मधमाशीपालन व्यवसाय शाश्वत शेतीचा राजमार्ग

विवेक मराठी    17-May-2025
Total Views |
डॉ. क. कृ. क्षीरसागर
9422080865
 
vivek
20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा करण्यासाठी मान्यता दिली. म्हणूनच मधमाशी दिनाचा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता त्याचे नियोजन दीर्घकाळ व सातत्याने केले पाहिजे. त्यासाठी मधमाशापालन व्यवसाय, मधुपर्यटनासाठी मधमाशांचे गाव, मधमाशी उद्यान आदी उपक्रमांतून शाश्वत शेतीचा विकास साधता येईल.
रोज आपल्या ताटात अन्न येतं, त्यापैकी ऐंशी टक्के अन्नाची निर्मिती मधमाशा करतात. मधमाशा आणि तत्सम अन्य प्राणी त्यांच्या परागीकरण सेवेमुळेच पिके, फळे आणि भाज्यांचे उत्पादन होते. हे आपणांस सर्वज्ञात आहे. त्यांनी या मध्यस्थीतून निर्माण होणारे विविध उत्पादन अनेक पटींनी तर वाढतेच. परंतु त्याची गुणवत्ताही सुधारते, पौष्टिक गुणधर्म वाढतात. अशा या दातृत्ववान मधमाशांचे स्मरण करण्यासाठी ’फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर’ (FAO) या जागतिक संस्थेने आणि संयुक्त राष्ट्रांनी 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा करण्यासाठी मान्यता दिली. 2017 साली ’फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर’च्या 40व्या अधिवेशनात ’रिपब्लिक ऑफ स्लोवेनिया’ने हा प्रस्ताव सादर केला होता. त्याला ’एपिमोंडिया’ म्हणजे 'International Federation of Beekeepers' Associations' या जगमान्य संस्थेने भक्कम पाठिंबा दिला. 2017 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आपल्या सर्वसाधारण सभेत या मागणीला एकमताने मान्यता दिली. त्यानुसार पहिला जागतिक मधमाशी दिन 20 मे 2018 रोजी जगभर साजरा झाला.
 
नमस्कार सुहृदहो !
 
 
या मागचा घटनाक्रम लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल. 20 मे 1734 या दिवशी स्लोवेनिआमधील ब्रेझनिका येथे मधमाशापालन व्यवसायाचा आद्यप्रणेता अँतोन जान्सा याचा जन्म झाला. व्यवसायाने शेती करू लागलेल्या अँतोनने जगातील पहिल्या मधमाशापालन तंत्रज्ञान शिकविणार्‍या विद्यालयाची स्थापना केली. युरोपमधील शेतकरी आणि युवकांना त्यामुळे रोजगाराची संधी तर मिळालीच, परंतु कृषिउत्पादन वाढविण्याचे कौशल्य प्राप्त झाले. अँतोन जान्साने 'Disussion On Beekeeping' हे जर्मन भाषेतील मधमाशाविषयक जगातील पहिले पुस्तक प्रसिद्ध केले. त्यामुळे मधमाशापालन व्यवसायाची शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानावर आधारित अशी पायाभरणी झाली. पुढे हा व्यवसाय अन्य देशांमध्ये लोकप्रिय होत गेला.
 
vivek 
 
भारताला मधमाशा, मध व मधमाशांचे मोहोळ याची माहिती प्राचीन काळापासून होती, हे संस्कृत साहित्य ग्रंथातून आणि पुरातत्त्वशास्त्राच्या आधारे सांगता येते, पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर होण्यासाठी विसावं शतक उजाडावे लागले. तरीसुद्धा आता भारताने केंद्रीय मधमाशा संशोधन संस्थेच्या आणि देशभर विखुरलेल्या कृषी महाविद्यालये व विद्यापीठे त्याप्रमाणे काही ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या व्यक्तिगत प्रयत्नातून या व्यवस्थेची सुरुवात केली आणि इतर देशांशी बरोबरी गाठली. मध व मेणाची निर्यात मोठ्या प्रमाणात आपण करू शकलो. भारतातील व अन्य विकसनशील देशातील युवकांना प्रशिक्षण करण्याच्या अनेक योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठे श्रेय द्यायला पाहिजे. यामुळेच भारतातसुद्धा देशभर 20 मे हा जागतिक मधमाशी दिन मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यामध्ये राष्ट्रपती भवन, राजभवन, शासकीय कृषी आस्थापना व तत्सम अन्य संस्था शैक्षणिक संस्थांचा सहभाग असतो. दरवर्षी साजर्‍या होणार्‍या या दिनासाठी संयुक्त राष्ट्र एक निवडक विषय अधोरेखित करीत असते. त्याचा उद्देश असतो जनप्रबोधन आणि ज्ञानजागृती करण्याचा.
 
 
2025 सालचा विषय मूळ इंग्रजीत आहे तो म्हणजे, 'Bee Inspired By Nature To Nourish Us All' या विषयातून मधमाशीची अत्यंत महत्त्वाची भूमिका स्पष्ट होते. ती म्हणजे कृषिउत्पादित अन्नाचा आरोग्याशी व पर्यावरणाशी असलेला निकटचा संबंध प्रस्थापित करण्याची. हे संबंध शाश्वत स्वरूपात टिकविण्यात मधमाशांची मध्यस्थी अतुलनीय ठरते. मधमाशांच्या व तत्सम अन्य जैविक घटकांच्या परागीकरण सेवेची महती स्पष्ट होते. म्हणूनच या सर्व घटकांचे संरक्षण व संवर्धन ही जबाबदारी आपल्यावर येते. शेतकरी आणि फळबागायतदार यांनी कृषी शाश्वत स्वरूपात टिकून राहील असे तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब कटाक्षाने करायला हवा. आपल्या अनुभवाला येतंय की, परागीकरण सेवा देणारे जैविक घटक विनाशाच्या वाटेवर आहेत. त्याला माणूस मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. जागतिक हवामानातील धोक्याचे बदल आणि सर्व प्रकारचे प्रदूषण माणसामुळे वाढीला लागले आहे. ते थांबविण्यासाठी माणसाने आपले वर्तन विचारपूर्वक बदलले पाहिजे.
 
vivek 
जागतिक मधमाशी दिन साजरा करताना आपण स्वतः तर याबाबतीत शिकत राहिले पाहिजे, शिवाय शेतकरी व जनसामान्यांचे प्रबोधनही केले पाहिजे. मधमाशीपालक म्हणजेच मधपाळ, परागीकरण शास्त्राचे अभ्यासक व तज्ज्ञ, संशोधक, देशाचे धोरण ठरविणारे प्रशासक, वनवासी जमाती, उद्योगजगतात काम करणारे, उद्योजक व कामगार, समाजसेवी संस्था या सर्व घटकाचे सक्रीय सहकार्य महत्त्वाचे ठरते, म्हणूनच मधमाशी दिनाचा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता त्याचे नियोजन दीर्घकाळ व सातत्याने केले पाहिजे. त्यासाठी मधमाशीपालन व्यवसाय, मधपाळ, मधमाशा, मधमाशांना उपयुक्त वनस्पतीचे रक्षण व संवर्धन, पूरक जंगल व्यवस्थापन, उपयुक्त कृषी तंत्रज्ञान व कृषी व्यवस्थापन पद्धती याबाबतीत सातत्याने प्रबोधन व प्रशिक्षणाची गरज आहे. यासाठीच व्यवहार्य ठरणारा उपक्रम म्हणजे मधुपर्यटन, कृषी पर्यटनामुळे शेती व्यवसायाचा परिचय होऊ शकतो. त्याचप्रमाणे मधुपर्यटनांमुळे मधमाशापालनाचा सखोल परिचय होईल. मधुपर्यटनासाठी मधमाशांचे गाव, मधमाशी उद्यान, प्रदर्शन असे उपक्रम निश्चित करावे लागतील.
 
 
महाबळेश्वरजवळील ’मांघर’ या गावाचा विकास ’मधमाशांचे गाव’ म्हणून शासनाने केला आहे. येथील प्रत्येक घरातील सर्व कुटुंब या ना त्या पद्धतीने मधमाशापालन व्यवसायाशी जोडले गेले आहेत. त्यातून रोजगाराची शाश्वती उपलब्ध झाली आहे. पर्यटकाचे ते एक आकर्षण ठरले आहे. त्यांचे आदरातिथ्य करण्याची वा त्यांच्या निवासाची घरोघरी सोय करण्याची संधी ग्रामस्थांना मिळत आहे. त्यामुळे गावकर्‍यांच्या अर्थार्जनात भर पडत आहे.
 
vivek 
याचप्रमाणे नाशिकजवळ ’पिंपळगाव बसवंत’ येथे दोन एकर जमिनीवर केलेली मधमाशा उद्यानाची उभारणी यशस्वी ठरली आहे. याठिकाणी पर्यटकाची सतत गर्दी होत असते. या ठिकाणी मधमाशापालनाच्या विविध अंगाचा, मधमाशांच्या जीवनाचा, मधनिष्कासन तंत्राचा, मेणावरील प्रक्रियांचा, मधमाशांना उपयुक्त वनस्पतींचा त्यांच्या लागवडीचा परिचय करून दिला जातो. त्यासाठी माहितीपूर्ण चित्रफिती, सिनेमे यांचा उपयोग केला जातो. या विषयीची माहितीपुस्तके असलेले सुसज्य ग्रंथालय उपयुक्त ठरते. मार्गदर्शक व्याख्याने, विविध श्रेणीचे प्रशिक्षण वर्ग, स्पर्धा यांचा उपयोग केला जातो. मधापासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. मधविक्रीची व्यवस्था आहे. अशाप्रकारे हे मधुपर्यटन स्थळ जनसामान्यांचे एक आकर्षण स्थळ बनले आहे. महाराष्ट्रात अशा अनेक मधुपर्यटन स्थळांची गरज आहे.
 
 
इतर प्रगत देशांमधील मधुपर्यटन स्थळाचे जाळे पर्यटकांना सतत आकर्षित करीत असते. या विषयावर जागतिक कीर्तीच्या 'Journal of Apicultural Research' या संशोधन नियतकालिकात एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये मधुपर्यटनाच्या विस्ताराचा आणि उपयुक्ततेचा परामर्श घेतला आहे. त्या शोधनिबंधाचे शीर्षक आहे. 'Bee Tourism: Apiculture And Sustainable Development in Rural Areas' भारतालाही ग्रामीण विकासासाठी व रोजगार निर्मितीसाठी मधुपर्यटन विकसित करण्याची गरज आहे. शासकीय धोरण आखणार्‍यांनी या विषयावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. सुदैवाने पंतप्रधान मोदी यांनी मधमाशापालन व्यवसायचे महत्त्व ओळखले आहे आणि विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामध्ये ’मधुपर्यटन’ या विषयाचा समावेश करणे आवश्यक आहे.
- लेखक केंद्रीय मधमाशा संशोधन संस्था, पुणे
येथील वरिष्ठ संशोधन अधिकारी आहेत.