पहलगाममध्ये गेलेल्या हिंदू पर्यटकांना नृशंसपणे ठार करण्यात आले. देशभर या घटनेच्या प्रतिक्रिया शोक आणि प्रतिशोध घेण्यापर्यंत पोहचल्या. भारत सरकारनेही नागरिकांप्रती दुःख व्यक्त करून पाकिस्तानविरूद्ध कठोर भूमिका घेतल्या. त्यातीलच एक निर्णय म्हणजे सिंधु नदीच्या पाण्याचा करार स्थगित करण्यात आला. कोणतेही पारंपरिक शस्त्र न वापरता ‘सिंधु शस्त्र’ वापरल्यामुळे भारताच्या या दुधारी शस्त्राने पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली आहे.
पहलगामच्या बैसरन भागात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांना ठार केल्यावर उमटलेली भारताची प्रतिक्रिया पाहून पाकिस्तानी मंत्र्यांची घाबरगुंडी उडालेली आहे. इतके की, प्रत्येकजण वेगवेगळ्या भाषेत बोलतो आहे. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आहेत, संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ आहेत, उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इसहाक दर आहेत आणि या सर्वांच्या पुढे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनिर हे आहेत आणि सगळे मिळून पळा पळा कोण पुढे पळे तो, असे एकमेकांना म्हणून खुणावत आहेत. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत भारतीय उपखंडात काहीही घडलेले असेल. पाकिस्तानचे संरक्षणमंत्रीपद सांभाळणार्या व्यक्तीने सांगितले की, पाकिस्तान सर्वप्रथम हल्ला करणार नाही, पण भारताने केला तर त्यास प्रत्युत्तर देऊ. येत्या दोन दिवसात भारताकडून पाकिस्तानवर आक्रमण केले जाईल, असेही ते एका वाहिनीला मुलाखत देताना म्हणाले आणि मग त्यांनी आपली मुलाखत घेणार्या वाहिनीवर आरोप केला की, त्यांनी आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला. पहलगाममध्ये पर्यटकांना नृशंसपणे ठार करणार्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेने आधी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि नंतर आपला हात त्यात नव्हता हे जाहीर केले. तेही पाकिस्तानच्या या संरक्षणमंत्र्यांनीच जाहीरपणे सांगितले. त्यांनी जे काही सांगितले ते या मंत्र्यांना आधीच कसे कळले? यातल्या प्रत्येकाचेच या दहशतवादी संघटनांबरोबर इतके घनिष्ट संबंध आहेत की, ते सगळेच त्यांचे प्रवक्ते बनतात. याच मुलाखतीत त्यांनी भारताकडून आक्रमण झाले तर मग आम्हीसुद्धा तयारी केलेली आहे, असे सांगितले. समा टीव्हीला मुलाखत देताना त्यांनी एक, दोन, तीन किंवा चार दिवसात पाकिस्तानला युद्धाला सामोरे जावे लागेल, असे भाकित केले आणि आपली त्यासाठी मानसिक तयारी असायला हवी, असे सांगितले. जिओ टीव्हीशी बोलताना मात्र त्यांनी हे उलटेपालटे करून सांगितले. त्यांची ही मुलाखत दाखवून झाल्यावर आपण भारताचा पाकिस्तानवर हल्ला अपरिहार्य आहे असे म्हटलेलेच नव्हते, असा खुलासा केला. भारताची अपरिहार्यता पाकिस्तानी मंत्री सांगतो आणि तरीही तो मंत्रिमंडळात पद टिकवून असतो, ही त्यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाची किमया म्हणावी लागेल. ते त्या पक्षाचे आहेत आणि तिकडे त्या पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो त्यांच्याही पुढे दोन पावले जाऊन भारताला धमकावून बसले आहेत.
पहलगाममध्ये जे काही घडले ते अतिशय हिंस्र आणि घृणास्पद होते, असे म्हणून पाकिस्तान्यांनी आम्ही तातडीने या हल्ल्यात सहभागी असल्याच्या संशय असलेल्यांवर कारवाई करत आहोत, असे म्हणून कारवाईला प्रारंभ केला असता तर त्या देशाला जनाची नाही तर मनाची थोडी तरी चाड आहे, असे म्हणता आले असते. पण जे आपल्या मनात येते ते त्यांच्या स्वप्नातसुद्धा येत नाही. कसे येणार? याच वातावरणात तर त्यांची वाढ झालेली आहे. खरोखरच त्यांनी असे आत्मपरिक्षण केले असते तर मग कदाचित भारतानेही ते काय करतात याची वाट पाहिली असती, पण तसे घडणे अवघड आहे. इसहाक दर यांनी पहलगाममध्ये हल्ला करणार्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून गौरवले तर ख्वाजा असिफ यांनी ‘दहशतवाद्यांना अशा पद्धतीने पोसण्याचे आणि त्यांना भारताविरूद्ध वापरण्याचे काम आम्ही गेली तीस वर्षे करतो आहोत आणि तेही आम्ही अमेरिकेच्या सांगण्यावरून करतो आहोत’, असे सांगितले. ख्वाजा असिफ यांच्या पक्षाचे नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे तिकडे सक्करमध्ये, ‘याच सिंधु नदीच्या किनार्यावर उभे राहून पाकिस्तानी जनतेला भिववत होते, की या सिंधु नदीतून एकतर पाणी वाहील किंवा भारतीयांचे रक्त वाहील.’ इथे त्यांना माहिती नसलेल्या एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा आणि तो म्हणजे याच सक्करच्या सिंधु नदीवर एका गोखल्यांनी 1923 मध्ये दुमजली बंधारा (धरण) बांधून सिंधच्या खोर्याची तहान भागवली. सांगायचा मुद्दा तो नाही, पण याच ठिकाणी उभे राहून बिलावल आपल्या आजोबांची-झुल्फिकार अली भुट्टोंची द्वेषाची गादी चालवत होते.
बिलावल भुट्टो यांना त्याबद्दल ‘मुस्लीम इत्तेहादुल मुसलमीन’ या पक्षाचे खासदार असाउद्दिन ओवेसी यांनी जबरदस्त तडाखा दिला आहे. ते म्हणाले की, बिलावल यांनी आपल्या आईला (बेनजीर) ठार करणारे कोण होते ते लक्षात घेतले पाहिजे. आपल्या आजोबांना (झुल्फिकार अली भुट्टो) फासावर चढवणारे कोण होते हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यांना या दोघांनाही पाकिस्तानी लष्कराने मारले हे सांगायचे आहे.. झुल्फिकार अली भुट्टोंनी भारताचे हजार तुकडे करू आणि भारताला रक्तबंबाळ करू, असे म्हटलेले होते. बिलावल यांनी अशा तर्हेचा आक्रस्ताळेपणा करून आपल्या अकलेचे दिवाळे काढले आहे. इसहाक दर यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांची री ओढली. आग्रा शिखर परिषदेच्या वेळी परदेशी पत्रकारांपुढे बोलताना एका देशाचे दहशतवादी दुसर्या देशाचे स्वातंत्र्यसैनिक असू शकतात, असे विधान केले होते. तेव्हा त्यांना ‘भारताचे दहशतवादी आमचे स्वातंत्र्यसैनिक आणि आमचे स्वातंत्र्यसैनिक तुमचे दहशतवादी असू शकतात, असे त्यांनी तेव्हा स्पष्ट केले होते. हेच पालुपद दर यांनी आळवले आहे. हे सर्व त्यांना फुटलेल्या घामाचे द्योतक मानावे लागेल.
TRF संघटनेने पहलाग हल्ल्याची जबाबदारी घेऊन नंतर घुमजाव केला
पहलगाममध्ये ज्यांनी हे हत्याकांड धर्म विचारून केले त्यांचा सूत्रधार कोण हेही आता स्पष्ट झाले आहे. हशिम मुसा हा लष्कर ए तैयबाचा पॅरा कमांडो होता आणि त्याने पाकिस्तानच्या ‘आयएसआय’कडून प्रशिक्षण घेतले असल्याचे उघड झाले आहे. हा हशिम मुसा लेख लिहिपर्यंत सापडलेला नव्हता, कदाचित आणखी काही दिवसात तो सापडेल. त्याच्यावर आणि अन्य तिघांवर प्रत्येकी वीस लाख रुपयांचे पारितोषिक लावलेले आहे. ते सगळेच्या सगळे सापडले तर बरेच काही बाहेर येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी नेते आता जगभर आम्हाला वाचवा, आमच्याकडे भारताला तोंड देता येईल इतके पैसेही नाहीत हो, असे सांगत फिरू लागले आहेत. चीन कदाचित त्यांच्या मदतीला येईल, पण तोही आपला त्यात फायदा काय आहे हे शोधून पावले टाकील हे उघड आहे. त्यांच्या बाजूने सध्या तरी तुर्कस्तान दिसतो आहे, बाकी सगळीकडे न बोलून शहाणपण आहे.
भारताने सिंधु नदीच्या पाण्याचा करार स्थगित ठेवल्यावर पाकिस्तानच्या पोटात गोळा आला नसता तरच नवल. भारताने तो रद्द केलेला नाही. या पाण्याचे अनेक पैलू आता उजेडात येऊ लागलेले आहेत. म्हणूनच असेल, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपले बंधु आणि सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारताला अंगावर घेऊ नका, त्याने पाकिस्तानची हालत आणखी खराब होईल, असे बजावल्याचे प्रसिद्ध झाले आहे. ते जरा तारतम्याला धरून आहे. कारगिलच्या वेळचा अनुभव गाठीस असलेले नवाझ जेव्हा हे सांगतात तेव्हा त्यांचा सर्व रोख आताच्या पाकिस्तानी लष्करावर आणि बाष्कळ बडबड करणारे त्यांचे लष्करप्रमुख असीम मुनिर यांच्याकडे आहे हे लगेच लक्षात येते. मुनिर यांनी अनिवासी पाकिस्तान्यांसमोर बोलताना बरेच तारे तोडले. त्यांच्याइतका मूर्खपणा आजवर कोणत्याच पाकिस्तानी लष्करप्रमुखाने केलेला नाही, हेही तितकेच खरे आहे. जनरल मुशर्रफ, जनरल अश्फाक परवेझ कयानी, राहिल शरीफ, कंवर जावेद बाज्वा झाले, यापैकी कोणीही धर्माच्या आधारे हिंदूंवर असे बेभान होऊन तुटून पडले नाहीत. खुद्द पाकिस्तानचे संस्थापक महमद अली जिना यांनी धर्माच्या आधारे आणि द्विराष्ट्र सिद्धांताच्या आधारावर स्वतंत्र देश स्थापन केला त्यांनीही आपल्या घटना परिषदेत पाकिस्तानच्या निर्मितीदिनाच्या आधी तीन दिवस बोलताना धर्माच्या आधारावर कोणताही भेदाभेद पाकिस्तानात केला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते, पण त्यानंतर पाकिस्तानमध्ये धर्माच्याच आधारे सर्व छळवणूक करण्यात येत राहिली हा भाग निराळा. जनरल असिम मुनिर बोलले आणि त्यानंतर लगेचच पहलगाममध्ये हिंदूंवर हल्ला झाला आणि प्रत्येक पर्यटकाला त्याचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या हा काही योगायोग नाही. हे निर्घृण हत्याकांड झाले आणि त्यानंतरच आता त्याचे पडसाद सर्व जगभर उमटू लागले आहेत. भारतीय उपखंडात तर ते अधिक जाणवणार आहेत.
भारताने सिंधु नदीच्या पाण्याविषयीचा करार स्थगित ठेवतो आहोत, असे म्हटल्याने पाकिस्तान्यांचा नुसता थयथयाट चालू झाला आहे. भारताच्या या करारस्थगितीला उत्तर म्हणून पाकिस्तानने भारताबरोबरचे काही करार स्थगित ठेवलेले आहेत. ‘द्विपक्षीय करार झाले आणि आता मोडले’ अशा अर्थाचा एक लेख पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. त्यात या करारांचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यातला पहिला करार हा नेहरू आणि लियाकत अली यांच्यात झालेला आहे. 1950 च्या एप्रिल महिन्यात झालेल्या या करारात दोन्ही देशातल्या अल्पसंख्य समाजाचे संरक्षण त्या त्या देशाने आवर्जून केले पाहिजे, असे म्हटलेले आहे. या कराराची वाट 1947 पासून पाकिस्तानने कशी लावलेली आहे ते सगळ्यांना माहिती आहेच. आता पाकिस्तानात जो हिंदू उरलेला आहे, तो अक्षरश: यांची घाण उचलण्यासाठी राहिलेला आहे. यातल्या काहींशी तर मी माझ्या प्रत्येक वेळच्या पाकिस्तान भेटीत बोलून आलेलो आहे. या करारात कोणाही अल्पसंख्य व्यक्तीला त्यांच्या त्यांच्या देशात मोकळेपणाने हिंडता फिरता येईल आणि नोकर्यांमध्ये त्यांच्याविषयीचा भेदभाव केला जाणार नाही, असे आश्वासन आहे. भारतात कोणाही अल्पसंख्य व्यक्तीला त्याची पात्रता असेल तर उच्च पदांवर जाण्यास प्रतिबंध नाही, पण पाकिस्तानात काय आहे? अल्पसंख्याकांविषयीचा हा करार स्थगित ठेवून ते असीम मुनिर जे म्हणाले तेच प्रत्यक्षात आणणार आहेत. यापुढल्या काळात या उरलेल्या अल्पसंख्याकांचे काही खरे नाही, अशी अवस्था होऊ शकते. आतापुरते बोलायचे तर पाकिस्तान स्थापन झाला तेव्हा असलेला 25 टक्के हिंदू समाज आता 2 टक्क्यांच्या घरात आला आहे. डॉनने म्हटले आहे की, फाळणीनंतर दोन्ही देशांमध्ये जे दंगे झाले ते लक्षात घेऊन हा करार करण्यास भारत आणि पाकिस्तान यांचे नेतृत्व तयार झाले, पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे करारापर्यंतच्या काळात पाकिस्तानात किती लोकांना यमसदनास पाठवण्यात आले, किती जणांना बाटवले गेले आणि किती जणींवर अत्याचार झाले आणि किती जणांना धमक्या देऊन त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या गेल्या, याला काहीच सीमा नव्हती. पाकिस्तान्यांपुढे हा आरसा धरला तर त्यांचा काळाठिक्कर पडलेला चेहराच फक्त पहायला मिळेल. हा आरसा प्रथम मुनिर यांच्यापुढे धरण्याची आवश्यकता आहे.
1950 ते 1960 या दरम्यान कोणताही नवा करार झाला नाही, पण 1960 मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल आयुबखान यांच्यात जो करार झाला तो आताचा बहुचर्चित सिंधु पाणीवाटप करार. या करारावर सहा वर्षे चर्चा चालू होती आणि त्यानंतर हा करार झाला. या चर्चेतून पाकिस्तानने आपल्या वाट्याला बरेच पाणी ओढून घेतले. या कराराने पाकिस्तानला पश्चिमेच्या सिंधु, झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी आणि रावी, बियास आणि सतलज या पूर्वाभिमुखी नद्यांचे पाणी भारताला देण्याविषयीचे ठरले. डॉनने म्हटले आहे की, गेल्या पासष्ट वर्षात या पाणीवाटपाविषयी जे जे प्रश्न निर्माण झाले ते ते सगळे सिंधु पाणीवाटपविषयक आयोगाच्या माध्यमातून सोडवले गेले. मग आताच भारताला हा करार स्थगित ठेवून काय साध्य करायचे आहे? हा करार स्थगित ठेवता येऊ शकतो आणि पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवता येऊ शकते हेच भारताला दाखवून द्यायचे आहे. सिंधु, झेलम आणि चिनाब या नद्यांचे 80 टक्के पाणी पाकिस्तानला आणि उर्वरित 20 टक्के पाणी भारताला, असे करारात म्हटलेले आहे. मात्र पाकिस्तानच्या वाट्याला जाणार्या पाण्यातलाही काही हिस्सा भारताला मिळू शकतो. हे पाणी घरगुती उपयोगासाठी वापरता येणे शक्य आहे, असे करारातच नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या प्रकल्पांसाठी वापरल्या जाणार्या पाण्यातही काही हिस्सा भारताला वापरता येऊ शकतो. मात्र ते पाणी अडवता येणार नाही. आताही भारताकडून पाणी अडवले जाणार नाही, पण ते अन्यत्र वळवले जाणार आहे. हे पाणी राजस्थानपर्यंत जाऊन आपल्या उपयोगाच्या प्रकल्पांमध्ये ते वापरले जाऊ शकते, ही करारातच तरतूद आहे. त्याची तयारी भारताने 2016 पासूनच केलेली असल्याचे सांगण्यात येत आहे.
थोडक्यात तहान लागल्यावर पाणी खोदण्याचा प्रकार इथे केला गेलेला नाही. या प्रश्नावर पाकिस्तान जागतिक बँकेकडे गेल्यास या बँकेला मध्यस्थी करण्याचा आणि दोन्ही देशांना सल्ला देण्याचा अधिकार या करारात आहे, पण बँकेचा कोणताही निर्णय भारताने वा पाकिस्तानने मानायलाच हवा, असे या करारात म्हटलेले नाही. पाकिस्तान या विषयावर फक्त दमदाटी करू शकेल, पण पाणी हे शस्त्र म्हणून वापरता येऊ शकते हे त्या देशाला आता समजायला लागेल. जे आतापर्यंत घडले नाही ते घडवायचेच नाही, असे काही तेव्हा ठरलेले नव्हते. हे शस्त्रही दुधारी आहे. पूरसदृश परिस्थितीत सगळीकडे पाणीच पाणी असेल तेव्हा पळता भुई थोडी होण्याजोगी स्थिती निर्माण करता येईल. अशा वेळी पाकिस्तानी नेत्यांना आपण इतके दिवस जी शस्त्रास्त्रे वापरली त्यापेक्षा वेगळे हत्यार वापरून भारत आपल्याला गटांगळ्या खायला लावतो आहे, हेही दाखवून देता येईल. पहलगामला जाऊन तुम्ही विशिष्ट समुदायाला त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालत असाल तर मग आम्ही तुमच्या देशात न येताही आणि कोणतेही पारंपरिक शस्त्र न वापरताही तुम्हाला दे माय धरणी ठाय करू शकतो. तेव्हा मग रक्ताचे पाट वाहणार नाहीत, पण जे काही होईल ते तुमच्या आठवणीतून जाणारही नाही.
इतरही अनेक करार पाकिस्तानने स्थगित ठेवलेले आहेत. त्यात सिमला करार आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानचे तेव्हाचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात सिमला येथे करार झाला. तो करार पाकिस्तानने स्थगित ठेवल्याने एक मोठी सोयच पाकिस्तानने करून दिलेली आहे. या करारात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक नियंत्रण रेषा ठरविण्यात आली होती. तेव्हा जिथे युद्धबंदी झाली तीच नियंत्रण रेषा ठरली. आता ती नियंत्रण रेषा अस्तित्वहीन बनली आहे. याचा अर्थच ती आता ओलांडून पुढे जाता येणे शक्य होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी काश्मीरसह सर्व वादविषय आपापसात चर्चा करून सोडवावेत, असेही कलम त्यात आहे. आता चर्चाच नाही, तर मग प्रत्यक्ष हत्यार उचलूनही काही पावले टाकता येऊ शकतील. पाकिस्ताननेच कराराला स्थगिती देऊन ही मोठी सोय केली आहे. काय होते हे पुढल्या काही दिवसात स्पष्ट होईल.