जेव्हा पती-पत्नी दोघेही संततीसाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तयार असतील आणि योग्य असतील तेव्हा. त्यांच्यात प्रेम असावे, एकमेकांविषयी आदर असावा, तेव्हा गर्भाधान संस्कार करावा. सहवासाच्या वेळी पती - पत्नीच्या आहार, विहार, विचार, भावना यांचा गर्भावर प्रभाव पडतो. मन स्थिर आणि शांत होण्यासाठी या संस्कारातील मंत्र मदत करतात. तसेच या संस्काराने बीज व गर्भ यांचे दोष नष्ट होतात असे म्हटले आहे.
मन्दंमन्दंनुदतिपवनश्चअनुकूलो यथा त्वां
वामश्चायंनदतिमधुरंचातकस्तेसगन्धः ।
गर्भाधानक्ष्मपरिचायात्नूनम्आबद्धमालाः
सेविष्यन्तेनयनसुभगंखेभवन्तम्बलाकाः॥
मेघा! मंद मंद चालणारे अनुकूल वारे तुला वाहून नेतील. डाव्या बाजूने मधुर गायन करणारा चातकांचा थवा तुला सोबत करेल! आणि गर्भाधान सोहळ्याचे स्वप्न रंगवत बगळे उडत असतील. त्या बगळ्यांची माळ गळ्यात घातलेला तू किती सुंदर दिसशील!
गर्भाधान हा संस्कार केवळ मानवांसाठी आहे असे न मानता, पशुपक्ष्यांमध्येसुद्धा असेल असा विचार करणारा महाकवी कालिदास, मेघदूत या महाकाव्यात लिहितो - यक्ष सांगत आहे, मेघा! प्रवासाच्या सुरुवातीला चातक पक्षी डाव्या बाजूला असणे शुभसूचक मानले गेले आहे. तू पाहा! चातक तुझ्या डावीकडून गात गात जातील. हा काळ बगळ्यांच्या विणीचा आहे; आकाशात पावसाचे ढग जमू लागतात, तेव्हा बगळी गर्भ धारण करते. मेघा! आषाढ महिन्यात जेव्हा त्या तुला पाहातील, तेव्हा त्या गर्भाधान उत्सवाचे स्वप्न रंगवू लागतील. आणि आनंदाने एकत्रितपणे माला करून उडू लागतील.
सनातन धर्म, गर्भाधानाला एक संस्कार मानतो, एक मंगल उत्सव मानतो. ‘गर्भाधान’हा शब्द गर्भ+आधान या दोन शब्दांपासून झाला आहे. आधान म्हणजे एखादी गोष्ट स्थापन करणे. गर्भाधानाचा शब्दश: अर्थ शुक्रबीजाची गर्भाशयात स्थापना करणे असा होय. ही क्रिया सर्जनाची आहे, नवीन जीव निर्माण करण्याची आहे. ती क्रिया केवळ शारीरिक राहू नये, पाशवी पातळीवर राहू नये म्हणून हा संस्कार. उपभोग आणि शरीरसुख मिळवणे याऐवजी पितृऋण फेडणे, उत्तम संतती निर्माण करून आपले जीवन सफल करणे हे ध्येय हा संस्कार देतो. जेव्हा एखादी क्रिया काही उच्च ध्येयासाठी केली जाते तेव्हा ती क्रिया न राहता ध्येयाचे साधन होते, एक साधना होते.
तैत्तिरीय संहितेत म्हटले आहे - प्रजयापितृभ्यः म्हणजे प्रजोत्पत्तीद्वारे पितृऋणाची फेड. म्हणून गर्भाधान संस्कार हा उत्तम संतान मिळवण्यासाठी केलेला यज्ञकर्म ठरतो.
गर्भाधान संस्कार केव्हा करावा? जेव्हा पती-पत्नी दोघेही संततीसाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तयार असतील आणि योग्य असतील तेव्हा. त्यांच्यात प्रेम असावे, एकमेकांविषयी आदर असावा, तेव्हा हा संस्कार करावा. सहवासाच्या वेळी पती - पत्नीच्या आहार, विहार, विचार, भावना यांचा गर्भावर प्रभाव पडतो. म्हणून पती-पत्नीने सदाचाराचे पालन करून आनंदी मनाने एकत्र यावे. मन स्थिर आणि शांत होण्यासाठी या संस्कारातील मंत्र मदत करतात. तसेच या संस्काराने बीज व गर्भ यांचे दोष नष्ट होतात असे म्हटले आहे.
अथर्ववेदाच्या गर्भाधान सूक्तामध्ये पती प्रार्थना करतो की - हे प्रिये! भगवान प्रजापती माझ्याशी एकरूप होऊन तुझ्यात वीर्य स्थापन करो. सर्वव्यापी भगवान विष्णू तुझे गर्भाशय सशक्त करो. भगवान सूर्य तुला आणि आपल्या होणार्या बाळाला आरोग्य देवो. भगवान धाता तुझ्या गर्भाचे धारण आणि पोषण करो. पत्नीच्या पोटाला स्पर्श करून, पती तिची अनुमती मागतो - मला माझ्या धर्माचे पालन करण्यासाठी, माझा पितृयज्ञ पूर्ण होण्यासाठी, मला तुझ्यापासून संतती होऊ दे!
बृहदारण्यक उपनिषदासह इतर ग्रंथांमध्ये - सहवास कोणत्या दिवशी करावा, कोणत्या प्रहरी करावा, तिथी कोणती असावी, शुभ नक्षत्रे कोणती इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत. त्या सगळ्यामधील तथ्य किंवा त्या मागील विज्ञान अथवा जुनी निरीक्षणे असतील वा नसतील, ते माहीत नाही. पण एक लक्षात येते की, ते पुत्र व्हावा अशी इच्छा धरत असत तसे कन्या व्हावी अशी इच्छा पण धरत असत. तसेच कन्या झाली तर - ‘गोरी असावी, सुंदर असावी’ यापेक्षा, ती विद्वान असावी, विदुषी असावी अशी इच्छा सुद्धा धरत असत. लक्षात घेण्यासारखे आहे की, मुलीला शिक्षण दिले जात असे आणि बुद्धिमान मुलगी असेल तर तिला उच्च शिक्षण देण्याची तयारी असे. केवळ मातापित्याची नाही, तर शिक्षण देणार्या संस्थांची सुद्धा. गर्भाधानापासून पुढील मंत्रात असे दिसते की, मुलगा असो वा मुलगी - जन्माला येणारे बाळ सुदृढ असावे, गुणी असावे अशीच प्रार्थना केली आहे.
त्याशिवाय, सगळे मंत्र गर्भाची आणि बाळाच्या आईची तितकीच काळजी घेतात. विवाहातील मंत्रांच्या पासूनचे सगळे मंत्र स्त्रीचे हित आणि मंगल चिंतितात. कुठेही स्त्रीकडे मूल जन्माला घालण्याचे साधन म्हणून पहिले नाही. पत्नीला तिच्या पतीच्या बरोबरीचे आणि मातेला पित्याच्या बरोबरीचे (किंवा अधिकच) स्थान दिले आहे. या मधून समाजाने, कुटुंबाने, पतीने स्त्रीची अतिशय मनापासून काळजी घेणे अपेक्षित होते, हे लक्षात येते.
रजनीकांत आणि रोहिणी
इकडे रजनीकांत आणि रोहिणीच्या घरी एक गोड बातमी होती. रोहिणीला दिवस गेले होते. किती आनंद झाला दोघांना! दोन्ही घरी आनंद झाला होता! पण अनसूयेने, म्हणजे रजनीकांतच्या आईने, आधीच दोघांना सांगितले होते, आईने किंवा सासूने चोर ओटी भरल्याशिवाय ही गोड बातमी बाहेर कुणाला सांगू नका बरे! पहिले तीन महिने सुखरूप पार पडले ना, की मगच सांगायचं!
दिवस जाऊ लागले. घरी सगळे रोहिणीची काळजी घेत होते. अगं पळू नकोस. धडपडू नकोस. कशाला स्टुलावर चढलीस? जड वस्तू उचलू नकोस! जेव्हा तिसरा महिना सुखरूप पार पडला, तेव्हा अनसूयेने घरात एक लहानसा समारंभ केला. अगदी मोजक्या घरच्यांच्या उपस्थितीत रोहिणीची चोर ओटी भरली. कुठलाही गाजावाजा नव्हता. रोहिणीला साडीचोळी देऊन, तिला हळद-कुंकू लावून तिचे औक्षण केले. गोड पेढा भरवला. तिची दृष्ट काढली आणि भरभरून आशीर्वाद दिला! नवीन बाळाच्या स्वागतासाठी देशमुख कुटुंब तयार झाले होते ...
संदर्भ - संस्कार प्रकाश - गीता प्रेस