पुण्यातील कायदे क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तीमत्त्व सोहनलाल कुंदनमल जैन यांची आयुष्याप्रति कृतज्ञ राहण्याची आणि सेवाभावाने जगण्याची त्यांची मानसिकता प्रत्येकाने अंगिकारण्यासारखी आहे. आपल्या समाजासाठी केलेलं काम आणि त्या समाजाने दिलेली ओळख समाजाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरल्याचा आनंद जैन यांच्या चेहर्यावर वयाच्या पंचाहरीतही दिसतो. सर्व स्तरातल्या लोकांचं त्यांच्यावर प्रेम असल्याचा आणि त्यांचंही लोकांवर प्रेम असल्याचा एक वेगळा, विलक्षण आनंद, त्यांच्या कामाला अधिक झळाळी मिळवून देतं, हे त्यांच्या मृदू बोलण्यातून आणि वागण्यातून जाणवत राहतं.
साधं, सरळ, सेवाभावी मनोवृत्तीने जगणारं, कार्याला आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी ठेवणारं, मानवतेला अधिक महत्त्व देणारं पुण्यातील कायदे क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे सोहनलाल कुंदनमल जैन. त्यांचा जन्म राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील शिवगंज या गावी झाला.
प्राथमिक शिक्षण झाल्यावर वयाच्या दहाव्या वर्षी आपल्या कुटुंबासह सोहनलाल जैन पुण्यात आले. सातवी-आठवीत असल्यापासूनच ते रा. स्व. संघाच्या शाखेत जाऊ लागले. तिथे त्यांच्यावर झालेले संस्कार त्यांनी कायमच आचरणात आणले. त्यांच्या वडिलांचं ज्वेलरीचं दुकान असल्याने वयाच्या दहाव्या वर्षांपासून ते वडिलांना दुकानात मदत करू लागले. त्या वेळी ‘दुकानात काम केल्याचा फायदा पुढे वकिली करताना झाला’, असं ते प्रांजळपणे सांगतात. गिर्हाईकांशी आपुलकीने बोलण्याची लागलेली सवय त्यांनी आजही जपलेली आहे. ते आपल्या अशिलांना ‘देव’ मानतात. वकिलीचा ‘व्यवसाय’ हा फक्त ‘व्यवसाय’ असता कामा नये, तर ती एक ‘सेवा’ असली पाहिजे, या उद्देशाने त्यांनी वकिली सुरू केली. आजही ते त्याच भक्तिभावाने काम करतात, हे विशेष उल्लेखनीय आहे.
वयाच्या पंधराव्या वर्षीच सोहनलाल त्या काळातली अकरावी उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. एफ.वाय.बी.ए.स्सी.मध्ये प्रथम श्रेणी मिळाल्यानंतर त्यांनी सी.ओ.ई.पी. महाविद्यालयात ऑन मेरीट इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. विद्यार्थिदशेतच त्यांचं वाचन दांडगं होतं. नवभारत टाईम्समध्ये, 15 जून 1967 रोजी छापून आलेला एक लेख त्यांच्या वाचनात आला. त्यात अभियांत्रिकी करून बेरोजगार राहिलेल्या तरुणांसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली होती. तो लेख वाचून त्यांचं मत बदललं आणि त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. त्याच दरम्यान त्यांनी वकिलीचाही अभ्यास सुरू केला. याच काळात वाचन, तल्लख बुद्धी आणि कायद्याचा केलेला अभ्यास यांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झळाळी आली.
कायद्याचं शिक्षण झाल्यावर जैन 25 मार्च 1972 रोजी तेव्हाच्या संघशाखेतील प्रमुख कार्यकर्ते म्हणजेच तात्या वझे यांच्याबरोबर तत्कालीन प्रतिथयश विधिज्ञ बाबाराव भिडेंना भेटायला गेले. तात्या वझेंच्या सांगण्यावरून बाबाराव भिडेंनी जैन यांना त्यांचे सहायक म्हणून काम करण्याची संधी दिली. हाच जैन यांच्या आयुष्यातला निर्णायक टप्पा ठरला. बाबाराव भिडे यांच्या सहवासात आल्यावर लहानपणापासून जैन यांच्यावर झालेले संघाचे संस्कार अधिक खुलले. त्यांच्या कामाला दिशा मिळाली. समाजाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन विकसित झाला. त्याचा पुढे सामाजिक काम करतानाही त्यांना उपयोग झाला.
बाबांचा स्वभाव, त्यांची शिस्त आणि सखोल वाचन प्रत्यक्ष पाहिल्यामुळे जैनांनी अर्धवेळ वकिली करण्याचा विचार सोडून, पूर्णवेळ वकिली व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साधारण पाच वर्षे जैन, कौटुंबिक आणि सार्वजनिक कार्यक्रम बाजूला ठेवून ‘बाबांची सावली’ म्हणून त्यांच्यासोबत काम करत राहिले. त्या वेळी बाबा कार्यालयामध्ये यायच्या आधी जैन त्यांच्या टेबलाशेजारी बसायचे. कार्यालयात बसून पक्षकारांशी बोलणं, त्यांची माहिती घेणं, त्याचं कायद्याच्या दृष्टीने वाचणं करणं, त्या संदर्भातले ड्राफ्ट तयार करणं, हे सर्व जैन बाबांकडून मनोभावे शिकले. ज्या काळात अनेकांना काम मिळत नव्हतं, त्या काळात जैन यांचा वकिली व्यवसायात जम बसला होता. बाबाराव भिडेंकडून त्यांना खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकता आल्या, त्याबद्दलची कृतज्ञताही जैन अतिशय निष्ठेने, आत्मीयतेने व्यक्त करतात.
एकीकडे जैन यांची कारकीर्द बहरत असतानाच देशाच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत होत्या. त्यातली एक महत्त्वाची घडामोड म्हणजे 1975 साली आणली गेलेली आणीबाणी. आणीबाणी जाहीर झाल्यावर अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. त्या वेळी बाबाराव महाराष्ट्र गोवा प्रांताचे संघचालक असल्याने त्यांनाही अटकेत टाकण्यात आलं. त्यामुळे कार्यालयातील सर्व कामांची जबाबदारी जैन यांच्याकडे आली. त्या वेळी बर्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात अटकेच्या ऑर्डर्स होत्या. रोज किमान 7 ते 8 जामीन अर्ज यायचे. त्या वेळी जैन यांनी साधारण 275 ते 300 कार्यकर्त्याना जामीन मिळवून दिला आणि त्यांना मुक्त केलं. या सगळ्यामुळे, साधारणत: एखाद्या वकिलाला, वकिलीची मान्यता मिळायला 10-15 वर्ष लागतात, ती जैन यांना 5 वर्षांतच मिळाली. तेव्हापासून जैन हे ‘बाबांची सावली’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
शैक्षणिक काम
सन 1979 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी जैन यांना खडकी एज्युकेशन सोसायटीत अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली होती. त्या संस्थेत बरेच धुरंधर लोक होते. काँग्रसचे चंद्रकांत छाजेड हे सचिव होते, तर कृष्णकुमार गोयल हे उपाध्यक्ष होते. खडकी एज्युकेशन सोसायटी सर्वसमावेशक होती. तिथे सर्व जातीचे, धर्माचे, पक्षाचे, निरनिराळ्या विचारधारांचे तज्ज्ञ एकत्र असूनही वैचारिक मतभेद फारसे झाले नाहीत. एकमेकांच्या विचारधारा कामाच्या आड आल्या नाहीत, तर ‘शिक्षण’ हाच विषय केंद्रस्थानी ठेवून काम करण्याला सगळ्यांनी प्राधान्य दिलं. तिथे जैन यांनी सलग 1979 ते 2016 पर्यंत 37 वर्ष अध्यक्षपद भूषवलं आणि तिथूनच त्यांच्या शैक्षणिक कामाबरोबरीनेच सामाजिक कामालाही सुरुवात झाली.
त्यानंतर 2016 पासून ते शिक्षण प्रसारक मंडळीमध्ये अध्यक्ष म्हणून काम कार्यरत आहेत. त्यांच्या अध्यक्षपदावर असण्याच्या काळात त्यांनी सगळ्यात महत्त्व दिलं ते शिक्षक गुणवत्तावाढीला. शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असल्याने त्यांची गुणवत्तावाढ झाली की त्याचा फायदा विद्यार्थांना होतो, हे लक्षात घेऊन त्यांनी सिटिझन ग्लोबल लीडरशिप नावाच्या अमेरिकन संस्थेच्या मदतीने शिक्षकांसाठी प्रशिक्षणं सुरू केलं. त्यातून शिक्षकांमध्ये नेतृत्वगुण वाढीस लागला. गुणवत्ता अधिक वाढावी म्हणून शिक्षकांसाठी परिसंवादही घेतले. शिक्षकांनी परिसंवादामध्ये सहभागी व्हावं, संशोधनामध्ये सहभाग घ्यावा म्हणून त्यांना प्रोत्साहनही दिलं.
‘मी शिक्षकांचा मालक किंवा बॉस नाही, तर मी त्यांचा मित्र, मार्गदर्शक आहे असं मी समजतो.’ ही त्यांची भूमिकाही एकूणच शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची आहे. अशी भूमिका ठेवल्यामुळेच शिक्षक उत्तम काम करतात ही गोष्टही ते अभिमानाने सांगतात. दीर्घ काळ ते शिक्षणक्षेत्रात काम करत असल्याने ते संस्थांचा वेगवेगळ्या प्रकारे विकास साधू शकले. दूरदृष्टीने काम करण्याच्या सवयीमुळे विविध प्रकारचे अभ्यासक्रम तयार करून घेणे, पायाभूत सुविधा तयार करणे, त्यासाठी संस्थेची आर्थिक घडी नीट बसवून ठेवणे आदी महत्त्वाच्या बाबी त्यांनी नेटकेपणाने करून ठेवल्या आहेत. म्हणूनच गुणवत्तेशी तडजोड न करता संस्थेचा विस्तार होत गेला. पुणे, सोलापूर आणि मुंबई इथे 4 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करून बांधकामंही त्यांनी अतिशय धाडसाने करून घेतलेली आहेत; तेही एकही रुपयाचे कर्ज न काढता. शिक्षण क्षेत्रातली ही सकारात्मकता एकूणच शिक्षण व्यवस्थेला विधायक वळण देण्यासाठी महत्त्वाची असेल, यात शंका नाही.
सामाजिक काम
वकिली करतानाच जैन यांनी शैक्षणिक संस्थामध्ये योगदान द्यायला सुरुवात केली आणि एकातून एक काम करत असतानाच जैन यांच्या सामाजिक कामाला सुरुवात झाली. निरामय ट्रस्टची स्थापना 2000 साली झाली. जैन या ट्रस्टचे अध्यक्ष झाले. त्यांच्या काळात या ट्रस्टतर्फे 135 झोपडपट्ट्यांमध्ये काम उभे राहिले. ट्रस्टची तीन मोबाईल हॉस्पिटल्स आहेत. ‘चला दहावी जिंकू या’, ‘मुलींसाठी किशोरी शक्ती वर्ग’ असे उपक्रमही चालू असतात. ड्रॉपआऊटची संख्या कमी करणं, शून्य ते सहा वर्षांच्या मुलांचे लसीकरण करणं, मुलींचे हिमोग्लोबिन तपासणं अशी कामं ट्रस्टतर्फे चालू असतात. आता ट्रस्टमार्फत थेल्मिसियावर उपचार करण्यासाठी पावलं उचलली आहेत. कोरोनाच्या काळात ज्या ठिकाणी कोणीच पोहोचू शकणार नाही, अशा ठिकाणीही ट्रस्टतर्फे किमान ऐंशी हजार ते लाख लोकांना वॅक्सीन दिल्या. लेप्रसीपासून ते रेड लाईट एरियापर्यंत हे काम विस्तारलं आणि सामाजिक काम करण्याची संधी मिळाली याबाबतीत जैन समाधानी असल्याचं त्यांच्याशी बोलतानाच जाणवतं. गरजू लोकांसाठी मोकळ्या मनानं त्यांना मदतीचा हात देणं, हे ते स्वतःचं सामाजिक कर्तव्य मानतात.व्यावसायिक नीतिमत्ता
‘व्यावसायिक नीतिमत्ता जपणं, ती फक्त आपण नाही तर आपल्यासोबत काम करणार्या प्रत्येकाने जपणं’, हे जैन यांना महत्त्वाचं वाटतं. ‘मी माझ्या अशिलांना कधीही खोटी वचनं दिली नाहीत’, असं ते आत्मविश्वासाने सांगतात. यातूनच त्यांची व्यावसायिक नीतिमत्ता ठाम असल्याच जाणवतं. त्याच वेळी सहकार्याशी असणारे त्यांचे नातेही अतिशय पारदर्शक असल्याचे ते सांगून जातात. त्यांच्यासोबत 1980 पासून अॅड. सुजाता किंकर, तर सुनिता किंकर 1990 पासून काम करत असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. व्यवसायात स्पष्टता, पारदर्शकता आणि नीतिमत्ता अत्यंत महत्त्वाची असल्याची मानत, त्यांनी ही त्रिसूत्री नेहमीच जपली.
याच बरोबरीने ते वकिलांच्या वेशभूषेलाही तितकंच महत्त्व देतात, त्यामुळे त्यांच्या कार्यालयातून प्रशिक्षण घेतलेला वकील नेहमी पांढरा शर्ट परिधान केल्याशिवाय न्यायालयात जात नाही, हेदेखील ते सांगतात. त्याच बरोबरीने वकिलाने उत्तम ग्रंथालय उभं केलं पाहिजे याबाबतही ते आग्रही आहेत. त्यांच्या हाताखाली सुमारे पाचशेपेक्षा जास्त वकिलांनी इंटर्नशिप केली आहे आणि यातले अनेक वकील सर्वोच्च न्यायालय ते तालुका न्यायालयांपर्यंत प्रॅक्टिस करत आहेत. अनेक जण न्यायपालिकेमध्ये आहेत. ही जैन यांच्या एकूणच वकिली कारकिर्दीची यशोगाथा आहे, असं म्हटलं पाहिजे.
संस्थात्मक जबाबदार्या
सन 1975 मध्ये वकिलीचा जम बसत असतानाच जैन यांना ‘महाराष्ट्र नर्सेस असोसिएशन’बरोबर काम करण्याची संधी मिळाली. याच काळात विश्वस्त म्हणून ‘जैन संघाच्या श्वेतांबर जैन मूर्तिपूजक संघा’त त्यांची नियुक्ती झाली. तीन वर्षं विश्वस्त म्हणून काम पहिल्यावर त्यांनी ठरवलं की परत तिथे विश्वस्त व्हायचं नाही. 1980 मध्ये पुणे बार असोसिएशनचा उपाध्यक्ष म्हणून; 1985 आणि 1992 साली बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे सदस्य म्हणून; 1990 आणि 1991 मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्याचबरोबर दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष; तर खडकीमध्ये विलास पंगुडवाले आणि शिवाजी पंगुडवाले, डॉ. हेगडेवार स्पोर्ट्स अकॅडमी इथे काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. पुणे विद्यापीठामधील सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी पार्क, तसेच सिनेटचेही ते सदस्य होते. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये त्यांनी दोन टर्म अपेक्स डायरेक्टर म्हणून काम केलं. छत्रपती शिवाजी सेवा समितीत ते स्थायी अध्यक्ष आहेत.
कौटुंबिक पाठबळ
व्यावसायिक, सामाजिक, शैक्षणिक अशी कारकीर्द बहरत असताना जैन यांना भक्कम पाठबळ लाभलं ते त्यांच्या कुटुंबियांचं. त्यांची पत्नी पुष्पा या निरलसपणे त्यांच्यासोबत कार्यरत आहेत. कायद्याचं शिक्षण घेतल्यावर वकिलीचे काही उत्पन्न नसतानाही, आई जतनाबाई आणि वडील कुंदनमल यांनी उमेदीच्या काळात पहिली पाच वर्षे पूर्ण पाठिंबा दिला. त्यांच्या भावाने म्हणजे भंवरलाल यांनी आपल्या भावाचं म्हणजे सोहनलाल यांचं शिक्षण पूर्ण व्हावं, म्हणून दुकानाची जबाबदारी स्वीकारली. संयुक्त कुटुंबात राहत असल्याने सोहनलाल जैन यांच्यावर आर्थिक भार फारसा पडला नाही, हेदेखील ते मोकळेपणाने मान्य करतात. तसंच आई-वडिलांनी कर्ज काढून काहीही करू नका, हा दिलेला मोलाचा सल्ला त्यांनी कायमच पाळलेला आहे.
आजही त्यांचं कुटुंब संयुक्त असल्याचं ते सांगतात. जैन यांच्या मोठ्या मुलाने, हितेश यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एलएल.एम. केलं आणि उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. तर नातू जनेय यांनी केम्ब्रिजमधून एलएल.एम. केलं आणि आता ते मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचे दुसरे चिरंजीव, सुजित हे व्यावसायिक आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये एक परंपरा आहे. एकाने उद्योग करायचा आणि दुसर्याने वकिली करायची. म्हणजे दोन्हींचा समन्वय साधला जातो. त्यातूनच कुटुंब व्यवस्थेला बळकटी मिळते, असं ते मानतात. आजच्या कुटुंब वाताहतीच्या काळात अशी कुटुंबप्रधान भूमिका विरळाच पाहायला मिळते.
कृतज्ञता
समाजासाठी केलेलं काम आणि त्या समाजाने दिलेली ओळख समाजाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरल्याचा आनंद जैन यांच्या चेहर्यावर वयाच्या पंचाहरीतही दिसतो आहे. समाजाने जितकं द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त भरभरून दिल्याचं समाधानही त्यांच्या चेहर्यावर आहे. सर्व स्तरातल्या लोकांचं त्यांच्यावर प्रेम असल्याचा आणि त्यांचंही लोकांवर प्रेम असल्याचा एक वेगळा, विलक्षण आनंद, त्यांच्या कामाला अधिक झळाळी मिळवून देतं, हे त्यांच्या मृदू बोलण्यातून आणि वागण्यातून जाणवत राहतं. आयुष्याप्रति कृतज्ञ राहण्याची, कृतज्ञ राहून सेवाभावाने जगण्याची त्यांची मानसिकता प्रत्येकाने अंगिकारण्यासारखी आहे.