@आनंद हर्डीकर

विवेकानंद केंद्राचे भूतपूर्व अध्यक्ष पद्मभूषण पी. परमेश्वरन यांनी मूळ लिहिलेला आणि तरुण भारत पुणेचे भूतपूर्व संपादक बापूसाहेब भिशीकर यांनी अनुवादित केलेला ‘मार्क्स आणि विवेकानंद‘ हा ग्रंथ 1993 सालानंतर प्रकाशित होऊ शकला नव्हता. मार्क्सनं मांडलेलं कम्युनिझमचं तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणणारा कम्युनिस्ट पक्ष आणि विवेकानंदांनी पुरस्कारलेल्या हिंदुत्वाच्या तत्त्वज्ञानाला कार्याची जोड देऊन ते पुढे नेणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज शताब्दीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या दोन्ही संघटनांच्या कार्यातून निर्माण होणारी वैचारिक घुसळण आजच्या घडीला आवश्यक आहे, विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे 4 जुलै रोजी पुण्यात प्रसिद्ध होणारे हे पुस्तक त्या घुसळणीला दिशा देईल, असा विश्वास आहे.
सप्टेंबर 1993 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेतील विश्वविजयी भाषणाची शताब्दी साजरी केली जात होती, तेव्हा त्या निमित्ताने पुण्यात भारतीय विचार साधना या प्रकाशन संस्थेतर्फे एका महत्त्वाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. ’मार्क्स आणि विवेकानंद : एक तौलनिक अध्ययन’ हे ते पुस्तक. केरळमधील पी. परमेश्वरन या ज्येष्ठ विचारवंताने 1987 साली मूळ इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकाचा ज्येष्ठ पत्रकार चं. प. तथा बापूसाहेब भिशीकर यांनी केलेला तो मराठी अनुवाद होता. सुप्रसिद्ध अमोघ वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या शुभहस्ते त्या पुस्तकाचे समारंभपूर्वक प्रकाशन पुण्यात झाले होते आणि त्याला वाचकांचाही चांगला प्रतिसादही लाभला होता.
तथापि या ना त्या कारणाने त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती मात्र प्रकाशित होऊ शकली नव्हती. पी. परमेश्वरन यांना पद्म पुरस्कार मिळाला तेव्हा आणि त्यांचे दु:खद निधन झाले तेव्हाही तशी आवृत्ती काढली जावी, अशी मागणी झाली होती. नाही म्हणायला विवेकानंद केंद्र प्रकाशन ट्रस्टने ‘हार्टबीटस ऑफ हिंदू नेशन‘ या नावाने परमेश्वरन यांच्या निवडक साहित्यावर आधारित तीन खंडांचा संच प्रकाशित केला होता. त्यात ‘ मार्क्स आणि विवेकानंद ‘ या ग्रंथाचा संपादित भाग समाविष्ट करण्यात आला होता.
दत्तप्रसाद दाभोळकरांसारखे डावे विचारवंत विविध स्तरांवरील पुस्तके लिहून स्वामी विवेकानंदांना हिंदू धर्मविरोधकाच्या स्वरूपात प्रस्थापित करण्याची विकृत मोहीम चालवू लागल्यानंतर तर या पुस्तकाची गरज अधिकच जाणवत होती. परंतु भारतीय विचार साधना या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करेल अशी अपेक्षा असल्याने विवेकानंद केंद्राने त्याचा गांभीर्याने विचार केला नव्हता. आज मात्र ’ विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागा’तर्फे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध होते आहे, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे..
जगभरात मार्क्सवादाची प्रचंड पीछेहाट झाली आहे. भारतातही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह डाव्या विचारसरणीच्या अन्य राजकीय पक्षांच्या प्रभावाला ओहोटी लागली आहे. भारतीय संघराज्यात एखाद-दुसरेच राज्य असे शिल्लक राहिले आहे की, जेथे हे पक्ष कसेबसे तग धरून आहेत. या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ पुनर्प्रकाशित होत आहे..
पण मुळात या तौलनिक समीक्षाग्रंथाची काही विशेष गरज आहे का, असा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष मराठी अनुवादाचे पुस्तक प्रकाशित झाले, तेव्हादेखील हा प्रश्न खुद्द अनुवादक चं. प. तथा बापूसाहेब भिशीकर यांनाही काही मित्रांनी विचारला होताच. आपल्या ’मनोगता’त त्यांनी त्या प्रश्नाचा उल्लेख करून त्याला उत्तरही दिले होते. ’मार्क्सवादाचा राजकीय प्रभाव अस्तंगत होत असला, तरीही त्या तत्त्वज्ञानाने जगभर ज्या जाणिवा निर्माण केल्या, त्यांची दखल यापुढेही सर्वांना घ्यावी लागणारच आहे,’ असे त्यांनी म्हटले होते. गेल्या तीन दशकात त्यांच्या त्या म्हणण्याचे प्रत्यंतर आले आहेच.
शिवाय या पुस्तकात मार्क्सप्रमाणेच स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्याबद्दलही विवेचन करण्यात आले आहे. ‘स्वामी विवेकानंद हे जणू मार्क्सवादीच होते, अशा अभिनिवेशाने त्यांचे काही उद्गार संदर्भापासून तोडून वापरण्याचा पद्धतशीर प्रयत्न भारतातील साम्यवादी पुढारी करीत आहेत,’ याचाही उल्लेख भिशीकरांनी ’मनोगता’त केला होता. डाव्या विचारसरणीच्या अनेक लेखकांकडून तसा प्रयत्न आजही सातत्याने केला जात असल्याचे आपण पाहात आहोत.
अशा परिस्थितीत पी. परमेश्वरन यांनी या पुस्तकात तशा प्रयत्नांमधील फोलपणा ज्या तर्कशुद्ध आणि समतोल पद्धतीने दाखवून दिला आहे, तो वैचारिक क्षेत्रात खचितच लक्षणीय ठरणारा आहे. मार्क्सवादी जीवनदर्शन आणि हिंदू जीवनदर्शन यांचा अभिनिवेशविरहित असा एक तौलनिक आलेखच त्यांनी वाचकांसमोर मांडला आहे. कार्ल मार्क्स यांचे मोठेपण मान्य करूनही त्यांनी प्रवर्तित केलेल्या तत्त्वज्ञानाच्या स्पष्ट झालेल्या मर्यादा त्यांनी दाखवून दिल्या आहेत आणि स्वामी विवेकानंदांच्या नवपुनरुत्थानवादी संदेशाचे सौम्यीकरण करण्याच्या प्रयत्नांवर टीकाही केली आहे.
असे करताना त्यांनी मार्क्स यांच्या जडवादी तत्त्वज्ञानापेक्षा ऐहिक अभ्युदयाबरोबरच आध्यात्मिक मूल्यसाधनांचाही समन्वय साधणारे स्वामी विवेकानंदांचे वेदांतप्रणीत हिंदू तत्त्वज्ञान कसे अधिक प्रभावी आहे, याचे साधार विवेचनही केले आहे. ते असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे ठरेल, याबद्दल विश्वास बाळगायला हरकत नाही..
या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या समाजहितैषी न्यायनिवाड्यांमुळे खूप गाजलेले, डाव्या विचारसरणीकडे झुकलेले न्या. व्ही. आर. कृष्णा अय्यर यांनी प्रथम आवृत्तीला लिहिलेली प्रदीर्घ प्रस्तावना!
’जगाला धक्का देणारे आणि आकारही देणारे दोन भिन्न प्रवृत्तीचे क्रांतिकारक, त्यांचे जीवन आणि तत्त्वज्ञान यांची तुलना’ त्या प्रस्तावनेत करण्यात आली आहे.’
विवेकानंदांचे विचार वाचत असताना कधीकधी नवलाने असे वाटून जाते की, हा महापुरुष म्हणजे आध्यात्मिकतेने सर्वस्वी भारलेला कार्ल मार्क्सच तर नव्हे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे आणि ’अर्थात मार्क्सचा अतिरेकी जडवादी मूल्यात्मक आधार वगळून!’ अशी जोडही त्याला दिली आहे. हा प्रश्न विचारत असताना त्यांनी पारंपरिक हिंदुत्ववाद्यांच्या मनात तरंगांची वर्तुळे निर्माण केली आहेत. मार्क्सवाद्यांमधील कडव्या असहिष्णू प्रवृत्तींवर खुद्द कार्ल मार्क्स यांनीच 1870नंतरच्या दशकभरात जी कठोर टीका केली होती, ती उद्धृत केली आहे आणि आजही आंधळेपणाने मार्क्सवादाची री ओढणारे जे कुणी महाभाग आहेत, त्यांना नव्याने त्या तत्त्वज्ञानाचे मूल्यमापन करण्याचा अप्रत्यक्ष सल्लाही त्यांनी दिला आहे. एखाद्या वैचारिक पुस्तकाला कशी प्रस्तावना असावी, याचा एक आदर्श वस्तुपाठच न्या. व्ही. आर. कृष्णा अय्यर यांनी आपल्यासमोर सादर केला आहे.
पी. परमेश्वरन यांच्या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांचा अफाट व्यासंग जसा सर्वच्या सर्व अकरा प्रकरणांच्या शेवटी दिलेल्या संदर्भटिपांवरून सहज लक्षात येण्यासारखा आहे, तसाच तो पानोपानी विखुरलेल्या नेमक्या उद्धरणांमुळेही जाणवण्यासारखा आहे. तो एकसुरी, एककल्ली, एकाक्ष अजिबात नाही. ज्या दोन क्रांतिकारक महापुरुषांची त्यांनी तौलनिक चिकित्सा केली आहे, त्या दोघांचे समग्र साहित्य तर त्यांनी अभ्यासलेले आहेच, पण त्या त्या महापुरुषांच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी काय काय लिहून ठेवले आहे, याचाही धांडोळा त्यांनी घेतला आहे..
अगदी थोडक्यात उल्लेख करायचा झाला, तर भारतातल्या समाजवादी उत्क्रांतीच्या दृष्टीने स्वामी विवेकानंदांचे महत्त्व ओळखणारे पहिले साम्यवादी विचारवंत के. दामोदरन यांच्या ’खपवळरप ढर्हेीसहीं’ या अभ्यासपूर्ण पुस्तकातील एक उद्धरण जसे पी. परमेश्वर यांनी दिले आहे, तसेच मार्क्स यांच्या भारताबद्दलच्या भाष्याबाबत नंबुद्रिपादांसारखे नेते कायम पोथीनिष्ठ भूमिका घेत राहिले असले, तरी हिरेन मुखर्जी यांनी मात्र मार्क्स यांच्या आकलनातील त्रुटी व उणिवा मान्य करण्याचे औदार्य दाखवले आहे, हेसुद्धा त्यांनी लक्षात आणून दिले आहे..
एकीकडे स्वामी विवेकानंदांबद्दल चीनमधील इतिहासाचे प्राध्यापक हुआंग चुआन यांच्यासारख्या विद्वानांची मते परमेश्वरन यांनी उद्धृत केली आहेत, तर दुसरीकडे स्वामी विवेकानंदांच्या संदेशातली विजिगीषू प्रेरणा सौम्य करण्याच्या रामकृष्ण मिशनच्या अनाकलनीय प्रयत्नांवर सोदाहरण परखड टीकाही केली आहे.त्या संस्थेने 1926 साली भरवलेल्या मेळाव्यात स्वामीजींचा गौरव करताना त्यांचे हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाशी असणारे अभिन्न नाते अधोरेखित केले होते. ’स्वामी विवेकानंद म्हणजे सद्गुरूंचे काषायवस्त्रधारी सेनापतीच! त्यांनी आपल्या धर्माच्या मृत अस्थींत नवचैतन्य ओतले आणि हिंदूंना धैर्यशील व आत्मविश्वाससंपन्न बनवले.’असे ठामपणे प्रतिपादन करून तोच वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला होता..
तथापि काळाच्या ओघात रामकृष्ण मिशनने हिंदुत्वाचा पुरस्कार करणे तर बाजूला सारलेच, उलट 1980 साली भरवलेल्या एका मोठ्या मेळाव्यात स्वामीजींचा संदेशही निस्तेज करून टाकला. शिवाय उच्च न्यायालयातील एका प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करून आपण हिंदूंपेक्षा वेगळे असल्याचा दावा करण्यापर्यंत मजल मारली. या सौम्यीकरणावरही परमेश्वरन यांनी टीका केली आहे.परमेश्वरन यांच्या समतोल दृष्टीचा प्रत्यय येतो, तो त्यांच्या या अशाच विवेचनामुळे. त्यामुळेच कार्ल मार्क्स यांच्या बहुतांशी खोट्या ठरलेल्या भाकितांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक हिंदुत्वाचा स्वामी विवेकानंदांनी मांडलेला विचारच यापुढे भारतात, किंबहुना जगातही, अधिकाधिक प्रभाव गाजवील, असा त्यांनी काढलेला निष्कर्ष विश्वासार्ह ठरला आहे, ठरणार आहे...
आज तब्बल 32 वर्षांनी या महत्त्वपूर्ण वैचारिक पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध होते आहे, तेव्हा योगायोगाने भारतीय साम्यवादी पक्षाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत आणि स्वामी विवेकानंदांनी जन्माला घातलेल्या देशाभिमानी, हिंदुत्ववादी नवप्रबोधनाची स्वाभाविक परिणती म्हणून स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही शताब्दीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा वेळी आवश्यक असणारी वैचारिक घुसळण सर्वार्थाने कारणी लावेल, असे हे पुस्तक विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रसिद्ध होत आहे, ही खरोखरच समाधानाची बाब आहे..
मार्क्सने प्रतिपादलेला कम्युनिस्ट विचार 1925 साली पक्षरूपाने भारतात अवतरला, त्याला यंदा 100 वर्षे होत आहेत. आणि विवेकानंदांनी हिंदुत्वाचा जो आग्रह वारंवार मांडला, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघटनरूपी जो अवतार दिला, त्यालाही यंदाच 100 वर्षे होत आहेत. मार्क्सचा विचार अदृश्यमान होतो आहे आणि दुसरा हिंदुत्वाचा विचार प्रखर तेजाने तळपू लागला आहे. त्या समसमा योगावर ही नवी आवृत्ती प्रकाशित होते आहे. आज न्या. अय्यर हयात नाहीत, पण डाव्या आणि कम्युनिस्ट विचारसरणीचा अभ्यास केलेले डॉ. अशोकराव मोडक यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या ग्रंथाला नव्याने लाभली आहे. हिंदुत्ववादीच नव्हे, तर हिंदुत्वविरोधी वाचकांनाही हा तौलनिक अभ्यास आवडेल याची खात्री आहे..
लेखक पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे संपादक आहेत.