आबालवृद्ध आले अन् पुस्तकांचे संचित घेऊन गेले!

विवेक मराठी    06-Dec-2025
Total Views |
चारुदत्त कहू -
9209863948
एरवी नोव्हेंबर महिन्यात नागपूरकर थंडीने गारठलेले असतात आणि दिवसभर अंगात लोकरी कपडे असल्याशिवाय घराबाहेर पडता येत नाही. संध्याकाळपासून गारठा सुरू होत असल्याने अनेक जण बाहेर पडण्याचेही टाळतात. पण 22 ते 30 नोव्हेंबर 2025 या 9 दिवसांच्या कालावधीत वातावरणातील गारठा झुगारून नागपुरातील रेशीमबाग मैदानाकडे शेकडो आबालवृद्धांची पावले वळलेली दिसली. नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी), महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नागपूर पुस्तक महोत्सव 2025’ नागपूरकरांनी अक्षरशः उचलून धरला. या महोत्सवात हजारो लोकांनी पुस्तकांशी मैत्री करून, आपल्या ज्ञानात भर पाडून घेतली. रिक्त हस्ते येथे येणारी प्रत्येक व्यक्ती आयुष्याचा ठेवा असलेले पुस्तकांचे संचित सोबत घेऊन परतताना दिसली. पुस्तक म्हणजे ज्ञानाचा अविनाशी दीप. जेथे माणूस पोहोचू शकत नाही, तेथे पुस्तक आपल्याला घेऊन जाते आणि पुस्तकाशी मैत्री म्हणजे स्वतःशी संवाद साधणे, याचा अनुभव या महोत्सवाला भेट देणार्‍या प्रत्येकाला आला.
 
NBT
 
 
नवी पिढी सोशल मीडिया आणि मोबाईलच्या आहारी गेल्याचा आणि वाचन संस्कृतीला ग्रहण लागल्याचा समज खोटा असल्याचे समाधानकारक दृश्य महोत्सवात पाहायला मिळाले. नागपुरात पहिल्यांदाच पार पडलेल्या या महोत्सवात आयोजकांची कसोटी तर लागलीच, पण त्यांच्या कल्पनाशक्तीतून प्रदर्शनाला भेट देणार्‍यांचा विक्रमी आकडाही गाठला गेला. आयोजनाचे म्हणाल तर पेंडॉल्स इतके भव्य होते की, एका दिवसात सर्व स्टॉल्सना भेटी देणेही शक्य झाले नाही. अनेकांना वेळच पुरला नाही. काहींनी तीन-चार वेळा भेट देऊन पुस्तकमैत्रीची आणि खरेदीचीही आपली भूक शमवून घेतली. शिक्षक-विद्यार्थी, आजी-आजोबा आणि नातू, मित्र-मैत्रिणी, कार्यालयीन सहकारी, कवी-कवयित्रींचे गट, ग्रामीण भागातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, भजनी मंडळाचे सदस्य, साहित्य संस्थांच्या सदस्यांचे गट, पत्रकार, प्राध्यापक, लेखक, प्रकाशक, मुद्रक अशा कितीतरी समूहांनी एकत्रित भेट देऊन पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन किती गरजेचे होते, हे पटवून दिले. शिक्षकांसह प्रदर्शनाला आलेल्या शाळकरी मुलांना पुस्तकमैत्रीतून जीवनभराचा अमूल्य ठेवाच मिळाला.
 
 
देशातील 50हून अधिक शहरांमध्ये मोठमोठी आयोजने करण्याचा अनुभव असलेल्या एनबीटीलाही या निमित्ताने सेकंड ग्रेड सिटीतील लोकांसाठीच नव्हे तर थर्ड ग्रेड सिटीसाठीही पुस्तक महोत्सव आयोजित केली जायला हवीत, हा संदेश मिळाला. या प्रदर्शनात देशभरातून आलेल्या सुमारे 300 प्रकाशकांची तब्बल 15 लाखांच्या आसपास पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली. यात बालसाहित्य, प्रादेशिक भाषांमधील साहित्य, संतसाहित्यापासून ते विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी, अंतराळशास्त्र, रोबोटिक्स, एआय आदीपर्यंत तसेच विविध लिपिंबद्दलची पुस्तके, हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू या भाषेतील पुस्तकांचे अमर्याद पर्याय सवलतीच्या दरात उपलब्ध होते. मुलाखती, आत्मचरित्रे, महापुरुषांची चरित्रे, पर्यटन, स्वःकथन, संत साहित्य, इतिहास याद्वारे कितीतरी विषयांना मुळातून स्पर्श केलेला दिसला.
 
 
नागपूर पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या समारंभाला उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एनबीटी इंडियाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी, उद्योजक अजय संचेती आदी उपस्थित होते. तर दुसर्‍या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ’झिरो माईल लिट फेस्टिवल’ मध्ये देशभरातील सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, धोरणकर्ते, कायदे अभ्यासक, विचारवंत यांच्या मुलाखती पार पडल्या. लेखक मंचमध्ये नागपूर व विदर्भीय लेखकांच्या साहित्यकृतींवर झालेल्या मुलाखती नवलेखकांना प्रेरणा देऊन गेल्या. बाल मंडपमध्ये बालकांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यशाळा, देशभरातील युवा लेखकाशी संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम अशी कार्यक्रमांची रेलचेल होती. पंधराशे मुलांनी पोस्ट कार्डवर चितारलेली चित्रे, म्युरल व सेल्फी पॉईंट आकर्षणाचे केंद्र ठरले.
 

NBT 
 
प्रथितयशांच्या मुलाखतींनी रंगत
 
वरिष्ठ अधिवक्ता विष्णू शंकर जैन, लेखक व विचारवंत मुकुल कानिटकर, अर्जुन पुरस्काराच्या मानकरी दमयंती तांबे, ’द सायलेंट वॉरियर’च्या लेखिका अंबरिन झैदी, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, महाराष्ट्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी) संदीप पाटील, लेखक-उद्योजक आणि प्रेरणादायी वक्ते अंकुर वारिको, महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू व साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा डॉ. कुमुद शर्मा, लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, ‘सुपर 30’चे जनक पद्मश्री आनंद कुमार, सुप्रसिद्ध लेखक आणि पटकथा लेखक आकाश गुप्ता, सुप्रसिद्ध लेखक प्रशांत पोळ, सुप्रसिद्ध पत्रकार सरिता कौशिक, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विपुल शाह, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, सुप्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य, सुप्रसिद्ध लेखक सुनील आंबेकर यांच्या मुलाखतींनी ’झिरो माईल लिट फेस्टिवल’ आणि नागपूर पुस्तक महोत्सवात रंगत भरली.
 
 
पुरस्कारांची आस ठेवू नका
 
महोत्सवात देशभरातून आलेल्या युवा लेखकांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी साहित्यिकांमधील प्रतिभेचा उल्लेख करून, त्यांनी आपली प्रतिभा तथ्यावर आधारित कशी राहील, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. साहित्य सर्जनता हा लेखकांचा स्वभावधर्म असून, ते शब्दसृष्टीचे ईश्वर असल्याने, त्यांनी शब्दांचा वापर जपून आणि पारखून करावा असे आवाहनही केले. चुकीचे शब्द उलट परिणाम करतात, असे सांगून लेखकांनी समाजहितासाठीच लिहावे, असे ते म्हणाले. लेखकांनी पुरस्काराची आस लावून बसू नये असे नमूद करून, एखाद्या वाचकाने दिलेली प्रशंसेची थाप हा देखील मोठा पुरस्कारच असल्याचे ते म्हणाले. एआय, आधुनिक शिक्षण प्रणाली, वैश्विकीकरण, डिजिटल युग, जेन झी, इतिहास याबाबतच्या प्रश्नांनाही त्यांनी यथोचित उत्तरे दिली. सरसंघचालकांनी व्यस्त कार्यक्रमातून पुस्तक महोत्सवातील स्टॉल्सना भेटी देऊन प्रकाशकांचा उत्साह वाढवला.
 

NBT 
 
‘लेखक मंच’मधील संवादाची चर्चा
 
‘लेखक मंच’मध्ये ज्येष्ठ समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे, इन्फ्लूएन्सर निखिल चंदवानी, पुरातत्व अभ्यासक डॉ. मनोहर नरांजे, झाडीबोली साहित्याचे अभ्यासक लखनसिंग कटरे, राकेश कृपलानी (सायबर सायकॉलॉजी), वसुंधरा काशीकर (चरित्र लेखन), रमा गोळवलकर (रहस्य कथा), डॉ. मीरा निचळे, रश्मी पदवाड मदनकर, डॉ. ईश्वर नंदापुरे, अफसाना बदर व तराना फजल यांना मुलाखतकारांनी बोलते केले. या सर्व संवादात्मक कार्यक्रमांची सर्वत्र चर्चा होती.
 
 
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
 
प्रसिद्ध शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांच्या अद्वैता या देशातील महिला संतांवर आधारित कार्यक्रमाने आध्यात्मिक वातावरण तयार केले तर प्रसिद्ध मराठी गझल गायक भीमराव पांचाळे यांनी हिंदी मराठी गझलांच्या सादरीकरणाने नागपूरकरांचे कान तृप्त केले. गर्जा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमासह युवा कलाकारांचे विविध बँड आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम करणार्‍या विश्व ममत्व फाउंडेशनच्या शिवमुद्रा डान्स ग्रुपने नागपूर पुस्तक महोत्सवात ‘मंगलमुखी - कलर्स ऑफ इंडिया’ हा अप्रतिम कार्यक्रम सादर केला. विविध राज्यातील लोकनृत्य व राज्य नृत्यांद्वारे भारतीय संस्कृतीचे विविध रंग कलाकारांनी प्रस्तुत केले.
 
 
‘चिल्ड्रेन्स कॉर्नर - बालमंडप’मधील उपक्रमांना नागपुरातील शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवात सकाळच्या वेळेत मुलांसाठी विविध शैक्षणिक, सर्जनशील आणि मनोरंजक उपक्रम राबवले गेले. एनसीसीएलतर्फे चित्रकला स्पर्धा, बुक कव्हर डिझाइन कार्यशाळा, पोस्टर मेकिंग, बुकमार्क डिझाइन, म्युरल वॉल आर्ट आणि मंडला आर्ट कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पक आणि वैविध्यपूर्ण कलाकृतींनी या कार्यशाळांना रंगत आणली. म्युझिकल स्टोरी टेलिंग, प्लेइंग विथ वर्ड्स, कार्टून डिझाईन हे वैविध्यपूर्ण उपक्रमही सोबतीला होते. पेंटिंग कॉम्पिटिशन, ड्रॉ विथ म्युझिक, कॅरिकेचर वर्कशॉप, योगा सेशन, लोकनृत्य सादरीकरण तसेच वैदिक गणित कार्यशाळांचे आयोजन झाले. हे सर्व उपक्रम मुलांमध्ये कला, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि वाचनाची आवड वाढीस लावण्यासाठी होते, असे आयोजकांनी सांगितले.
 
 
समाजात हे करू, ते करू, असे झाले पाहिजे, तसे झाले पाहिजे असे बोलणारे खूप असतात. मात्र काही जण न बोलता कार्यसिद्धीस नेणारे ठरतात. यात एनबीटीचे प्रा. मिलिंद मराठे यांच्यासह झिरो माईल फाऊंडेशनची संचालकांची त्रयी प्रशांत कुकडे, समय बन्सोड आणि कल्याण देशपांडे यांच्या नावांचा उल्लेख करावा लागेल. महोत्सवातील भिन्न कार्यक्रमांमधील त्यांची लगबग सुमारे 250 जणांच्या टीमला कार्य करण्याची प्रेरणा देऊन गेली नाही तरच नवल. गेल्या सहा महिन्यांपासूनच्या त्यांच्या धावपळीची पुस्तक महोत्सवाच्या यशस्वीतेतून फलश्रुती झाली.
 
 
पुस्तक महोत्सव नवी उंची गाठेल
 
विदर्भ ही भाषेच्या संगमाची भूमी आहे. येथे मराठी आणि हिंदी साहित्याची समांतर अशी समृद्ध परंपरा आहे. एनबीटीने देशभरात वाचनसंस्कृती पुनर्स्थापित करण्याचे उत्कृष्ट कार्य केले आहे. नागपूरचा पुस्तक महोत्सव आता नवी उंची गाठेल.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
----------------------------------- 
पुस्तकांतूनच ज्ञानप्राप्ती
 
पुस्तकातून जे विचार आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात, त्यातून व्यक्तीमत्त्व घडते. मी शालेय जीवनात बाबासाहेब पुरंदरे, रणजीत देसाई, शिवाजी सामंत यांची पुस्तके वाचली. त्याचा माझ्या जीवनावर परिणाम झाला. आपला देश ज्ञानाचे भांडार असून देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृत, परंपरा ही आपली मोठी शक्ती आहे. देशाला विश्वगुरू बनवायचे असेल, देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर ज्ञान प्राप्त करावे लागेल व हे ज्ञान पुस्तकांतून प्राप्त होते.
 
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
--------------------------------------------------------------------------- 
फेसबुक, इन्स्टामधून बाहेर पडा
 
पिझ्झा, बर्गर जसे शारीरिक आरोग्यावर परिणाम करतात तसेच, इन्स्टाग्राम, फेसबुक बौद्धिक आरोग्यावर परिणाम करतात. त्यातून बाहेर पडायचे असेल, प्रगती करायची असेल तर पुस्तके वाचली पाहिजे, कल्पनारम्य गोष्टी वाचल्या पाहिजे.
 
- सुप्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी
 
------------------------------------------------------- 
नवभारताच्या उभारणीची साक्ष
 
यवनांच्या आक्रमणानंतर आपली संस्कृती लयास गेली, परंतु शिवछत्रपतींनी मराठी भाषेची आणि भारतीय संस्कृतीची पुन्हा प्रतिष्ठापना केली. हा पुस्तक महोत्सव त्या परंपरेचा वारसा पुढे नेणारा आहे. आज 350 वर्षांनंतर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि डॉ. मोहनजी भागवत यांच्या नेतृत्वात नवे राष्ट्र उभारताना दिसत आहे. हा महोत्सव त्या नवभारताच्या उभारणीची साक्ष देणारा आहे.
 
-शिवकथाकार विजयराव देशमुख