भारताचे नवीन जागतिक वारसा स्थळ - चराईदेव मैदाम

विवेक मराठी    15-Jul-2025
Total Views |
@डॉ. श्रीकांत कार्लेकर 
charaidevi
दफन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ढिगार्‍यांनी पिरॅमिडसारख्या रचना बनवल्या गेल्या आहेत त्यांना 'चराईदेव मैदाम्स’ म्हणून ओळखले जाते. याला ’युनेस्को जागतिक वारसा स्थळ’ म्हणून नामांकन मिळाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवणार्‍या देशभरातील 52 स्थळांपैकी मैदाम्स हे एक ठरले आहे. त्यामुळे मैदाम्सला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली आहे. हे मैदाम्स काय आहे, त्याचा इतिहास काय आहे याबद्दल माहिती सांगणारा लेख...
जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळण्यासाठी कराव्या लागणार्‍या युनेस्कोच्या अनेक अटींची पूर्तता केल्यावर आसाम राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे आसाममधल्या चराईदेव मैदाम या ठिकाणाचा समावेश जागतिक वारसा स्थळांत मागच्या वर्षी करण्यात आला. त्यानंतर हे ठिकाण अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. भारतीय पुरातत्त्व संचालनालय देखील लोकांना हे वारसा स्थळ आणि त्याचे महत्त्व याबद्दल माहिती देण्यासाठी सध्या जागरूकता कार्यक्रम आयोजित करत असते.
 
 
पूर्व आसाममधील अहोम घराण्याची 700 वर्षे जुनी, ’चराईदेव मैदाम’ (Charaideo Maidam) नावाची, उंचवट्यावर किंवा ढिगार्‍यावर दफन करण्याची पद्धत, ’सांस्कृतिक धरोहर’ या श्रेणी अंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत 26 जुलै 2024 रोजी समाविष्ट करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्रात हा निर्णय घेण्यात आला होता. जागतिक वारसा स्थळ हे असे एक ठिकाण असते जे युनेस्कोद्वारे उत्कृष्ट जागतिक मूल्य असलेले ठिकाण म्हणून सूचीबद्ध केले जाते.
 
 
’चराईदेव मैदाम’ हे युनेस्को (UNESCO) च्या 2023-2024च्या सांस्कृतिक धरोहर श्रेणीतील जागतिक वारसा स्थानाच्या दर्जासाठी भारताचे नामांकन होते. दफन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या या ढिगार्‍यांनी पिरॅमिडसारख्या रचना बनवल्या गेल्या ज्यांना ’मैदाम्स’ म्हणून ओळखले जाते. यांचा वापर 1228 पासून सुमारे 700 वर्षे आसामवर राज्य केलेल्या पूर्वीच्या ताई-अहोम (Tai-Ahom) राजघराण्याने केला होता. या नामांकनासाठी निवडलेल्या 52 स्थळांपैकी, आसामची जागा भारत सरकारने निवडली होती.
 
charaidevi  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत वर्षी 21 जुलै रोजी घोषणा केली होती की ’चराईदेव मैदाम’ हे भारताचे 43 वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असेल आणि सांस्कृतिक धरोहर श्रेणीतील ईशान्य भारतातील पहिले स्थान असेल. ’चराईदेव मैदाम’मध्ये आसामच्या ताई-अहोम समुदायाचा खोल आध्यात्मिक विश्वास, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वास्तुशास्त्रीय परिपक्वता यांचा समावेश आहे.
ही घोषणा भारताच्या मातीतून झाली आहे या व्यतिरिक्त आणखी दोन कारणांमुळे तिचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीतला हा समावेश महत्त्वाचा आहे. ईशान्येकडील एखाद्या स्थळाला सांस्कृतिक श्रेणी अंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि काझीरंगा आणि मानस राष्ट्रीय उद्यानांनंतर, हे आसामचे तिसरे जागतिक वारसा स्थळ आहे.
 
 
आत्तापर्यंत शोधण्यात आलेल्या अशा 386 रचनांपैकी चराईदेव येथील शाही दफन केलेली 90 ठिकाणे या परंपरेचे सर्वोत्तम जतन केलेली, प्रातिनिधिक आणि सर्वात परिपूर्ण उदाहरणे आहेत. चराईदेव मैदाममध्ये अहोम राजघराण्याचे नश्वर अवशेष आहेत. पूर्वी, मृत व्यक्तींना त्यांच्या सामानासह दफन केले जात होते, परंतु 18 व्या शतकानंतर, अहोम राज्यकर्त्यांनी अंत्यसंस्काराची हिंदू पद्धत अवलंबली आणि त्या नंतर चरईदेव येथील मैदाममध्ये अंत्यसंस्कार केलेल्या अस्थी आणि अस्थींचे दफन करण्यास सुरुवात केली.
 
 
charaidevi
 
हे दफन ढिगारे इथल्या लोकांसाठी अत्यंत आदरणीय आहेत. जेव्हा देशाने लचित बोरफुकन यांची 400 वी जयंती साजरी केली तेव्हा दिल्लीच्या विज्ञानभवनात एक प्रदर्शन मांडले होते, ज्यात ताई अहोमांच्या अद्वितीय दफन वास्तुकला आणि परंपरा दर्शविणारे मैदामचे मॉडेलही होते.
 
 
ताई-अहोम समुदायाच्या अनोख्या अंत्यसंस्काराच्या पद्धती प्रतिबिंबित करणारे हे ढिगारे आहेत. पूर्व आसाममधील पटकाई पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या दफनभूमीला ताई-अहोम अतिशय पवित्र मानतात. ताई-अहोम लोक 13व्या शतकात आसाममध्ये आले आणि त्यांनी चराई देवची स्थापना केली. आसाममधील अहोम राजवंशाच्या (1228-1826) दफन ढिगार्‍यांची तुलना इजिप्शियन पिरॅमिड्स आणि प्राचीन चीनमधील शाही कबरींशी केली जाते. आसामच्या या चराईदेव मैदाम्सची इजिप्तच्या पिरॅमिडशी तुलना केली तर असे लक्षात येते की, मैदाम हे आसाममधील ताई अहोम समुदायाची, इजिप्तच्या पिरॅमिडप्रमाणेच 13व्या ते 19व्या शतकातील राजघराण्यातील सदस्यांचे ढिगार्‍यावर दफन करण्याची मध्ययुगीन परंपरा दर्शवतात.
 
 
पूर्व आसाममधील शिवसागर शहरापासून पूर्वेला सुमारे 30 किमी अंतरावर असलेले हे चराईदेव मैदाम्स, अहोम राजघराण्यातील सदस्यांच्या नश्वर देहाचे अवशेष पुरून केलेली पूजास्थानेच आहेत. पुरलेल्या व्यक्तींच्या परतीच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या साहित्यासह, इतकेच नव्हे तर त्यांचे नोकर, घोडे, पशुधन आणि अगदी त्यांच्या बायकांसह, हे दफन केले जात असे.
अहोमांनी मृत कुटुंबातील सदस्यांना चराई देव येथे दफन करण्यास प्राधान्य दिले. त्यांनी त्यांचा पहिला राजा सुकाफाचा अंत्यसंस्कारही तिथेच केला. चराईदेव हे लंकुरी या भगवान शिवाचा अवतार समजल्या जाणार्‍या अहोमांच्या पूर्वज देवांचे निवासस्थान देखील मानले जाते.
 
 
charaidevi
 
मैदाममध्ये एक किंवा अधिक खोल्या आणि घुमटाकृती डोलारा असलेले एक भव्य भूमिगत तळघर असते. हे मातीच्या ढिगार्‍याने झाकलेले असते. बाहेरून तो अर्धगोलाकार ढिगारा दिसतो. ढिगार्‍याच्या वरच्या बाजूला एक छोटासा खुला मंडप असतो. एक अष्टकोनी बटू भिंत मैदामला वेढून बांधलेली असते. मैदामची उंची सामान्यत: आत पुरलेल्या व्यक्तीचे महत्त्व दर्शविणारी असते.
पूर्वी बहुतेक मैदाम खोल्या लाकडाचे खांब आणि तुळई वापरून बांधल्या गेल्या होत्या. गदाधर सिंह राजाने आणि त्याच्या उत्तराधिकार्‍यानी नंतर त्यासाठी विटा आणि दगडांचा वापर केला बरेच मैदाम, राजांच्या नावाने तयार केलेले असले तरी त्यापैकी बरेच आजही कोणाचे आहेत, ते अज्ञातच आहे.
 
 
चराईदेव हा शब्द तीन ताई अहोम शब्दांपासून बनला आहे, चे-राय-दोई. चे म्हणजे शहर किंवा गाव, राई म्हणजे चमकणे आणि दोई म्हणजे टेकडी. थोडक्यात, चराईदेव म्हणजे, डोंगरावर वसलेले एक चमकणारे शहर. 1671 मध्ये मुघलांशी लढा देणारे अहोम राज्याचे महान सेनापती लचित बोरफुकन यांची 400वी जयंती गेल्या वर्षी साजरी केली. अशा वेळी चरईदेव मैदाम्सच्या ’युनेस्को जागतिक वारसा स्थळ’ या नामांकनाला खूपच महत्त्व प्राप्त झाले होते.
 
 
जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवणार्‍या देशभरातील 52 स्थळांपैकी मैदाम हे एक आहे. सध्या, प्राचीन स्मारके आणि स्थळे अवशेष कायदा (1958) आणि आसाम प्राचीन स्मारके आणि अभिलेख अधिनियम (1959) अंतर्गत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि पुरातत्त्व विभाग, राज्य पुरातत्त्व विभागाद्वारे मैदाम्सचे व्यवस्थापन केले जाते.
 
 
अहोम, ज्याला ताई-अहोम म्हणूनही ओळखले जाते, हा भारतातील आसाम आणि अरुणाचल प्रदेशात आढळणारा वांशिक गट आहे. या गटाचे सदस्य 1228मध्ये आसामच्या ब्रह्मपुत्रा खोर्‍यात आलेल्या ताई लोकांचे मिश्र वंशज आणि कालांतराने त्यांच्यात सामील झालेले स्थानिक आहेत. सुकाफा, ताई समूहाचा नेता आणि त्याच्या 9000 अनुयायांनी अहोम राज्याची स्थापना केली (1228-1826 CE). त्याने 1826पर्यंत सध्याच्या आसाममधील ब्रह्मपुत्रा खोर्‍याच्या बहुतांश भागावर राज्य केले. अहोम हे भारतातील सर्वात जास्त काळ राज्य करणार्‍या राजवंशांपैकी एक होते.
 
अहोम राज्याचा पहिला राजा चाओलुंग सुकाफा, पटकाई पर्वतीय प्रदेश ओलांडून ब्रह्मपुत्रा खोर्‍यात पोहोचला आणि अहोम राजवंशाचा त्याने तिथे पाया घातला.
 
 
गुवाहाटीच्या पूर्वेला 400 किमी पेक्षा जास्त अंतरावर असलेली चराइदेव ही 1253 मध्ये ’चाओ लुंग सुकाफा’ यांनी स्थापन केलेली अहोम राजवंशाची पहिली राजधानी होती. 1826 मध्ये यांदाबूच्या तहानंतर आजच्या म्यानमारने आसामवर आक्रमण केल्याने आणि त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने विलीन केल्याने या राजवंशाचे शासन संपले. ब्रिटिश सम्राटाने राज्याचा कारभार स्वीकारला आणि अशा प्रकारे आसामच्या वसाहती युगाला सुरुवात झाली.
 
 
विविध नैसर्गिक आपत्तींमुळे मैदाम्सची सध्याची उंची कमी झाली आहे. पूर्वीच्या काळात मृत राजासोबत किमान 10 जिवंत व्यक्तींना, राजाच्या मृत्यूनंतर त्याची काळजी घेण्यासाठी, जिवंत दफन केले गेले होते. परंतु ही प्रथा राजा रूद्र सिंहाने नंतर रद्द केली. 2000-02 मध्ये, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या, गुवाहाटी विभागाने मैदाम क्रमांक 2 चे उत्खनन केले. त्यात मैदामची सगळी रचना कायम राहिली असल्याचे दिसून आले. मैदामचे घुमटाकृती छप्पर भाजलेल्या विटांनी बनवले होते आणि त्याला अष्टकोनी सीमा भिंतीने वेढले होते असे दिसून आले. मैदामच्या छताला एक छिद्र होते जे पूर्वीच्या लुटीचे निर्देशक होते. मुघल सेनापती मीर जुमलाकडून आणि नंतर 1826मध्ये ब्रिटिश सेनेकडून बर्‍याच मैदाम रचना लुटल्या गेल्या.
 
 
मैदाम्सचा कमानीच्या आकाराचा दरवाजा उत्खननानंतर पश्चिमेकडे सापडला, जो मूलतः विटा आणि दगडी बांधकामाने मढवलेला होता. हे मैदाम आधीच लुटले गेले असले तरी 5 व्यक्तींच्या सांगाड्याचे अवशेष, हस्तिदंताचे सजावटीचे तुकडे, लाकडी वस्तूंचे अनेक तुकडे, राजेशाही अहोम चिन्हाचे चित्रण करणारे हस्तिदंती फलक, हत्ती, मोर आणि विविध फुलांचे कोरीवकाम अशा अनेक कलाकृती उत्खननात मिळाल्या. या मैदामची नेमकी तारीख सांगता आलेली नाही, परंतु ती 18 व्या शतकाच्या पूर्वार्धातील असावी असा अंदाज आहे.
 
 
भारतीय पुरातत्त्व खात्याला नवीनच केलेल्या दुसर्‍या टप्प्यातील उत्खननात मैदाम क्रमांक 90 आणि 78 मधल्या ढिगार्‍यांमधून अहोम वस्ती आणि त्यांच्या दफन पद्धतींबद्दल माहिती मिळाली. मैदाम क्रमांक 33 हा मध्यम आकाराचा दफन ढिगारा तपशीलवार दस्तावेजीकरणासाठी निवडला गेला. मैदाम क्रमांक 77 इतर मैदामात आढळणार्‍या अष्टकोनी भिंतींपेक्षा वेगळा म्हणून आणि त्याच्या गोलाकार लहानशा बाह्य भिंतीसाठी ओळखला जातो. उत्खननात एका मोठ्या मातीच्या ढिगार्‍याने झाकलेली विटांनी बांधलेली रचना मैदाम क्रमांक 2 या ढिगार्‍यात आढळली. यात अष्टकोनी आकाराची भिंत आणि हस्तिदंत व लाकडी वस्तूंचे तुकडेही आढळले. इतर दफन ढिगार्‍यातून आणखी विलक्षण माहिती मिळण्याची शक्यता पुरातत्त्व खात्याने वर्तविली आहे.