मातेचे हाडवैरी

विवेक मराठी    16-Jun-2025
Total Views |
मिलिंद सबनीस  9422881783
वैदिक काळापासून वैदिक वाङ्मयामध्ये मातृभूमी आणि तिचे पुत्र या अर्थाच्या अनेक ऋचा मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. मातृभूमीसाठी त्याग करणारे तिचे पुत्र, तिला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी धडपड करणारे तिचे पुत्र ही कल्पना कालातीत आहे, पण गेल्या काही वर्षांत या विचारांना सुरुंग लावण्याचं काम या मातृभूमीतील तिचेच काही पुत्र करत आहेत. आपल्या आईविषयी, मातृभूमीविषयी कृतघ्न भाव असणार्‍या या लोकांना काय म्हणावं, या लोकांविषयी काय लिहावं ?
 
india
 
आठच दिवसांपूर्वी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी राजभवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतमातेच्या चित्रावरून केरळमधे नवीन वाद सुरू झाला आहे. भारतमातेच्या ज्या चित्राचे पूजन होणार होते ते चित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्येे वापरले जाते असा मुद्दा उपस्थित करून राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीच्या सरकारने विशेषत: केरळचे कृषी मंत्री पी.प्रसाद यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. ‘भारतमातेची प्रतिमा या कार्यक्रमाचा भाग नसतांना तिच्या पूजनाचा कार्यक्रम का ठेवण्यात आला? ’असा प्रश्न उपस्थित करत पुढे, ’कम्युनिस्ट कार्यकर्ते अशा पद्धतीने पूजा पाठ करत नाहीत. हे छायाचित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारासाठी वापरण्यात येते त्यामुळे कोणत्याही सरकारी कार्यक्रमात ते वापरू नये, ’असा आदेश पी. प्रसाद यांनी दिला. शिक्षणमंत्री व्ही. शिवनकट्टी यांनीही हीच भूमिका मांडली .
 
 
सामान्य नागरिकांना चीड यावी असेच हे वृत्त आहे. ’वन्दे मातरम्’चा अभ्यासक म्हणून अनेक वर्षं काम करत असतांना ’वन्दे मातरम्’ विरोधाची भूमिका मुस्लीम संस्था, नेते यांच्यापेक्षाही अधिक जोरकसपणे समाजवादी व कम्युनिस्ट पक्षांनी घेतली होती. ’वन्दे मातरम्’ला विरोध नवा नाही. पण आता ’वन्दे मातरम्’चा मूलस्त्रोत असणार्‍या भारतमातेबद्दलही त्यांच्या मनात द्वेष व्हावा ही गोष्ट संतापजनक आहे. ज्या वैदिक वाङ्मयांतील अथर्ववेदामधे ’पृथिवी सूक्त’ नावाची 63 सूक्ते केवळ मातृभूमी या विषयालाच उद्देशून लिहिली जातात त्या सूक्तांना पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी भारताचे आद्य राष्ट्रगीत म्हणून गौरवले आहे. त्यात मातृभूमीची व तिच्या पुत्रांच्या कर्तव्यांची मीमांसा केली आहे. ही कम्युनिस्ट मंडळी आता हे वैदिक वाङ्मयही नाकारणार का? प. बंगाल आणि केरळमध्ये दीर्घकाळ कम्युनिस्टांनी राज्य केले त्याचे परिणाम आजही आपण पाहत आहोत. एखाद्या राजकीय विचारसरणीला तीव्र विरोध करणे हे त्या राजकीय पक्षाच्या भूमिकेला योग्य असले तरी, भारताची सांस्कृतिक परंपराच नाकारणे हे कोणत्या भूमिकेत बसते?
 
 
भारतमाता ही संकल्पना प्राचीन काळापासून असली तरी आधुनिक कालखंडात तिचा उगम बंगालमध्ये झाला असावा. अर्वाचीन काळातील पहिली देशव्यापी हिंदू संघटना ऋषी राजनारायण बसू यांनी ‘हिंदू मेळा’ या नावाने 1867 मध्ये सुरू केली. 1868च्या दुसर्‍या अधिवेशनात सत्येंद्रनाथ ठाकूर यांची ’जय भारतेर जय’ ही कविता विशेष गाजली. त्यात ‘मिले सब भारत संतान एकतान मनप्राण।’ असा उल्लेख होता. मातृभूमिस्तवन करणारी आणखीन काही गीते मधल्या काळात लिहिली गेली. 1875 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले ’वन्दे मातरम्’हे गीत मातृभूमी स्तवनाचे सगळ्यांत मोठे आणि उत्तुंग उदाहरण! 1882 मध्ये बंकिमचंद्रांनी लिहिलेल्या ’आनंदमठ ’ कादंबरीतही मातृभूमी आणि तिचे संतान असाच पट मांडला आहे.
 
पहिला ’भारत माता की जय’ हा जयघोष
 
शिशिरकुमार घोष यांच्या ’भारतमाता’ कवितेवरून प्रेरणा घेत किरणचंद्र बंदोपाध्याय यांनी ’भारतमाता ’ हे नाटक लिहिले. याचा पहिला प्रयोग 1873 मध्ये ’हिंदू मेळा’ या संस्थेच्या अधिवेशनात झाला. इतिहास अभ्यासकांच्या मते भारतमाता हे पात्र या नाटकाद्वारे पहिल्यांदाच रंगभूमीवर आले. पहिल्यांदाच जाहीरपणे रंगभूमीवर जन्मभूमीची पूजा केली गेली. ’भारतमाता की जय’ असा जयजयकारही पहिल्यांदा याच नाटकाद्वारे लोकांपर्यंत पोहोचला.
 
 
’वन्दे मातरम्’ प्रमाणे ’भारत माता की जय’ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा जयघोष ठरला. भारतमाता या अमूर्त कल्पनेला पुढच्या काळात भारतीय चित्रकारांनी मूर्त स्वरूप दिले. हरिश्चंद्र हलधर हे 1882 मध्ये भारतमातेचे चित्र काढणारे पहिले चित्रकार. 1905 मध्ये अवनींद्रनाथ ठाकूर यांनी रेखाटलेले संन्यासिनी वेशातील भारतमातेचे चित्र विशेष गाजले. पुढे पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर, रावबहादुर धुरंधर, दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, गोपाळ देऊस्कर अशा अनेक चित्रकारांनी भारतमातेची चित्र रेखाटली. मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने ’वन्दे मातरम्’च्या 125 व्या वर्षी 1999 मध्ये सचिन जोशी यांनी काढलेले चित्र हे ’वन्दे मातरम्’मधील वर्णनानुसार होते. बहुतांश भारतमाता या देवी स्वरूपातल्या आहेत. त्यामुळेच कदाचित कम्युनिस्टांना त्या खुपत असाव्यात.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातर्फे 1970च्या सुमारास मु. रामलिंगम या चित्रकाराने रेखाटलेले भारतमातेचे चित्र प्रकाशित करण्यात येऊ लागले. अखंड भासणार्‍या भारताच्या नकाशात ही भारतमाता सिंहासमवेत असून तिच्या हातात भगवा ध्वज आहे. हे चित्र पुढे जवळ जवळ चार दशके पूजिले जात होते. या भारतमातेच्या चेहर्‍यामागे अग्निशलाका होत्या. आणि ती जागा नकाशानुसार काश्मीर रेखीत करणारी होती. कदाचित त्या काळात दहशतवादाने पेटलेला काश्मीर अशी भावना त्यातून प्रतीत होत असावी अशी शंका आल्यामुळे 2012 मध्ये सध्या प्रचलीत असलेले बलराज या चित्रकाराने रेखाटलेले नवे भारतमातेचे चित्र संघप्रणित संस्थांमध्येे पुढे आणले गेले. यामध्ये हिमालयाची हिमशिखरे स्पष्ट असून भारतमातेच्या मुखामागे तेजोवलय आहे. बाकी स्वरूप मात्र बदललेले नाही.
 
 
एरवी भारतमातेच्या चित्राबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. एम. एफ. हुसेनने काढलेली भारतमाता निर्वस्त्र दाखवल्यामुळे लोकक्षोभ उसळला. परंतु हा एकच अपवाद वगळता बहुतांशी भारतमातेची चित्रे ही देवतास्वरूप आहेत. संघप्रणित भारतमातेच्या चित्रांमध्ये भारतमातेच्या हातात भगवा ध्वज आणि या भगव्या ध्वजालाही प्राचीन काळापासून आधार आहे. आज अनेक भारतमातेच्या चित्रांमध्ये भारतमातेच्या हातात तिरंगी ध्वज आहे हे ही योग्य आहे .
 
 
केवळ देवीस्वरूप आणि हातात भगवा ध्वज यामुळेच या चित्रावर केरळमधल्या सत्तारूढ नेत्यांनी आक्षेप घेतला असावा. वास्तविक भारतीय देवदेवतांप्रमाणे भारतमाता ही कल्पना नसून तिच्या नावामधे माता हे संबोधन आले आहे. वैदिक वाङ्मयातील अमूर्त कल्पनेला प्रतिभावान चित्रकारांनी दिलेले मूर्त स्वरूप आहे. त्यात कम्युनिस्टांचा आक्षेप भारतमातेच्या त्या चित्रावर आहे असे मानले तरी अप्रत्यक्षपणे भारतमाता ही संकल्पनाच ते नाकारत आहेत असा स्पष्ट अर्थ त्यातून निघतो. त्याविषयीचे निवेदन जाहीर करतानाही आम्ही मूर्तिपूजा मानत नाही. आम्ही पूजापाठ करीत नाही, म्हणून ही प्रतिमा नको असे ते म्हणतात.
 
भारतमातेचे पूजन करण्यासाठी तिची प्रतिमा असणे हा एक सांकेतिक भाग झाला. मूर्त स्वरूपातील भारतमातेचे अस्तित्व आणि तिचे पूजन नाकारताना आज भारतमातेचेच काही पुत्र तिच्याशी कृतघ्न होत आहेत, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?