पुणे : दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने यंदाचा 30वा बाया कर्वे पुरस्कार चाळीसगाव येथील ‘अपंग विकास बहुउद्देशीय संस्थे‘च्या अध्यक्ष तसेच दिव्यांगांसाठी चालविलेल्या ‘स्वयंदीप‘ या प्रकल्पाच्या प्रणेत्या मीनाक्षी निकम यांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करणार्या ‘सक्षम‘ या संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. अविनाश वाचासुंदर यांच्या हस्ते बाया कर्वे पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रदान केला गेला. रुपये एक लाख एक हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या रमा पुरुषोत्तम विद्या संकुलात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ. अविनाश वाचासुंदर आणि मीनाक्षी निकम यांच्यासह संस्थेच्या अध्यक्ष स्मिता घैसास, उपाध्यक्ष स्मिता कुलकर्णी, विश्वस्त पुरुषोत्तम लेले, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्ष विद्या कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, बाया कर्वे पुरस्कार निवड समिती सदस्य बागेश्री मंठाळकर (व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) आणि डॉ. प्रसाद जोशी (कुलगुरू, डेक्कन मानित विद्यापीठ पुणे) हे मान्यवर उपस्थित होते.
‘अण्णा म्हणजेच महर्षी कर्वे आणि बाया कर्वे या दोघांनी ज्या प्रकारची आव्हाने आपल्या आयुष्यात पेलली तशाच प्रकारची आव्हाने आजच्या पुरस्कार सन्मानित मीनाक्षीताई निकम यांनीसुद्धा पेलली आहेत. म्हणूनच त्यांना पुरस्कृत करणे हा संस्थेचादेखील सन्मान आहे‘, असे मत आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी व्यक्त केले. बाया कर्वे पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. प्रसाद जोशी यांनी निवड प्रक्रियेबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमात चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारलेल्या कलादालनासाठी संस्थेच्या वतीने बाया कर्वे यांचे एक तैलचित्र भेट स्वरूपात प्रदान केले गेले. वाचन मंदिराचे विश्वस्त प्रकाश देशपांडे यांनी संस्थेच्या वतीने ते स्वीकारले आणि आपल्या भावना शब्दरूपाने व्यक्त केल्या. बाया कर्वे पुरस्कार निवड समितीच्या वतीने डॉ. प्रसाद जोशी यांनी या वर्षीच्या पुरस्काराच्या निवडप्रक्रियेबाबत उपस्थितांना माहिती दिली. मीनाक्षी निकम यांच्या कार्यावर आधारित एक चलचित्र प्रस्तुत केल्यानंतर त्यांना ‘बाया कर्वे पुरस्कार 2025‘ सन्मान प्रदान करण्यात आला.
“हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी एक जबाबदारी आणि समाजाने दाखवलेला प्रबळ विश्वास असून अण्णा आणि बाया यांनी उभ्या केलेल्या मंदिराचा एक दगड बनण्याची संधी मला दिल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे,“ असे हृद्य उद्गार दिव्यांगांची माय म्हणविल्या जाणार्या मीनाक्षी निकम यांनी या सत्काराला उत्तर देताना काढले. त्या पुढे म्हणाल्या, “दिव्यांगांसाठी काम सुरू करताना माझ्याकडे एका इच्छेखेरीज काहीही नव्हते. अगदी आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती होती. पण या फाटल्या आभाळालाही संवेदनेचे खांब मिळत गेले. आजचा हा पुरस्कारही असाच एक मजबूत आधार आहे, अशीच माझी भावना आहे. अण्णा आणि बाया यांचे नाव माझ्या कामाशी जोडले गेल्याने एक वेगळीच कृतार्थता आज अनुभवास येत आहे. दिव्यांगांना शासकीय कागदपत्रे मिळवताना येणार्या अडचणी स्वतः अनुभवल्यानंतर पुढील आयुष्यामध्ये दिव्यांगांसाठीच काम करण्याची दिशा निश्चित झाली आणि स्वयंदीप प्रकल्पाचे काम उभे राहिले.“ त्यांनी नंतर संस्थेच्या पारदर्शक निवड प्रक्रियेचे विशेष कौतुक करून कर्वे परिवाराशी कायमस्वरूपी जोडलेले राहण्याची इच्छा व्यक्त केली.
डॉ. अविनाश वाचासुंदर आपल्या भाषणात मीनाक्षी निकम यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत म्हणाले, “मीनाक्षीताईंसारखी उदाहरणे म्हणजे सर्वांना आपल्या समाजबांधवांसाठी काही ना काही करण्याची ऊर्जा देणारी आहेत.“ त्यांनी बाया कर्वे यांच्या ‘माझे पुराण‘ या आत्मचरित्रातील त्या काळी विधवांच्या नशिबी येणारी दुरवस्था दर्शविणारा उतारा वाचून दाखवला. सक्षम या संस्थेच्या पुण्यात झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने कोंढवा परिसरातील कुष्ठरोगातून बर्या झालेल्या लोकांच्या वसाहतीत जाण्याचा वेळचा अनुभव सांगताना, “अशा लोकांना साध्या आरोग्यसुविधा सुद्धा उपलब्ध होत नाहीत व हे लोक समाजाकडून दुर्लक्षित राहतात,“ अशी वेदना त्यांनी सर्वांसमोर मांडली. ते स्वतः जेथे कार्यरत आहेत त्या कर्णबधिरांच्या क्षेत्रातील वेदनादायी समस्यांचाही त्यांनी उल्लेख केला. “या क्षेत्रात चालू असलेल्या सामाजिक कामांच्या तुलनेत प्रत्यक्षातील आव्हाने प्रचंड मोठी आहेत व आपली संवेदना आणि सक्रियता हेच यावरचे उत्तर आहे,“ असे ते यावेळी म्हणाले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, सकारात्मक कार्याचा प्रसार करणे हाच बाया कर्वे पुरस्कार देण्यामागचा खरा हेतू आहे, असे आवर्जून सांगितले. मीनाक्षीताई यांच्या स्वयंदीप प्रकल्पाला दिलेल्या भेटीचा प्रेरणादायक अनुभवदेखील त्यांनी सर्वांना सांगितला आणि अशा कार्यासाठी सदैव सिद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या सोहळ्यात पुण्यातील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर राठी यांनी मीनाक्षी निकम यांच्या कार्यासाठी एक लाख रुपयांची धनराशी आर्थिक सहयोग म्हणून देऊ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिराबेन नानावटी व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्रा. अर्पिता सिंह आणि याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनुष्का सिंह यांनी एकत्रितपणे केले. स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या शाखेच्या प्रा. मल्लिका सामंत यांनी आभारप्रदर्शन केले. कमिन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी अभिरा काळे हिने गायिलेल्या संपूर्ण वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.