राज्याचा भूगोल आणि अर्थकारण बदलणारा समृद्धी महामार्ग

    13-Jun-2025
Total Views |
@अजित माधवराव चव्हाण  
 
 राजकीय इच्छाशक्तीचा योग्य वापर केला, तर किती जबरदस्त काम होऊ शकते याचं हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. अनेक जिल्ह्यांचा भूगोल व अर्थकारण यामुळे बदलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातल्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्णत्वाकडे जाणं हा देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीचा विजय आहे.
road
 
मुंबई ही प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जलवाहतूक सुविधांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी असलेली भारताची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी आहे. ज्यामुळे मुंबईकडे जगभरातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी आणि माल वाहतुकीचा ओघ आहे. राज्यातील बहुतांश व्यावसायिक व औद्योगिक विकास मुंबई-पुणे-नाशिक परिसरात झाला आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असली आणि देशाचे भौगोलिक केंद्र असले तरी, मराठवाडा-विदर्भातील क्षेत्रे खनिजे आणि कृषी उत्पादनांनी समृद्ध असूनही, मुंबई-पुणे-नाशिक यांच्या तुलनेत ही क्षेत्रे व्यावसायिक-औद्योगिकदृष्ट्या मागासलेलीच आहेत. या आर्थिक मागासलेपणाचे मुख्य कारण म्हणजे, देशातील सारी बंदरे आणि देशाच्या प्रमुख आर्थिक कॉरिडॉरपासूनचे अंतर, दर्जेदार रस्त्यांचा अभाव, नाशवंत-अनाशवंत अशा दोन्ही प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यास अडचणीचे ठरत होते.
 
जुन्या नागपूर-मुंबई रस्त्यावरून मुंबईकडे येण्यास 17 ते 18 तास लागत होते. हा प्रवास वेगवान करण्यासाठी मुंबई ते नागपूर ग्रीनफिल्ड हायवे करण्याचा निर्धार महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केला. आठ तासांत नागपूर-मुंबई प्रवास पूर्ण करता यावा याकरता फडणवीस यांनी 31 जुलै 2015 रोजी विधानसभेत ”नागपूर मुंबई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे” विकसित करण्याचा निर्णय जाहीर केला. या महामार्गाचा अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांचेकडे सोपवले. शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सादर केलेल्या, व्यवहार्यता अहवालातील निष्कर्षानंतर राज्य मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने 30 नोव्हेंबर 2015 रोजी 701 कि.मी. लांबीच्या दु्रतगती महामार्गास परवानगी दिली. एक्सप्रेस-वेच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची अंमलबजावणी एजन्सी म्हणून नियुक्ती केली. तसेच या निष्कर्ष अहवालातील प्रस्तावित असलेल्या दु्रतगती महामार्गाच्या सर्वेक्षणाला महाराष्ट्र शासनाने 30 एप्रिल 2016 रोजी मान्यता दिली.
 road 
 
महत्त्वाच्या निर्णयामध्ये महाराष्ट्र सरकारनं एक्सप्रेस-वेसाठी आवश्यक असलेली खाजगी जमीन केवळ जमीन मालकांच्या स्वेच्छा सहभागाने आणि संमतीने संपादित करण्याचा भू-मालकांना या क्षेत्रातील अपेक्षित आर्थिक वाढीसाठी भागीदार बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 5 जुलै 2016 रोजी राज्य मंत्रीमंडळांना महामार्ग अधिनियमामध्ये लँड पुलिंग योजना समाविष्ट करण्याला मान्यता दिली. या प्रकल्पाकरता जमीन संपादित करण्याकरता मोठ्या प्रमाणावरती जनजागृती करण्यासाठी शासनाच्या सर्व एजन्सी एकत्रितरीत्या व्यापक प्रयत्न केले. त्यावेळी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनी मध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम करत असताना या मार्गाच्या विरोधात असलेल्या जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी म्हणून मी एक कार्यक्रम केला होता. त्यावेळी अगदी आमदार, खासदार, नेते आणि जनता यांच्यासकट सर्वांनाच असं वाटत होतं की, एवढा मोठा प्रकल्प आकाराला येईल का? परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयी प्रचंड आत्मविश्वास होता आणि 13 जुलै 2017 ला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यात खाजगी जमीनखरेदीसाठी तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पहिला विक्री करारनामा केला गेला व पुढे ठरल्याप्रमाणे सात महिन्यांच्या कालावधीत थेट खरेदी योजनेद्वारे खाजगी किमतींचा 84% भूसंपादन पूर्ण केले गेले. उर्वरित 16 टक्के खाजगी जमीन पुढील दोन महिन्यांत संबंधित कायदे अंतर्गत संपादित करण्यात आले.
 
नमस्कार सुहृदहो !
 
 
अशा प्रकारे एक्सप्रेस-वे एंटर चेंज आणि वे-साइड सुविधांसाठी आवश्यक असलेली अंदाजे 88 हेक्टर जमीन संपूर्ण नऊ महिन्यांच्या विक्रमी वेळात संपादित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांकडून परवानग्या मिळवण्यात आल्या. हा देखील एक विक्रमच म्हटला पाहिजे.
हा एक्सप्रेस-वे शिर्डी-वेरूळ-लोणार-अजिंठा-वेरूळ -छत्रपती संभाजीनगर-त्र्यंबकेश्वर-घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग-पंचवटी नाशिक-इगतपुरी हिलस्टेशन यासारख्या विविध पर्यटन स्थळांना जोडणारा पर्यटन विकासाला सर्वांगीण चालना देणारा ठरतो आहे. मालाची व मनुष्यबळाची वेगाने वाहतूक होऊन या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील आणि स्थानिक जीडीपी वाढण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
road 
 
या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमध्ये अनेक मोठे आव्हाने होती. समृद्धी महामार्गामध्ये एकूण 16 पॅकेजेस होती. याकरता सोळा स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करून वेगाने काम पूर्ण करण्यात आलं. समृद्धी महामार्गात एकूण 1903 लहान-मोठी बांधकामे करण्यात आली. यात छेदणार्‍या रस्त्यावरून प्रवेश करणे व बाहेर पडण्याकरता 23 एंटरचेंज, नद्यांवरचे 32 मोठे पूल, डोंगरदर्‍याच्या ठिकाणी असलेले 73 पूल, आठ रेल्वे पूल, सात बोगदे इतर छेदणार्‍या रस्त्यांसाठी 411 अंडरपास, वन्यजीवांना जाण्याकरता 100 बांधकामांचा प्रामुख्याने समावेश आहे. या महामार्गाच्या बांधकामासाठी सात लक्ष मीटर स्टील वापरण्यात आले. 56 लक्ष मॅट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले. सहा पूर्णांक शून्य करोड घनमीटर क्रश दोन वापरण्यात आला आहे. यावरून महामार्गाच्या परिणामाची व्याप्ती आपल्या लक्षात येते.
 
बोगदे डोंगर कटिंगमधून निघालेला दगड बारीक करून त्याचा वापर काँक्रीटमध्ये करण्यात आला. समृद्धी महामार्गावर वन्यजीवांच्या संरक्षणाकरता विशेष काळजी घेऊन त्यांच्या नैसर्गिक मार्गांमध्ये वन्यजीवांना जाणे-येणे सुलभ व्हावे याकरता 100 भूयारी उन्नत मार्ग बांधण्यात आले. तसेच या मार्गाच्या बांधकामावर नॉईस बेरियर, व्हिजन बेरियर लावण्यात आलेले आहेत.
 
कोविड-19 महामारीच्या काळात संकटात मनुष्यबळ, यंत्रसामग्री, बांधकाम साहित्याचा तुटवडा झालेला असतानाही त्यावर मात करत समृद्धी महामार्गाचे बांधकाम वेळेत पूर्णत्वास नेण्यात आलं. समृद्धी महामार्गावर आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना अपघात आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्याकरता सुसज्ज यंत्रणा व मनुष्यबळ उभारलेलं आहे.
 
दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटर 26 मे 2023 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला तर तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी 25 किलोमीटर 4 मार्च 2024 रोजी खुला करण्यात आला. उर्वरित इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरचा टप्पा देखील खुला करण्यात आलेला आहे. समृद्धी महामार्गाची शेवटच्या टप्प्यातील 76 किलोमीटर लांबी ही कठीण भूभागातून जाते. ही इगतपुरी-ठाणे इथल्या डोंगराळ प्रदेशातून जाते. या भागात मोठ मोठ्या डोंगरदर्‍या आहेत. या भागामध्ये या ठिकाणी मोठे पूल व बोगदे बांधणे हे अत्यंत जिकिरीचं काम इंजिनियर्सने अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
 
नमस्कार सुहृदहो !
 
 
समृद्धी महामार्गाच्या नजीकच्या भागात 18 ठिकाणी नवनगरे कृषी समृद्धी केंद्र उभारणे नियोजित आहे. यामध्ये गोदाम, शीतगृह, आयटी सेंटर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हेल्थ सेंटर इत्यादी सुविधा असणार आहेत. यातून चार ते पाच लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. समृद्धी महामार्गावर सध्या 22 ठिकाणी स्वच्छतागृहे, पाणी व खाद्यपदार्थ मिळणारी उपाहारगृहे व इतर इंधन स्थानक कार्यरत आहेत. लवकरच या ठिकाणी प्रवाशांसाठी फूड प्लाझा, पेट्रोलपंप, गॅरेज, पार्किंग व स्वच्छतागृहे, प्राथमिक उपचार इत्यादी परिपूर्ण सुविधा पुरवण्याकरता 16 ठिकाणी आधुनिक सोयीसुविधा केंद्र महामार्गालगत उभारण्यात येणार आहेत.
देवेंद्र फडणवीस या तरुण नेत्याच्या संकल्पनेतून नवं महाराष्ट्रातला हा अतिशय अत्याधुनिक रस्ता उभं राहणं हे एक आश्चर्यच आहे. राजकीय इच्छाशक्तीचा योग्य वापर केला, तर किती जबरदस्त काम होऊ शकतो याचं हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. अनेक जिल्ह्यांचा भूगोल व अर्थकारण यामुळे बदलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातल्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्णत्वाकडे जाणं हा देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीचा विजय आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशामधल्या इंजिनिअरिंगचा चमत्कार असंदेखील या प्रकल्पाला म्हणता येईल. इंजीनिअरिंगचे अनेक चमत्कार या प्रकल्पामध्ये आपल्याला पाहता येतील.
 
देशातील सर्वात रुंदी आणि लांबीचा बोगदा देखील याच ठिकाणी एकूण नाशिक ते ठाणे जिल्ह्यादरम्यान इगतपुरीच्या जवळपास आठ किलोमीटर लांबीचा हा बोगदा सर्वाधिक लांबी रुंदीचा बोगदा आहे. इथल्या 76 किलोमीटरच्या डोंगरदर्‍यांमुळे मोठे पूल आणि बोगदा बांधणे मोठा जिकिरीचे काम होते. एका ठिकाणी खडकात 30 ते 40 मीटरपर्यंत खोदकाम करावे लागते. या टप्प्यात एकूण सोळा पूल आहेत. त्यांची लांबी 11 किलोमीटर आहे. सर्वाधिक लांबीचा पूल हा 2.28 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गाची निर्मिती करत असताना मोठ्या प्रमाणात उच्च तसेच कमी दाबाच्या विद्युत वाहिन्यांना स्थलांतरित करावे लागले. कमी दाबाच्या 62 वाहिन्या स्थलांतरित करण्यात आल्या. तसेच टोरेंट पॉवरच्या पाच विद्युतवाहिन्या व पावर ब्रिजची एक विद्युतवाहिनी स्थलांतरित करण्यात आलेली आहे.
नमस्कार सुहृदहो !
 
राज्याच्या पाच महसुली विभागांच्या दहा जिल्ह्यांतील 26 तालुक्यांमधल्या 292 गावांतून जाणारा हा सहा पदरी महामार्ग ग्रीनफिल्ड संरेखन आहे. या महामार्गामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे हे दहा जिल्हे प्रत्यक्षरीत्या जोडले जातात. तसेच समृद्धीमुळे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड हे 14 जिल्हे अप्रत्यक्षरीत्या जोडले जातात.
या महामार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनांकरता कमाल गती घाटात 100 किलोमीटर प्रतितास आणि सपाट रस्त्यावर 120 किलोमीटर प्रतितास आहे. जुन्या मुंबई-नागपूर रस्त्यावरती सतरा-अठरा तास लागायचे. हा प्रवास आता आठ तासांत शक्य होणार आहे. मुंबईमधल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ते नागपूरमधल्या मिहान यांना जोडणार्‍या महामार्गामुळे बंदरावरून जलवाहतूक करून अत्यावश्यक माल भारतभर वेळेत पोहोचवणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यामधल्या ग्रामीण भागाला महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकात्मिक नियोजन आणि पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकत्रित अंमलबजावणीचा समर्थन करणारा हा महामार्ग दिल्ली-मुंबई दु्रतगती मार्ग जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, शिर्डी, अजिंठा-वेरूळ लेणी, लोणार सरोवर आणि इतर पर्यटनस्थळांना जोडणार आहे. तसेच समृद्धी महामार्गामुळे कृषी, पर्यटन, दळणवळण उद्योग इत्यादी क्षेत्रे विकसित होऊन लघु उद्योगांना चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. तसेच इंधनाची आणि वेळेची बचत होणार आहे. दुर्दैवाने अपघात झाल्यास अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहनांसह रुग्णवाहिका, गस्त वाहन, महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र, तीन टन क्षमतेची क्रेन, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षारक्षक व संपूर्ण महामार्गावर एकूण 287 रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेले आहेत.
 
महामार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महामार्ग सुरक्षा पोलिसांना 15 अतिरिक्त वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच या ठिकाणी अत्याधुनिक ट्रॅकिंग सुविधा आहे. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवण्याकरता देखील प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे देशाच्या प्रगतीला चालना मिळणार आहे. महाराष्ट्रमधील फडणवीस-शिंदे-पवार सरकारकडून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना मानवी चेहरा दिला जातो आहे. विविध क्षेत्रांत मूलगामी परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे सर्वाधिक पायाभूत सुविधांचा प्रकल्प सुरू होणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरले आहे.
 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प पूर्ण करून दाखवल्यामुळे निश्चितपणे त्यांच्याबद्दल संपूर्ण देशामध्ये आधीच असलेल्या विश्वासार्हतेच्या भावनेमध्ये आणखी भर पडली आहे. काम करून दाखवणारा नेता ही फडणवीस यांची प्रतिमा उजळवणारे हे मोठे काम महाराष्ट्रात उभे राहिल्याने ज्यांनी ज्यांनी या समृद्धी महामार्गावरून प्रवास केला त्यांच्या आनंददायी प्रतिक्रिया ह्या खरोखर ऐकण्यासारख्या होत्या.
 
मी पत्रकार म्हणून, सुरुवातीला या प्रकल्पाला होणारा विरोध ही पाहिला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून लोकांमध्ये या प्रकल्पानंतर झालेला आनंददेखील पाहिला आहे. एवढा मोठा प्रकल्प खरंच पूर्ण होईल का असा विचार करणार्‍या लोकांना समृद्धीवरून प्रवास केल्यानंतर देवेंद्र फडणवीस या लोकनेत्याच्या क्षमतेवरती विश्वास ठेवून विरोधकांना देखील आनंद व्यक्त करावा लागला, याचा मी साक्षीदार आहे. एकूणच काय तर समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या पटलावरची भाग्यरेषा ठरणार यात शंकाच नाही!
 
लेखक भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे
सह-मुख्य प्रवक्ता आहेत.