आम्हाला उत्तुंग शिखर गाठायचं आहे. आणि आजच्या काळाचा विचार करता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, दळवळणाच्या क्षेत्रात, उद्योग व्यापार्याच्या क्षेत्रात मराठी माणसाला पुढे जायचे आहे. तो ध्येयवाद सोडून त्याच्या हातात भिकेचे वाडगे देणे हा छत्रपती शिवरायांचाच अपमान आहे.
निवडणुकांचे वेध सुरू झाले की, राजकीय नेत्यांची डोकी भन्नाट धावायला लागतात. विशेष करून ज्या नेत्यांकडे आणि पक्षांकडे जनहिताचा, जन विकासाचा, जन शिक्षणाचा, कोणताही कार्यक्रम नसतो, असे नेते भावनिक विषय शोधण्याच्या मागे लागतात. कधी ते सीमावादाचे मेलेले मढे उकरून काढतात, तर कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथित अपमानाचा विषय लावून धरतात. आणि काहीच सापडलं नाही तर मराठा आरक्षणाचा विषय आहेच. त्याला धरून ब्राह्मण विद्वेषाचा विषय खाजून खाजून काढला जातो.
महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक धोरणात शालेय शिक्षणात हिंदीचा अभ्यास सक्तीचा केला आहे. हे धोरण जाहीर झाल्याबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत मुंबई विकासाचा कोणताही विषय नसलेले पक्ष जागे झाले. ‘हिंदी सक्तीची चालणार नाही’ ही ओरड त्यांनी सुरू केली. हिंदी आमच्यावर लादली जाते असा हकारा सुरू केला. आंदोलन करण्याच्या धमक्या दिल्या. त्यांची भाषा मोठी तिखट - लवंगी मिरचीसारखी. महाराष्ट्र पेटून देण्याच्या घोषणा झाल्या. तेव्हा मनात प्रश्न निर्माण झाला की, या सर्वांचा विचार सार्वभौम प्रजेचा एक घटक म्हणून मी कसा केला पाहिजे?
माझ्या शालेय शिक्षणात इयत्ता आठवीपासून ते इंटरपर्यंत हिंदी सक्तीचे होते. त्यामुळे माझे काहीच नुकसान झाले नाही, उलट फायदाच फायदा झाला. मी हिंदी उत्तम बोलू शकतो, हिंदी लिहू शकतो आणि संविधानासारख्या किचकट विषयावर दीड-दोन तास अस्खलित भाषण देऊ शकतो. हिंदी भाषेच्या अभ्यासामुळे मला तुलसीदास, रविदास, कबीर, प्रेमचंद, शरदचंद्र मुक्तिबोध अशा महान साहित्यकारांचा परिचय झाला. अनेक भाषणांत त्यांच्या कथांचे मी दाखले दिले आहेत. भाषेचा अभ्यास व्यक्तिमत्त्व घडवतं, व्यक्तिमत्त्व समृद्ध करतं, आपल्या समान सांस्कृतिक मूल्यांची नाळ घट्ट करतं, एक राष्ट्रीयत्व प्रबळ करतं.
विरोधच करायचा असेल तर इंग्रजी भाषेला करायला पाहिजे. शिक्षणाची भाषा मातृभाषाच असली पाहिजे. मातृभाषेतील शब्द किंवा देशी भाषेतील शब्द नुसते शब्द नसतात, तर त्या संकल्पना असतात. त्यांच्या मागे मूल्यविचार असतो. त्यांच्या मागे शाश्वत सांस्कृतिक विचार असतो. आईचे स्थान मम्मीने घेतले, पण आई या शब्दात जे माधुर्य आहे ते मम्मी या शब्दात नाही. वडिलांचे स्थान पप्पा या शब्दाने घेतले. अनेक घरात वडिलांना दादा म्हणतात, दादाची गोडी पप्पात नाही. वहिनी, मावशी, काकू या सर्व अंटी झाल्या. या अंटीने वहिनी, काकू, मावशीतील मधुरभावाची घंटी वाजवून टाकली. हा जो सांस्कृतिक र्हास चाललेला आहे, त्या विरूद्ध ओरड करण्याची ‘राज’ नेत्यांची हिम्मत नाही. अशी हिम्मत केली तर मते जातील. हिंदीला शिव्या घालून मराठी मते मिळतील हा भ्रम त्यांच्या डोक्यात आहे.
मराठीपणाची चिंता करण्याचे अनेक विषय आहेत. जेव्हा जेव्हा मी कार्यालयात येतो, तेव्हा वयोमनाप्रमाणे मला ओला किंवा उबेरने यावे लागते. महिन्यातून वीस वेळा आलो तर पंधरा-सोळा वेळेस मला जे ड्रायव्हर भेटतात, ते सर्व अमराठी असतात. त्यातही अहमद, महम्मद, याकूब, अक्रम या ड्रायव्हरांची संख्या सर्वाधिक असते. यातून बहुतेक ड्रायव्हर बिहारमधून आलेले आहेत. चुकून मराठी माणूस भेटतो, जसा आज म्हणजे 22 तारखेला भेटला, तेव्हा बरं वाटतं. राजनेत्यांना ही वस्तूस्थिती दिसत नाही का? उपनगरात रिक्षा हे वाहन अनिवार्य झालेले आहे. तेथेही हीच रड आहे. रिक्षा ड्रायव्हर याकूब, महम्मद, मिश्रा, यादव भेटेल, परंतु पवार, जोशी, कांबळे, गायकवाड भेटणार नाही. अल्पशिक्षित मराठी तरूणांसाठी रोजगारच्या या सर्वोत्तम संधी आहेत. त्या तरूणाची माथी भडकवून पोटापाण्याच्या विषयापासून तोडफोडीच्या मार्गाने घेऊन जाणारे राजकारण महाराष्ट्राला घातक आहे.
तंंत्रज्ञानाची प्रगती अफाट आहे आणि नवीन तंत्रज्ञान शिकल्याशिवाय नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात टिकून राहणे अशक्य आहे. हे नवीन तंत्रज्ञान शिकावं लागतं. त्या शिक्षणासाठी पैसा खर्च करावा लागतो. आर्टिफिशयल इंटिलेजन्स, अॅनिमेशन, ग्राफिक्स, वगैरे सर्व तंत्रज्ञान कष्टसाध्य आहे. ते शिकल्याशिवाय मराठी तरूण उद्योग व्यवसायात टिकू शकणार नाही. त्याला या दृष्टीने सक्षम करण्याचा कार्यक्रम कोणता? तोडफोड आणि दगड मारणे हा सोपा कार्यक्रम झाला. तोडफोडीची वाट तुरूंगात नेणारी असते आणि आधुनिक शिक्षण घेण्याची वाट उत्तम घरात घेऊन जाण्याची असते.
मुंबईतील कारखाने आणि गिरण्या संपल्या, त्या जागी नवीन व्यवसाय केंद्रे उभी राहिली आहेत. गगनचुंबी निवासी संकुल उभे राहिले आहेत. काय नाव असतात, या निवासी संकुलाची? मार्वेला, रोडाज् इनक्लेव्ह, व्हिस्टा, पॅरोनोमा, बोलेवाड, ज्याचे अर्थ माझ्यासारख्या मराठी शाळेत शिकणार्याला समजत नाहीत. इमारतींना मराठी नावे देता येत नाहीत का? अप्रतिम संस्कृत नावे आहेत, ती का दिली जात नाही. ती देण्यासाठी आंदोलन का केली जात नाही? नावांना काळे का फासले जात नाही? तेव्हा मराठी अस्मिता कुठे गेलेली असते?
या सर्व संकुलात कोण राहतात? राजनेत्यांनी त्याचा सर्व्हे करावा. घोडबंदरच्या हिरानंदानी संकुलात सर्व्हे केला तर हजार कुटुंब असतील तर त्यातील 50 कुटुंब मराठी निघाली तरी खूप झाली. मराठी माणूस या संकुलातील जागा विकत घेऊ शकत नाही. दोन ते चार कोटी रूपये उभे करण्याची त्याची शक्ती नसते. त्याला शक्तिहिन कोणी केले? त्याला शक्तिहिन करण्याचे काम मराठी अस्मितेचा गळा काढणार्यांनीच केले आहे. राजकारणासाठी त्यांचा वापर करायचा, वापर करून सत्तास्थानी जायचे, सत्तेचे सगळे भोग भोगायचे, सत्तेचा मलिदा काही लोकांना देऊन त्यांना आपल्या काबूत ठेवायचे, आणि सर्वसामान्य माणसाला झुलवत ठेवायचे.
जनता जनार्दनाने आता डोळ्यात अंजन घालून जागे झाले पाहिजे. मराठीपणाचा अभिमान अजिबात सोडता कामा नये. मराठी अस्मिता जपूनच ठेवली पाहिजे, पण ही मराठी अस्मिता वडापाव विकण्यात नाही. थोडं इतिहासात डोकावून पाहिले तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात हिमालयाची शिखरे ठरावीत अशी माणसे मराठी मातीने निर्माण केली आहेत. सिनेगायकीत लता मंगेशकर, भावगायकीत सुधीर फडके, क्रिकेटमध्ये गावस्कर आणि तेंडुलकर, उद्योगक्षेत्रात किर्लोस्कर आणि गरवारे, नाटकाच्या क्षेत्रात आचार्य अत्रे, शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात पा. वा. काणे, आचार्य विनोबा भावे, ज्ञानाच्या क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. प्रभाकर मांडे, नरहर कुरूंदकर अशी किती नावे घ्यावीत. आम्हाला उत्तुंग शिखर गाठायचं आहे. आणि आजच्या काळाचा विचार करता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, दळवळणाच्या क्षेत्रात, उद्योग व्यापार्याच्या क्षेत्रात मराठी माणसाला पुढे जायचे आहे, तो ध्येयवाद सोडून त्याच्या हातात भिकेचे वाडगे देणे हा छत्रपती शिवरायांचाच अपमान आहे.