सांगली - “डॉ. कुसुमताई घाणेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमातील या कुसुमगंधाने माझंही आयुष्य सुगंधित झालं. एका स्त्रीने समाजासाठी समर्पित वृत्तीने केलेले काम किती मोठा आकार घेेऊ शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. कुसुमताई घाणेकर यांनी स्थापन केलेली भगिनी निवेदिता प्रतिष्ठान ही संस्था. संस्थेचा हा वटवृक्ष थेंब थेंब प्रेमाचं, शिस्तीचं आणि संवेदनशीलतेचे सिंचन केल्यामुळेच एवढा बहरला आहे“ या शब्दांत कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या भारतीय सैन्यदलातील निवृत्त मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांनी कामाची प्रशंसा केली.
भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या संस्थापिका डॉ. कुसुमताई घाणेकर यांची जन्मशताब्दी आणि संस्थेची 55वी वर्षपूर्तीनिमित्त ‘निवेदिता सुकन्या संमेलन’ विष्णुदास भावे नाट्यमंदिर, सांगली येथे शनिवार दि. 21 जून 2025 रोजी आयोजित केले होते. या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष नीता दामले, सचिव विनीता तेलंग, कुसुताईंची भाचेसून व नागूपर येथील (BNP) संस्थेच्या संचालिका संजीवनी घाणेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा संचालक सुधीर चापोरकर, आमदार सुधीर गाडगीळ, आणि प्रमुख वक्त्या मोहिनी गर्गे-कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर होते. सांगलीतील मान्यवर व सुजाण नागरिकही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
“लष्करी जीवन ‘मी’ नसून ‘आम्ही’चा प्रवास शिकवते. ही वर्दी म्हणजे केवळ कापडाचा पोत नाही तर शौर्याची, हौतात्म्याची ती एक समृद्ध परंपरा आहे.“ असं प्रमुख वक्त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या. लष्कराचे अनुभव सांगताना त्यांनी काश्मीरमधील हृदयद्रावक आठवणीदेखील सांगतिल्या. दुसर्या दिवसाचा सूर्र्योेदय नव्या दृष्टिकोनातून बघता येणं म्हणजे सैनिक असणं. दुःखातदेखील आपलं मनोबल टिकवून ठेवणं म्हणजे सैनिक होणं या शब्दांत सैनिकी जीवनाचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं. अतिशय प्रेरक आणि रंगत गेलेली ही मुलाखत संस्थेच्या सचिव विनीता तेलंग यांनी घेतली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कुसुमताई घाणेकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा माहितीपट दाखवण्यात आला. भगिनी निवेदिता संस्थेच्या अध्यक्षा नीता दामले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुकन्या सन्मान संमेलनाची संकल्पना संस्थेच्या कोषाध्यक्ष निलिमा भिलवडीकर यांनी सांगितली. या कार्यक्रमात सुकन्यांना शाल आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्राचे वाचन संस्थेच्या सह कोषाध्यक्ष ॠता जोग यांनी केले.
संमेलनात सहभागी झालेल्या सुकन्यांना संरक्षण दलात असलेल्या संधींविषयी मार्गदर्शन करताना,“कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर योग्य निर्णयक्षमता ही फार महत्त्वाची असते. तसेच दृढ निश्चयाबरोबर लवचिकताही आवश्यक असते. आयुष्याला टीपकागद करावे, जे जे चांगले आहे ते ते टिपत जावे आणि समृद्ध व्हावे. शरीर सामथ्यार्र्ची किल्ली मनाच्या सामर्थ्यात दडलेली असते. मनशक्ती वाढविण्याकडे भर द्यायला पाहिजे. मन स्वस्थ असेल तर कुठल्याही क्षेेत्रात उत्तुंग भरारी घेऊ शकतो, उत्तम निर्णय करू शकतो.” असे मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांनी सांगितले.
जिल्हा संघचालक सुधीर चापोरकर हे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, “हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या आपल्या देशाला जन्मशताब्दी साजरी करणे काही नवीन गोष्ट नाही. परंतु ज्या कामासाठी ती व्यक्ती जगली, त्या कामाची आजची स्थिती काय आहे याचे स्मरण करण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीची जन्मशताब्दी साजरी होणे हे भाग्य फार कमी जणांना लाभते. 55 वर्षांपूर्वी कुसुमताईंनी सांगलीसारख्या एका ग्रामीण भागात महिलांसाठी काम करणार्या एखाद्या संस्थेची स्थापना करावी आणि 55 वर्षांनंतर त्याचा विकास व्हावा ही सामान्य गोष्ट नाही. या संस्थेने महिलांना शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, रोजगार क्षेत्र, एकंदर महिला स्वावलंबी कशा होतील हे पाहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना उत्तम माणूस व्हायला शिकवलं, हे संस्थेच सर्वात मोठे यश आहे. या संस्थेतून निर्माण होणार्या सुकन्यांच्या मनात निर्धार जागवला. स्वतःच्या समर्पणाने, अविरत कष्टाने, सातत्यपूर्ण प्रयत्नाने संस्थेला फार पुढे नेले. हे करत असतानाच नवनवीन कार्यकर्त्या कशा घडतील याकडे लक्ष दिले. आज त्यांच्या पश्चातही संस्था अतिशय दमदारपणे वाटचाल करीत आहे आणि यापुढे करीत राहील हे आश्वासन कार्यकारिणी सदस्यांकडून मिळतो आहे, हेच या संस्थेची समाजाची कणव आणि संवेदनशीलता टिकून आहे याचे द्योतक आहे.

“लहानपणापासून भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संस्थेचे कार्य मी पाहिले आहे. डॉ. कुसुमताई आणि कमलताई जोग यांची समर्पित आणि सेवाभावी वृत्ती यामुळेच ही संस्था महिलांच्या समस्येचे समाधान शोधण्यास यशस्वी झाली आहे. असे मत सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मांडले.
संस्थेत घडलेल्या निवडक शंभर सुकन्यांची यशोगाथा, संस्थेची वाटचाल, कुसुमताईंच्या आठवणी याचा लेखाजोखा म्हणजे कुसुमगंध ही स्मरणिका. या स्मरणिकेचे मुखपृष्ठ निवेदिता प्रतिष्ठान बालगृहातील विद्यार्थिनी आणि आज स्वतःच्या आयुष्यात उल्लेखनीय यश मिळवलेली काजल पाटील हिने रेखाटले आहे. स्मरणिकेची संकल्पना संस्था सदस्य काव्यश्री नलावडे यांनी मांडली. कुसुमगंध या स्मरणिकेचे प्रकाशन सांगली आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्या काळे यांनी केले तर सूत्रसंचालन अनिता पागे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राने झाली.