पहलगाम हिंदूंचे टार्गेटेड किलिंग

विवेक मराठी    02-May-2025
Total Views |
@रुपाली कुलकर्णी-भुसारी - 9922427596
 
 
Pahalgam
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी ‘टार्गेटेड किलिंग’ केले. हिंदू पर्यटकांना धर्म विचारून ठार केले. दी रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने त्याची जबाबदारी घेतली आहे. इस्लामिक दहशतवादाने काश्मिरी पंडितांचेसुद्धा शिरकाण केलेले आहे. ज्यूंप्रमाणेच हिंदू ठार मारले गेले आहेत. फक्त याची तीव्र जाणीव आता होते आहे. इस्लामी दहशतवाद, काश्मिरीयत, ज्यू आणि हिंदू टार्गेट, गाझा आणि काश्मीर यांचा उहापोह करणारा हा लेख.
 
एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा समुदायाला हेरून, नियोजित कट करून ठार मारणे म्हणजेच ‘टार्गेटेड किलिंग‘. याचा वापर कोण करत आहे त्यावरून त्याचे संदर्भ बदलू शकतात. काही वेळा दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी शासनाच्या बाहेरील व्यक्ती किंवा संस्था थेट कारवाई करते आणि अपेक्षित दहशतवाद्याला ठार केले जाते. याउलट, काही वेळा दहशतवादी संघटना विशिष्ट धर्माच्या व्यक्तीला किंवा समूहाला क्रूरपणे ठार करून दहशत माजवतात. ते सुद्धा टार्गेटेड किलिंग आहे. पहलगाम येथे हिंदूंना दहशतवाद्यांनी निवडून निवडून ठार केले या अनुषंगाने या लेखात ‘टार्गेटेड किलिंग’चे विवेचन केलेले आहे.
 
 या दहशतवादी हल्ल्यात नुसताच अंदाधुंद गोळीबार नव्हता हे लक्षात घेण्यासारखे आहे. बेसावध पर्यटकांना गाठून, त्यांचा धर्म विचारून जवळून गोळ्या घातलेल्या आहेत. स्थानिक व्यावसायिक, स्थानिक काश्मिरी इस्लामी नागरिकांना इजा होणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे. हे अत्यंत नियोजनबद्ध, अमानुष कृत्य आहे. नियोजनाशिवाय हे शक्य नाही आणि हे नियोजन अनेक पातळीवर झालेले दिसून येत आहे. 
 
आजपर्यंत मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया चालत असल्याचे आढळून येत होते. इराण-इराक, तुर्कस्थान, इस्रायल, इजिप्त तसेच इराक-सीरियाच्या सीमेवरील घटना यात ठळक होत्या. गेल्या वर्षी, बेसावध असणार्‍या इस्रायलींवर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने पुन्हा तेथील दाहक बातम्या आपल्यावर आदळू लागल्या होत्या. हमासचा हा हल्ला ‘टार्गेटेड किलिंग’चा प्रकार होता. वरकरणी आपल्यापासून लांब असणारा हा दहशतवाद 22 एप्रिलला पहलगाम येथे पोहचला आणि आपले बहरू लागलेले नंदनवन पुन्हा उद्ध्वस्त केले गेले. या दहशतवादी हल्ल्यात नुसताच अंदाधुंद गोळीबार नव्हता हे लक्षात घेण्यासारखे आहे. बेसावध पर्यटकांना गाठून, त्यांचा धर्म विचारून जवळून गोळ्या घातलेल्या आहेत. स्थानिक व्यावसायिक, स्थानिक काश्मिरी इस्लामी नागरिकांना इजा होणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे. हे अत्यंत नियोजनबद्ध, अमानुष कृत्य आहे. नियोजनाशिवाय हे शक्य नाही आणि हे नियोजन अनेक पातळीवर झालेले दिसून येत आहे.
 
 
हल्ला करणारे दहशतवादी केवळ गोळीबार करून क्षणात पळून गेले नाहीत, कारण त्यांच्यात विशिष्ट विचारसरणी - कट्टर इस्लामी मूलतत्त्ववाद - भिनवून, त्यांना त्यासाठी तयार करून पाठवलेले होते. ‘हिंदू व्यक्तीला निवडणे’ हे त्याला ठार मारण्याच्या आधी तपासणे ही प्रमुख अट त्यात होती. त्यासाठी ते थंड डोक्याने वावरत होते. नियोजनात पर्यटन स्थळ निश्चिती, अर्थातच आधी रेकी करून मगच केलेली असणार. दहशतवाद्यांनी ‘आत्मघातकी दहशतवाद’ हा मार्ग येथे निवडलेला नाही हे लक्षात घ्यायला हवेे. कारण तसे केले असते तर स्थानिक काश्मीरी जे इस्लाम धर्माचे आहेत ते सुद्धा ठार झाले असते. यावरून या दहशतवाद्यांच्या मानसिकतेचा अंदाज येतो. त्यांना हिंदूंची निवड करूनच त्यांना मारायचे होते! यातून हिंदूंच्या मनात दहशत उत्पन्न करायची होती.
 

pahalgam 
 
या प्रकारे हिंदू बहुसंख्य असणार्‍या भारतात येऊन, हिंदू पर्यटकांना निवडून त्यांना आपल्याच देशाच्या भूमीवर निर्घृणपणे मारले गेले आहे.
 
नमस्कार सुहृदहो !
 
अशा घटना आजवर इस्रायली भूमीवर ज्यूंच्या बाबतीत घडल्याचा इतिहास आहे. ज्यू लोकांना केवळ इस्रायलमध्येच नाही तर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पॅलेस्टिनी दहशतवादी ठार मारतात ही वस्तुस्थिती आहे. ‘टार्गेटेड किलिंग’ हे विशिष्ट विचारधारेचा परिणाम असते. म्हणूनच, पहलगाम हल्ला ही आपल्या समस्त हिंदूंसाठी धोक्याची पूर्वसूचना आहे.
 
 
जागतिक इतिहासात डोकावतांना
 
प्रामुख्याने ज्यू लोक धर्माच्या कारणाखाली सगळ्यात जास्त बळी पडलेले आहेत. म्हणून त्यांचे उदाहरण विवेचनासाठी घेतले आहे.
 
 
इतिहासात डोकावले तर, दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हिटलरने होलोकॉस्ट घडवून लाखो ज्यू नागरिकांचे हत्याकांड केले होते. केवळ धर्म पाहून हे हत्याकांड झाले होते. हिटलरने नाझी वंशाच्या श्रेष्ठत्वाची विचारसरणी उचलून धरली होती. आर्य वंशाच्या श्रेष्ठत्वाचे तत्त्वज्ञान त्याने भिनवले होते. तसेच इतिहासात, इस्रायल-पॅलेस्टिनी वाद आणि त्यातून ज्यूंची हत्या या घटना आजही घडत आहेत. त्याची अनेक उदाहरणे आहेत. 1972 मध्ये जर्मनीच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये निरपराध इस्रायली खेळाडूंना आधी ओलीस धरून नंतर त्यांची हत्या केली गेली. तसेच ज्यू प्रवासी असणार्‍या विमानांचे अपहरण अनेक वेळा केले गेले आहे. अनेक वेळा इस्रायली सैनिकांची फसवणूक करून ठार केले गेले आहे. काही वेळा ज्यू नागरिकांनी भरलेल्या प्रवासी बसचे अपहरण केले गेले आहे.
 
 
याची अनेक उदाहरणे आहेत. पण महत्त्वाचे हे आहे की, त्याचा प्रतिशोध इस्रायलने प्रत्येक वेळी घेतलेला आहे. म्युनिक ऑलिम्पिक नंतर ‘ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड’ जवळजवळ वीस वर्षे इस्रायलने राबवले. या हत्याकांडात सहभागी असणारे आणि त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली होती, त्या सगळ्यांना त्या त्या देशात जाऊन, प्रसंगी त्यांच्या शयनगृहात घुसून इस्रायलने प्रतिशोध पूर्ण केला आहे.
 
दहशतवाद्यांना पुढील गोष्टी साधायच्या होत्या

* आपल्याच देशात हिंदू सुरक्षित नाहीत हे ठसवणे. ते सॉफ्ट टार्गेट आहेत हे सिद्ध करणे.
 
* पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्णयाला अपयशी ठरवणे. त्यांच्यावरील सामान्य जनतेचा विश्वास उडवणे.
 
* कलम 370 रद्द केल्यावरसुद्धा काश्मीरची परिस्थिती नियंत्रणाखाली नाही हे पटवून देणे.
 
* स्थानिक काश्मिरी जनतेला आर्थिक फटका बसल्यावर त्यांचा केंद्र सरकारवर राग निघणे.
 
* हिंदुत्वाला मानणार्‍या मोदींच्या सरकारने हिंदूंनाच सुरक्षा देऊ न शकणे.
 
* काश्मीरच्या पर्यटनाला खीळ बसवून, स्थानिक रोजगाराला बुडवणे.
 
* सामाजिक, राजकीय, धार्मिक, मानसिक स्तरावर अस्थैर्य निर्माण करणे.
 
* भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्ववादी सरकार इस्लामद्वेष्टे आहे असा आभास जागतिक स्तरावर निर्माण करणे.
 
* काश्मिरीयत आजपर्यंत जपलेली एक ओळख होती, पण आता इस्लामचेच राज्य सर्वत्र राहील याची झलक दाखवणे.
 
 
 
इस्रायली प्रवासी असणार्‍या विमानाचे अपहरण झाल्यावर 1976 मध्ये युगांडाच्या एन्टेबी विमानतळावर छापा मारून धडक कारवाई करून इस्रायलने शंभरच्यावर प्रवाशांना सुखरूप परत आणले होते. 11 मार्च 1978ला इस्रायली प्रवासी बसचे अपहरण करून 38 ज्यूंना पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी - फतहने - ठार केले होते तेव्हा लगेच 15 मार्चला इस्रायलने लेबेनॉनवर हल्ला चढवला. ‘ऑपरेशन लिटीनी’ राबवले होते. दक्षिण लेबेनॉनमधील लिटीनी नदीपर्यंत धडक दिली होती.
 
 
अशी अनेक उदाहरणे इतिहासात आहेत.
 
ताजे उदाहरण म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 ला इस्रायलमध्ये संगीत महोत्सवाचा आनंद लुटणार्‍या निरपराध ज्यूंवर हमासने हल्ला चढवला. इस्रायलने लगेच प्रत्युत्तर देत गाझावर हल्ला चढवला. अजूनही हे युद्ध चालू आहे.
 
इस्रायलचे उदाहरण धर्मावर आधारित आहे. ज्याप्रमाणे यहुदी /ज्यू धर्माच्या नागरिकांना ठार केले गेले तसे आता भारतात पहलगाम येथे घडलेले आहे ही वस्तुस्थिती आहे. अर्थात, भारत आणि इस्त्रायल यात फरक आहे. धोरणात तर आहेच पण सामान्य जनतेच्या विचारसरणीत सुद्धा आहे.
 
 
इस्रायलमध्ये सर्व जनता एक होऊन एकत्र उभी राहते, पण भारतात तथाकथित पुरोगामी आणि अन्य विचारधारांचे, राजकीय पक्षांचेसुद्धा एकमत होऊ नये ही लाजिरवाणी बाब आहे. देशाच्या शत्रूच्या विरोधात लढतांना आधी समाजात एकी असली पाहिजे.
 
हमास-पहलगाम संबंध
 
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये -पीओके - पहलगाम हल्ल्याच्या दोन महिने आधी हमासचे नेते आणि पाकिस्तान दहशतवादी गट यांची भेट झाली होती असा दावा भारतातील इस्रायली राजदूत रुवेन अझर यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इस्रायलच्या संगीत महोत्सवावरचा हल्ला 7 ऑक्टोबर 2023 आणि पहलगामवरील हल्ला (22 एप्रिल 2025) यात साम्य आहे. बेसावध पर्यटकांना यात ठार केले गेले आहे. हमासचा प्रवक्ता खालीद क्वादौमी आणि नाजी झहीर, मुफ्ती आझम आणि बिलाल अलसल्लात हे रावळकोट येथे 5 फेब्रुवारी 2025 ला एका रॅलीत सहभागी झाले होते. ‘काश्मीर सोलीडॅरीटी आणि हमार(स) ऑपरेशन अल अक्सा फ्लड’ नावाची ही रॅली होती. या रॅलीत पाकिस्तान, पॅलेस्टाइन आणि हमासचे ध्वज होते. पाकिस्तानचा काश्मीरमधील हस्तक्षेप आणि हमासचा इस्रायलविरुद्ध चाललेला संघर्ष याला जोडण्याचा हा प्रयत्न आहे. हा जाणीवपूर्वक पाकिस्तानी जिहादी गटाने घडवून आणलेला आहे. गाझा आणि काश्मीर यांची तुलना करून आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इतकेच नाही तर 2023 च्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर बरेच वेळा हमासच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानला सुद्धा भेटी दिल्या आहेत. हमासने जैश -ए-मुहंमदच्या बहावलपूरच्या मुख्यालयाला सुद्धा भेटी दिल्या आहेत. भारताने कलम 370 रद्द केल्यानंतरच्या या घडामोडी आहेत हे विशेष. शिवाय 2023 मध्ये इस्रायलने पाकिस्तानातून सक्रीय असणार्‍या लष्कर -ए- तैयबा या दहशतवादी संघटनेला अनधिकृत घोषित केले आहे. लष्कर -ए- तैयबाने 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबई येथे दहशतवादी हल्ला चढवला होता. एकूणच दहशतवादी संघटना आपापसात हातमिळवणी करीत आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि इस्रायल सहकार्य दृढ होणे आवश्यक आहे.
 
काश्मिरीयत-हिंदू टार्गेट
 
काश्मीरला आपल्या ‘काश्मिरीयत’चा अभिमान आहे. ती त्यांची ओळख आहे. त्यांची संस्कृती आहे. काश्मिरीयत ही खानदानी काश्मिरी मुस्लीम माणसाची अदब आहे. ती तेथील हिंदूचीसुद्धा शान होती. आम्ही केवळ इस्लामी नाही तर काश्मिरी आहोत हे ठासून सांगणारी त्यांची ‘आयडेंटीटी’ होती. जगातील सगळ्या इस्लामी लोकांपेक्षा काश्मिरी इस्लामी संस्कृती वेगळी आहे हे त्यातून दर्शवले जात होते. वेशभूषा, खानपान अगदी एकत्र बसून रोजचा चहा पिण्यातसुद्धा एक अदब यात होती.
 
 
पण आता ही काश्मिरीयत कट्टर इस्लामने गोठवून टाकली. इस्लाम ही ‘नया काश्मीर’ची ओळख राहील हे जणू दहशतवाद्यांना ठसवायचे आहे.
 
 
टार्गेटेड किलिंगमध्ये पूर्वी अनेक हल्ल्यात हिंदूंना ठार केले गेले आहे. काश्मीरमध्ये पहलगामच्या आधी सुद्धा हिंदूंना निवडून ठार केले गेले होते. 1989 -90 च्या काळातील काश्मिरी हिंदूंचे हत्याकांड केले गेले. ते हिंदू धर्माचे होते म्हणून त्यांना हे सर्व सोसावे लागले. मध्यंतरी, काही काश्मिरी हिंदूंना परत काश्मीरमध्ये वसवण्यात आले होते तेव्हासुद्धा त्यांच्यावर हल्ले झाले. नुकतेच 2022 मध्ये रजनी बाला या हिंदू शिक्षिकेला गोपालपूरच्या शाळेत घुसून ठार करण्यात आले होते. अशी अनेक उदाहरणे आहेत.
 
 
पण तरीही पहलगामचा हा हल्ला जास्त दाहक आहे कारण यात एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा हेतू होता.
 
एकूणच काश्मीरला सुरक्षित ठेवून विकासाची वाटचाल होऊ शकत नाही हे संपूर्ण देशाच्या आणि काश्मिरी जनतेच्या मनावर बिंबवणे हा दहशतवाद्यांचा हेतू आहे. कारण त्यांना आंतरराष्ट्रीय मदत असून काश्मीरचा प्रश्न सुटू द्यायचा नाही. मात्र हे दहशतवादी आपले हेतू साधण्यात यशस्वी होणार नाहीत, हीच अपेक्षा आहे.
 
 
हिंदूंची हत्या काश्मिरी भूमीवर आधीही झाली आणि आता सुद्धा झाली आहे. काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत याचे गांभीर्य सामान्य जनता म्हणून आपल्याला ओळखता येणे गरजेचे आहे. कारण ‘टार्गेट’ काश्मीरच्या पहलगाममध्ये गाठलेले असले तरी दहशतवाद आणि फुटीरतेचे समर्थन करणारे देशभर, अगदी आपल्या भोवताली सुद्धा वावरत आहेत...!
 
लेखिका एकता मासिकाच्या संपादक आहेत.