संस्कार किती आणि कोणते?

विवेक मराठी    21-May-2025   
Total Views |

birthday
वेद, स्मृती, पुराण, धर्मसूत्र, गृह्यसूत्र आदि ग्रंथांमध्ये या संस्कारांची माहिती आली आहे. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये संस्कारांचा उल्लेख आला आहे, त्या संस्कारांच्या वेळी गावयाचे मंत्र सुद्धा आले आहेत, पण त्यामध्ये ‘संस्कार’ हा शब्द आला नाही. संस्कारांचे मूळ वेदांत असले तरी त्यात संस्कारांची यादी किंवा संस्कार करायची पद्धत येत नाही. मात्र नंतरच्या वेदांगातील - गृह्यसूत्र आणि धर्मसूत्रांनी; तसेच इतर स्मृतिग्रंथांनी संस्कारांची सखोल माहिती दिली आहे. काही ग्रंथकारांनी 16, काहींनी 25 तर काहींनी 48 संस्कार सांगितले आहेत.
साधारण 1940च्या दशकातली गोष्ट आहे. नावे वेगळी असतील, पण गोष्ट घडलेली आहे. रजनीकांतचा सातवा वाढदिवस होता. कितीतरी दिवस आधीपासून त्याला आपल्या वाढदिवसाचे वेध लागले होते. आता माझा वाढदिवस येईल, मग आजी, काकू, आई मला ओवाळतील. आजोबा आणि बाबा माझ्यासाठी एखादा नवीन खेळ आणतील किंवा नवीन कपडे आणतील. काकाला तर आधीच, मला नवीन चप्पल घे! म्हणून सांगितले होते. रजनीकांत रोज आजोबांच्या खोलीत बसून त्यांच्या मेजावरील कॅलेंडरची पाने पालटून, वाढदिवसाला किती दिवस राहिले ते मोजत होता.
 
 
शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला! रजनी लवकर उठला. आईला घाई करून तिला पाणी तापवायला लावून त्याने पटकन आंघोळ केली. धुतलेला सदरा घातला आणि देवाच्या पाया पडून पळत पळत आजोबांच्या खोलीत गेला. आजोबांच्या पायावर डोके टेकवून नमस्कार केला. आता मला आजोबा काहीतरी खाऊ देतील किंवा हातावर पैसे ठेवतील असा विचार त्याच्या मनात घोळत होता. रजनी उठून उभा राहिला आणि तो अपेक्षेने आजोबांकडे पाहू लागला.
 
 
आजोबांनी एका मोठ्या पोत्याकडे बोट दाखवून म्हटले, रजनी! आज तुला हे तांदळाचे पोते घेऊन बाहेर ओट्यावर बसायचे आहे. जो कोणी याचक येईल त्याला हे माप भरून तांदूळ द्यायचे. हेच तुझ्या वाढदिवसाचे बक्षीस आहे बरे का! रजनीचा अगदीच अपेक्षाभंग झाला होता. हे कसले बक्षीस? आणि ही कसली वाढदिवस साजरा करायची पद्धत? हा विचार जरी मनात आला तरी आजोबांच्या समोर काही बोलायची हिंमत नव्हती.
 
 
आजोबांनी त्याला ते पोते बाहेर नेऊन दिले. रजनीकांत नाखुषीने वाड्याच्या ओट्यावर मांडी घालून बसला. थोड्या वेळाने त्या रस्त्याने एक याचक आला, रजनीने एक माप भरून तांदूळ त्याच्या झोळीत टाकले. तो गरीब म्हातारा त्याला तोंडभर आशीर्वाद देऊन निघून गेला. लोकं येत राहिली, रजनी तांदूळ देत राहीला. त्यांच्या मुखावरील आनंद पाहून रजनीची नाराजी कुठल्याकुठे पळून गेली होती. आता तांदूळ देतांना त्याला एक समाधान मिळत होते. हा बदल कधी झाला हे त्याचे त्याला सुद्धा कळले नाही! शेवटचे माप टाकले, तेव्हा त्याला थोडे वाईटच वाटले, आता माझ्याकडे द्यायला तांदूळ नाही... रजनी सात वर्षांचा झाला होता!
रजनीकांत दया आणि अकार्पण्य हे दोन गुण वाढदिवसाच्या संस्कारातून शिकला होता.
सम् म्हणजे सम्यक / परिपूर्ण / संपूर्ण, आणि कृ म्हणजे करणे. अर्थात एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला जे परिपूर्ण करतात ते म्हणजे संस्कार. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध संस्कार केले जात. आता प्रत्येक व्यक्तीचे म्हणजे आपल्या ह्या लेखमालेत ‘रजनीकांत’चे आयुष्य सुफल व्हावे, अर्थपूर्ण व्हावे, त्याची शैक्षणिक, नैतिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी कमीतकमी कोणते संस्कार आवश्यक आहेत ते निश्चित केले गेले.
 
 
वेद, स्मृती, पुराण, धर्मसूत्र, गृह्यसूत्र आदि ग्रंथांमध्ये या संस्कारांची माहिती आली आहे. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये संस्कारांचा उल्लेख आला आहे, त्या संस्कारांच्या वेळी गावयाचे मंत्र सुद्धा आले आहेत, पण त्यामध्ये ‘संस्कार’ हा शब्द आला नाही. संस्कारांचे मूळ वेदांत असले तरी त्यात संस्कारांची यादी किंवा संस्कार करायची पद्धत येत नाही. मात्र नंतरच्या वेदांगातील - गृह्यसूत्र आणि धर्मसूत्रांनी; तसेच इतर स्मृतिग्रंथांनी संस्कारांची सखोल माहिती दिली आहे. काही ग्रंथकारांनी 16, काहींनी 25 तर काहींनी 48 संस्कार सांगितले आहेत.
 
 
सर्वसाधारणपणे हे 16 संस्कार मानले गेले आहेत - 1. गर्भाधान, 2. पुंसवन, 3. सीमन्तोन्नय, 4. जातकर्म, 5. नामकरण, 6. सूर्यावलोकन, 7. अन्नप्राशन, 8. चूडाकरण, 9. कर्णवेध, 10. विद्यारंभ, 11. उपनयन, 12. वेदारंभ, 13. समावर्तन, 14. विवाह, 15. विवाहाग्निपरिग्रह आणि 16. अन्त्येष्टि
 
काही गृह्यसुत्रांमध्ये विवाहानंतर - वानप्रस्थ, संन्यास आणि अन्त्येष्टि हे शेवटचे तीन संस्कार सांगितले आहेत. काही ठिकाणी पाहिला वाढदिवस हा 16 संस्कारांपैकी एक सांगितला आहे.
 
गौतम ऋषींनी 40 संस्कार सांगितले आहेत -
 
वरील पैकी 10 संस्कार - गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन, जातकर्म, नामकरण, अन्नप्राशन, चौल, उपनयन, समावर्तन आणि विवाह.
 
चार वेदांचे व्रत - वेदव्रत
 
पाच दैनिक यज्ञ - पञ्चमहायज्ञ
 
सात पाकयज्ञ- अष्टक, पार्वण, श्राद्ध, श्रावणी, आग्रहायणी, चैत्री, आश्वयुजी
 
सात हविर्यज्ञ- अग्न्याधेय, अग्निहोत्र, दर्शपौर्णमास्य, चातुर्मास्य, आग्रयाणेष्टि, निरूढ-पशुबन्ध, सौत्रामणि
 
सात सोमयज्ञ- अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ्य, षोडशी, वाजपेय, अतिरात्र, आप्तोर्याम
 
ह्या 40 संस्कारात पुढील आठ गुण मिळवून 48 संस्कार होतात - धैर्य, दया, अनसूया, शौच, अनायास, मंगल, अकार्पण्य आणि अस्पृहा.
 
या पैकी पहिले 3 संस्कार रजनीकांतच्या जन्माच्या आधी झाले होते - गर्भाधान, पुंसवन आणि सीमन्तोन्नयन. जे माता आणि पिताबीज आणि क्षेत्राच्या शुद्धीसाठी.
 
पुढचे सहा संस्कार - जातकर्म, नामकरण, सूर्यावलोकान, अन्नप्राशन, चूडाकरण, आणि कर्णवेध - बाल्यावस्थेत केले गेले. जन्मानंतरच्या पहिल्या संस्कारात, बाळाला नाव मिळाले. रजनीकांतला या द्वारे स्वत:ची ओळख मिळाली. पुढचे वर्षभर रजनीकांतवर होणारे इतर संस्कार बाळाच्या वाढीतील एकेक टप्पा दर्शवतात.
 
 
त्यानंतरचे चार संस्कार - विद्यारंभ, उपनयन, वेदारंभ आणि समावर्तन - रजनीकांतच्या शिक्षणाशी संबंधित असतात.
 
 
आयुष्याच्या त्यापुढील टप्प्यात - विवाह, वानप्रस्थ आणि संन्यास हे संस्कार येतात. हे तीनही संस्कार आश्रमांचे प्रवेशद्वार आहेत. हे संस्कार मात्र रजनीकांत स्वत: निवडतो, ठरवतो आणि हवे असेल तर करवून घेतो. या आधीचे सर्व संस्कार - रजनीकांतच्या आईवडिलांनी करून घेतलेले असतात. गौतम ऋषींनी सांगितलेल्या 40 संस्कारांपैकी विविध यज्ञाचे संस्कार गृहस्थाश्रमात करायचे असतात, तसेच ते वारंवार करायचे असतात.
 
 
प्रत्येक संस्कारातून पुढे पुढे जात रजनीकांत लहानाचा मोठा होतो, त्याचे शिक्षण होते, लग्न होते, मुलेबाळे होतात, त्यांची लग्ने झाल्यावर तो आणि त्याची बायको वानप्रस्थ स्वीकारतात. रजनीकांत आता म्हातारा होतो आणि एक दिवस त्याच्या जीवनयात्रेचा शेवट होतो. मग त्यावर अंतिम संस्कार केला जातो. अर्थातच हा संस्कार त्याचा मुलगा त्याच्यावर करतो.
 
 
असे म्हणू शकतो की सर्वच संस्कार एक प्रकारे यज्ञ आहेत. अगदी नामकरणापासून प्रत्येक विधीमध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो, मंत्र म्हणून आहुती दिली जाते. विवाह संस्कारात होम असतो, वधू-वर अग्नीला प्रदक्षिणा घालतात, आणि अग्नीला साक्षी मानून विवाह संपन्न होतो. अग्नीपासून सुरुवात होते, जन्मभर अग्नीची सोबत असते, शेवटी आणि अंतिम संस्कार किंवा अंत्येष्टी (अंतिम इष्टी) म्हणजे शेवटचा यज्ञ केला जातो. या यज्ञात अग्नीमध्ये आपला देहच आहुती म्हणून अर्पण केला जातो!

दीपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

9822455650

 deepali.patwadkar@gmail.com