क्रांती ऋचा - महाकवी सावरकरांचे मनोज्ञ दर्शन

विवेक मराठी    26-Feb-2025   
Total Views |
- प्रशांत पोळ

book
 
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तळपत्या प्रतिभेचे अथांग क्षितिज. आपण सावरकरांना प्रामुख्याने ओळखतो ते क्रांतीकारकांचे मुकुटमणी म्हणून. मार्सेलिसची उडी आणि काळ्या पाण्याची खडतर, जीवघेणी शिक्षा भोगलेले, संपूर्ण समर्पित राष्ट्रभक्त. हिंदुत्वाचे आधुनिक भाष्यकार आणि विज्ञाननिष्ठ समाजसेवक. सावरकरांची प्रज्ञा आणि प्रतिभा अलौकिक होती. चतुरस्त्र होती. ते एकाच वेळेस थोर साहित्यकार होते. इतिहास संशोधक होते. ऐतिहासिक कथा / कादंबरी / नाटक लिहिणारे लेखक होते. प्रखर वक्ता होते. ते पत्रकार होते. नाटककार होते आणि हो, कवी ही होते. नुसते कवी नाही, तर महाकवी..!
 
 
(काही वर्षांपूर्वी पर्यंत सावरकर हे उपेक्षित व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात, १९८३ साली, काँग्रेसच्या एका मोठ्या पुढार्‍याने, सुधीर फडके यांच्याशी बोलताना, सावरकरांना 'आउटडेटेड' म्हटलं होतं.
 
गंमत बघा, आज सावरकर हे मराठी / हिंदी / इंग्रजीत 'बेस्ट सेलर' आहेत. मराठीत अक्षय जोग यांनी सावरकरांवरील आक्षेपांना खोडून काढण्याचं फार मोठं काम केलं आहे. इंग्रजी आणि हिंदीत विक्रम संपत यांची सावरकरांवरची पुस्तकं गाजत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे 'ते' पुढारी मात्र आऊटडेटेड व्हायला लागले आहेत..!)
 
 
सावरकरांच्या 'संगीत सन्यस्त खड्ग' नाटकातलं एक पद आहे -
शतजन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्यमालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
 
पुण्यात सावरकर जन्मशताब्दी समारोहाच्या कार्यक्रमात बोलताना, या ओळींविषयी पु. ल. देशपांडे म्हणाले होते,
'उत्कट भव्य ते घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे', हा समर्थांचा उपदेश सावरकरांइतका तंतोतंत आचरणात आणलेला क्वचित आढळतो. त्यामुळे कवितेत देखील ते कल्पनेची हिमालयीन शिखरं गाठतात'.
 
 
'शतजन्म शोधिताना...' मध्ये कालाचं किती विराट स्वरुप, दोन ओळीत त्यांनी उभं केलं आहे, पहा ! एका सूर्यमालिकेचं चित्र डोळ्यांपुढे आणताना आपण थकून जाऊ. हा महाकवी 'शत सूर्यमालिकांच्या, दीपावली विझाल्या' म्हणून जातो.
अलौकिक प्रतिभेच्या या दोन ओळींचा जरी विचार केला, तरी या कल्पनेसाठी सावरकरांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता.
 
 
मात्र अश्या महाकवी सावरकरांच्या कवितेबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. त्यांच्या 'जयोस्तुते श्री महन्मंगले..' आणि 'सागरा प्राण तळमळला..' या दोन कविता तशा अजरामर. पण या शिवाय सावरकरांनी सन १८९४ ते १९३८ या काळात अनेक कविता लिहिल्या. महाकाव्यं लिहिली. नाट्यगीतं लिहिली. त्याबद्दल फारसं लेखन झालेलं दिसत नाही.
 
 
ही उणीव भरून काढली आहे, ताज्या दमाच्या लेखिका / कवयित्री अश्विनी जांभेकर पितळे यांनी. सावरकरांच्या कवितांच्या रसग्रहणाचं क्रांती ऋचा हे त्यांचं पुस्तक, 'विवेक प्रकाशनाने' प्रकाशित केलंय. कवी सावरकर समजून घ्यायचे असतील, तर हे पुस्तक वाचायलाच हवं.
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी
क्रांती ऋचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याचे रसग्रहण
 
या पुस्तकात अश्विनीजींनी सावरकरांच्या लोकप्रिय असलेल्या, जयोस्तुते.. सारख्या कविता घेतलेल्या नाहीत. उलट काहीशा उपेक्षित असलेल्या, परंतु अत्यंत दर्जेदार अश्या कवितांचं रसग्रहण त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर, 'खरा माणूस शोधायचा असेल तर त्याचं काव्य वाचावं. समग्र सावरकर समजणं अशक्य गोष्ट आहे. मात्र त्यांचं काव्य वाचल्याशिवाय त्यांच्या अधिक जवळ जाता येत नाही, हे देखील खरं आहे'.
 
यात एकूण १५ कवितांचं रसग्रहण आहे. सावरकरांची कविता ही संस्कृत प्रचूर आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी, प्रथमदर्शनी ती समजायला कठीण जाते. त्या सर्व जागा अश्विनीजींनी अत्यंत सहजपणे, सोप्या शब्दात उलगडून दाखविल्या आहेत. सावरकरांच्या विविध रसातल्या कवितांचा येथे समावेश आहे. यात 'तनुवेल' आहे, तशीच 'महासागर' सुद्धा आहे. 'श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग' सारखी वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेली कविता आहे. तसेच अंदमानच्या काळ कोठडीत लिहिलेल्या 'कमला' या महाकाव्याचंही 'रसग्रहण' आहे.
 
 
सावरकर हे जातिवंत कवी होते. अक्षरशः सर्व प्रकारचे रस त्यांनी आपल्या काव्यातून लिलयेनं खेळवले आहेत. कमला काव्यात वीर रस आहे, तसाच शृंगार रस ही उच्च पातळीवर नेऊन ठेवला आहे. लेखिका लिहितात, 'वीरता, शौर्य ही त्या काळाची गरज होती. कमला काव्यातही वीर रस आहे. नाही असं नाही; परंतु शृंगार रस हा माणसात उपजतच असतो. आपला जन्म ही शृंगारातूनच होतो. शृंगारामुळे आयुष्यात रुची उत्पन्न होते. शृंगाराला 'रसराज' म्हणतात, ते उगाच नाही. मुकुंदा आणि कमला यांच्या पहिल्या चुंबनाचं वर्णन, सावरकर इतक्या नाजुकतेने करतात, की ते 'लज्जाचित्र' समोर उभं राहतं.
 
 
यात पुढे लिहिलंय, 'वरवर कठोर वाटणारं त्यांचं मन, फुलाप्रमाणे कोमल आहे. फुलाचा सुगंध ज्याप्रमाणे लपून राहत नाही, त्याप्रमाणे सावरकरांच्या स्वभावाची ही हळवी आणि अपरिचित बाजू कमला काव्यात बघायला मिळते.
 
रत्नागिरीत स्थानबद्ध असताना, सन १९३१ मध्ये सावरकरांनी, 'मला देवाचे दर्शन घेऊ द्या..' ही सुरेख कविता लिहिली. सावरकर हे हाडाचे समाज सुधारक होते. जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी, रत्नागिरीतील भागेश्वराचे मंदिर त्यांनी अस्पृश्यांसाठी खुले केले. त्याप्रसंगी केलेली ही कविता -
 
तो हिंदू देव, मी हिंदू.
मी दीन, तो दया सिंधू,
तुम्ही माझे धर्माचे बंधू
अडवू नका मला जाऊ द्या
मला देवाचं दर्शन घेऊ द्या..!
 
 
या कवितेची छानशी उकल, या पुस्तकात केलेली आहे. अश्विनी जी लिहितात, 'या कवितेच्या अनुषंगाने समाज सुधारक म्हणून सावरकर मला नव्याने उमगत गेले. या अंगाने त्यांचा अभ्यास करू लागले, आणि आवाक् झाले. एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूने परिपूर्ण अभ्यास कसा करावा, हा सावरकरांच्या बाबतीत एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
 
 
सावरकरांची एक - एक कविता म्हणजे एक - एक लखलखतं रत्न आहे. 'महासागर' सारखी खोल, जीवनाचा अर्थ सांगणारी कविता असो, की 'बालविधवा दु:स्थिती कथन' सारखी करूण रसाची कविता; 'हा छंद नसे चांगला' ही लावणी असो की 'दीपावलीचे लक्ष्मीपूजन' सारखी, स्वदेशी चे प्रोत्साहन करणारी कविता... लेखिकेच्या भाषेतच सांगायचं तर, 'केवळ एका चौकटीत बसेल ती सावरकरांची प्रतिभा कुठे..! भावना तरल असतात हे माहिती होतं, पण सावरकरांची प्रतिभाही तरल आहे, तिला काव्याच्या कोणत्याही साच्यात घातलं तरी ती सहज सामावून जाणारी आहे, हे नीटसं माहित नव्हतं'.
 
 
सावरकरांच्या, त्यातल्या त्यात अपरिचित अश्या, १५ कवितांच्या रसग्रहणाचं हे पुस्तक. बहुदा अश्विनी जांभेकर पितळे यांचं हे पहिलंच पुस्तक आहे. पण कदाचित त्या स्वतः कवयित्री असल्यामुळे असेल, कवितांच्या रसग्रहणाचे हे लेख फार रसाळ झाले आहेत. त्या कवितांबरोबरच सावरकरांसंबंधी काही माहितीही उलगडत जाते. 'जगन्नाथाचा रथोत्सव' सारख्या कवितेचं केलेलं निरूपण हे केवळ अप्रतिम..!
 
 
महाकवी सावरकरांच्या काहीशा अज्ञात असलेल्या, रसपूर्ण, अर्थगर्भ आणि विचार परिपक्व कविता, मराठी वाचकांसमोर आणण्याचं मोठं काम, 'क्रांति ऋचा' ने केलंय, हे निश्चित..!
 
- प्रशांत पोळ