यांना यापुढेही सर्व कामांत आमचे सहकार्य असेल.” असे मत एलआयसीचे सुजीत देशपांडे यांनी मांडले.
 
“भारत आता चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल हे खरे, परंतु त्याचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. ज्याला आपण अंत्योदय म्हणतो, त्याचेच काम भागवतकाका करीत आहेत. भागवतकाकांच्या प्रत्येत कामामागे उभे राहण्याची ही परंपरा यापुढेही कायम राहील,” असे आश्वासन दि टिजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी दिले.
 
सुप्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी पाठवलेला व्हिडिओ संदेश या प्रसंगी दाखविण्यात आला. ते या संदेशात म्हणाले, “उंच माझी सावली गं, या विशेष किशोरी विकास प्रकल्प संचलित वनवासी विभागातील मुलींच्या कार्यक्रमातून या मुलींचा आत्मविश्वास दुणावेल आणि त्यांच्या स्वप्नातील वास्तव उभे करण्याचे बळ मिळेल.”
 
संघर्ष करत, जिद्दीने पुढे जात असलेल्या, स्वविकासाची वेगळी वाट निवडणार्‍या या मुलींसाठी येणारा भविष्यकाळ उज्ज्वल आहे याची खात्रीच या छोटेखानी कार्यक्रमाने दिली आहे.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.