Rashtra Sevika Samiti
@सुनीला सोवनी
पुष्कळदा अशा आंदोलनांनंतर सहभागी कार्यकर्त्यांमधील धग हळूहळू विरत जाते. कार्याला निस्तेजपणा येऊ शकतो. कार्यकर्ते आणि अखेरीस ते सुखाने नांदू लागले... या श्रेणीत जाऊन पोहोचतात. परंतु समितीच्या सेविकांचे असे अजिबातच झाले नाही. उलट आकडेवारी असे सांगते की, त्यानंतरच्या काळात समितीचे कार्य, शाखांची संख्या यात प्रांताप्रांतातून भरपूर प्रमाणात वाढ झाली. त्यावेळेसच्या आंदोलनात सक्रिय असणार्या, नव्याने सक्रीय झालेल्या सेविकांनी स्वतःला विधायक कार्यात गुंतवून घेतले. ‘राष्ट्र सर्वप्रथम’ हे भान कायम ठेवत शाखा, कार्यक्रम व्यक्तीनिर्माण यात त्या पूर्णपणे रमल्या. समितीच्या दृष्टीने ही फार मोठी उपलब्धी आहे यात शंकाच नाही.
आपल्या देशाच्या लोकशाही, स्वातंत्र्य अशा मूल्यांवर घाला घालणारी आणीबाणी लादली गेली तेव्हा मी स्वतः अतिशय लहान नऊ-दहा वर्षांचीच होते. परंतु तो काळच असा संस्मरणीय होता की, त्यामुळे सोलापुरातील आमच्या घरातले वातावरण मला लख्ख आठवते आहे. माझे वडील संघाचे बालपणापासून स्वयंसेवक. पहिल्या संघबंदीवेळीही लहान वयातच विसापूर जेलमध्ये त्यांनी कारावास भोगला होता. आणीबाणीवेळी संघाचे महत्त्वाचे पदाधिकारी असल्याने एखादा महिना भूमिगत राहाण्यात ते सफल झाले. मात्र लगेचच अटक झाल्याने ते मिसाबंदी झाले. संघप्रचारक असणारे काका मुकुंदराव गोरे यांच्यावरही अटक वॉरंट निघाले असल्याने तेही भूमिगत होते. घरात संघप्रचारक, कार्यकर्ते यांची नेहमीच वर्दळ असायची. या सगळ्याचा परिणाम म्हणून गुप्तवेशातील पोलीस आमच्या वाड्याच्या सभोवताली फिरत असत.
घरात जसा संघवाल्यांचा राबता होता, तशीच समिती कार्यकर्त्यांची उठबसही चाले. आई आणि आजी तसेच लग्न झालेली आत्या समितीच्या सेविका म्हणून कार्यरत होत्या. घरातच आईची व शेजारच्या वाड्यात आजीची शाखा चाले. कार्यकर्त्यांची जोरदार धरपकड सुरू झाली होती. घराघरांतले कर्ते पुरुष जेलमध्ये गेलेले.
आम्ही तिन्ही भावंडे लहान होतो, आजोबांचे त्याच काळात निधन झाले होते तरी सुद्धा न डगमगता आई व आजी आणीबाणी विरोधातील प्रत्येक कार्यात सहभागी झाल्या.
लोक संघर्ष समितीच्या वतीने सत्याग्रहांची योजना बनली. त्यातला एक सत्याग्रह आमच्याच घरातून होणार होता. एका बोळाच्या शेवटी आमचा वाडा. बोळाच्या तोंडाशी, तेथून जवळच असणार्या दत्त चौकात सुगावा लागल्याने पोलिसांनी घेराबंदी केली होती. परंतु त्या आधीच सत्याग्रहात भाग घेणार्या सर्व सेविका आमच्या घरी पोहोचल्या होत्या. बाहेर पोलिसांचे जथ्थे उभे असल्याने बायकांनी एक युक्ती शोधून काढली. दुसर्याच गल्लीत जाणार्या भिंतीला शिडी लावून तिच्या साहाय्याने सगळ्या जणी खाली उतरल्या आणि योजनेप्रमाणे सत्याग्रह यशस्वी करून दाखवला! त्या वेळच्या त्यांनी दिलेल्या घोषणा, वाड्यातल्या सर्वांनी सत्याग्रहींना दिलेली साथ मला आजही आठवते आहे.
मातृशक्तीचा हा शौर्य आविष्कार ज्यात माझी आईसुद्धा सहभागी होती, मी कधीच विसरू शकणार नाही. इतरांना त्रास नको म्हणून सत्याग्रहात भाग घेतलेल्या सर्व सेविकांनी जेलचेच अन्न घेतले. तीन आठवड्यांनी परतलेली व कारागृहात डास, अन्य कीटक चावल्याने हाता-पायावर फोड आलेली माझी आई मला अजूनही समोर दिसते.
केवळ महिलांच्या गटाचे 3/4 सत्याग्रह त्यावेळी सोलापुरात झाले. बहुतेकींची मुले लहान होती त्यामुळे सहभागी सेविकांनी सत्याग्रह करतानाच योजना अशी केली की, ज्या तुकडीतील महिलांच्या मुलांचा संगोपनाचा प्रश्न असेल त्यांची मुले पुढच्या तुकडीतील महिलांच्या घरी राहतील. मला आठवते मंगला वहिनी पात्रुडकर सत्याग्रही झाल्या तेव्हा त्यांची मुले आमच्या घरी राहायला होती.
पुरुष जेलमध्ये गेले त्यावेळी नोकरी करणार्या महिलांचे प्रमाण अगदीच थोडे असल्याने घरोघरी आर्थिक प्रश्न कठीण झाला होता. अशा वेळी सोलापुरातील या सेविकांनी चटण्या, लोणची, मसाले, पापड इ.चे दुकान चालवायला घेतली. माझ्या आईसह अनेक बायका कुठून तरी कापडाचे विशिष्ट आकारातील रंगबिरंगी तुकडे घेऊन येत ते परस्परांशी जोडून त्याच्या पिशव्या शिवत व मग त्या विक्रीला देत. एकीकडे अर्थार्जनासाठी धडपड दुसरीकडे सत्याग्रहींना डबे पुरवणे, पत्रके पोहोचवणे, एकमेकींच्या घरी जाऊन धीर देणे अशी कित्येक कामे त्या विलक्षण देशनिष्ठेतून करीत होत्या.
गिरणगाव अशी प्रसिद्धी असणार्या सोलापुराचे वृत्त सविस्तर देण्याचे कारण इतकेच की, त्या वातावरणाची मी स्वतः साक्षी होते आणि सोलापुरातील समितीच्या सेविकांचे हे कार्य प्रातिनिधिक स्वरूपाचे असे आहे.
आणीबाणी लादल्यापासून त्यानंतरच्या निवडणुकीत विजय मिळेपर्यंतच्या 19 महिन्यांच्या काळातील सेविकांनी दाखवलेले असामान्य धैर्य, शौर्य, चातुर्य, प्रगल्भता, विवेक, जाज्ज्वल्य देशभक्ती याची शेकडो उदाहरणे भारतभरातून प्राप्त होतात.
ज्या वयात उत्तम करिअरची अथवा सुखी संसाराची मधुर स्वप्ने तरुणी पाहतात अशा 18/20 वर्षांच्या वयात व्यक्तिगत जीवनाची पर्वा न करता शिक्षण अर्धवट सोडून तरुण सेविकांनी, आपणही जेलमध्ये गेल्यास घरातील प्रश्न जास्त जटिल होईल हे माहीत असूनही गृहिणींनी सत्याग्रहामध्ये धडाडीने भाग घेतला. सेविका जेलमधील संघ अधिकारी, कार्यकर्ते आणि जेलबाहेर भूमिगत असणारे अधिकारी, प्रचारक यांच्यामधील विश्वसनीय खंबीर दुवा बनल्या. भूमिगत प्रचारकांना आपल्या घरी ठेऊन घेतानाच त्यांच्या रक्षणाची जबाबदारी साहसाने पार पाडली. कधी मुलगी तर कधी बहीण बनून त्यांच्या सोबत प्रवास केला, महत्त्वपूर्ण वस्तू, कागदपत्रे जोखीम घेऊन योग्य स्थळी पोहोचवली.
सेविकांनी लहान-मोठे उद्योग सुरू केले. सायक्लोस्टाईल पेपर छापण्यात, ते घरोघरी वाटण्यात पुढाकार घेतला. डबे गोळा करून जेलमधील बंधुभगिनींना दिले. प्रसंगी जीवावर बेतले तरी ब्र नाही काढला कधी.
राष्ट्र सेविका समितीचे कार्य आणीबाणी येईपर्यंत म्हणजेच 1975 पर्यंत देशातल्या सर्व प्रांतांमधून सुरू झाले असले तरी अनेक प्रांतांमधून त्याचा आजच्या इतका विस्तार झालेला नव्हता. शाखांची संख्या तुरळकच होती.
मिसाबंदींच्या यादीमध्ये सेविकांची नावे कमीच आढळतील. मात्र संघावर बंदी आली, स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर जेलमध्ये गेले, सत्याग्रह सुरू झाले तसे महिलांनी झपाटल्यागत आणीबाणीविरोधी कार्यात स्वतःला झोकून दिले. हां हां म्हणता समितीच्या सेविकांनी घरोघरी जाऊन महिलांची एक संघटित शक्ती उभी करण्यात यश मिळवले.
मिसाबंदींच्या यादीमध्ये सेविकांची नावे कमीच आढळतील. मात्र संघावर बंदी आली, स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर जेलमध्ये गेले, सत्याग्रह सुरू झाले तसे महिलांनी झपाटल्यागत आणीबाणीविरोधी कार्यात स्वतःला झोकून दिले. हां हां म्हणता समितीच्या सेविकांनी घरोघरी जाऊन महिलांची एक संघटित शक्ती उभी करण्यात यश मिळवले. भूमिगत संघप्रचारक, कार्यकर्ते यांच्या बरोबरीच्या स्थानिक स्तरावरील बैठकीत, योजनेत त्या सहभागी झाल्या. केंद्र स्तरावरून आणीबाणी विरोधातील लढ्यात सेविकांनी लोक संघर्ष समिती, विद्यार्थी परिषद यांच्या नावे सहभागी व्हावे असे पत्र समिती संस्थापिका वं. मावशी केळकर यांनी सर्व सेविका प्रमुखाकडे पाठवले. जागोजागीच्या सेविकांनी स्वयंस्फूर्त आघाडी घेतलेली होतीच!
या लेखाच्या निमित्ताने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता लक्षात असे आले की, समितीच्या विद्यमान नेतृत्वातील (वय 70 किंवा अधिक) सर्वच्या सर्व जणींनी आणीबाणीविरोधी लढ्यात सत्याग्रह केला होता. सर्व त्या कार्यात कसलीच तमा न बाळगता आघाडीवर राहिल्या होत्या. उदा. समितीच्या सहकार्यवाहिका अलकाताई इनामदार 90 दिवस, दुसर्या सहकार्यवाहिका चित्राताई जोशी 50 दिवस जेलमध्ये होत्या. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी आणीबाणीविरोधी लढ्यात भाग घेतला होता. आता कार्यकारिणी सदस्य असणार्या रेखाताई राजे दोन महिने कानपूरच्या जेलमध्ये होत्या. कसलेच काही कळत नसताना जेलमधील एका वेडसर बाईचे बाळंतपण त्यांनी केले. तिच्या शैशवास जपले. विद्यमान प्रमुख संचालिका मा. शांताक्का यांनी सत्याग्रह करीत बंगलोर येथील महिला कार्यकर्त्यांचे नेतृत्व केले होते.
त्याचबरोबर आणीबाणीत देशातील विशेषतः जनसंघाचे दिग्गज नेते बंगलोरच्या कारागृहात होते. कारागृहातील नेते व कारागृहाबाहेरील शेषाद्रीजी यांच्यासारखे नेते यांच्यामधील विश्वसनीय संपर्क दुवा म्हणून वं. शांताक्कांचे कार्य फारच महत्त्वाचे ठरले आहे.
अक्कांची आई राजम्मा ( वय 105 वर्षे) या देखील जातिवंत देशभक्त! त्यांनीच आपल्या तीनही मुलांना शाखेत पाठवले. आणीबाणीच्या संदर्भात त्यांचे उदाहरण फारच प्रेरक आहे. आणीबाणीच्या वेळी शांताक्कांचे वडील अर्धांगवायूने अंथरुणाला खिळून होते. दोन्ही भाऊ भूमिगत झाले होते. मात्र संघकार्यकर्त्यांचे, नेत्यांचे घरात येणे पूर्वीप्रमाणेच चालू होते. चौकशीसाठी पोलीसही वरचेवर येत असत. एकदा संघाचे वरिष्ठ अधिकारी सूर्यनारायण राव व त्यांचे बंधू नरहरीजी घरात असतानाच (दोघांवरही पकड वॉरंट होते) चौकशीला पोलीस आले. राजम्मांनी सांगितले की, घरात पतीशिवाय कोणीच नाही परंतु पोलिसांचा विश्वास बसेना. राजम्मांना संघकार्यकर्त्यांना वाचवणे हे आपले आद्य कर्तव्य वाटले. शेवटी त्यांनी मुलांची शपथ घेऊन सांगितले की, घरात आणखी कोणीही नाही. मुलांची शपथ घेतल्यामुळे पोलिसांचा विश्वास बसला आणि ते निघून गेले. सूर्यनारायण राव यांची अटक टळली.
कोणत्याही आईसाठी आपली मुले म्हणजे काळजाचा तुकडा असतो. त्यांच्या संदर्भात इतर कोणी वाईटसाईट बोलले, शपथ घेतली तरी ती आईला सहन होत नाही. परंतु राजम्मांना आपण सत्यनिष्ठ आहोत, देव आपले वाकडे करणार नाही यावर ठाम विश्वास होता. राष्ट्र प्रथम हे भान त्यांनी प्रज्वलित ठेवले.
समितीच्या दुसर्या प्रमुख संचालिका वं. ताई आपटे यांचा जनसंपर्क दांडगा होता. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस येरवडा कारागृहात होते. ताई आपटे त्यांची बहीण होऊन भेटीला जात असत. सर्वांसाठी सुग्रास खाऊ नेत.
समितीच्या दुसर्या प्रमुख संचालिका वं. ताई आपटे यांचा जनसंपर्क दांडगा होता. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस येरवडा कारागृहात होते. ताई आपटे त्यांची बहीण होऊन भेटीला जात असत. सर्वांसाठी सुग्रास खाऊ नेत. परंतु खायला घालणे इतकेच काम त्या नक्कीच करत नव्हत्या. त्यादेखील संपर्क दूत म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरीवर सातत्याने होत्या. वं. ताईंनी 5 सुवासिनींनी बरोबर घेऊन आपल्या जेलमधील भावाची म्हणजे पू. बाळासाहेबांची एकसष्ठी साजरी केली होती.
सर्वच्या सर्व मिसाबंदीच्या घरचा योगक्षेम पाहणे, सत्याग्रहींची विचारपूस करणे त्यांनी आपले कर्तव्य मानले. केवळ पुण्यातीलच नव्हे तर अन्यत्र सर्व ठिकाणी या कार्यामध्ये समितीच्या सेविकांची मजबूत फळी कार्यबद्ध होईल यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले.
इथे हेही नमूद करायला हवे की, ज्या कारागृहांमधून मिसाबंदी ठेवलेले असत त्यांच्या नातेवाईकांची व्यवस्था समितीच्या सेविका आपल्याच घरी करीत असत. नातेवाईकांचे हवे नको पाहाणे कारागृहापर्यंत सोबत करणे अशा प्रकारची कामे सुद्धा सेविकांनी केली आहेत.
आणीबाणी वेळी महाराष्ट्रात बंद घरांमधून काही प्रमाणात शाखा चालू होत्या मात्र एकूणच दहशतीचे वातावरण असल्याने शाखा चालणे अवघड जात होते. अशावेळी पौरोहित्य वर्ग, श्री सूक्त वर्ग या नावाखाली समितीचे नित्य काम चालू ठेवण्यात समितीला यश आले.
समितीच्या प्रथम प्रचारिका सिंधुताई फाटक यांनी उत्तर भारतातील सर्वसामान्य महिलांना पडदा पद्धती, इतर अनेक रूढीग्रस्त विचारातून बाहेर काढत राष्ट्रभक्तीचे जागरण घडवण्यात, महिलांचे संघटन करण्यात अनमोल कामगिरी बजावली आहे.
आणीबाणी प्रसंगी त्यांचे कार्य असाधारण असे होते. विशेषतः पंजाब, जम्मू -काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश येथील महिलांना उभे करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. युवती विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून, गृहिणी विभिन्न जागरण समित्यांच्या अंतर्गत लढाईच्या सैनिक बनल्या. पत्रक वाटणे, जेल भरो आंदोलन करण्यापासून निवडणूक जाहीर झाल्यावर कोपरा सभा घेणे, घरोघरी जाऊन संपर्क करणे अशी अनेक कामे महिलांनी/सेविकांनी केली आहेत. समितीच्या बौद्धिक प्रमुख शरद दीदी सांगतात, आणीबाणीच्या वेळेपर्यंत मथुरेत समितीची शाखा नव्हती. सिंधुताईंमुळे नाव फक्त ऐकले होते. परंतु माझ्या भावाला अटक झाली. त्याचे खूप हाल झाले, तेव्हा आपणही या कार्यात स्वतःला झोकून द्यायचे असे मी ठरवले. आणीबाणीत विद्यार्थी परिषदेच्या अंतर्गत आम्ही अनेक युवती सांगितली जातील ती सर्व कामे करीत होतो. आणीबाणी संपताच समितीशी प्रत्यक्ष संपर्क आला आणि मी प्रचारिका बनले!
विवाहानंतर स्वतःबरोबर समितीलाही आसाममध्ये घेऊन गेलेल्या लीलावती कुसरे मावशींनी (यांचे जीवन पुस्तकाचा विषय होऊ शकतो) आणीबाणी विरोधात पूर्वांचलात अफाट काम करून दाखवले आहे. उत्तर आसाममधील नौगावला त्या राहात असत. त्यांचे घर म्हणजे प्रचारकांसाठीचे आश्रयस्थान. विविध क्लृप्त्या योजून भाऊराव देवरस, मधुकर लिमये अशा शीर्षस्थ संघकार्यकर्त्यांचा आसाममधील प्रवास त्यांनी सुकर करून दाखविला. घरातल्या आतल्या बाजूस गुप्त बैठका आणि बाहेरच्या बाजूस भजनकीर्तनाचे मेळे अशा स्वरूपात त्यांचे साहाय्य चाले. मोहनलाल नावाच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी मावशींनी मैत्र जमवले होते. पोलिसांच्या योजना आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात मावशी तरबेज झाल्या होत्या. खबरी देण्याची अशी जबाबदारी त्यांनी उत्तमपणे पार पाडली. त्याचप्रकारे ज्यांची धरपकड झाली होती अशा घराघरांशी मावशींनी संपर्क ठेवला होता. त्या व रमा जालान अशा अनेक सेविकांनी अगदी ओढा, नदी ओलांडून लांबवरचा प्रवास करीत महिलांचे मनोधैर्य टिकवण्यात आणि त्यांना आणीबाणीविरोधातील लढाईसाठी सिद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावली.
देशभरातील समिती कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचा, कर्तृत्वाचा गोषवारा एकत्र केल्यास आपला नवरा, भाऊ, वडील किंवा अन्य कार्यकर्ते यांच्यावरील आघात त्यांनी आपल्यावरील आघात मानला. संघाच्या शाखेत न जाताही संघकार्याला तोलून धरले. व्यक्तिगत जीवनाची फिकीर न करता राष्ट्र सर्वप्रथम या उक्तीला कृतीची कमाल जोड दिली. सर्वच्या सर्व महिलांना सैद्धांतिक भूमिका पुरतेपणाने उमगली होती असे मुळीच नाही. परंतु आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आहे, स्वातंत्र्याचा गळा घोटला जातोय, सज्जनांना-देशभक्तांना त्रास दिला जातोय हे पूर्णपणे समजले होते. म्हणूनच त्यावेळेच्या लढाईत त्या बेधडकपणे सहभागी झाल्या.
या लढाईमध्ये समाजातील मातब्बर मंडळींनी आणीबाणीला विरोध करावा यासाठी प्रयत्न चालले होते. त्यात देखील समितीच्या सेविका प्रयत्नशील होत्या. उदाहरणार्थ, विनोबा भावे यांना भेटायला नागपूरहून कार्यकर्त्यांची एक टोळी गेली होती.
स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा परंतु स्वातंत्र्यासाठीचा हा लढा समाजाने निकराने लढला. ज्यात प्रत्येक प्रांतातील बहुतांश सेविका झटून सहभागी झाल्या. खरे तर लढ्यातील हे कर्तृत्व समितीसाठी केवढी भूषणास्पद गोष्ट आहे? परंतु सेविका आपल्या पराक्रमाकडे केवळ कर्तव्यधर्म म्हणून पाहतात. आपला धर्म आपण निभावला अशी त्यांची भावना असते!
पुष्कळदा अशा आंदोलनांनंतर सहभागी कार्यकर्त्यांमधील धग हळूहळू विरत जाते. कार्याला निस्तेजपणा येऊ शकतो. कार्यकर्ते आणि अखेरीस ते सुखाने नांदू लागले... या श्रेणीत जाऊन पोहोचतात. परंतु समितीच्या सेविकांचे असे अजिबातच झाले नाही.उलट आकडेवारी असे सांगते की, त्यानंतरच्या काळात समितीचे कार्य, शाखांची संख्या यात प्रांताप्रांतातून भरपूर प्रमाणात वाढ झाली. त्यावेळेसच्या आंदोलनात सक्रिय असणार्या, नव्याने सक्रीय झालेल्या सेविकांनी स्वतःला विधायक कार्यात गुंतवून घेतले. राष्ट्र सर्वप्रथम हे भान कायम ठेवत शाखा, कार्यक्रम व्यक्तीनिर्माण यात त्या पूर्णपणे रमल्या. समितीच्या दृष्टीने ही फार मोठी उपलब्धी आहे यात शंकाच नाही.
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. एवढे तेवढे कार्य किंवा केलेले एखादे भाषणसुद्धा गाजावाजा करून लोकांसमोर सांगितले जात असते. नसलेले श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असतो. अशा काळातही आपल्या कर्तृत्वाकडे किती निरपेक्षपणे पहिले जाऊ शकते याची प्रचिती समितीच्या कार्यकर्त्या देत असतात.
मागील वर्षी काशीतील फेब्रुवारी बैठकीनंतर श्री राम दर्शनाचा विषय सुरू झाला तेव्हा चित्राताई जोशी सहजगत्या बोलून गेल्या आवश्यकता होती त्यावेळी आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह केला. आवश्यकतेप्रमाणे रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. आता आपले काम झाले आहे. दर्शन होईल तेव्हा होईल...!
अशा निर्लोभी, देशभक्त, समाजकार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारताचा महारथ पुढे पुढे जात असतो. त्या काळात विलक्षण साहस दाखवलेल्या कोणाही सेविकेशी बोला त्यांचा आनंदाने चेहरा फुलतो, डोळे लकाकतात, भरभरुन सांगतात पण त्यात अहंकाराचा लवलेश नसतो. द्वेषाची भावना नसते. अपेक्षा तर नसतेच नसते. असते ती केवळ आपण ही त्या लढाईतले एक घटक होतो त्यामुळे आपल्या जीवनाचे सार्थक झाले अशी एकमेव भाग्य भावना!!
प्रणम्यां मातृदेवता!!!
पत्रकार, अ.भा.प्रचार प्रमुख, राष्ट्र सेविका समिती