श्रीरंगम्च्या श्रीरंगनाथस्वामी मंदिरात साजर्या होणार्या विविध उत्सवात श्रीरंग उत्सवांत कसा रंगत जातो. त्याचे हे सोहळे भक्त किती तन्मयतेने आणि समरसून करतात. शिवाय दक्षिणेत याव्यतिरिक्त असलेली कोणकोणती लहानमोठी मंदिरे आहेत ते आपण या लेखात पाहूया.आतापर्यंत आपण श्रीरंगम्च्या श्रीरंगनाथस्वामीचा महिमा पाहिला. मंदिराचे पुरातन काळापासूनचे महत्त्व पाहिले. अत्यंत रोमहर्षक धार्मिक इतिहासाबरोबरच मंदिरावर झालेले आक्रमण तसेच लुटालूट हा उद्विग्न करणारा इतिहाससुद्धा ह्या मंदिराला आहे. सुलतानाच्या तिन्ही आक्रमणांनंतर श्रीरंगम् लवकरच सावरले. पुढे विजयनगर साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासामुळे मंदिराचे संरक्षण झाले. महान राजा ’कृष्णदेवराय’ वैष्णवपंथीय असल्यामुळे श्रीरंगम्ला विशेषतः तिरुपती बालाजी मंदिराला अत्यंत उर्जितावस्था प्राप्त झाली. श्रीरंगम् परत एकदा पूर्वीच्या सोनेरी वैभवाने झळाळून निघाले. मंदिरात श्रीरामानुजाचार्यांनी सुरू केलेले उत्सव परत एकदा झोकात प्रारंभ झाले.
मंदिराचा सगळ्यांत महत्त्वाचा उत्सव म्हणजे ’वैकुंठ एकादशी’. ह्याच वैकुंठ एकादशीमुळे मी मंदिराच्या ’प्रेमात’ पडले होते. माझ्या विष्णुभक्तीची सुरुवात होण्यासाठी वैकुंठ एकादशीचा पावन दिन कारणीभूत ठरला. तर आजच्या या लेखात आपण मंदिरात साजरे होणारे विविध उत्सव आणि श्रीरंगम् येथे श्रीरंगनाथस्वामींशिवाय अजून कोणकोणती लहानमोठी मंदिरे आहेत ते पाहूया.
आपल्या पुराणांमध्ये असं सांगितले आहे की, ब्रह्मांडात कुठेतरी सुदूर उत्तर दिशेला क्षीरसागराचे अस्तित्व आहे. पुराणाच्या या संदर्भाच्या अनुषंगाने दिव्य देसम् मंदिरांमध्ये एक असे द्वार उत्तरेला असते की, ज्या द्वाराला ’वैकुंठ द्वार किंवा द्वारम्’ म्हणतात. हे द्वार नेहेमीच मूलवरमच्या डाव्या बाजूला असते आणि वर्षभर बंद असते. दक्षिणेत कोणत्याही अगदी लहानतल्या लहान मंदिरातही वैकुंठ द्वार असतेच असते. वर्षांतून एकदाच फक्त वैकुंठ एकादशीला हे द्वार उघडले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला वैकुंठ एकादशी म्हणतात. वैष्णवांसाठी हा धार्मिक दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात मोठा पवित्र सोहळा असतो, कारण वैकुंठ म्हणजे ’परम धाम’ किंवा ’मोक्ष धाम’.
वैकुंठ द्वार उघडल्यावर सर्वात प्रथम नम्मपेरूमाळची मूर्ती पालखीतून मिरवत बाहेर काढतात व त्यानंतरच भाविकांना द्वारातून प्रवेश करण्याची संधी मिळते. वैकुंठ एकादशीच्या दिवशी प्रत्यक्ष पेरूमाळ, वैकुंठाचे द्वार उघडतो त्यामुळे जर या द्वारातून आपण प्रवेश केला तर आपल्यालाही वैकुंठाला जाण्याचे सौभाग्य प्राप्त होईल, आपण महाविष्णुच्या पायाशी लीन होऊ शकू या विश्वासाने प्रत्येक वैष्णव या द्वारातून प्रवेश करतो. यासाठी विशिष्ट मुहूर्त असतो. तो मुहूर्त गाठण्यासाठी प्रत्येक भाविक आटापिटा करतो. मी ज्यावेळी पहिल्यांदा वैकुंठ एकादशीच्या दरम्यान मंदिराला भेट दिली तेव्हा भक्तगण जणू मंदिराच्या प्रांगणात मुक्कामाला आले होते. हा मुहूर्त बहुतकरून पहाटे असतो त्यामुळे भाविकांना तो मुहूर्त साधायचा होता. वैकुंठ एकादशीचा सगळ्यांत महान सोहळा हा श्रीरंगम्ला होतो कारण 108 दिव्य देसम्पैकी सगळ्यांत पहिले दिव्य देसम् आहे हे. स्थानिक तर आहेतच, पण लांबून लांबून लोक वैकुंठ एकादशीचा मुहूर्त साधतात. परदेशातून भाविक येतात. सामान्य भाविकांबरोबरच वैष्णव आचार्य, साधू या सोहळ्यात सहभागी होतात. यावेळेस मंदिरात अतोनात गर्दी असते. श्रीरंगनाथस्वामी हे जगातील सर्वात मोठे पूजा होणारे हिंदू मंदिर असतानाही आम्ही चेपून निघालो याचे हे कारण होते.
वैकुंठ एकादशीचा द्वितीय क्रमांकाचा सोहळा पार पडतो तो तिरुमला इथल्या श्रीबालाजी मंदिरात. अतिशय भव्यदिव्य असा हा अत्यंत लोभस सोहळा असतो. आयुष्यात अनुभव करण्याजोगे काही क्षण असतात. त्या वेचक क्षणांत गणण्याजोगी ही अनुभूती नक्कीच आहे. कांचीपुरम् येथील वरदराज पेरूमाळ, नानगुनेरी येथील श्रीवनमामलई अशा सगळ्यांच पेरूमाळ मंदिरांत हा सोहळा झोकात साजरा होतो.
या दरम्यान श्रीरंगम्ला, मंदिरात ’पगल पथु’ व ’इरा पथु’ सोहळे होतात. पगल पथु म्हणजे दिवसा श्रीरंगनाथ स्वामींचे विविध रूपांत दर्शन होते. हा सोहळा वीस दिवस चालतो तर इरा पथु हा दहा दिवसांचा सोहळा म्हणजे रात्रीच्या वेळी श्रीरंगाला विविध रुपांत सजवले जाते.
365 दिवसांपैकी 322 दिवस विविध उत्सव श्रीरंगम्ला साजरे होतात. इथे श्रीरंगाबरोबरच श्रीरंगनायकी नच्चियार ह्या लक्ष्मीदेवीच्या विग्रहाचे सुद्धा अतिशय लाड पुरवले जातात. श्रीसूक्तात वर्णिलेल्या लक्ष्मीसारखाच हा विग्रह आहे. सुलतानी आक्रमणाच्या वेळी या थायरची उत्सवमूर्ती इथल्या मंदिराजवळ असलेल्या बिल्ववृक्षाखाली पुरली होती. कालांतराने याबद्दल श्रीरंगम्ची जनता पूर्णपणे विसरली. पुढे थायरची मूर्ती नव्याने केली गेली. मात्र कित्तेक वर्षांनी झालेल्या अतोनात पावसामुळे लक्ष्मीदेवीची मूळ उत्सवमूर्ती जमिनीतून बाहेर आली. त्यामुळे नम्मपेरूमाळ सारख्याच या लक्ष्मीदेवीच्याही दोन उत्सवमूर्ती आहेत.
दक्षिणेच्या प्रत्येक मंदिरात असतात त्याप्रमाणे इथेही मंदिरात हत्ती आहे. नवरात्रीत या हत्तीकडून लक्ष्मीदेवीसाठी माऊथ ऑर्गन वाजवला जातो तसेच तो मंदिराच्या स्वर्गमंडपात चामर सेवा देतो. फक्त शारदीय नवरात्रीच्या वेळेतच रंगनायकी थायरच्या चरणांचे दर्शन होते. श्रीरंगाचे सुद्धा कोडकौतुक केले जातात. भगवंतासाठी काय करू आणि काय नाही असे भाविकांना झालेले असते. नम्मपेरूमाळला घेऊन मिरवणे ही इथली सगळ्यांत आवडती सेवा. त्याचे सुद्धा किती गोड प्रकार आहेत. नम्मपेरूमाळ सिंहगती, गजगती, हंसगती व सर्पगतीने मिरवतात. सिंह ज्याप्रमाणे गुहेतून बाहेर येताना सावध पवित्र्यात येतो त्याप्रमाणे नम्मपेरुमाळ आधी सावधपणे दोन्ही बाजूंनी लक्ष ठेवत पालखीतून त्यांच्या स्थानावरून बाहेर येतो. जणू काही तो त्या आपल्याला बघायला आलेल्या भाविकांना निरखतोय. ही चाल म्हणजे पेरूमाळचे नृसिंह स्वरूप आहे. सिंहगतीची चाल भव्य, जोशपूर्ण, तेजस्वी व सामर्थ्यशाली असते. तर गजगतीची चाल मजबूत व दणकट असते. ही चाल म्हणजे महाविष्णुचे शक्ती व स्थैर्याचे प्रतिक आहे. हंसगती म्हणजे मृदू, नाजूक व कोमल असते. ही चाल म्हणजे महाविष्णुच्या राजसस्वरूपातील शृंगार व माधुर्य दर्शवते. तर सर्पगती म्हणजे लवचिक, वळणदार व नृत्यस्वरूप (डावी-उजवीकडे) ज्याप्रमाणे सर्पाची चाल डौलदार असते तशी असते. ही चाल जीवनाचा कालातीत प्रवास व गूढरम्यता दर्शवते. ह्या चालीने नम्मपेरूमाळला परत त्याच्या स्थानी नेले जाते. ह्या चारही चाली मुख्यत्वेकडून वैकुंठ एकादशी, ब्रह्मोत्सव व पंगुनी उत्सवावेळी होतात. त्यावेळी अनेक भक्त, वैष्णव पुजारी यांत सहभागी होतात.
मिरवणुकीच्या वेळी त्यांच्याकडून भक्तिगीते तसेच नालयिरा दिव्य प्रबंधम् या ग्रंथातील पदांचा संगीतमय जल्लोष होतो. त्यावेळी मंदिराचे वातावरण अत्यंत भक्तिभावाने भारावून जाते. मंदिरात ‘डोल’ उत्सव साजरा होतो. यांत नम्मपेरूमाळला व थायरच्या उत्सवमूर्तीला चंदन, रेशमी वस्त्रे व फुलांनी सजलेल्या झोपाळ्यावर बसवले जाते व त्यांना हलकेच झोका दिला जातो. वसंतोत्सव व पंगुनी महिन्यात हा डोलोत्सव मुख्यत्वे साजरा होतो. तर तेपोत्सव म्हणजे पतीपत्नीला ’थाई पौर्णिमेच्या’ वेळी एका नावेत बसवतात व पुष्करणीमधून फेरफटका मारतात. पूर्ण नौका तेव्हा असंख्य फुलांनी सजलेली असते. मंत्रोच्चारांत व शंख, तुतारीच्या गजरात नम्मपेरूमाळ व रंगनायकी अम्मन छान नौकेतून फिरून येतात. त्यावेळी दिवाळीसारखेच दीपप्रज्वलन केलेले असते. पंगुनी महिन्यात तर पतीपत्नीच्या विवाहाचा सोहळा संपन्न होतो. तेव्हा भक्तगण, आचार्य सगळेच वर्हाडी असतात. मंदिरात मंगलाष्टके, वाजंत्री असा एकच थाट उडालेला असतो. ’थाई थेर’ उत्सवात 65 फूट उंचीच्या रथातून श्रीरंगाचा रथोत्सव संपन्न होतो. त्यावेळी हजारो भक्तगण पारंपरिक तामिळ संगीताच्या ठेक्यात, दोरखंडाने रथ ओढतात. असे विविध उत्सव पूर्ण वर्षभरात साजरे होतात.
मंदिरात राम सीता लक्ष्मण, हयग्रीव, अन्नमूर्ती, गरुडमूर्ती, धन्वंतरी, तसेच सगळ्यांच बाराही आळ्वारांच्या मूर्ती आहेत. त्यांचीही विविध उत्सवांत पूजा चालत असते. वैकुंठाचा द्वारपाल ’विश्वक्सेन’ हा नम्मळवारांचे रूप मानले जातो. त्यामुळे वैकुंठ उत्सवाची सांगता ही नम्मळवारांची उत्सवमूर्ती नम्मपेरूमाळच्या चरणी ठेवून त्यावर तुळशीच्या माळा अर्पण करून होते. याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे नम्मळवार, वैकुंठामध्ये पेरूमाळ चरणी लीन झाले त्याप्रमाणेच आपण केलेली निःस्वार्थ सेवाही पेरूमाळ चरणी अर्पण होवो.
या प्रत्येक उत्सवाचे विविध अर्थ आहेत. एकतर प्राचीन काळात हाच एक विरंगुळा होता. तसेच आपला भगवंतही आपल्यासारखेच वागतो, लाड पुरवून घेतो हा विश्वास भक्तांच्या ठायी आला. तिरूचिरापल्ली येथील द्वितीय क्रमांकाचे दिव्य देसम् असलेल्या ’कोमलवल्ली थायरला’ भेटायला नम्मपेरूमाळ, रंगनायकीला न सांगता गुपचूप जातो. त्यावरून रंगनायकी चिडते, मग परत श्रीरंगम्ला आल्यावर नम्मपेरूमाळ तिची समजूत घालतो. यावेळी आचार्यच पेरूमाळ व रंगनायकीच्या वतीने एकमेकांशी वाद घालतात. मग नम्मळवारांच्या मध्यस्थीने पतीपत्नीचे भांडण मिटते. कित्येक शतके चालत आलेल्या ह्या गोष्टींमुळे व अशा सर्व मानवी पातळीवर येऊन केलेल्या व्यवहारांमुळे भक्तांना, आपला देव कोणी काही वेगळा आहे असं कधी वाटलंच नाही. आपलेपणा आणि आपुलकीच वाटली. याच कारणाने युरोपमध्ये झालेल्या ’ठशपरळीीरपलश’ ची म्हणजे कलेच्या पुनरुज्जीवनाची गरज आपल्याकडे भासलीच नाही. आपले देव पूर्वीपासूनच मानवी चेहरामोहरा असलेले होते.
हंपी- बदामी- पतदकल- ऐहोळेची भग्न मंदिरे माझ्या मनावर ओरखडा ओढून गेली होती. मात्र वैभवाने झगमगलेली मंदिरे बघताना मनात एक विलक्षण चैतन्य उमटून आले. हे चैतन्य आयुष्यभरासाठी साथ देणार आहे.