बळानेच राष्ट्रे जगी धन्य होती!

विवेक मराठी    24-May-2025
Total Views |
@डॉ. नीरज देव
savarkar 
राष्ट्र आक्रमक आणि युद्धाकांक्षी असेल तरच शत्रूराष्ट्र त्यास घाबरून राहते. त्याच्याशी दोस्ती करण्याचा प्रयत्न करते. स्वा. सावरकरांची स्पष्ट भूमिका होती की,‘स्वातंत्र्य मिळाले, पण जोपर्यंत त्याच्या पाठीशी सामर्थ्य उभे राहत नाही. तोपर्यंत ते तसेच राखणे ही शक्य होणार नाही.’ आज जेव्हा आपण सर्जिकल स्ट्राईक, ऑपरेशन सिंदूर सारखी आक्रमक पावले उचलतो, तेव्हा खर्‍या अर्थाने सावरकरांच्या मार्गावर चालतो आहोत.
बळानेच राष्ट्रे जगी धन्य होती ।
बळानेच स्वातंत्र्यगीतास गाती ॥
समर्था मिळे मुक्तीचा गोड ठेवा ।
तरी देश सामर्थ्यशाली करावा॥
 
 
या काव्यपंक्ती सावरकरांचे शस्त्रसामर्थ्यविषयक विचार उत्तमपणे व्यक्तवितात.
 
 
खरे सांगायचे तर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांइतका वस्तुनिष्ठ विचार करणारा नेता विरळाच झाला असेल. भारताचे पारतंत्र्य शस्त्रशक्तीशिवाय नष्ट करता येणे शक्यच नाही, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच ते सशस्त्र क्रांतिकारक बनले.
सावरकरांचे आकलन किती यथार्थ होते. हे इंडियन इंडिपेंडंट अ‍ॅक्टच्या वेळी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान अ‍ॅटलीने दिलेल्या उत्तरावरून चटकन ध्यानात येते.
 
 
आपल्याला भारताला स्वातंत्र्य का द्यावे लागत आहे. हे प्रतिपादन करताना त्याने,
 
Britain transferring power due to fact that,
 
1.The Indian mercenary army no longer loyal to Britain. and
 
2. Britain cannot afford to have a large Britain army to hold down India.
 
 
नमस्कार सुहृदहो !
 
अर्थात, ’भारतीय सैन्य इंग्रजांना प्रामाणिक राहिले नसल्याचे सांगत, त्यांच्यावर बळपूर्वक नियंत्रण ठेवणे ब्रिटिशांना शक्य नसल्याचे सांगितले.’
 
त्याच्या या वक्तव्यात कुठेही 1942चे आंदोलन, अहिंसक सत्याग्रह इत्यादीचा पुसटसाही उल्लेख नाही. उलट सन 1900 पासून सावरकर पुरस्कारित असलेल्या बाबींचाच उल्लेख व्दिरुक्तीने आहे.
 
 
सावरकर अन् त्यांच्या सहकार्‍यांनी स्वातंत्र्य मिळविले, रक्त-घाम-कष्ट अन् आपल्याच देशबांधवांकडून होणारी आत्मघाती उपेक्षा पचवित स्वातंत्र्य मिळविले. तीन चतुर्थांश भारत स्वतंत्र केला. त्याचीच ही पावती आहे. त्यामुळेच स्वतंत्र भारताची पहिली चिंता त्यांनाच होती. भारताचे स्वातंत्र्य शस्त्रबळानेच टिकू शकते हे ठाऊक असल्यानेच यासंबंधीचे संदेश ते वारंवार देताना सापडतात.
‘राष्ट्र स्वतंत्र असते म्हणूनच ते संकटात असते.’
 
 
सावरकर सांगत, ‘जेव्हा एखादे राष्ट्र स्वतंत्र असते, तेव्हा ते स्वतंत्र असते म्हणूनच सदोदित संकटात असते.’ दोन देशांच्या सीमा परस्परांना भिडलेल्या असतात तेव्हा परस्परांचे हितसंबंध आडवे येतात. ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयास करतात. एकमेकांचे पाणी, जमीन इत्यादी हडपण्याचा प्रयास करतात, आणि भारताच्या आसपास असलेले पाकिस्तान तर सांस्कृतिक नि धार्मिकदृष्ट्या भारताचे वैरी. तीच बाब राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या चीनची. हे सावरकरांना पक्के कळत होते, म्हणूनच ते सांगतात, ‘उशापायथ्याशी तुमचे शत्रू आहेत. तुमचे स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर तुम्ही शस्त्रसज्ज असले पाहिजे.’
 
हायड्रोजन नाही तर ऑक्सिजन बाँब शोधा
 
सावरकरांना अपेक्षित शस्त्रसज्जता भालेतलवारींची नाही तर अणुबाँबची आहे. पुण्यात उभारलेल्या एका स्मृतिस्मारकांत भाले, ढाल, तलवारी इ.शस्त्रांची चित्रे कोरलेली होती. त्याचे उद्घाटन करताना सावरकर म्हणाले होते, ‘आता भाल्याबरच्याचे दिवस सरले. अणुशक्तीचे दिवस आले. यावर अणुबाँबची पण प्रतिकृती हवी होती.’ याचाच अर्थ सावरकरांना अद्ययावत शस्त्रे हवी होती. हे स्पष्ट करताना एका बाबीची जाणीव द्यावीशी वाटते की, भारतात बाँबचे युग हुतात्मा खुदिराममुळे अवतरले, असे आपण म्हणत असलो, तरी त्याचे खरे श्रेय सावरकरांचे आहे.
 
नमस्कार सुहृदहो !
 
 
 
आपल्या अंतिम व्याख्यानातही ते म्हणाले होते, ‘हायड्रोजन बाँब शोधा, जगाला सापडला नाही असा ऑक्सिजन बाँब शोधा आणि शोधल्यावर काय करायचे ते सांगताना ते म्हणतात, ‘अणुबाँब शोधणे उपयोगी नाही. गरज तर त्याचा उपयोग ही केला पाहिजे. म्हणजे शत्रू दाती तृण धरून राहील. धाकापोटी मित्र राहिल.’
 
 
तुमचे सैन्य आक्रमक असले पाहिजे
 
आज आपण संरक्षणमंत्री नि संरक्षक सेना म्हणतो, मुळात ही गोष्टच चूक आहे. सेना जर आक्रमक असेल तरच राष्ट्राचे संरक्षण होऊ शकते. पूर्वीच्या काळी संरक्षण मंत्री नाही तर युद्ध मंत्री असत. कारण राष्ट्र आक्रमक आणि युद्धाकांक्षी असेल तरच शत्रू त्याला भितात. त्याच्याशी दोस्ती करण्याचा प्रयास करतात.
 
 
पण ’आम्ही युद्धाला प्रारंभ करणार नाही’ असे आपण म्हणतो. युद्धांत जिंकण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे सरळ आक्रमण करणे, युद्धभूमी आपण ठरविणे होय. हे आपण केले नाही म्हणून तिबेट आणि भारताची भूमी चीन बळकावता झाला, आणि नेहरु ती छे No man's Land होती म्हणत मूग गिळून बसले. कशामुळे? सैनिकी शक्तीच्या अभावामुळे आणि आपल्या दुर्बळतेमुळे!
 
 
आणि आज! आज जेव्हा आपण सर्जिकल स्ट्राईक करतो तेव्हा सावरकरांच्या मार्गावर चालत आपण युद्धभूमी निवडतोय. जेव्हा पाकव्याप्त काश्मीर आपण मिळवू, तो हिंदूंनी बहुसंख्याक करु तेव्हाच सावरकरांना अनुसरले असे होईल.
 
 
सावरकर म्हणत, ‘स्वातंत्र्य मिळाले, पण जोपर्यंत त्याच्या पाठीशी सामर्थ्य उभे राहत नाही. तोपर्यंत ते तसेच राखणे ही शक्य होणार नाही.’ ’असमर्थ नि प्रत्येक आक्रमकांपुढे झुकणार्‍या लोकशाहीपेक्षा हिटलरचे राज्यही परवडते’ असे प्रतिपादन करीत तेव्हा या वाक्याचा मथितार्थ ’हिटलरचे राज्य चांगले होते वा लोकसत्ता चांगली नसते’ असा नसून, ’अंतर्गत शासनपद्धती कशीही असली तरी बाह्यदृष्ट्या राष्ट्र सामर्थ्यवान असले पाहिजे’ असाच होतो.
 
 
सैनिकी शिक्षण अनिवार्य
 
सावरकर म्हणत, ’राष्ट्र समर्थ होण्यासाठी प्रचंड सैन्य पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने सैनिकी शिक्षण हे घ्यायलाच हवे. युरोपात सैनिकी शिक्षण सक्तीचे असते तसेच आपण करायला हवे.‘ ‘प्रबळ सैन्याविना लोकशाही, अगदी उत्कृष्ट घटनेची असली तरी ती मातीला मिळाल्याशिवाय राहणार नाही.’ जगांत अजूनही बळाचेच वर्चस्व आहे हे आपण ओळखायला हवे. फ्रांसचा जनरल दि गॉल बळानेच सत्तेवर आला. तुर्कस्तान, अमेरिका, रशिया सारे सैनिकी बळावरच जगांत श्रेष्ठ ठरलेत. भारतातील प्रत्येक महाविद्यालयातील तरुणांनी एनसीसीत गेलेच पाहिजे. आज जर सावरकर असते तर अग्निवीर योजनेचे कौतुक केले असते. हिंदूंना योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले असते.
 
 
सीमा निश्चित करा!
 
स्वतंत्र राष्ट्राने आपल्या सीमा निश्चित करायलाच हव्यात. त्यांना असलेली परकीय नांव बदलून त्यांना स्वकीय नांवे द्यायला हवीत. सावरकरांच्याच शब्दात सांगायचे तर ’अरबी समुद्र? तो काय अरबांच्या बापाचा आहे का? नाही! अरबी समुद्र नव्हे तर पश्चिम समुद्र’ हे असे केले तर त्याच्या स्वामित्वाचा स्पष्ट बोध होतो. त्याचप्रमाणे जी निर्मनुष्य वा असंरक्षित भूमी आहे ती हिंदूबहुल होईल हे आपण बघायला हवे.
 
 
उपरोक्त बाबीत आपण विविध नगरांना मूळ नांव देण्याचा प्रघात आरंभिला आहेच. तो पूर्णत्वाला जावो. पोर्ट ब्लेअरचे वीर सावरकरपूरम् व्हावे, अरबी समुद्राचे पश्चिम समुद्र आणि हो! अहमदाबादचे, त्या गुर्जर नगरीचे कर्णावती व्हावे. त्याचसोबत सीमेवरील प्रांत हिंदूबहुल करावेत.
 
 
भारत स्वतंत्र होताच, सहअस्तित्व, सहजीवन, अलिप्त धोरण आदि पोकळ अन् भंपक कल्पनांचा सुकाळ माजला यावर उपरोधिक टोला मारताना सावरकर म्हणतात, ’वाघ जेव्हा शेळीला खातो. तेव्हा वाघ व शेळीचे संपूर्ण सहजीवन झालेले असते.’ अर्थात अशा भोंगळ गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे.
 
 
’नुसती ही लोकशाही नि ती लोकशाही, हा न्याय नि तो न्याय करीत राहण्यात काहीच अर्थ नाही. या जगांत न्याय-अन्याय वगैरे काही नाही. अन्यायाला अन्यायाने नि आक्रमणाला आक्रमणानेच उत्तर द्यायला हवे तरच राष्ट्र अजेय व स्वतंत्र राहते.
या सूत्रांशिवाय तरुणींनीसुद्धा सैन्यांत शिरले पाहिजे सांगत. ते सार्‍या भारताला शस्त्रसज्जतेचा अखंड संदेश देत राहतात. जो आजही त्याच्या साहित्यातून तळपतो आहे.