वैचारिक ध्येयवाद जगणार्‍यांचे अध्वर्यू - मा. यशवंतराव लेले

विवेक मराठी    08-Dec-2025
Total Views |
 @विवेक गिरिधारी
ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेपासून प्रदीर्घ काळ सक्रीय असलेले आदरणीय यशवंतराव लेले यांचे वृद्धापकाळाने नुकतेच दु:खद निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. या निमित्ताने कृतीशील ध्येयवाद जगणार्‍या यशवंतरावांच्या कार्यकर्तृत्वाचा सविस्तर आढावा घेणारा हा विशेष लेख !
 
lele
 
सध्याचा काळ हा व्यक्तीच्या नावाने संस्था अथवा संघटना ओळखला जाण्याचा आहे. परंतु अशाही काही मोजक्या कर्तृत्ववान, नि:स्वार्थी व नि:स्पृह व्यक्ती असतात की ज्या आपले संपूर्ण कर्तृत्व, व्यक्तित्व संघटनेमध्ये/संस्थेमध्ये विलीन करून टाकतात. नव्हे तीच त्यांची ओळख बनते. अशा अगदी मोजक्या संस्थांपैकीच एक पुण्यातील ‘ज्ञान प्रबोधिनी’ ही आहे. नाव अगदी सर्वांना सुपरिचित, माहिती असणारे आहे. परंतु तितकीच अपरिचित आहेत ती त्यापाठीमागची मंडळी. वं. आप्पा पेंडसे यांनी 1962मध्ये अण्णा ताम्हणकर व यशवंतराव लेले या आपल्या सहकार्‍यांसह ज्ञान प्रबोधिनीची स्थापना केली. स्थापनेपासून प्रदीर्घ काळ प्रबोधिनीच्या कार्यात सक्रीय असलेले आदरणीय यशवंतराव लेले यांचे वृद्धापकाळाने नुकतेच दु:खद निधन झाले. या निमित्ताने त्यांच्या प्रदीर्घ कार्यकर्तृत्वाचा सविस्तर आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
 
 
वाईतील बालपण
 
लेले घराणे हे मूळचे सांगलीचे. यशवंतरावांचे वडील हे सातारा जिल्ह्यातील वाईच्या प्रख्यात राष्ट्रीय प्राज्ञपाठशाळेत शिक्षक होते. पुढे ते त्या संस्थेचे कार्यवाहही होते. ही प्राज्ञ पाठशाळा केवलानंद सरस्वती यांनी 1917मध्ये सुरू केली. या शाळेत काम करण्याच्या निमित्ताने त्याच वर्षी वडील वाईला आले. यशवंतराव यांचा जन्म मिरज येथे आजोळी झाला. 21 ऑगस्ट 1930 हा त्यांचा जन्मदिवस. वाईतील प्राथमिक शाळेत त्याचे सुरुवातीचे शिक्षण झाले. त्या काळी वय वर्षे सात पूर्ण झाल्यावरच प्राथमिक शाळेत प्रवेश मिळत असे. प्राथमिक शिक्षण झाल्यावर वाईच्या द्रविड माध्यमिक विद्यालयात त्यांचे पुढील शालेय शिक्षण झाले. त्यावेळी सातवीत मॅट्रीकची परीक्षा असे. त्याचे केंद्र वाईला नसल्यामुळे ती परीक्षा देण्यासाठी म्हणून ते 1948 मध्ये मोठ्या बहिणीसह पुण्याला आले. यशवंतरावांना एक थोरली बहीण व एक धाकटी बहीण अशा दोन बहिणी आहेत.
 
 
त्या काळी यशवंतरावांच्या घरात पहिल्यापासून राजकीय चळवळीचे वातावरण होते. वडील काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते होते. ते वाई तालुक्याचे काँग्रेसचे प्रमुख होते. त्यामुळे घरात खादीचा वापर, चहा न पिणे वगैरे राष्ट्रीयत्वाचा संस्कार करणारे वातावरण होते. वडिलांनी व अल्पकाळ आईनेसुद्धा स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगला होता. स्वातंत्र्यादरम्यानच्या काँग्रेस चळवळीत असल्याचा सार्थ अभिमान या कुटुंबाला होता. दुसरीकडे बालवयातील यशवंताचे सर्व मित्र हे संघशाखेत जाणारे होते. खरे तर संघशाखेत जाणे हे घरातील प्रचलित वातावरणाच्या पचनी पडणारे नव्हते. तरीपण बाल यशवंता हट्टाने वाईतील संघशाखेत जात राहिला. स्वातंत्र्यासाठी शस्त्रे जमविणे, नेमबाजी सराव करणे असे गुप्त उद्योग करणार्‍या गटात यशवंता सामील झाला होता. शेवटी त्या शस्त्रांचा उपयोग दादरा-नगर हवेली मुक्तीच्या वेळी होऊ शकला.
 
 
या दरम्यान गांधीवधानंतरच्या जाळपोळीचे लोण वाईलाही येऊन पोहोचले. ही जाळपोळ शमावी म्हणून त्यांच्या वडिलांनी अनेक रात्री वाईत फिरून काढल्या व लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे वाईतील संघचालकांच्या पेटत्या घराचे जाळपोळीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी तरुण वयातील यशवंता धावला. अर्थात त्याबद्दल त्याला घरात बोलणीही खावी लागली. वाईच्या एकूणच निसर्गरम्य परिसरात व्यायाम, कृष्णाकाठचे मनसोक्त डुंबणे, भरपूर वाचन आणि संघशाखा या गोष्टी मात्र मनमुराद करता आल्या.
 

lele 
 
पुण्याकडे प्रस्थान
 
घरातील आर्थिक प्राप्ती लक्षात घेता तरुण यशवंताला काही तरी उत्पन्नाचा मार्ग शोधून पुढील शिक्षण घेणे क्रमप्राप्त होते. हे वाईत शक्य नव्हते म्हणून तो पुण्याला आला. झटपट छोटी नोकरी मिळू शकेल असा एक ‘सब ओव्हरसिअर’ म्हणजे बांधकाम पर्यवेक्षणाचा काही महिन्यांचा अभ्यासक्रम त्यांनी पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करायला घेतला. त्या आधारे त्यांना 7-8 वर्षे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी मिळू शकली जेणेकरून त्यांना आपले पुढील बी.ए. व बी.टी. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले. पुढे यथावकाश त्यांनी एम. ए. ही पूर्ण केले. सुरवातीची काही वर्षे अगदी अडगळीच्या छोट्या भाड्याच्या खोलीत त्यांनी दिवस काढले. अनेक वर्षे जेवणाचा डबा त्यांना सकाळच्या वाई-पुणे गाडीने येत असे.
 
 
पुण्यात आल्यापासूनच त्यांचे संघशाखेत जाणे हा वाईप्रमाणेच नित्य कार्यक्रम होता. वैदिकाश्रम येथील शाखेत ते सक्रीय होते. गांधी वधोत्तर संघबंदी विरोधातील सत्याग्रहात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना आठ महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. दोन महिने येरवडा तुरुंगात आणि सहा महिने मुंबई वरळी येथे बीडीडी चाळीत त्यांनी ही शिक्षा भोगली. अर्थात त्यातून त्यांची संघनिष्ठा अधिकच दृढ झाली. पुढे वैदिकाश्रम शाखेत येणार्‍या शरद भिडे, राम नाईक व स्व. रामदास कळसकर यांच्याशी त्यांचे घट्ट मैत्र जमले. बाकी नित्रांच्नी वेगळ्या वाटांनी जायचे ठरवले तरी तरुण यशवंता ठरवून शिक्षकी पेशाकडे वळला. सुरुवातीची सहा वर्षे कर्मवीर भाऊसाहेब पाटील विद्यालय अर्थात नानावाडा येथील शाळेत त्यांनी शिकविले. नंतरची सहा वर्षे रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकविले. त्यानंतर मात्र त्यांनी या कायमस्वरूपी नोकरीचा त्याग करून पूर्णपणे ज्ञान प्रबोधिनीला वाहून घेतले. सुरुवातीच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नोकरीच्या वेळीही ते ‘कायमस्वरूपी नोकरी’च्या मोहात पडले नव्हते. ‘आयुष्यात सरकारी नोकरी करायची नाही’, हे वडिलांचे ब्रीद त्यांनी स्वतःच्या आयुष्यातही खरे ठरविले.
 
 
आप्पा पेंडसे व यशवंतराव यांच्यातील ध्येयबंध
 
संघप्रचारक म्हणून काही काळ आंध्रप्रदेशात मच्छलीपट्टणमधे काम केलेले आप्पा पेंडसे यांच्या मनात एकोणीसशे साठच्या दशकात शिक्षणविषयक आगळेवेगळे प्रयोग करून पाहण्याचे घाटत होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय शिक्षणाच्या धर्तीवर आता नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला पथदर्शक ठरू शकतील असे शिक्षणातील प्रयोग ते करू पाहत होते. अर्थात त्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या शिक्षणविषयक विचारांचा आशय त्यांनी आधारभूत मानला होता. नुसते इंग्रजांवर टीका करण्याचे दिवस केव्हाच संपले होते. आता स्वतंत्र भारतात विजीगिषु वृत्ती निर्माण करणारी, समाजाच्या विविध क्षेत्रात भारतीय धारणेतून विचार करणारे असे प्रेरणासंपन्न व सक्षम नेतृत्व उभे करणारी शिक्षण पद्धती विकसित करणे ही त्या काळची गरज होती. या संकल्पनेसाठी आप्पांनी त्यांचे आयुष्य पणाला लावले होते. ते काही नुसते पोकळ स्वप्नरंजन नव्हते!
 
 
सुरुवातीचे आप्पांचे काही प्रयोग राष्ट्र जागृती मंडळ या अनौपचारिक रचनेतून झाले. त्या पाठोपाठ विविध शाळेतील बुद्धिमान मुले निवडून त्यांच्यासाठी प्रबोधवर्ग चालू करण्यात आले. या दोन्ही उपक्रमात तरुण यशवंता व अप्पा पेंडसेंसारखेच संघ प्रचारक असलेले वसंत तथा अण्णा ताम्हनकर हे हिरीरीने सहभागी झाले. नुसते सहभागी झाले नाहीत तर आप्पांच्या भविष्यातील स्वप्नांचेही ते कधी भागीदार बनले हे त्यांनाही कळले नाही. स्वप्नदर्शी असणार्‍या आप्पांनी या तरुणांवर मोठेच गारुड केले होते. यामुळेच तर मे 1962 मध्ये विवाहित झालेला तरुण यशवंता कायमस्वरूपी असणार्‍या रमणबागेतील शिक्षकी पेशाच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवून 1968मध्ये प्रबोधिनीत पूर्णवेळ दाखल झाला होता !
 
 
खरे तर आप्पा व यशवंतराव यांचा संघ शाखेमुळे जुना परिचय होताच. आप्पांनी यशवंतरावांना शिक्षक होण्यास सुचविले. त्यामुळे1956मध्ये यशवंतराव बी.टी. झाले. योगायोगाने त्याच वेळेस आप्पा टिळक अध्यापक महाविद्यालयात एम.एड. करीत होते. प्रत्यक्षात मात्र दोघांच्या वयांमध्ये 13 वर्षांचे अंतर होते. 1956मध्येच यशवंतरावांनी नागपूर येथे संघाचे तृतीय वर्षाचे शिक्षण घेतले. 1957 ते 1967 असे दहा वर्षे राष्ट्र जागृती मंडळाचे कामकाज अप्पा पेंडसेंच्या पुढाकाराने चालू होते. त्याचे कार्यवाह यशवंतराव होते. या राष्ट्र जागृती मंडळात हिंदुत्ववादी तत्त्वचिंतक पु. ग. सहस्रबुद्धे मार्गदर्शक होते. प्राचार्य शिवाजीराव भोसले, शरद वाघ व ‘माणूसकार’ श्री. ग. माजगावकर इ. मंडळी प्रसंगी येत असत. मुस्लिमांच्या वाद्यबंदीला न जुमानता जानेवारी 1961मध्ये पुण्यात मशिदीसमोरून या मंडळाने काढलेली वाजतगाजत सवाद्य मिरवणूक हा त्याकाळी सर्वत्र कौतुकाचा विषय झाला होता. जुलै 1961 पानशेत धरण फुटून आलेल्या पूरआपत्तीमध्ये या मंडळाने तातडीचे मदतकार्य केले होते.
 
ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेपासूनचा सहभाग
 
15 जुलै 1962 रोजी प्रबोधिनीच्या स्थापनेची सभा नूमवि शाळेत झाली. विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक मा.दादासाहेब आपटे यांनी प्रबोधिनी स्थापनेचा ठराव मांडला. मेजर जनरल य.श्री. परांजपे, तरुण भारतचे संपादक वसंतराव गीत इ. मान्यवर उपस्थित होते. डॉ. कोठुरकर हे पुणे विद्यापीठातील मानसशास्त्र विभाग संस्थापक अध्यक्षस्थानी होते. यावेळी आप्पा पेंडसेंच्या समवेत अण्णा ताम्हनकर व यशवंतराव उपस्थित होते. या सभेचे इतिवृत्त अण्णांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले होते व मागाहून टंकित करून घेतले होते. लगेचच म्हणजे 1962 पासून पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सायंकाळच्या प्रबोधशाळेस सुरुवात झाली. चाचण्यांद्वारे निवडून घेतलेली अन्य शाळेतील बुद्धिमान मुले त्यास येत असत. प्रबोधशाळेत अनेक जण तेव्हा इतरत्र नोकरी करत व संध्याकाळी शिकवत. यशवंतरावही रमणबागेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दिवसा शिकवत व सायंकाळी प्रबोधशाळेत शिकवत.
 
 
इतिहास कथनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागरण करण्यात यशवंतरावांचा हातखंडा होता. 1962 ते 1969 या दरम्यान प्रबोधशाळेच्या आठ तुकड्या बाहेर पडल्या. अनेकांना परिचित असणारे प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाषराव देशपांडे, विसुभाऊ गुर्जर, रामभाऊ डिंबळे, शरदराव सुंकर, अनंतराव अभंग, जयंतराव आठल्येव कै. विवेकानंद तथा भाई फडके हे प्रबोधशाळेचे विद्यार्थी होत.
 

lele 
 
पुढे ज्ञान प्रबोधिनी प्रशालेस जून 1969मध्ये स्वतंत्रपणे प्रारंभ झाला. 1969-70 ही प्रशालेची पहिली शैक्षणिक तुकडी होती. तेव्हा प्रशालेला स्वतःची वास्तू नसल्याने पहिली दोन वर्षे प्रशालेच्या प्रत्यक्ष अध्यापनाचे कामकाज हे टिळक रोडच्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीत पार पडले. सुरुवातीला 12 वर्षे ‘संस्कृत’चे अध्यापन करणार्‍या यशवंतरावांनी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत मात्र ‘परिस्थितीज्ञान’ विषयाचे तास प्राधान्याने घेतले. मराठी व संस्कृत या विषयांचे गरजेनुसार अध्यापन केले. याचे प्रमुख कारण म्हणजे ‘देशप्रश्न सोडविणारे कर्तृत्ववान विद्यार्थी-कार्यकर्ते तयार व्हावेत’ हा प्रबोधिनीचा असलेला प्रधान हेतू! जे विषय बाहेर बोलले जातात, सामाजिक अथवा राष्ट्रीय प्रश्न म्हणून चर्चिले जातात पण अभ्यासाचा भाग म्हणून शिकवले जात नाहीत असे विषय या परिस्थितीज्ञानाच्या तासाला घेतले जात. त्यावर चर्चा केली जात असे. विद्यार्थ्यांना यात काय कळते? हा भाव तर बिलकूल नसे.
 
 
दिवसभराच्या शाळेसोबत संध्याकाळी मैदानावर चालणारे तासभराचे दल हाही प्रशालेचा अविभाज्य भाग होता आणि आजही आहेच. दलामध्ये प्राधान्याने खेळ होत असले तरी ते खेळापुरते नक्कीच मर्यादित नसते. खेळासोबतच वैचारिक जडणघडण करणारी वैचारिक शिबिरे, अभ्यासवर्ग, अभ्यास सहली व दौरे या उपक्रमांचे ते केंद्र असते. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाची 60 ते 65 टक्के घडण ही मैदानावर होते व उर्वरित शाळेत होते ही त्यापाठची धारणा होती. यशवंतराव हे ज्ञान प्रबोधिनी प्रबोधशाळेप्रमाणे प्रशालेचेही पहिले प्राचार्य ! 1969 पासून 1975 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यापूर्वी 1966 पासून यशवंतराव प्रबोधिनीचे कार्यवाह म्हणून कार्यरत होते. सुरुवातीच्या आठ तुकड्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. सुरुवातीची प्रशाला ही फक्त मुलांसाठी होती. पुढे जून 1975मध्ये ती मुलींसाठी पण चालू झाली. मुलींच्या पहिल्या तुकडीचे ते वर्गशिक्षक होते. विद्याताई हर्डीकर या युवती प्रशालेच्या पहिल्या प्राचार्या होत्या. 1972मध्ये नलूताई गुजराथी व विद्याताई हर्डीकर यांनी युवती प्रबोधशाळेला प्रारंभ केला होता.
 
 
वेगवेगळ्या अभ्यास दौर्‍याचे नेतृत्व
 
राष्ट्रीय प्रश्नांचा समक्ष जाऊन अभ्यास केला पाहिजे, तेथे जाऊन स्थानिक लोकांकडून परिस्थिती समजावून घेतली पाहिजे, या भूमिकेतून यशवंतरावांनी प्रबोधिनीच्या तरुण कार्यकर्त्यांना घेऊन जून 1965 मध्ये दक्षिणेतील हिंदीविरोधी आंदोलनाचा अभ्यास करण्यासाठी तामिळनाडू गाठले. मुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ नेते सी. राजगोपालाचारी यांची भेट घेतली. विवेकानंद शिलास्मारकासाठी दगड घडविले जात होते अशा काळात त्या पवित्र खडकावर नावेतून जाऊन सर्व 18 जणांनी उपासना केली. ऑक्टोबर1965मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात यशवंतरावांनी युद्ध वार्ताहर म्हणून काम केले व त्यासंदर्भातील एक लेखमाला तत्कालीन दै. तरुण भारत मध्ये प्रसिद्ध केली. त्यांची प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांपुढे व्याख्यानमालाही झाली. अशांत बनलेल्या ईशान्य भारताचा अभ्यास करण्यासाठी मे 1967च्या सुमारास यशवंतरावांनी एका छोट्या कार्यकर्त्यांच्या गटासह मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागाप्रदेशाचा(नागालँड) व आसामचा सविस्तर महिनाभराचा अभ्यासदौरा केला. त्यात शरदराव सुंकर, विसुभाऊ गुर्जर व सुधीर चिटणीस सहभागी होते. त्यानंतर आजतागायत प्रबोधिनीचे अनेक कार्यकर्ते पूर्वांचलात जात आहेत व वेगवेगळ्या प्रकारे योगदान देत आहेत. काही वर्षे तर नागाप्रदेशात शाळा चालविली. नोव्हेंबर 1967मध्ये गोमंतकाचा म्हणजे गोव्याचा अभ्यासदौरा झाला. त्याचेही नेतृत्व यशवंतरावांकडेच होते. यात विनय हर्डीकर व शिवराज गोर्ले इ. चा सहभाग होता.
 
 
डिसेंबर 1967मधील कोयना भूकंपाच्या वेळेसच्या मदतकार्यात प्रबोधिनीने संस्थेची सदस्यमंडळ सभा रद्द करून पुढाकार घेतला होता. आप्पा पेंडसे व अण्णा ताह्मणकर मोटारसायकलवरून लगोलग घटनास्थळी पोचले. त्यापाठपोठ यशवंतराव तरुण कार्यकर्त्यांच्या चमूसह पोहोचले व त्यांनी कोयनानगरला मुक्काम ठोकला होता. पुढे महिनाभर हे मदतकार्य चालले. या दरम्यानचा आणखी एक वेगळा अनुभव म्हणजे त्यांचा 1970मधील फ्रान्सचा एक महिन्याचा अभ्यासदौरा ! भारत-फ्रान्स मित्रमंडळातर्फे हा दौरा काढण्यात आला होता. त्यात विद्यार्थी सहाय्यक समितीच्या अच्युतराव आपटे यांचा पुढाकार होता. भारतातून सुमारे शंभरच्या आसपासमंडळी त्यात सहभागी होती. त्यात यशवंतराव व हिंदी हायस्कूलचे प्रमुख प्र. द. पुराणिक असे दोन शिक्षक सोडले तर सर्व कलावंत मंडळींचा समावेश होता. ज्येष्ठ नृत्यांगना रोहिणी भाटे यांचाही समावेश होता. फ्रान्समध्ये यशवंतरावांना फ्रेंच कुटुंबात राहण्याची संधी मिळाली. या दौर्‍यात त्यांना फ्रान्समधील महानगरे, औद्योगिक भाग तसेच ग्रामीण भागही बघता आला. तेथील शिक्षणपद्धतीचा अभ्यास करता आला.
 
मुंबईतील प्रबोधिनीचे विस्तारकार्य
 
स्थापनेनंतरच्या एक तपाच्या यशस्वी वाटचालीनंतर गरज होती ती प्रबोधिनीच्या विस्तारकार्याची. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची दैनंदिन कामकाजाची घडी व्यवस्थितपणे बसली होती. त्यामुळे यशवंतराव प्रबोधिनी विस्तारासाठी बाहेर पडले. 1976च्या सुमारास यशवंतराव हे ज्ञान प्रबोधिनीच्या विस्तारासाठी मुंबईत आले. प्रबोधिनीचे त्यावेळचे उपाध्यक्ष व उद्योगपती कांतिभाई श्रॉफ यांचा त्यात पुढाकार होता. गोरेगाव-जोगेश्वरी परिसरात यशवंतराव त्यावेळेस निवासी राहिले. विविध शाळांमधील उपक्रम व चाचण्या असे कामाचे स्वरूप होते. गोरेगावला प्रबोधशाळा स्वरूपात काही काम सुरू झाले. सुमारे 8-10 वर्षे चालले व तेथील विद्यार्थीही शालान्त परीक्षेत चमकले.
 
 
मुंबईत असतांनाच आंध्र वादळाच्या पुनर्वसन कार्यात यशवंतराव सहभागी झाले होते. पुनर्वसनापूर्वीच्या तातडीच्या मदतकार्यासाठी नोव्हेंबर 1977मध्ये प्रबोधिनीतील त्या वेळचे युवक कार्यकर्ते गिरीशराव बापट व अविनाश धर्माधिकारी सहभागी झाले होते. पाठोपाठ मोहनराव गुजराथीही 35जणांच्या तुकडीसह पोहोचले. प्रेते गोळा करून त्याचे दाहकर्म करण्याचे आव्हानात्मक काम या सर्वांनी केले. पुढे गावातील दैनंदिन व्यवहार चालू होणे, रोजगाराचे गाडे रुळावर येण्यासाठी प्रयत्न करणे यासारख्या पुनर्वसनाच्या कार्यात यशवंतराव 1978 ते 1980 या कालावधीत दोन वर्षे कार्यरत होते. तेथे एकदा गेले की सलग दोन-दोन महिने ते तिथे थांबत असत.
 
 
वर्ष 1981-82 मध्ये मुंबईतील एक्सेल इंडस्ट्रीज या कंपनीत कर्मचारी-अधिकारी निवड प्रक्रियेसंबंधित व्यापक निवड चाचण्या संयोजनात यशवंतरावांचा प्रबोधिनीतर्फे सहभाग होता. निवडलेल्या कर्मचारी सदस्यांच्या पुढील प्रशिक्षणातही त्यांचा सहभाग होता. कधीच संपाला सामोरी न गेलेली स्वतःची कार्यसंस्कृती राखणारी अशी ही एक आगळीवेगळी वैशिष्टपूर्ण कंपनी आहे.
 
 
 
दरम्यानच्या काळात खार येथील रामकृष्ण मठाशी यशवंतरावांचा निकटचा संबंध आला. त्यावेळी स्वामी भौमानंद महाराज खारच्या मठात होते. पुढे स्वामी भौमानंद महाराज हे प्रदीर्घ काळ पुणे मठाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. खार मठाचे सेवाकार्य ठाणे जिल्ह्यातील वनवासी भागातील सकवार परिसरात चालू होते. त्यात सुमारे तीन वर्षे यशवंतराव खूपच सक्रीय होते. बराच काळ ते सकवार परिसरात निवासीही होते. वनवासींसाठीचे रोजगार शिक्षण यावर तेथे प्रामुख्याने काम चालत असे. शिवाय दर आठवड्याला रविवारी मुंबईवरून अनेक डॉक्टरमंडळी आरोग्यशिबिर घेण्यासाठी येत असत. या दरम्यान यशवंतरावांचे कुटुंब पुण्यातच असल्याने त्यांची दोन-अडीच महिन्यातून पुण्याला फेरी होत असे.
 
खेड-शिवापूरमधील ग्रामीण शिक्षणाचे कार्य
 
 
खेड-शिवापूर परिसरातील शिवगंगा नदी खोर्‍यातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रबोधिनीने 1980-81 पासून तेथे इयत्ता 8 वी ते 10 वी साठीची माध्यमिक शाळा सुरू केली होती. त्याला काही तांत्रिक शिक्षणाचीही जोड देण्यात आली होती. या ग्रामीण शाळेचे प्राचार्य म्हणून यशवंतराव 1985 ते 1987 असे दोन वर्षे शिवापूरला राहिले. या दरम्यान शिवापुरात महिलांचे गाजलेले असे दारूबंदी आंदोलन झाले. त्या निमित्ताने गायत्रीताई सेवक, सरीताताई आठल्ये, बागेश्रीताई पोंक्षे व मिलिंद पटवर्धन हे पुण्यातील कार्यकर्ते निवासी होते. शिवापूरच्या कृषी-तांत्रिक विद्यालयात विवेकराव पोंक्षे व संजीव तागडे कार्यरत होते. या सर्व दारूबंदी आंदोलनादरम्यानचा यशवंतरावांचा तेथील निवासी वावर हा नक्कीच कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा व उभारी देणारा होता !
 
 
संत्रिकेतील प्रदीर्घ काम
 
अलीकडच्या गेल्या दोन तपाहून अधिक काळ यशवंतराव हे प्रबोधिनीतील धार्मिक अंगाने चालणार्‍या संत्रिका या विभागाशी जवळून संलग्न होते. नव्हे प्रबोधिनीतील अलीकडच्या नवीन कार्यकर्त्यांसाठी तीच त्यांची ओळख बनून राहिली आहे ! या विभागाचेही ते पहिले पूर्णवेळचे विभागप्रमुख झाले. त्याआधी कृष्णराव अर्जुनवाडकर हे त्यांची स.प. महाविद्यालयातील नोकरी सांभाळून हिरीरीने काम बघत होते. त्यांच्या पत्नी लीलाताई अर्जुनवाडकर यादेखील सक्रीय होत्या. 1992च्या सुमारास यशवंतराव या विभागाचे पूर्णवेळचे काम बघू लागले. आपल्या धार्मिक वारश्याचे कालानुरूप संशोधन व उपयोजन हा याविभागाचा प्रमुख हेतू आहे.
 
 
आप्पांनी धर्मनिर्णय मंडळाच्या मदतीने सुरू केलेले संस्कार पोथ्या तयार करण्याचे काम यशवंतरावांनी अधिक नेटाने पुढे नेले. त्याची व्याप्ती वाढविली. संस्कार पोथ्यांमध्ये नवीन कालानुरूप व आधुनिक समाजमानसाच्या पचनी पडेल अशा कालोचित आशयाची भर घालून त्या अधिक अद्ययावत व आशय संपन्न केल्या. काही नवीन प्रयोगही केले. संत्रिकेत अंत्यसंस्कार करण्यासाठीची ‘अंत्येष्टी’ची पोथी बनविण्यावर भर दिला. सुरवातीला काही काळ तर ते स्वतः स्मशानात ‘अंत्येष्टी’च्या विधीसाठी जात असत. नंतर मागाहून अनेक पुरोहित तयार झाले. पौरोहित्य प्रशिक्षणावर सातत्याने भर दिला जात आहे. महिला पुरोहितांना व अन्य ब्राह्मणेतर जातींमधून पौरोहित्य करू इच्छिणार्‍यांना प्रोत्साहन दिले. मुंबईत महिला पुरोहितांचा संच तयार होण्यास प्रोत्साहन दिले. डॉ. लताताई भिशीकारांच्या पुढाकाराने सोलपूरातही पौरोहित्य प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहभागी होण्यापासून ते पाठपुरावा करण्यापर्यंत त्यांनी जबाबदारी सांभाळली. संत्रिकेतील रामायणविषयक दुर्मिळ ग्रंथांचे संकलन ही एक विशेष बाब आहे. यात दोन हजारहून अधिक ग्रंथांचा समावेश असून ती 50हून अधिक भाषा-लोकभाषेतील असून 35 वेगवेगळ्या लिप्यांमधील आहेत. यातील यशवंतरावांचे मार्गदर्शन व प्रयत्न मोलाचे आहेत. भारतरत्न स्व. नानाजी देशमुख यांना जेव्हा चित्रकुट येथे रामायणावरील चित्रप्रदर्शनी साकारायची होती तेव्हा रामायणाबाबतचे जुने ऐतिहासिक संदर्भ अभ्यासण्यासाठी त्यांनी थेट प्रबोधिनीतील संत्रिकेला वर्ष 1999मध्ये भेट दिली होती !
 

lele 
 
संत्रिकेतील विविध व्याख्याने व राष्ट्रवाद बैठकीचे नियमितपणे करावे लागणारे संयोजन, संत्रिकेतील विषयांना पूरक लेखन, विद्याव्रत संस्कार पार पाडणार्‍या कार्यकर्त्यांना नियमितपणे आशयाबाबत मार्गदर्शन करणे व वेळप्रसंगी उपस्थित राहणे या नित्य कामात यशवंतराव व्यग्र असत. संस्कार विधींबाबत नानाविध शंका घेऊन येणार्‍यांना मार्गदर्शन करत. तरुण कार्यकर्त्यांना काही वर्षे हिरीरीने काम केल्यानंतर, आता पुढे काय ? याबाबत त्यांचे मार्गदर्शन घ्यावेसे वाटे. काम व प्रापंचिक अडचणी यात घुसमट होणार्‍या गृहस्थाश्रमी कार्यकर्त्यांना तर चर्चेसाठी यशवंतराव हक्काचे वाटत. यशवंतरावांनाही तो आपल्या कामाचा महत्त्वाचा भाग वाटत असे. त्यामुळे ते त्यासाठी पुरेसा वेळ देत. प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांबरोबरच स्वरूपवर्धिनीतील अनेक कार्यकर्त्यांना त्यांचे प्रासंगिक पण हक्काचे मार्गदर्शन मिळत असे. लोकसंघटनाची आगळीवेगळी वाट चोखाळणारे विश्व हिंदू परिषदेचे भक्तिमार्गी डॉ. संदीप महिंद यांनीही बराच काळ यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली.
 
वंचितांचे आश्रयदाते यशवंतराव
 
बेळगाव परिसरात बेरड-रामोशी समाजात निष्ठापूर्वक ध्येयवादी वृत्तीने अनेक वर्षे काम करणार्‍या कै. डॉ.भीमराव गस्ती यांचे ‘बेरड’ हे अनुभवांचे आत्मकथन करणारे पुस्तक 1986-87 च्या सुमारास यशवंतरावांच्या वाचनात आले. अंगावर शहारे आणणारे हे पुस्तक वाचून ते कमालीचे अस्वस्थ झाले. बेरड-रामोशी समाजाची हलाखीची परिस्थिती,पोलिसांचे निर्दयी अत्याचार ,उर्वरित समाजाचे बघेपण व कोरडी सहानुभूती यामुळे यशवंतराव हेलावले. त्यांनी भीमरावांना पत्र लिहिले. पुढे त्यांच्या कार्यास प्रत्यक्ष जाऊन भेटही दिली. भीमरावांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात देवाला सोडल्या जाणार्‍या असहाय्य देवदासी महिलांसाठी कार्य चालू केले. त्यात यशवंतराव तन-मनाने सहभागी झाले. प्रत्यक्ष देवदासींच्या मोर्च्यात सामील झाले. मोर्च्याच्या वतीने भीमरावांसोबत जिल्ह्याधिकार्‍यांना भेटले. पुण्यातील सदाशिव पेठेच्या प्रतिष्ठेच्या चौकटीत वावरणारी ही पावले या अभागी, अनवाणी व भेगाळलेल्या पावलांसोबत समरस झाली ती कायमचीच !
 
 
भीमरावांचेही पुण्यातले येणे वाढले. पुण्यात आले की त्यांचा यशवंतरावांच्या घरी मुक्काम ठरलेला असायचा. पुढे कार्यकर्त्यांनाही भीमराव सोबत घेऊन येऊ लागले. मग सर्वांचा निवास व सहवास प्रबोधिनीला लाभू लागला. प्रबोधिनीतील तरुण कार्यकर्त्यांचेही प्रेरणाविश्व भीमरावांबरोबरच्या निवांत गप्पांनी समृद्ध होऊ लागले. यशवंतरावांनी भीमरावांना अधिक लिहितं करणं, त्यासाठी त्यांचा पाठपुरावा करणे यातून पुढे भीमरावांचे ‘आक्रोश’ पुस्तक प्रसिद्ध झाले व आता त्यांच्या पश्चात ‘कौरव’ प्रकाशनाच्या मार्गावर आहे. भटके विमुक्त समाजात तळमळीने कार्य करणार्‍या गिरीश प्रभुणे यांना यशवंतरावांनी प्रबोधिनीत बोलावून भीमरावांची गाठ घालून दिली. भेटीगाठी वाढल्या. त्यातून पुढे ‘सामाजिक समरसता’ विषय वाढता राहिला. साहित्याच्या अंगानेही वाढला.
 
 
भीमरावांच्या पत्नी-कमळाबाईंची किडनीची शस्त्रक्रिया असो वा स्वतः भीमरावांची हृदयरोगाची शस्त्रक्रिया असो यात पुढाकार यशवंतरावांचाच होता. कारण प्रकृतीकडे दुर्लक्ष करीत, हेळसांड करीत काम करत राहण्याची भीमरावांची वृत्ती त्यांना चांगलीच ठाऊक होती. अर्थात भीमरावांचेही यशवंतरावांपुढे काही चालत नसे ! कारण त्यांच्या मनात यशवंतरावांचे स्थान हे आदर्श गुरुवत होते. अर्थात शेवटी मात्र घात झाला आणि भीमराव काहीसे अकाली गेले. याचे मोठे शल्य यशवंतरावांच्या वाट्याला आले. सुरुवातीला समाजवादी वर्तुळात वावरणारे व मिरविले जाणारे भीमराव कधी व कसे हिंदुत्वाच्या विशालधारेत सामावले गेले ? हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे एकमेव व एका शब्दातले उत्तर आहे यशवंतराव !
 
 
एकूणच वंचित समाज हा यशवंतरावांचा आस्थेचा विषय होता. त्यासाठी काम करणारे कार्यकर्ते, त्यांच्या कामातील अडचणी, ताण-तणाव, यश-अपयश ते जाणून घेत. त्यातून काम करणार्‍या कार्यकर्त्याला उभारी मिळत असे. एक नवी उमेद घेऊन तो कार्यक्षेत्रात परतत असे. असे हे स्वतःहून ओढवून घेतलेले यशवंतरावांचे पालकत्व होते ! त्यातून त्यांच्या अवतीभवती काम करणार्‍यांचेही भावविश्व न कळत समृद्ध होत असे. संत्रिकेत काम करणारी शुभांगी देवरे ही त्यापैकीच एक. पारधी समाजातील प्रश्नांबाबतचे गिरीश प्रभुणे यांचे सातत्यपूर्ण लेखन वाचून तिलाही वाटू लागले की आपणही यमगरवाडीला जाऊन प्रत्यक्ष कामात सहभागी व्हावे. यशवंतरावांनी तिची प्रभुणेंशी गाठ घालून दिली. वर्ष 1999 ते 2001 दरम्यान तिने अडीच वर्षे यमगरवाडीला प्रत्यक्ष राहून पारधी समाजासाठी काम केले. पुढे तिच्या वृत्ती-पिंडाला साजेशा असणार्‍या अनुरूप सामाजिक कार्यकर्त्यासोबत विवाह जुळविण्यातही यशवंतरावांनी लक्ष घातले आणि हा जुळवून आणलेला आंतरजातीय विवाह सहजपणे पार पडला !
 
स्मरण प्रेरणावंतांचे
 
पंजाबमधील थोर संन्यासी, देशभक्त व गणितज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे 1973 हे जन्मशताब्दी वर्ष होते. अवघ्या 33 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या स्वामीजींनी जपानमधील विश्व धर्म संमेलनात भाग घेतला होता. स्वामी विवेकानंदांप्रमाणे त्यांनी विदेशात वेदांतधर्माची ध्वजा फडकावली. जपान, अमेरिका व रशिया या देशांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भाषणे दिली. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी कार्यक्रम घडवून आणले. रामतीर्थ जन्मशताब्दीच्या वतीने ठिकठिकाणी चरित्रकथनाचे व विचारप्रसाराचे काम झाले. पुण्यातील शताब्दी समितीचे यशवंतराव हे कार्यवाहही होते. वर्ष 2002 हे स्वामी विवेकानंद यांच्या स्मृती शताब्दीचे वर्ष होते. ते साजरे करण्याचे प्रबोधिनीने ठरविले. त्यातही यशवंतरावांचेही मार्गदर्शन व पुढाकार होताच.
 
 
सर्वात विशेष म्हणजे भगिनी निवेदिता यांची स्मृतीशताब्दी साजरी करण्यात यशवंतरावांनी वयाच्या 80 व्या वर्षी घेतलेला पुढाकार ! तो केवळ अवर्णनीय व अचंबित करणारा होता. सुमारे 15 संस्थांच्या प्रतिनिधींना एकत्र आणून त्यांनी पुण्यात एका ‘स्मृतीशताब्दी समिती’चे गठन केले. या समितीने राज्यभरात विविध कार्यक्रम ठिकठिकाणी घडवून आणले. कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा मा.निवेदिता भिडे यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलावून ज्ञान प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात एक मोठा कार्यक्रम डिसेंबर 2010मध्ये त्यांनी घडवून आणला. सर्वात अवघड व चिवटपणे केलेले काम म्हणजे भगिनी निवेदिता यांचे चरित्र! ते लिहिण्यास त्यांनी डॉ. मृणालिनी गडकरी यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्यांना सर्वतोपरी मदत केली. स्वतः चरित्रासाठी आवश्यक ते सर्व संदर्भ शोधले. समग्र भगिनी निवेदिता वाड:मयाचे सर्व पाचही इंग्रजी खंड त्यांनी चिकाटीने वाचून काढले. अखेरीस 408 पानांचे भगिनी निवेदिता यांचे सुंदर चरित्र आकाराला आले! तेही ऐन वेळीच्या प्रकाशक बदल वगैरे अडचणीवर मात करत. या शिवाय मा. सुहासिनी देशपांडे, डॉ. सुरुची पांडे, आदिती हर्डीकर व मृणालिनी चितळे यांनीही एकेक वेगळा पैलू घेऊन निवेदितांवर पुस्तके लिहिली. या सर्वानांही यशवंतरावांचे मार्गदर्शन लाभले. लोकसभेचे माजी सभापती मा. सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
 
 
सक्रिय मार्गदर्शनाचे पर्व
 
संत्रिका विभागात सुमारे एक तप विभागप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर वयाच्या पंचाहत्तरीत म्हणजे 2005मध्ये ते औपचारिक जबाबदारीतून मुक्त झाले. असे असले तरी तेव्हापासून आजतागायत ते संत्रिकेत ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. लगोलग पुढील तीन वर्षात त्यांनी ठरवून सोलापूर केंद्रात महिन्यातून एक आठवडा जाण्यास सुरुवात केली. यात तेथील प्रशालेतील शिक्षकांचे पाठ बारकाईने अभ्यासणे व सुधारणेबाबत सूचना करणे, शिक्षक प्रशिक्षणात मार्गदर्शन करणे, तरुण कार्यकर्त्यांशी प्रेरक संवाद करणे, सल्लामसलतीसाठी उपलब्ध असणे या दृष्टीने त्यांचे सोलापूरमधील निवासी वास्तव्याचे मोल मोठे होते. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी वा अन्य कामांमुळे पडलेला खंड वगळता त्यांनी चोवीस आठवडे सोलापूर केंद्रासाठी वेळ दिला. या दरम्यान प्रासंगिक हराळी केंद्रावरही त्यांचे जाणे होत असे. पुढे भगिनी निवेदिता स्मृती शताब्दीचे काम सुरु झाल्यानंतर मात्र त्यांची सोलापूर फेरी थांबली.
 
कुटुंबवत्सल यशवंतराव
 
कुटुंबातील सदस्यांच्या मते तर त्यांचे ‘दादा’ म्हणजेच यशवंतराव आणि प्रबोधिनी असा वेगवेगळा विचारच करता येणार नाही कारण त्यांचे असे वेगळे काही आयुष्यच नव्हते. यशवंतराव यांना एक मुलगी-सुधा आणि आनंद व राजेंद्र अशी तीन अपत्ये आहेत. आपल्या या मुलांच्या बालपणात ते त्यांना किशोर मासिक वाचून दाखवत, वि. दा. करंदीकरांच्या कविता साभिनय वाचून दाखवत. मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या शैक्षणिक परीक्षांच्या वेळी ते आवर्जून वेळ काढत. ठाणे जिल्ह्यात आदिवासी भागात सकवारला रहात असतांना कुटुंबासह साजरी केलेली दिवाळी मुलांच्या लक्षात राहणारी होती. सकाळी आंघोळ व व्यायाम झाल्याशिवाय दूध प्यायचे नाही असा मुलांसाठी त्यांचा दंडक असे. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपली कार्यमग्नता टिकली पाहिजे असे त्यांचे मुलांना सांगणे असतो. त्यांचा स्वतःचाही अत्यंत आखीव-रेखीव असा दिनक्रम असे. पूजा, सूर्यनमस्कार, ध्यान, योगासने व व्यायाम याला दैनंदिन जीवनात नित्याचे स्थान असे. त्यांना स्वच्छता व टापटीप लागत असे. आयुष्यात जर दुर्दैवाने एखादी वाईट घटना घडली तर दु:ख कुरवाळत न बसता कामाला लागा हा त्यांचा आग्रह होता.
 
 
नातवंडांसाठी ‘आजोबा’ असणारे यशवंतराव त्यांच्यासोबत मात्र थट्टा-मस्करी करू शकत असत. इतरांना धीर-गंभीर भासणार्‍या यशवंतरावांचा असाही एक अपरिचित पैलू होता. नातवंडांचा अभ्यास हेही आजोबांचं एक आवडीचं काम ! आजोबांनी आयुष्यातले अनुभव नातवंडांना सांगितले, त्यांच्यामुळे भीमराव कोण हे नातवंडांनाही कळले. आजोबांकडून एखाद्या प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही असे कधी झाले नाही, आजोबा एखादी गोष्ट सांगतांना ती का? आणि कशी ? करायची हेही सांगतात, आजोबा कौतुकही करतात, ही सर्व नातवंडांची निरीक्षणे बरीच बोलकी आहेत.
 
 
यशवंतरावांच्या एकूण योगदानात त्यांची पत्नी सुमतीताई यांचा अनन्यसाधारण वाटा आहे. त्या बी.ए. बी.एड. पर्यंत शिकल्या होत्या. सुरुवातीला त्यांनी काही काळ विविध शाळांमध्ये प्रासंगिक नोकरी केली परंतु पुढे घरच्या जबाबदार्‍यांमुळे ती त्यांना थांबवावी लागली. त्यांनी घरची आघाडी अत्यंत भक्कम व समर्थपणे पेलल्यामुळे यशवंतराव आपल्या सार्वजनिक आयुष्यात भरीव योगदान देऊ शकले. घरी कायम पै-पाहुण्याची वर्दळ असली तरी पत्नीची त्याबाबत कुरकुर नसे. यशवंतरावांनी आपल्या पत्नीला प्रबोधिनीच्या पद्धतीने पौरोहित्य करायला प्रोत्साहन दिले. अनेक पूजाविधी व विवाह संस्कार त्या करत असत. सुरुवातीला त्या राष्ट्र सेविका समितीमध्ये बरेच काळ सक्रीय होत्या. मागाहून काही काळ त्यांनी स्वरूपवर्धिनीच्या शाखेचेही काम केले. दुर्दैवाने यशवंतरावांना त्यांच्या पत्नीची दीर्घकाळ साथ मिळू शकली नाही. एकत्र 35 वर्षांच्या संसारानंतर वर्ष 1997मध्ये वयाच्या 63व्या वर्षी सुमतीताईंचे रक्ताच्या कर्करोगाने काहीसे अकाली निधन झाले.
 
 
वर्ष 2012मध्ये दुर्दैवाने यशवंतरावांनाही कर्करोगाने गाठले. सुरुवातीची केमोथेरपीची संख्या 4 वरून 19 झाली. अशा कठीण परिस्थितीत कर्करोगाचा सामना करतांना यशवंतरावांचा निराशेचा खचलेला सूर कधी जाणवलाच नाही हे कुटुंबियांचे निरीक्षण महत्त्वाचे होते. त्यांच्या चेहर्‍यावर कायम असलेली प्रसन्नता याही प्रसंगी कोमेजली नव्हती. अखेरीस कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगातून ते पूर्णपणे बरे झाले आणि पुन्हा नेहमीसारखे सक्रीय झाले.
 
कार्यकर्त्यांसाठी अनुकरणीय यशवंतराव
 
सतत वाचन, मनन, चिंतन, लेखन व प्रबोधन करत राहणे हा यशवंतरावांच्या जगण्याचा स्थायीभाव आहे. त्यांची वैचारिक व्यासंगी वृत्ती अफाट होती. त्यांच्या वाचनात कोणते ना कोणते पुस्तक सतत असे. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी व त्यातील वैविध्य बघितले की विस्मयचकित व्हायला होते. एखाद्या प्रश्नाची दुसरी बाजू समजावून घेण्यासाठी वैचारिक विरोधकांचीही ते वेळप्रसंगी पुस्तके वाचत. त्यांनी स्वतः कधी पुस्तक लिहिले नसले तरी विविध विषयांवरचे प्रासंगिक स्फुटलेखन लेखन त्यांनी बरेच केले आहे. तरुण कार्यकर्त्यांकडूनही त्यांची अध्ययन-अभ्यासू वृत्तीची अपेक्षा असे. राष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास करण्याचा त्याचा आग्रह असे. हिंदुत्वाचे अधिष्ठान असणारा, सेवाप्रेरित असा पीळ असलेला कार्यकर्ता तयार व्हावा हीच त्यामागची भावना होती. ते विद्यावाचस्पती झाले नाहीत तरी अशा अनेकांना ते सहजी मार्गदर्शन करू शकतील इतकी त्यांच्या वैयक्तिक व्यासंगाची खोली व व्याप्ती होती. त्यातूनच संत्रिकेतील पौरोहित्य करणार्‍या चौघीजणींनी वाचस्पती होण्याचा पराक्रम केला.
 
 
कृतिशीलतेने जगणे हे यशवंतरावांच्या जगण्याचे मर्म होते. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात ते नियमित जीवन दिनचर्या पाळणारे होते. सतत कार्यरत रहाणे हा त्यांचा स्थायी भाव होता. कार्यकर्त्याच्या आयुष्याला काही तरी शिस्त असली पाहिजे याबाबत ते आग्रही असत. पगाराची अपेक्षा न ठेवता, आवश्यक तेवढेच मर्यादित वेतन/मानधन घेऊन काम करणे यासाठीची त्यांनी स्वतःच्या मनाची तयारी केलेली होती. मग वेळप्रसंगी आर्थिक ओढाताण सहन करावी लागली तरी त्याबद्दल त्यांची नाराजी नसे. कार्यकर्त्याने कार्यक्षेत्रात राहिले पाहिजे याबाबत ते आग्रही असत. म्हणूनच मुंबईत प्रबोधिनीच्या विस्तारासाठी गेले असतांना 2-3 महिन्यातून त्यांचे पुण्याला येणे होत असे. पुढे शिवापूरला असतांना तर पुण्याहून येऊन-जाऊन करण्यासारखे होते. पुणे-शिवापूर तर अंतर अवघे 22 किलोमीटरचे. तरीपण ते तिथे जाऊन प्रत्यक्ष दोन वर्षे राहिले. कामाचे मानदंड तयार होत असतात ते अशा निग्रही कार्यकर्त्यांच्या जगण्यातूनच !
 
 
पत्रलेखन हे यशवंतरावांचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य होते, ओळख होती. अनेकांना ते वाढदिवसाला आवर्जून पत्र पाठवीत असत. त्या व्यक्तीच्या आयुष्यात जर एखादी चांगली गोष्ट घडली तरी कौतुकाचे पत्र येणे ठरलेलेच. दुर्दैवी घटना घडली तरी सांत्वनाचे पत्र हमखास येणार. वैयक्तिक पातळीवर नात जपण्याचा त्यांचा तो मार्ग होता. त्यांच्या पत्राची सुद्धा एक वेगळी खासियत होती. कोणत्याही आकाराच्या कागदावर ते पत्र लिहू शकत व पुरेसा मजकूर लिहू शकत. त्याचे कारण त्यांचे हस्ताक्षर. सर्वसामान्य व्यक्तीच्या निम्म्या आकाराचे असे मुंगीएवढ्या अक्षरात ते लिहू शकत. अर्थात त्यातली आशयघनता मात्र मोठी असे. त्यामुळेच अनेकांसाठी ही पत्रे म्हणजे यशवंतरावांची ‘आठवण’ आहे.
 
 
यशवंतरावांचे अनेकांना जाणवणारे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आग्रहपूर्वक मराठी शब्दांचा वापर. बोलण्यात आणि लिहिण्यातही! त्यांचा तो आग्रह बघितला की नकळतपणे इंग्रजी शब्द वापरत बोलणार्‍यावरही परिणाम झाल्याशिवाय रहात नसे.
ध्येयवाद स्वतःच्या आयुष्यात जगून दाखविणार्‍या पिढीचे यशवंतराव प्रतिनिधी होते. अशा व्यक्तींच्या आयुष्याच्या प्रकाशात अजून कितीतरी जीवने उजळली! अर्थपूर्ण बनली. त्यांच्या जगण्याचे निष्ठापूर्वक अंशतः जरी अनुकरण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला तरी त्यांचा वारसा सांगण्याला आपण खर्‍या अर्थाने पात्र होऊ शकू असे वाटते.
 
 
-विवेक गिरिधारी