पातंजल योगदर्शन

विवेक मराठी    15-Jul-2025
Total Views |
patanjal yog darshan book review 
ग्रंथाली प्रकाशित, डॉ. धनश्री साने लिखित,‘पातंजल योगदर्शन निरंतर साधना’ या प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखिकेने ‘पातंजल योगदर्शन’ या ग्रंथाचा तौलानिक दृष्टीने विचार करून पतंजली ऋषी यांनी लिहिलेल्या योगदर्शन ग्रंथातील चारही पादांचे विवरण केले आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी मूळ सूत्रे, त्या सूत्रांचा मराठीत अर्थ देऊन सर्वसामान्यांना उपयुक्त अशी या पुस्तकाची मांडणी केली आहे.
 @अनुया विश्वेश जोशी
 
योगेन चित्तस्य पदेन वाचां । मलं शरीरस्य च वैद्यकेन ।
योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां। पतंजलिं प्रांजलिरानतोऽस्मि ॥
 
अर्थ : योगाने चित्ताचा, व्याकरणाने भाषेचा आणि वैद्यकाने शरीराचा मळ ज्यांनी दूर केला त्या मुनिश्रेष्ठ पतंजलींना मी दोन हात जोडून नमस्कार करतो.
 
 
एकविसाव्या शतकात योग सर्वतोमुखी झाला आहे. याचे मुख्य कारण शरीर व मन यांचे स्वास्थ्य योगामुळे साधता येते हे आता लक्षात येऊ लागले आहे. स्वास्थ्य जोपासना व संवर्धन हे प्रत्येक सुजाण नागरिकाच्या जीवनाचे उद्दिष्ट झाले आहे. आकाशवाणी, वर्तमानपत्रे, मासिके, आरोग्य विशेषांक यांमधून आरोग्यविषयक जाणीव दिवसेंदिवस विकसित होताना दिसते. अनेक शाळांमधून योगासनांना महत्त्व दिले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एकविसावे शतक मनोकायिक आजारांचे असणार आहे असे म्हटले आहे. सर्वसाधारण लोक रोगांवरील उपचारांचाच विचार करताना दिसतात, पण रोग होऊच नये यासाठी काय केले पाहिजे याचा विचार फारसा केला जात नाही. योगशास्त्रात मात्र हा विचार पुरातन काळापासून केलेला आहे. योगशास्त्रावरील ’योगदर्शन’ या ग्रंथामध्ये पतंजली ऋषींनी जणू संपूर्ण मानसशास्त्र उलगडत नेले आहे. या पातंजल योगदर्शन ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन करण्याची संधी लेखिका डॉ. धनश्री साने यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी अनेक संदर्भ ग्रंथ वाचून, त्यानुसार टिपणे काढून, त्या सर्व ग्रंथांचे तौलानिकदृष्ट्या अवलोकन केले आणि मग मनन, चिंतन यांच्या आधाराने तयार झालेला जो अभ्यास त्याचे फलित म्हणजे त्यांनी लिहिलेला ग्रंथ ’पातंजल योगदर्शन निरंतर साधना’ हा होय.
 
 
या ग्रंथामधून आपल्याला पतंजली ऋषींनी मांडलेला योगशास्त्राचे विवेचन सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न लेखिकेने यातून केला आहे. योगदर्शनामध्ये पतंजली ऋषींनी संपूर्ण मानसशास्त्र उलगडत नेले आहे त्याचा तपशिलाने अभ्यास प्रस्तुत ग्रंथात केला आहे.
माणसाच्या मनात निर्माण होणार्‍या चित्तवृत्ती म्हणजेच त्याच्या मनामध्ये निर्माण होणार्‍या मनोवृत्ती ह्या कशा उफाळून येतात व त्यांचा निरोध कसा करावा, याविषयी सखोल मांडणी पतंजली ऋषींनी केली आहे. त्याचे विवेचन करत साधनेच्या द्वारे उन्नती कशी साधता येऊ शकते, त्या येणार्‍या अडचणींना कशा पद्धतीने दूर ठेवले गेले पाहिजे, याचेही विवेचन पतंजली ऋषींनी केले आहे तेच या ग्रंथामध्ये अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे. ते विक्षेप म्हणजे मनोकायिक आजाराची लक्षणेच असे म्हणता येते आणि त्यावर मात करण्याचे उपायही पतंजली ऋषींनी साधेसोपे वाटतील असे सांगितले आहेत. तेच उपाय या ग्रंथामध्ये उदाहरणांसह विवरण केले आहेत.
 
 
योगदर्शनामध्ये पतंजली ऋषींनी ज्या आध्यात्मिक विषयांची मांडणी केली आहे ते सर्वच विषय सर्वव्यापी, आपल्या प्राचीन संस्कृतीचा मूळ गाभा असलेले, सनातन सत्य असे आहेत. त्या सर्वांचा लेखिकेने पतंजली ऋषींच्या ग्रंथातील सूत्रांच्या आधाराने विस्तृतपणे त्यांचा परामर्श घेतला आहे. उदा. ईश्वरविषयक संकल्पना, ईश्वराचे स्वरूप, ईश्वर स्वरूप असणारा ओंकार, साधनेतून साधकास प्राप्त होणार्‍या सिद्धी, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, षट्चक्र तसेच या ग्रंथाचे मूळ उद्दिष्ट असणारी कैवल्यावस्था, या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी कठोर साधना, समाधीचे असणारे विविध टप्पे, पायर्‍या असे तत्त्वज्ञान या ग्रंथाचा मूळ स्रोत आहे आणि या सर्वांचा परामर्श घेऊन हा ग्रंथ विवरण केला गेला आहे.
 
 
योगदर्शनामध्ये पतंजली ऋषींनी जो अष्टांगयोग सांगितला आहे, म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यातील बहिरंग समजल्या जाणार्‍या यम-नियम आदींच्या आचरणातून सर्वसामान्य प्रापंचिक व्यक्तीला स्वतःचे एक विवेकशील जगणे शक्य आहे, असा या लेखिकेला वाटणारा विश्वास तिने मांडलेल्या विवेचनामधून दिसून येतो.
पतंजलींच्या नजरेसमोर असणारा योगसाधक हा आश्रमात गुरुसमवेत राहून जीवन कंठत होता. नेहेमीच्या अर्थाने संसारी नव्हता. कैवल्याच्या दृष्टीने योगसाधना करणार्‍या साधकाने यम-नियम तर पाळावेतच, पण याचबरोबर प्रापंचिक व्यक्तीनेही यम-नियम निरपवाद पाळण्याचे ध्येय समोर ठेवले तरी त्याचा सदसद्विवेक नकळतपणे जागृत होतो हा विश्वास देण्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक होऊ शकेल.
या ग्रंथामध्ये ऋषी पतंजली यांनी सांगितलेली धर्ममेघ समाधी म्हणजेच कैवल्यावस्थेची अत्यंत खडतर वाटचाल कर्मविपाकाच्या सिद्धांताच्या साह्याने लेखिकेने विशद केली आहे. तिथपर्यंत पोहोचणे ही जन्मजन्मांतरीची साधना आहे. पण लेखिकेने सांगितल्याप्रमाणे अष्टांग मार्गाकडे जरी वळले तरी यातील यम-नियमांमध्ये सामावलेले अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही पाच व्रते तसेच शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान ही महाव्रते प्रापंचिक, संसारी माणसाने दैनंदिन जीवनात प्रामाणिकपणे आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. तसे केले, तर त्याचा एक सकारात्मक परिणाम अनुभवता येतो. कोणालाही दुःख न देणे, सत्याला धरून वागणे, चोरी कधीही न करणे, अवाजवी वस्तूंचा व नकारात्मक वस्तूंचा साठा न करणे यांचे पालन जरी केले तरी शारीरिक, मानसिक शुद्धी होऊन शुद्ध, सात्विक, संपन्न व्यक्तिमत्व घडते, असा लेखिकेच्या मनामध्ये असणारा ठाम विश्वास या ग्रंथलेखनामधून व्यक्त होतो.
 
 
सत्प्रवृत्ती, सदाचार, सद्सद्विवेकबुद्धी जागृत होऊन आध्यात्मिक विकासाची वाटचाल सुरू होते व समाधीचा टप्पा कितीही दूरचा वाटत असला तरी त्या दिशेने होणारी प्रगती जीवनामध्ये मानसिक सामर्थ्य वाढवणारी असते. जीवनामध्ये उद्भवणार्‍या अडचणींचे निवारण होण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी उपकारकच होते, असे या ग्रंथातून लेखिकेने एका परीने एक आश्वासनच दिले आहे. पतंजली ऋषींनी सांगितलेला हा समाधी मार्ग अवघड वाटत असला तरी अशक्य नाही. सूक्ष्म गतीने का होईना, समाधी मार्गाकडे जाण्याची दिशा मिळेल असे लेखिकेने म्हटले आहे.
प्रस्तुत ग्रंथामध्ये लेखिकेने ’पातंजल योगदर्शन’ या ग्रंथाचा तौलानिक दृष्टीने विचार करून, पतंजली ऋषी यांनी लिहिलेल्या योगदर्शन ग्रंथातील चारही पादांचे विवरण केले आहे. यातील पहिला पाद ’समाधीपाद’, दुसरा ’साधनपाद’, तिसरा ’विभूतीपाद’ आणि चौथा ’कैवल्यपाद’ आहे. चारही पादांचे सूत्राच्या साह्याने विवेचन करत प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी मूळ सूत्रे, त्या सूत्रांचा मराठीत अर्थ देऊन विवेचन करत हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाच्या शेवटी ग्रंथात येणार्‍या तत्त्वज्ञानाच्या परिभाषेचा सोप्या भाषेत अर्थ, संस्कृत शब्दांचा मराठीत अर्थ आणि संपूर्ण सूत्रे सलगपणे या ग्रंथाच्या परिशिष्टात त्यांनी दिलेला आहे. त्याबरोबरीने संदर्भ ग्रंथांची सूची देऊन प्रस्तुत ग्रंथ तत्त्वज्ञानाच्या अर्थाच्या आणि आकलनाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा ग्रंथ ’ग्रंथाली प्रकाशनाने’ प्रसिद्ध केला आहे. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध लेखिका, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे व पूज्य स्वामी श्रीगोविंददेव गिरी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
 
पुस्तकाचे नाव : पातंजल योगदर्शन
निरंतर साधना
लेखक : डॉ. धनश्री साने
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
मूल्य : 500 रु.