भारतातही नुकत्याच झालेल्या दिल्लीमधील दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस विरोधक कसे वागले हे आपण पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की, अमेरिकेत जरी सध्या दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे ध्रुवीकरण झाले असले तरी जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा त्यावरून सरकारवर आणि परिणामी सरकारी यंत्रणेवर विनाकारण कुहेतूने अतिरेकी शंका घेतल्या जात नाहीत. यांचा अर्थ असा होत नाही की, त्या घटनेकडे पुरेशा गांभीर्याने लक्ष दिले जात नाही पण आपल्या देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पक्षीय दृष्टीकोनातून तडजोडीची भूमिका घेतली जात नाही, हे महत्त्वाचे.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. 26 नोव्हेंबर 2025 रोजी साधारण दुपारच्या सव्वादोनची वेळ होती. राजधानीतील, व्हाइट हाऊसपासून काहीशाच अंतरावर असलेल्या फारागेट स्क्वेअर नामक जागेपाशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशाने उपस्थित असलेले नॅशनल गार्डस गस्त घालत होते. 17th street NorthWest And H street च्या कोपर्यावर अचानक कोणीतरी गोळीबार सुरू केला. एका अज्ञात व्यक्तीने थेट दोन गार्ड जवानांवर गोळीबार केला. कोणतीही चकमक नव्हती, चेतावणी नव्हती-उलट, हल्ला पूर्णपणे विचार करून आखलेला दिसत होता. ऐन गर्दीत चालू असलेल्या ह्या प्रसंगात, काही सेकंदांतच हे दोन्ही जवान जमिनीवर कोसळले. गोळीबार ऐकून काही अंतरावर असलेले इतर गार्ड तात्काळ त्या दिशेने धावले. प्राथमिक अहवालानुसार, एका गार्डने हल्लेखोराला जमिनीवर पाडले (tackle केले).
दुसर्या गार्डने आवश्यकतेनुसार प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. हा त्वरित हस्तक्षेप झाल्यामुळे तो हल्लेखोराला पुढील गोळीबार किंवा शस्त्र वापरण्यापासून रोखणारा निर्णायक क्षण ठरला. हल्लेखोराने जमिनीवर पडलेल्या जवानाचे शस्त्र उचलण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रत्युत्तर देणार्या गार्डने त्याच क्षणी त्याला झडप घालून काबूत घेतले, ज्यामुळे तो कोणतेही शस्त्र वापरू शकला नाही.
अमेरिकेतील नॅशनल गार्ड हे दल काहीसे भारतातील निमलष्करी दलासारखे असते. जे तरुण-तरुणी नॅशनल गार्डमध्ये आपल्या जीवनातील काही काळ देण्यासाठी तयार असतात त्यांना अमेरिकन सरकारच्या काही शैक्षणिक सवलती मिळतात, ज्यामुळे महागडे उच्च शिक्षण घेणे थोडेसे त्यांच्या आवाक्यात येऊ शकते. नॅशनल गार्डस हे बहुतांशी वेळेस राज्याच्या गव्हर्नरांच्या अखत्यारीत येतात. पण जर राष्ट्राध्यक्षांचे बोलावणे आले तर राष्ट्राध्यक्षांच्या अखत्यारीत ते काम करतात. सध्या वॉशिंग्टन डी.सी. मध्ये नॅशनल गार्डस हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बोलावलेले आहेत. दुर्दैवाने, या घातपाती हल्ल्यात प्रायव्हेट साराह बेकस्ट्रॉम, वय फक्त 20 वर्षे, या नॅशनल गार्डचा मृत्यू झाला. नंतर मिळालेल्या माहितीनुसार, तिला नॅशनल गार्डचे कर्तव्य बजावून पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा होती. तिच्यासोबत असलेले स्पेशॅलिस्ट अँड्र्यू वोल्फ, वय 24वर्षे (हा लेख लिहीत असताना) जखमी झाल्यामुळे गंभीर अवस्थेत आहे.
या हल्लेखोराला तात्काळ सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्या यंत्रणेकरवी लगेच ओळख पटू शकली. त्याचे नाव आहे, रहमानुल्ला लकनवाल. वय वर्षे 29 असलेला हा रहमानुल्ला अफगाण नागरिक आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे अफगाणिस्तानात जेव्हा अमेरिकेने ताबा ठेवला होता, तेव्हाच्या अमेरिकेच्या ऑपरेशन्सदरम्यान तो अमेरिकन गुप्तहेर संघटना, CIAच्या सुरक्षा दलाचा भाग होता. माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या काळात, काबूलमधून अमेरिकेने जेव्हा काढता पाय घेतला, तेव्हा त्यांनी ज्या अफगाणांनी अमेरिकेस तालिबानविरोधात मदत केली होती, त्यांना अमेरिकेत Operation Allies Welcome नावाच्या कार्यक्रमाखाली राहण्यासाठी येण्यास परवानगी दिली. रहमानुल्ला हा 2021 साली अशाप्रकारे अमेरिकेत आला.
आता बाहेर येत असलेल्या बातम्यांप्रमाणे, काही अहवालांनुसार, अमेरिकेत त्याचे आयुष्य अत्यंत अस्थिरतेत गेले - आर्थिक ताण, एकाकीपणा आणि मानसिक संघर्ष अशा अनेक प्रकारच्या तणावातून तो जात होता. तो गुन्हेगारच आहे. तो खूपच एकाकीपणे राहायचा. तो स्वतःच्या बायकोशी आणि मुलांशी पण फारसा बोलत नव्हता. अर्थात यामुळे त्याच्या दुष्कृत्याचे समर्थन अजिबात होऊ शकत नाही. पण त्याच्या ह्या नाजूक मानसिक अवस्थेचा नेमका कोणी फायदा करून घेतला का? हे तपास यंत्रणा आता पाहतील.
अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या प्रमुख क्रिस्ती नोएम यांनी सांगितल्याप्रमाणे, रहमानुल्लाला अतिरेकी बनण्याचे प्रशिक्षण हे अमेरिकेतच मिळाले आहे. पुढे त्यांनी अशी शक्यतादेखील व्यक्त केली आहे की, असे अतिरेकी तयार करण्यात त्याच्या कम्युनिटीमधील म्हणजे अफगाण समुदायातीलच काहीजण कारणीभूत असावेत. थोडक्यात, जरी अजून अधिकृतपणे तसे म्हटले गेलेले नसले तरी, हा हल्ला हा अंतर्गत होता. कुठून बाहेरून झालेला दहशतवादी हल्ला नव्हता. अर्थात हल्ला करणारा हा निर्वासित म्हणून अधिकृतपणे अमेरिकेत आलेला स्थलांतरित होता, हे देखील त्यातील वास्तव आहे.
कुठल्याही सामाजिक घटनांचे आणि त्याहूनही अधिक दुर्घटनांचे सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटतातच. तसेच ह्या दुर्घटनेचे देखील उमटत आहेत. सामान्य नागरिकांपासून ते दोन्ही पक्षातील राजकाराण्यांपर्यंत सर्वांनी दोन्ही नॅशनल गार्डस मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली. ट्रम्प यांनी समाजमाध्यमातील पोस्ट वर आणि ट्रम्पसरकार मधील इतरांनी देखील तात्काळ बायडेन यांचे सरकार असताना त्यांनी ठरवलेल्या स्थलांतरितांच्या बाबतीतील धोरणावर टीका केली. त्याचाच परिणाम म्हणून इतर देशाचे नागरिक असलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अमेरिकेत सहजपणे येऊ शकले असे त्यांचे म्हणणे आहे. ट्रम्प आणि त्यांच्या पक्षातील, विचारसरणीतील अनेकांचा एकूणच स्थलांतरिताना देशात सहज प्रवेश देण्यावरून विरोध आहे. या नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे त्या विरोधाला अधिकच तिखट धार चढली आहे.
भारतातही नुकत्याच झालेल्या दिल्लीमधील दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस विरोधक कसे वागले हे आपण पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की, अमेरिकेत जरी सध्या दोन्ही पक्षांमध्ये टोकाचे ध्रुवीकरण झाले असले तरी जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा त्यावरून सरकारवर आणि परिणामी सरकारी यंत्रणेवर विनाकारण कुहेतूने अतिरेकी शंका घेतल्या जात नाहीत. यांचा अर्थ असा होत नाही की, त्या घटनेकडे पुरेशा गांभीर्याने लक्ष दिले जात नाही अथवा संबंधित सिनेट तसेच कॉँग्रेसनल कमिटीजमध्ये विरोधक अभ्यासपूर्वक त्याबाबत प्रश्न विचारत नाहीत की माहिती घेत नाहीत.
या हल्ल्यानंतर ट्रम्प सरकारने तातडीने पावले उचलत सुरक्षेसाठी अतिरिक्त 500 गार्ड तैनात केले आहेत. नॅशनल गार्डस हे बाहेरील राज्यातून आलेले असल्याने त्यांना स्थानिक भूभाग आणि visitorsची पूर्ण कल्पना नसते. म्हणून आता गस्त पद्धती पूर्णपणे बदलल्या गेल्या आहेत. आता सैनिकांना एकेकटे पाठवले जाणार नाही तर डी.सी. पोलीस आणि गार्ड यांचे संयुक्त पथक तयार केले गेले आहे. त्याचबरोबर ट्रम्प विरोधक नॅशनल गार्डचा असा वापर करणे कितपत योग्य आहे, हे विचारू लागले आहेत.
या घटनेच्या दुसर्याच दिवशीच अमेरिकेत सर्वत्र आणि सर्वधर्मीय लोक साजरा करतात त्या थँक्सगिव्हींगचा सण होता. त्यासाठी जनतेला शुभेच्छा व्यक्त करताना, ट्रम्प यांनी ह्या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध करत अतिशय कडक धोरणे अंमलात आणली जातील, असे सांगितले. त्याला अनुसरून लगेचच अफगाण visitorsचे व्हिसा अर्ज स्वीकारणे अमेरिकेने तूर्तास थांबवले आहे. अमेरिकेने ज्या देशात धार्मिक स्वातंत्र्य नाही अशा काही देशांना countries of particular concerns असा असा दर्जा दिलेला असतो. सध्या या यादीमध्ये अफगाणिस्तान, म्यानमार, बुरुंडी, चाड (Chad), क्युबा, रिपब्लिक ऑफ काँगो, इक्वेटोरिअल गिनी (Equatorial Guinea), इरिट्री (Eritrea), हैती, इराण, लाओस, लिबीया, सिएरा लिऑन (Sierra Leone), सोमालिया, सुदान, टोगो (Togo), तुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला, आणि येमेन हे देश येतात. ट्रम्प सरकारच्या नवीन धोरणानुसार या सर्व देशांतील नागरिक ज्यांनी अमेरिकन ग्रीनकार्ड घेतलेले आहे. त्यांच्या ग्रीनकार्डची पुनर्तपासणी केली जाणार आहे. या सर्व धोरणात्मक प्रतिक्रिया जाहीर केल्या जात असल्या तरी त्या प्रत्यक्षात कशा अंमलात आणल्या जाणार आहेत हे कळायला अजून वेळ लागेल. त्याच बरोबर ह्या हल्ल्यातील गुन्हेगार-आरोपीची अजून चौकशी व्हायची आहे तसेच या हल्ल्यामागचा निश्चित उद्देश समजून घ्यायचा आहे, अथवा तशी चौकशी झाली असली तरी ती उघडपणे जाहीर करण्यात आलेली नाही. हा गुन्हा देशविरोधी भावनेतून झाला, दहशतवादी कृत्य म्हणून घडविला गेला की हा धार्मिक अतिरेकी हल्ला होता अथवा सदर आरोपी मनोरुग्ण असल्याने हातातून घडलेले कृत्य अशा प्रकारे नेमका कशा रितीने झालेला, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्या घटनेमागे कोणी बोलविता धनी होता का, हे समजून येणेही आवश्यक आहे. घातपात असो की दहशतवाद त्याचे मुळासकट उच्चाटन होणे गरजेचे आहे ही गोष्टच या घटनेतून अधोरेखित झालेली आहे.