नार्कोटिक्स जिहाद - तरुणाईभोवतीचा फास

विवेक मराठी    11-Jul-2025   
Total Views |
Narcotics Jihad
 
vivek 
आजच्या तरुणाईभोवती अमली पदार्थांचा फास वाढत चालला आहे. पूर्वी फक्त चित्रपट उद्योग आणि बड्या बापांच्या बिघडलेल्या मुलांच्या रेव्ह पार्ट्यांचा उल्लेख व्हायचा. पण आता हे चित्र बदललं आहे. मोठमोठी शहरंच नाही तर छोटी गावंही नशेची शिकार झाली आहेत. अल्पवयीन मुलांना अमली पदार्थांचं व्यसन लावलं जातं, त्यांना ड्रग्ज पुरवले जातात आणि गुन्हे करवून घेतले जातात. भारतात अनेक राज्यांना नशेने पोखरलं आहे. अंमली पदार्थांचं जाळं हे केवळ काळ्या पैशांशी संबंधित नसून विचारधारात्मक युद्धाचं अस्त्र म्हणूनही वापरलं जात आहे. फ्रान्ससारख्या देशातील सिरिंज हल्ल्यांपासून ते भारतातील केरळ, कर्नाटक राज्यातील ड्रग नेटवर्कमुळे नार्कोटिक जिहादचा गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे.
 
2016 मध्ये उडता पंजाब हा चित्रपट आला होता. पंजाबमधील अमली पदार्थांचं जग, नशेमुळे वाया गेलेली एक पिढी, पाकिस्तानातून अंमली पदार्थांच्या तस्करीचं भयाण वास्तव या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. अमली पदार्थांची तस्करी, यात व्यवस्थेचे बरबटलेले हात, त्याच्या सेवनाचे दुष्परिणाम याचे संदर्भ आपण अनेक चित्रपटातून पाहिले आहेत. हल्ली ओटीटीवरील क्राईम वेबसिरीजमध्ये याचा संदर्भ येतोच. अमली पदार्थांशिवाय या वेबसिरीज पूर्णच होऊ शकत नाही. अनेकदा वर्तमानपत्रांतूनही आपण पोलिसांनी इतके किलो ड्रग्ज जप्त केले अशा बातम्या सर्रास वाचतो. पांढर्‍या नशेचा धूर तरुणांना गिळंकृत करतोय. फक्त तरुणच नाही तर अल्पवयीन शालेय विद्यार्थी सुद्धा अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत. एमडी, कोकेन, बॉण्ड असे ड्रग्ज घेण्याचं प्रमाण शाळकरी मुलांमध्ये वाढत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात शाळांच्या बाहेर अशा पदार्थांची विक्री होत असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत. दम मारो दमच्या नशेत बेधुंद झालेली तरुणाई रेव्ह पार्ट्यांमध्ये नाचताना दिसते. सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणानंतर बॉलिवूडमधलं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. अनेक बॉलिवूड कलाकार ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत हे उघड झालं. स्वामी विवेकानंद म्हणायचे की, ‘एखाद्या देशाचे 50 वर्षानंतरचे भवितव्य जाणून घ्यायचे असेल, तर त्या देशाची तरुण पिढी काय करत आहे हे पाहावे.’ यानुसार आता विचार केला तर तरुणाई नशेच्या दरीत खेचली जात आहे. विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहणार्‍या भारतासाठी हा मार्गातील मोठा अडथळा आहे.
 
 
अमली पदार्थांचा प्रसार हा फक्त आरोग्य किंवा कायद्याच्या समस्येपुरता मर्यादित राहिलेला नाही. यामागे खूप मोठं षडयंत्र आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमली पदार्थांचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. अमली पदार्थांची चळवळ अनेकदा एका विशिष्ट धार्मिक गटाशी संबंधित ड्रग माफियांकडून चालवली जात असल्याच्या गंभीर नोंदी समोर येत आहेत. नार्कोटिक जिहाद या संकल्पनेच्या आडून हिंदू तरुण-तरुणींना व्यसनाच्या विळख्यात टाकून त्यांना मानसिक, शारीरिक, सामाजिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा योजनाबद्ध कट रचला जात असल्याचा आरोप केला जात आहे. फ्रान्ससारख्या देशातील सिरिंज हल्ल्यांपासून ते भारतातील केरळ, कर्नाटक राज्यातील ड्रग नेटवर्कमुळे नार्कोटिक जिहादचा गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे. अमली पदार्थांचं जाळं हे केवळ काळ्या पैशांची संबंधित नसून विचारधारात्मक युद्धाचं अस्त्र म्हणूनही वापरलं जात आहे.
 

vivek 
 
अमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादी कारवाया
 
अमली पदार्थांचा व्यापार आणि दहशतवादी कारवाया यांच्यातील संबंध हा जागतिक स्तरावर चिंतेचा विषय आहे. एक थी बेगम नावाच्या वेबसीरिजमध्ये 90 च्या दशकातील काळ दाखवला आहे. माफियाराज, अमली पदार्थांची तस्करी, त्याचा काळाबाजार हे सगळं दाखवलं आहे. नार्को जिहाद हा शब्द याचसंदर्भात वापरला जातो. अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, अफगाणिस्तानातील तालिबान आणि इतर दहशतवादी गटांनी अफू आणि हेरॉइनच्या व्यापारातून मोठ्या प्रमाणात पैसा उभा केला. या पैशांचा उपयोग शस्त्रास्त्र खरेदी, प्रशिक्षण आणि दहशतवादी हल्ल्यांसाठी केला जातो. युरोप आणि उत्तर अमेरिकेतही अशा कारवाया आढळल्या आहेत. कॅनडासारखा देशही अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकला आहे. इसिस सारखे गटही अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणार्‍या नफ्याचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी करतात.
 
 
अमली पदार्थांचा वापर करून आपल्या देशातील विधायक तरुणाईची शिकार करण्याचा शत्रुदेशांचा कट आहे. हा कट वेळीच ओळखणं गरजेचं आहे. आज ट्रेंड, स्ट्रेस रिलिफ, मजा मस्ती यासाठी तरुणाई नशेत वाहावत जाते. देशातील तरुण पिढी व्यसनाधीन करणं हा दीर्घकालीन राष्ट्रविघातक नियोजनाचा भाग आहे. दहशतवादी हल्ले, सायबर हल्ले आणि नार्कोटिक्स या गोष्टी वेगवेगळ्या नाहीत. नार्कोटिक्स, सायबर हल्ले यातून मिळणारे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरले जातात. शत्रुराष्ट्राकडून सीमेवर होणारे हल्ले, सायबर हल्ले एवढचं युद्धाचं स्वरूप आज मर्यादित राहिलं नाही तर नार्कोटिक्स जिहाद हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
 
 
जागतिक स्तरावरील नार्कोटिक्स जिहाद
 
जून 2025 मध्ये फ्रान्समधील ’फेते दे ला म्युझिक‘ या वार्षिक संगीतमय उत्सवात एक धक्कादायक घटना घडली. या कार्यक्रमात 145 व्यक्तींनी सिरिंजने टोचल्याची तक्रार नोंदवली. ज्यामध्ये प्रामुख्याने तरुणींचा समावेश होता. फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने याप्रकरणी 12 जणांना ताब्यात घेतले. तिथल्या वृत्तानुसार ज्यांना ताब्यात घेतले ते परप्रांतीय आणि स्थलांतरित मुसलमान आहेत. या हल्ल्यांमध्ये डेट रेप ड्रग्ज वापरले गेले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. या ड्रग्जमुळे पीडित व्यक्ती भ्रमिष्ट, बेशुध्द किंवा असहाय्य होतात. या घटनेमुळे फ्रान्समध्ये मोठी खळबळ उडाली. युकेमध्ये 2021-2022 दरम्यान अशा सिरिंज हल्ल्यांच्या एक हजारपेक्षा जास्त घटना नोंदवल्या गेल्या होत्या. अंमली पदार्थांचा वापर करून गुन्हेगारी कारवाया कशा केल्या जातात याचं हे उदाहरण आहे.
 
 
भारतातील ड्रग्जचे जाळे
 
भारतात केरळमध्ये 2021 मध्ये नार्कोटिक्स जिहाद हा शब्द चर्चेत आला. केरळमधील कॅथॉलिक बिशप (मुख्य धर्मोपदेशक) मार जोसेफ कल्लारंगट्टू यांनी असा दावा केला की, गैरमुस्लीम तरूणांना खासकरून ख्रिश्चन मुलांना अमली पदार्थांच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. त्यावेळी त्यांनी लव्ह जिहाद आणि नार्कोटिक जिहादचा उल्लेख केला. जिहादी केवळ लव्ह जिहादचाच नाही तर नार्कोटिक जिहादचाही प्रसार करत आहेत. या त्यांच्या वक्तव्याने त्यावेळी बराच गोंधळ झाला होता.
 
 
छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी मायलन फार्मा कंपनीच्या प्लांटवर छापा टाकण्यात आला. रासायनिक कचर्‍याच्या माध्यमातून ड्रग रॅकेट चालवले जात असल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली. ज्यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीच्या नव्या पद्धती उघड झाल्या. ‘मिस्त्री’ नावाची एक नवीन वेबसीरिज आली आहे. यात वेगवेगळे भाग आहेत. एका भागात विषारी सापापासून ड्रग तयार करून त्याची तस्करी करत असल्याचं दाखवलं आहे. थोडक्यात काय तर, वेगवेगळ्या माध्यमातून अमली पदार्थ बनवून त्याचा काळाबाजार होत आहे.
 
 
vivek
 नार्कोटिक्स जिहादविषयी बोलणारे केरळमधील कॅथॉलिक बिशप मार जोसेफ कल्लारंगट्टू
 
हल्ली ऑनलाईन ड्रग्ज विक्रीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. पुण्यातील ललित पाटील प्रकरणामुळे मुंबई, पुणे, नाशिक याठिकाणी ड्रग्जचे गुप्तपणे कारखाने चालवले जात असल्याचं समोर आलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांची मोठी साखळी कार्यरत असल्याचं उघड झालं. ठाण्यात मुख्यत्वे मुंब्रा तर मुंबईत कुर्ला भागात या तस्करांचे मोठे अड्डे आहेत. मागच्या महिन्यात वसईतील पेव्हर ब्लॉक तयार करणार्‍या कारखान्यात मेफेड्रोन बनवणार्‍या गुप्त युनिटचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या कारवाईतून सुमारे 8 कोटी रुपयांचे कच्ची सामग्री आणि उपकरणे जप्त करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य संशयित आरोपी सादिक सलीम शेख (वय 28) हा पश्चिम वांद्र्यातील राहुल नगर येथील रहिवासी आहे.
 
 
2021 मध्ये गुजरातच्या मुंद्रा बंदरावर 21 हजार कोटी रुपयांचे 3 हजार किलो हेरॉईन जप्त केले होते. मागच्या वर्षीही गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलाने संयुक्त कारवाई करत 3 हजार 300 किलो वजनाचे हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. मध्य प्रदेशातील आदिवासी भाग असलेल्या झाबुआतही 168 कोटींचे अमली पदार्थ सापडले. हे आकडे म्हणजे समुद्राच्या पाण्याचा एक थेंब आहेत. भारतातच नाही तर जगभरात अमली पदार्थांची करोडोंची उलाढाल आहे. जगभर ड्रग्ज माफिया समांतर अर्थव्यवस्था चालवत असतात. गुजरात, राजस्थान, पंजाब या राज्यांच्या सीमेवरून पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना अमली पदार्थांची तस्करी करतात. आज प्रत्येक राज्याला अमली पदार्थांनी विळखा घातला आहे. देश म्हणून हा चिंतेचा विषय आहे.
 
 
अमली पदार्थांची कीड आज संपूर्ण जगाला पोखरत आहे. यावर मात करण्यासाठी स्थानिक आणि जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. अमली पदार्थांच्या तस्करीला वेगवेगळे कंगोरे आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात योग्य ती कडक कारवाई केली नाही तर ड्रग्जचा भस्मासुर तरुण पिढीला गिळंकृत करेल. नुसती तरुणांमध्ये जनजागृती करून उपयोग नाही तर त्याची पाळंमुळं खणून काढली पाहिजे. नार्कोटिक्स जिहाद हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गंभीर मुद्दा आहे. याकडे कानाडोळा करून चालणार नाही. तरुणांना नशेत बुडवणार्‍या ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळाव्याच लागतील. नार्कोटिक्स जिहादचा धोका जर आपण वेळीच ओळखला नाही तर तरुणांची एक पिढी याला बळी पडेल आणि हे नुकसान कधीही भरून काढता येणार नाही. तरुणाईभोवती नार्कोटिक्स जिहादचा फास आवळण्यापूर्वीच तो तोडून टाकला पाहिजे.

बागेश्री पारनेरकर

सा. विवेकमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. रेडिओ, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमात काम करण्याचा अनुभव. विविध माध्यमातून योग आणि आहार विषयक लेखन. नाट्य, नृत्य, संगीत क्षेत्राची आवड. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनाचा अनुभव...