स्त्री शक्ती भारतीय दृष्टीकोन

विवेक मराठी    04-Mar-2025   
Total Views |
‘स्त्री शक्ती; विमेन, जेन्डर अँड सोसायटी इन इंडिया’ पुस्तकामध्ये ऐतिहासिक, तात्विक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून विश्लेषण केले गेले आहे. भारतीय समाजाचा साकल्याने विचार करत शाश्वतता आणि सुसंवाद सुनिश्चित करण्यासाठी भारतीय दृष्टीकोनांमध्ये रुजलेले उपाय शोधण्याचा या पुस्तकातून प्रयत्न केला गेला आहे.
book
 
 ‘स्त्री शक्ती; विमेन, जेन्डर अँड सोसायटी इन इंडिया’ हा प्रमुख संपादिका नयना सहस्रबुद्धे यांनी प्राची मोघे, वरदा संभूस, ज्योती चौथाईवाले आणि सिंधू कपूर या विचारी कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ज्ञ अशा भारतीय स्त्री शक्तीच्या चमूबरोबर संपादित केलेला ग्रंथ नुकताच वाचनात आला. भारतीय दृष्टीकोनाने स्त्रीवादाकडे पाहण्याचा एक सखोल विचार करून साकार झालेल्या या ग्रंथात विविध विचारवंत, महिला सक्षमीकरणामध्ये कार्यरत असलेल्या लेखक-लेखिकांच्या विद्वत्तापूर्ण अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश आहे. नयना सहस्रबुद्धे यांचे महिलांविषयक चिंतन त्यांच्या ‘स्त्रीभान’ या पुस्तकातून आपण वाचलेच आहे. भारतीय स्त्री शक्तीचे कार्य आणि विचार या ग्रंथामध्ये समाजाचा व्यापक आणि समग्र पद्धतीने विचार करत प्रकट झाले आहेत. सर्वसमावेशक आणि संतुलित दृष्टीकोनासह विविध विषयांचा समावेश करणे हे एक आव्हानात्मक काम होते; परंतु मुख्य संपादक आणि त्यांच्या चमूने ते उत्तमरीत्या केले आहे.
प्रकाशक : आर्यन बुक्स इंटरनॅशनल
किंमत : 1495 रु.
 
पुस्तकामध्ये ऐतिहासिक, तात्त्विक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून विश्लेषण केले गेले आहे. भारतीय समाजाचा साकल्याने विचार करत शाश्वतता आणि सुसंवाद सुनिश्चित करण्यासाठी भारतीय दृष्टीकोनांमध्ये रुजलेले उपाय शोधण्याचा या पुस्तकातून प्रयत्न केला गेला आहे. या पुस्तकाची रचना वेगवेगळ्या चार विभागांमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक विभाग भारतीय स्त्रीवादाच्या एका स्वतंत्र आयामावर भाष्य करतो. पुस्तकाला माजी खासदार आणि ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन फॉर इंटिग्रल ह्युमॅनिझम’चे अध्यक्ष डॉ. महेश चंद्र शर्मा यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी सुरुवातीसच पाश्चात्य आणि भारतीय स्त्रीवादी दृष्टीकोनांमध्ये विरोधाभास दर्शविला आहे. त्यामुळे अत्यंत मूलभूत प्रश्न संबोधित झाला आहे. अर्थात त्याचे उत्तर समाजातील समस्यांचे निराकरण करताना किंवा उत्तम गोष्टींचे अधिकच बळकटीकरण करताना समग्र दृष्टीकोन बाळगण्यात आहे.
 
 
पहिल्या भागात सैद्धांतिक आधार आणि मुख्य संकल्पना यावर भर दिला आहे. भारतीय समाजातील लिंगविशिष्ट भूमिकांचा (gender roles) ज्ञानशास्त्रीय आणि तात्त्विक आधार स्थापित करणार्‍या सैद्धांतिक पायांचा यामध्ये उहापोह केला आहे. स्त्रियांबद्दलचे भारतीय समाजात जे सामाजिक दृष्टीकोन आहेत त्यांना आकार देण्यात वेद, उपनिषदे आणि धर्मशास्त्रांसह प्राचीन धर्मग्रंथांचे महत्त्व यात अधोरेखित केले आहे. पुस्तकातील एक महत्त्वाचं प्रकरण वैदिक काळातील महिलांच्या भूमिकेवर चर्चा करते. गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या महिला विद्वानांच्या ऐतिहासिक उदाहरणांचा हवाला यामध्ये दिला असून, लेखिका बौद्धिक आणि आध्यात्मिक विमर्शामध्ये महिलांच्या सक्रिय सहभागाचा भक्कम पुरावा देतात. त्यामुळे आजपर्यंत समाजात निर्माण झालेले किंवा भारतीय समाजावर पाश्चात्यांनी लादलेले, शिक्षणतज्ज्ञांनी तसेच बाळगलेले दृष्टीकोन जसे की, भारतीय समाज नेहमीच पितृसत्ताक राहिला आहे याला या नोंदी आव्हान देतात. त्याऐवजी भारतीय परंपरांमध्ये खोलवर रुजलेल्या लैंगिक समानतेचा दृष्टीकोन हा प्रबंध सादर करतो. भारतातील स्त्रीवादी विमर्शावर वसाहतवाद आणि जागतिकीकरणाच्या परिणामाचेही या पुस्तकात समीक्षात्मक परीक्षण केले आहे. स्त्रीवादावरील समकालीन दृष्टीकोनांची वाचकांना यातून माहिती होते. त्याद्वारे स्त्रीवादी संकल्पनांचे पुनरावलोकन आणि पुनर्मूल्यांकन करण्याची गरजही इथे अधोरेखित होते.
 
 
दुसर्‍या विभागात स्त्रीवादाच्या अनेक पैलूंवर भाष्य आहे. स्त्रीवादाच्या वैविध्यपूर्ण आणि बहुआयामी स्वरूपाचा इथे विस्तार केला आहे. विविध जागतिक आणि स्वदेशी स्त्रीवादी चळवळींवर यामध्ये प्रकाश टाकला आहे. या विभागात तिसर्‍या जगातील स्त्रीवाद, दलित स्त्रीवाद, पर्यावरण-स्त्रीवाद आणि भारतीय स्त्री दर्शनाचा अद्वितीय दृष्टीकोन यावर निबंध सादर केले गेले आहेत. प्रत्येक प्रकरण वेगवेगळ्या सामाजिक-राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भातील महिलांच्या जिवंत अनुभवांचे आणि संघर्षांचे अंतर्दृष्टीपूर्ण विश्लेषण सादर करते. पुस्तकाच्या तिसर्‍या विभागात सामाजिक जीवनात महिलांच्या पावलांचे ठसे यावर उत्तम चर्चा केली आहे.
 
 
सामाजिक संरचना आणि ऐतिहासिक उत्क्रांतीमध्ये महिलांच्या भूमिकेवर इथे भर दिला गेला आहे. अनेक महत्त्वाच्या विषयांवर या विभागातही आधीप्रमाणेच गहन चर्चा आढळते. पुस्तकाच्या चौथ्या भागात समकालीन काळातील स्त्रियांवर चर्चा केली आहे. सार्वजनिक जीवन, सामाजिक चळवळी आणि प्रशासन यासह विविध क्षेत्रांमधील महिलांच्या योगदानाची चर्चा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण आजच्या काळातली आव्हाने आणि आकांक्षा आणि पारंपरिक अपेक्षा यांचा समतोल साधताना महिलांनी आव्हानांचा सामना कसा केला यावर इथे विचार केला गेला आहे.
 
 
त्यामुळेच अभ्यासक आणि भारतीय विचारांमध्ये रस असलेल्या विद्वानांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक एक उत्कृष्ट साधन झाले आहे. भारतीय सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन पाश्चिमात्य स्त्रीवादाचा पूर्णपणे स्वीकार किंवा त्याला नकार न देता स्वदेशी स्त्रीवादी चौकट पुस्तकातून स्पष्ट होत आहे. अनेक नामांकित विचारवंत कार्यकर्त्या लेखकांनी यामध्ये योगदान दिल्यामुळे त्यातील मांडणीला खूप मोठी विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. त्याला प्राचीन धर्मग्रंथ आणि तात्त्विक ग्रंथांच्या संदर्भांचा आधार आहे. भारतीय संदर्भात स्त्रीवादाचा समग्र दृष्टिकोन सादर करण्यासाठी इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि राजकारण यांचे मिश्रण झाल्यामुळे एक आंतरशाखीय दृष्टिकोन वाचकांना यामधून मिळू शकतो. तसेच पाश्चात्य दृष्टीकोनाच्या पलीकडे स्त्रीवादी चळवळींच्या बहुविधता आणि एक व्यापक दृष्टीकोन यामुळे स्त्रीवादी विचारधारांचा एक दीर्घ असा परीघ समोर येतो.
 
 
एकंदरीत, ’इंडियन पर्स्पेक्टिव्ह्ज ऑन फेमिनिझम’ हे एक उत्कृष्ट मांडणी झालेले पुस्तक आहे. स्त्रीवादाबद्दलच्या पारंपरिक विमर्शाला आव्हान देत पाश्चात्य विचारांव्यातिरिक्त सैद्धांतिक मांडणी करण्याचे कुशल काम या पुस्तकाने केले आहे. भारताच्या समृद्ध बौद्धिक परंपरांवर आधारित, भारतीय तत्त्वज्ञान आणि इतिहासात खोलवर रुजलेला एक पर्यायी स्त्रीवादी विमर्श सादर करण्याचे एक मोठे कार्य या पुस्तकाने केले आहे.
 
 

विभावरी बिडवे

बी. ए. (मानसशास्त्र), एल एल. बी. पुणे येथे दिवाणी आणि मिळकत हस्तांतर विषयक वकिली सुमंत्र सेंटर ह्या संस्थेची विश्वस्त म्हणून कार्यरत. कोथरूड, पुणे येथील वस्त्यांमध्ये सदर संस्थेतर्फे उपचारात्मक अभ्यासिका चालविल्या जातात. पूर्वी दिव्य मराठी मध्ये थोडे कायदेविषयक व इतर लिखाण. इतरत्र स्फुट लेखन.