हल्लेखोर बिबट्यांचा नागरी दहशतवाद

विवेक मराठी    08-Dec-2025
Total Views |
मिलींद सुधाकर जोशी
9822011595
उसाचे शेत बिबट्याच्या मादीला प्रजननासाठी योग्य आणि सुरक्षित असते. पिल्लेही सुरक्षित राहतात. ही शेते नागरी वस्तीच्या जवळ असल्याने पाळीव जनावरे शिकारीसाठी उपलब्ध असतात त्यामुळे मादी हा अधिवास स्वीकारते. त्यांची पिल्लेही याच अधिवासात जन्मतात आणि मोठीही इथेच होतात. साहजिकच त्यांना हा आपला नैसर्गिक अधिवास वाटतो. त्यांच्या सवयीत झालेला हा बदल आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. बिबट्याने हा माणसाचा शेजार त्याचे नैसर्गिक घर मानल्याने त्यांचा उपद्रव वाढतोच आहे आणि मनुष्य-बिबट्या संघर्ष आणखी तीव्र होतो आहे. बिबट्या पुन्हा जंगलांकडे वळायला हवा यासाठी जंगलातील शिकारीयोग्य प्राण्यांची संख्या वाढवणे हा एक उपाय होऊ शकतो.
Leopards
 
सध्या महाराष्ट्रातील बर्‍याच जिल्ह्यांमध्ये शहरी भागात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण फारच वाढले आहे. नाशिकला आणि नागपूरला लोकांच्या थेट घरात शिरला होता तर पुण्यात चक्क विमानतळावरच्या धावपट्टीवर वावरतोय. घराच्या आवारातील पाळीव कुत्रे, शेळ्या, कोंबड्या, गुरे यांना उचलून नेतो आहे. लहान मुलांवर हल्ले करतो आहे. रोज कुठे ना कुठे होणार्‍या या हल्ल्यांचे प्रमाण इतके वाढले आहे की त्यामुळे बिबट्याप्रवण क्षेत्रातच नव्हे तर शहरांमध्येही भीतीचे आणि दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
 
 
आधी या प्राण्याबाबत थोडे जाणून घेतले पाहिजे. बिबट्या हा सस्तन प्राण्यातल्या कार्निव्होरस (मांसभक्षी) प्रकारातील पँथरेनी (मार्जार) कुळातील एकटा (कळप वा कुटुंबविरहित) राहणारा, बहुतांशी रात्री शिकार करणारा, जमिनीवर अथवा झाडांवर वास्तव्य करू शकणारा प्राणी आहे. केसाळ त्वचा आणि त्यावरचे ठिपके (रॉसेट्स) या मुळे दिसायला एकदम आकर्षक असतो. प्रत्येक माणसांच्या बोटांचे ठसे जसे वगवेगळे असतात तसेच प्रत्येक बिबट्याच्या त्वचेवरील ठिपक्यांची रचना वेगवेगळी असते आणि त्या रचनेवरून तो बिबट्या ओळखता येतो. शिकारी प्राण्यांप्रमाणे तीक्ष्ण सुळे आणि नखे, मजबूत पंजे आणि खांदे बिबट्याकडेही असतात. मागचे पाय लांब आणि पुढचे पाय जास्त ताकदवान असतात. आपली शिकार पकडून तिच्यासह झाडावर चढू शकण्याइतकी शक्ती त्याच्याकडे असते. छोटे प्राणी, माकडे, हरीण आणि चितळ, पाळीव जनावरे, कुत्रे, डुक्कर इ. त्याची मुख्य शिकार आहे. मात्र ससे, कोंबड्या, खेकडे खाऊन तात्पुरती गुजराण करू शकतो.
 
 
ज्यांची फारशी जास्त उंची नाही आणि 10 ते 50 किलोच्या दरम्यान वजन आहे असे प्राणी या बिबट्याची शिकार बनतात. तो पाण्यात चांगला पोहू शकतो आणि ताशी 50 कि.मी. गतीने धावू शकतो. शिकार करताना दृष्टीपेक्षाही श्रवणशक्ती आणि हुंगण्याच्या शक्तीचा वापर जास्त प्रभावीपणे करतो. आपले लांब आणि तीक्ष्ण सुळे शिकारीच्या नरडीत रुतवून तिला श्वास कोंडून मारणे ही याची शिकारीची पद्धत आहे. करवतीने लाकूड कापताना होणार्‍या आवाजासारखा याचा आवाज असतो. यातील मादी मिलनासाठी तयार असली की तेवढ्या काळात नरमादी एकत्र येतात. गर्भधारणेनंतर साधारण 100 दिवसांनी मादी 1 ते 3 पिल्लांना जन्म देते. पिल्ले 100 दिवसांपर्यंत दुधावर असतात त्यानंतर स्वत: खाऊ लागतात. साधारणपणे सव्वा ते दोन वर्षांनंतर वेगळी होतात.
 
 
बिबट्याचा मूळ अधिवास जंगल हाच आहे. पण नष्ट होत जाणारी जंगले आणि जंगलातील शिकारयोग्य प्राण्यांची कमतरता तसेच पाळीव प्राण्यांच्या शिकारीतला सोपेपणा यामुळे बिबट्याची पावले मनुष्यवस्तीकडे वळतात आणि वाढते शहरीकरण व जंगलतोडीमुळे माणूसही बिबट्याच्या आणखी जवळ सरकतोय. लोकांनी मोठा आवाज केला तर हल्लेखोर बिबट्या पळून जातो. यामुळेच बिबट्याप्रवण क्षेत्रातल्या लोकांना मोबाईलवर गाणी तीही सामूहिक मोठ्या आवाजातली लावून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. गळ्याभोवती उपरणे घालणे यानेही बचाव होऊ शकतो कारण हल्ला झाला तर प्रथम उपरणे त्यांच्या दातात अडकते आणि त्यामुळे मनुष्य त्याच्या तावडीतून सुटण्याची शक्यता वाढते. बिबट्याच्या शिकारी या कमी उंचीच्या असतात, म्हणून माणसे जेव्हा वाकून काम करत असतात तेव्हा त्याचा हल्ला होण्याची शक्यता जास्त असते. लहान मुलेही कमी उंच असल्याने त्यांना बिबट्याच्या हल्ल्याचा धोका जास्त असतो.
 
 
माणसावर हल्ला करून नरडीच आवळणार्‍या बिबट्याची दहशत इतकी आहे की, माणसेही गळ्यात खिळयांचे पट्टे अडकवून फिरत आहेत. वनविभागाने अणकुचीदार सिरॅमिकचे पट्टे लोकांना गळ्यात घालण्यासाठी वाटले आहेत. पूर्वी पट्टे फक्त पाळीव प्राण्यांना विशेषत: कुत्र्यांना घातले जायचे कारण बिबट्या त्यांच्यावर हल्ले करायचा. आता लहान मुले त्यांच्या छोट्या आकारमानामुळे बिबट्याला शिकारयोग्य वाटतात त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती खूपच जास्त आहे. शासनाने बिबट्याप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळाही बदलल्या आहेत. या वाढत्या उपद्रवाची आणि त्यामुळे उसळलेल्या जनक्षोभाची दखल सरकारलाही घ्यावी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट्यांकडून मानवावर होणार्‍या हल्ल्यांना ‘राज्य आपत्ती‘ म्हणून घोषित करण्याचा विचार केला. आपत्ती घोषित केल्याने आपत्तीवर तातडीने कारवाई करावी लागते आणि अशा कारवाईला प्राधान्य मिळते तसेच निधी आणि अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करता येते. याच बरोबर बिबट्यांना वन्यजीव अधिनियमाच्या ‘शेड्यूल-1’ मधून वगळून ‘शेड्यूल-2’मध्ये समाविष्ट केले गेले तर जंगली प्राण्यांच्या सुरक्षेचे आणि त्यांची प्रजाती जतन करण्याचे निकष शिथिल होतात आणि निर्णयाचे अधिकारही बदलतात आणि ते राज्य सरकारकडे येतात ज्यामुळे कडक आणि गतिमान कारवाई करणे शक्य होते.
 
 
मुख्यमंत्र्यांनी बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे बसवण्याच्या आणि पकडलेल्या बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर्स सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. बिबट्यांचे हल्ले तर या आधीही झालेले आहेत. या समस्येचे निराकारण करण्याच्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सरकारला 25 वर्षांपूर्वीच दिलेला होता त्यावर सरकारने कृती केली नाही. या बिबट्यांची वस्तुस्थितीदर्शक गणना न केल्याने आणि प्रत्यक्षात संख्या वाढलेली आहे हे वास्तव न स्वीकारल्यामुळे समस्येने सध्याचे उग्र स्वरूप धारण केले आहे. बिबट्यांचे हल्ले रोखणे ही फक्त वनविभागाचीच नव्हे तर अनेक सरकारी यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
 
 
जंगलतोडीमुळे बिबट्याचा अधिवास आकुंचन पावतो आहे ही वस्तुस्थिती आहे. तसेच जंगलाजवळच्या जमिनी सिंचनव्यवस्था सुधारल्याने लागवडीखाली आल्या. उसाचे पीक कमी त्रासाचे आणि फायदेशीर आहे. हे उसाचे शेत बिबट्याच्या मादीला प्रजननासाठी योग्य आणि सुरक्षित असते. पिल्लेही सुरक्षित राहतात. ही शेते नागरी वस्तीच्या जवळ असल्याने पाळीव जनावरे शिकारीसाठी उपलब्ध असतात त्यामुळे मादी हा अधिवास स्वीकारते. त्यांची पिल्लेही याच अधिवासात जन्मतात आणि मोठीही इथेच होतात. साहजिकच त्यांना हा आपला नैसर्गिक अधिवास वाटतो. त्यांच्या सवयीत झालेला हा बदल आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हा नवा अधिवास स्वीकारल्यामुळे बिबट्या जरी जंगलात सोडला तरी तो पुन्हा मनुष्यवस्तीजवळ येतो. सुरक्षेमुळे आणि अन्नाच्या उपलब्धतेमुळे पिल्ले मरण्याचे प्रमाण कमी होते व बिबट्यांची संख्या वाढते. त्यातच पिल्लाना जर लहानपणी नरमांस खायला मिळाले किंवा मादीच नरमांसभक्षक असेल तर पिल्ले सहजपणे नरभक्षक बनतात. बिबट्याने हा माणसाचा शेजार त्याचे नैसर्गिक घर मानल्याने त्यांचा उपद्रव वाढतोच आहे आणि मनुष्य-बिबट्या संघर्ष आणखी तीव्र होतो आहे. बिबट्या पुन्हा जंगलांकडे वळायला हवा या साठी जंगलातील शिकारीयोग्य प्राण्यांची संख्या वाढवणे हा एक उपाय होऊ शकतो.
 
 
माझा मित्र रवींद्र फालक हा मानद वन्यजीव रक्षक आहे. रवी आणि त्याचे अनेक सहकारी वन्यजीव संरक्षणाच्या आणि बिबट्या पकडण्याच्या मोहिमांमध्ये नि:स्वार्थपणे स्वत:चा वेळ आणि पदरमोड करून सहभागी होत असतात. नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यात दोन बिबटे पकडले त्या मोहिमेत रवीचा सहभाग होता. त्याच्याशी केलेल्या चर्चेचा उपयोग या सर्व गोष्टी लेखात नमूद करताना झाला आहे. रवी आणि मी 2022 साली झालेल्या टायगर ऐस्टिमेशन (व्याघ्र अनुमान) या उपक्रमाअंतर्गत मध्य प्रदेशातील रातापानीच्या अभयारण्यात सहभागी झालो होतो. आमचे सर्वेक्षण क्षेत्र वेगवेगळे असले तरी 7 दिवस आमचा मुक्काम एकाच चौकीत होता. या उपक्रमात 6 दिवस अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने जंगलाचे सर्वेक्षण करून हे बघितले जाते की किती वाघ या जंगलात राहू शकतात. वाघांचे भक्ष्य असलेले प्राणी आहेत का? त्या प्राण्यांना आवश्यक असलेली झाडे आहेत का? जंगल आणि त्याचा प्रकार वाघ राहाण्यायोग्य आहे का? झाडांचे आणि झुडुपांचे जमिनीवर किती आवरण आहे? असे आणि आणखी कितीतरी निकष अत्यंत बारकाईने घेतलेल्या निरीक्षणांच्या आधारे अभ्यासले जातात आणि हे ठरवले जाते की किती वाघ तिथे राहू शकतात. त्या जंगलासंबंधीचे निर्णय या सर्वेक्षणातून काढलेल्या निष्कर्षांच्या आधारे घेतले जातात. या उपक्रमातील निरीक्षणे नोंदण्यासाठी विशेष कॉम्प्युटर प्रोग्राम तयार केला आहे आणि सर्व निरीक्षणे मोबाइल अ‍ॅप द्वारा लगेच अपलोड करावी लागतात. या सर्व प्रक्रियेचे आम्हाला ट्रेनिंग दिले गेले होते. आमच्या सर्वेक्षणानंतर रातापानी अभयारण्याला टायगर रिझर्वचा दर्जा दिला गेला याचा आनंद आहेच.
 
 
आता बिबट्यांच्या बाबतीत असाच अभ्यास करायला हवा. ज्या जंगलात बिबट्या सोडणार आहे त्या जंगलाचा तरी असा अभ्यास केला जावा. जुन्नरसारख्या क्षेत्रात जर 100 बिबटे असतील तर तिथल्या जंगलाची ती क्षमता तरी आहे का हे तपासायला हवे. ती जर नसेल (खर तर ती क्षमता नाहीये) तर तिथल्या बिबट्यांची संख्या कमी होण्यासाठी तातडीची उपाययोजना करायला हवी. आता आणखी दुर्लक्ष झाले तर ती न सुधारता येणारी चूक ठरेल.
 
 
मानवी वस्तीजवळच्या अधिवासात वाढलेल्या बिबट्याला पकडून दुसर्‍या ठिकाणी सोडले जाते तेव्हा पूर्ण परिसर नवीन असल्याने तो गोंधळून जातो. अशा अस्वस्थ अवस्थेत तो तातडीने मानवी वस्तीजवळचा अधिवास शोधत असतो आणि आक्रमकही झालेला असतो. जो बिबट्या पकडला आहे त्यानेच माणसाची शिकार केली आहे हे ठरविण्यासाठी शिकारीच्या जखमेजवळील स्वॅब (द्रवरूप नमुने) काळजीपूर्वक गोळा करावे लागतात, त्यांचे आणि पकडलेल्या बिबट्यांच्याकडून घेतलेल्या नमुन्यांचे डीएनए जुळायला हवेत तरच तोच बिबट्या पकडलाय हे सिद्ध होते. त्याचबरोबर शिकारीच्या जागी बिबट्याचे केस पडलेले असतात तेही गोळा करावे लागतात आणि जुळावे लागतात. जर बिबट्या जवळपासच्या कॅमेर्‍यात दिसलेला असेल तर त्याच्या अंगावरचे ठिपके देखील जुळावे लागतात. हे नीट केले नाही तर खरा नरभक्षक मोकळा राहतो आणि दुसराच बिबट्या कायमस्वरूपी बंदिस्त होतो. ही सर्व किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि हे करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्‍यांची गरज असते त्यांची पुरेशी संख्या नाही. बिबट्या पकडला गेल्यानंतर गावकरी फारच आक्रमक होतात आणि त्याला मारण्याबाबत आग्रही असतात. पण गावकर्‍यांनी शांततेने वागून हा निर्णय वनविभागाला घेऊ द्यायला हवा यात त्यांचेच हित आहे. बिबट्या पकडला गेल्यानंतरही त्याचे क्षेत्र मोकळे झाल्यास दुसरा बिबट्या ते काबीज करण्यासाठी तिथे येण्याची दाट शक्यता असते. एकंदर या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे अवघड वाटत असले तरी सातत्य राखल्यास ती निश्चितपणे आटोक्यात आणता येईल.