ग्रामविकासासाठी ‘भगीरथ’ प्रयत्न

विवेक मराठी    17-Jul-2025
Total Views |
krushivivek
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. ही संस्था विविध प्रकल्प आणि प्रशिक्षणाद्वारे शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत करते. बायोगॅस, कुक्कुटपालन, शेळीपालन, महिला बचत गट, जल आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या या संस्थेचा परिचय करून देणारा हा लेख.
 
 
थोर हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांचे एक वाक्य आहे- शेतकर्‍याच्या मुलाला शेणाचा दुर्गंध येऊ लागला की, ओळखा दुष्काळ येणार आहे. आज आपण हे पाहत आहोत, अनुभवत आहोत. ’उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ असे आपण म्हणतो व तसेच ऐकायची आपणाला सवय झालेली आहे. राजकीय भाषणे आपण याच अनुषंगाने ऐकत असतो. खरा कष्ट करणारा शेतकरी असे काही ऐकतही नाही, बोलतही नाही आणि भाषणंही करीत नाही. तो शेतामध्ये घाम गाळत असतो. अर्थाअर्थी या सार्‍यांशी त्याचा काही संबंधही येत नाही. त्याची नित्यपूजा सतत चालूच असते. फायदा-तोट्याचा त्याचा हिशोब कधीच नसतो.
 
 
उत्पादनक्षमता व उत्पादकता यातील अंतर त्याला समजत नाही असे नाही, पण त्याला त्याच्या भाषेत समजावून सांगणारा कोणी नसतो. आर. के. लक्ष्मण यांचे एक खूप चांगले कार्टून आहे. चार शेती तज्ज्ञ शेतात शेतीसंबंधात चर्चा करत असतात आणि बांधावर एक शेतकरी हे सारे कौतुकाने पाहतो आहे. सूटबूटवाले लोक काय चर्चा करताहेत ते तो लक्षपूर्वक ऐकत आहे. खाली एक खोचक वाक्य आहे. 'Who is That Funny Guy?' असे ते तज्ज्ञ लोक या शेतकर्‍याकडे पाहून म्हणत आहेत. व्यंगचित्र वास्तवाशी जोडलेले आहे. त्यातील उपरोध अधिक अस्वस्थ करणारा आहे. दवाखान्यामध्ये पेशंट तपासत असताना हे सारेच आम्ही पाहत होतो, वाचतही होतो. युगात्मा शरद जोशी वाचताना असे लक्षात आले की, प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही तर जटिल आहे. याच्यामध्ये अंतर्विरोध खूप आहे. भारत व इंडिया मधील दरी वाढते आहे. याचे उत्तर हे आहे की, या दोघांना जोडण्याचा सेतू तयार करता येईल का?
 
 
krushivivek
 
 
भगीरथ विकास प्रतिष्ठानचे कार्य
 
’भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ने गेली 20 वर्षे ’आहे रे आणि नाही रे’ यांच्यामध्ये संवाद साधण्याचा एक सेतू तयार केला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान सोपे करून सांगणे हे नेहमी अवघड का जाते? हे मला समजत नाही. दुधाळ जनावरे असलेल्या एका वस्तीमध्ये जनावरांचे डॉक्टर जंतनिर्मूलनासंदर्भात जातात. ते खूप शिकलेले असतात. याची सर्व माहिती त्यांना असते. शेतकरी माना डोलावतात, टाळ्या वाजवतात. असे झाले की दोघेही खूश असतात, पण सरतेशेवटी जनावरांना जंताचे औषध कोणीच देत नाही. यामुळे डॉक्टर निराश होतात. काही वर्षांनी जनावरांची माहिती असणारा, जनावरांबद्दल जिव्हाळा असणारा साधा गावठी वैद्य त्याच गावात जातो. वस्ती तीच, माणसेही तीच असतात. हा तिथे सांगतो की, तुम्हाला एक दूधवाढीची गोळी देतो. जनावरांना चार ते पाच महिन्यांतून ती एकदा द्यायची. यामुळे दुधाळ जनावरांचे दूध वाढेल. जादू होते. सारे त्याचे ऐकतात. तो त्यांना ’अश्रलशपवरूेश्रश’ ची गोळीच देतो, पण सांगण्याची भाषा वेगळी असते. विचार पॉझिटिव्ह असतात. जंतनिर्मूलन या शब्दामुळे लोक लांब जातात, तर दूध वाढवणारी गोळी ही सकारात्मक असते. ’भगीरथ’ला हे समाजमन माहीत आहे. खरे सांगू का! एकदा तुमची आणि समाजाची नाळ जुळली की, आप-परभाव राहत नाही. या मनीचे त्या मनी पटकन जाते. विचार आपोआप पोचतात.
गोठोस व निवजे गावात दोनशे गोठे
 
 
’भगीरथाची विकासगंगा’ विकासाचा प्रवाह सामान्य माणसापर्यंत पोचवते. परिवर्तन हे हळुवारपणे होत असते. त्यासाठी बॅनर, घोषणा, मोठे मेळावे यापैकी खरंच काही लागत नाही. आमच्या मनात सामाजिक काम म्हणजे पंढरपूरच्या वारीचे प्रारूप होते. सरकारी योजनेपेक्षा ही वारी अधिक महत्त्वाची असते. ती पुढे जात राहते. समाजातील प्रश्नांची चिंता न करता आम्ही समूहचिंतन केले व त्यातून ’भगीरथ’ची कार्यपद्धती विकसित झाली. शेवटी सरकार-सरकार म्हणजे तरी काय हो? तुम्ही आणि आम्ही मिळून ठरवू तेच म्हणजे सरकार होय. ते ठरवणं जर खूप जोरकस असेल, त्याचे दृश्य परिणाम जर दिसत असतील, तर सरकार आपल्यासोबत येणारच ना! त्यासाठी निमंत्रणाची गरज नसते. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या निर्णयामुळे गोठोस व निवजे या दोन गावांमध्ये 200 गोठे नरेगातून बांधून पूर्ण झाले. प्रति गोठा साधारणपणे 80 हजार रुपये नरेगातून मिळाले. जिल्हा बँकेने यासाठी अल्पमुदतीचे कर्ज शेतकर्‍यांना मंजूर करून दिले. सर्वांनी मिळून एका ध्येयासाठी काम केल्यास यशाचा मार्ग सुकर होतो.
 

krushivivek 
 
'बायोगॅस’मध्ये भरीव कार्य
 
’बायोगॅस’ हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रथम बायोगॅससाठी कर्जही आम्हीच द्यायचो. तेव्हा आमच्याकडे 5-6 लाख रुपये होते, त्यातून आम्ही बायोगॅससाठी कर्ज द्यायचो. त्याच्यावर कोणतेही व्याज नसायचे. बायोगॅस पेटला की, शेतकरी ती मदत परत करायचे. एकदा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अनिरूद्ध देसाई, ’नाबार्ड’चे सी. के. देसाई, पुणे येथील सुंदररमण असे सारे अधिकारी ’भगीरथ’ला आले होते. वर्दे गावातील बायोगॅसचे काम त्यांनी पाहिले होते. ’णझछठच’ हा जर्मन बँकेचा प्रकल्प त्यांनी आम्हांला सांगितला. हा प्रकल्प सबसिडीआधारित नव्हता, तर कर्जआधारित होता. यामध्ये सबसिडीचे प्रलोभन नव्हते. बायोगॅस, दुधाळ जनावरे, गांडूळखत यासाठी प्रति शेतकरी रु. 80 हजार ते 1 लाखाचे कर्ज देण्याची सोय यामध्ये होती. यामधून एकूण 1200 बायोगॅस तेव्हा बांधले गेले. 6 कोटी रुपयांची कर्जे झाली. छझअ रेट 0% होता. आतापर्यंत भगीरथ प्रतिष्ठानने 9,500 बायोगॅस बांधून पूर्ण केले आहेत. केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे, तर राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश, झारखंड या भागातही बायोगॅसच्या प्रशिक्षणाचे काम भगीरथ प्रतिष्ठानने केले आहे. विकास हा कर्जातून होतो. कर्ज फेडल्यामुळे शेतकर्‍याची प्रतिष्ठा वाढते, पत वाढते. बँक पुन्हा कर्ज देताना खूप पॉझिटिव्ह असते.
 
 
बायोगॅस प्रशिक्षण घ्यायचं आहे का?
जी गावे व स्वयंसेवी संस्था बायोगॅस प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनी ’भगीरथ’शी अवश्य संपर्क साधावा. साधारणत: 2 ऑक्टोबरपासून ते मे महिना अखेरपर्यंत प्रशिक्षण वर्गाला सुरुवात होते. दोन गवंडी व एक इंजिनिअर दहा दिवस भगीरथला येऊन प्रशिक्षण घेऊ शकतात. प्रशिक्षण खर्च, निवास व भोजन या संदर्भात अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा.
 
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान
 
पत्ता- मु.पो. झाराप (देवी भावई मंदिराशेजारी),
 
तालुका - कुडाळ, जिल्हा - सिंधुदुर्ग.
 
पिन कोड - 416520
 
संपर्क क्र. - 9422596500
 
E -mail :bhagirathgram@gmail.com
 
 
 
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. हे इयत्ता 5 वीमध्ये आपण शिकतो. सामाजिक काम करत असताना आमच्या असे लक्षात आले की, ग्रामीण शेतकर्‍याची मूलभूत गरज ही सामाजिक प्रतिष्ठा आणि बँकेतील पत ही आहे. ’भगीरथ’ने कर्जासाठी दिलेले शिफारसपत्र म्हणजे बँकेसाठी सामाजिक वचनचिट्ठी असते. बायोगॅसमुळे गावाचे जंगल वाचते, स्वयंपाक तयार करण्याचा वेळ वाचतो. इंधन स्वतः तयार करणे यामधली स्वयंपूर्णता खूपच वेगळी असते. ङझॠ वाटतो चांगला, पण दरमहा रु. 1000/-, 1,200/- देणार कोण? एका गाईच्या शेणावर 3-4 माणसांचा स्वयंपाक बायोगॅसमुळे होतो. याला शौचालय जोडले तर भंगीमुक्तीही होते. ’भगीरथ’चे 50 गवंडी हे अशा प्रकारचे ग्रीन करियरचे काम करीत आहेत. उक4 म्हणजे मिथेन हा जागतिक तापमान वाढवण्यातला एक महत्त्वाचा घटक आहे, पण तो आपण इंधनासाठी वापरतो. त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पुरे होतात. बायोगॅससोबतच 3,000 बायोगॅस लाभार्थींना आपण प्रेशर कुकरही दिले आहेत. इंधनाची क्षमता त्यामुळे वाढली आहे. ’भगीरथ’चा कृतीवर विश्वास आहे.
 

krushivivek 
 सेलम हळद उत्पादक
 
 
 
गौतम बुद्ध एकदा म्हणाले होते की,’ज्याला भूक लागली आहे त्याला भाकरी द्या. त्याला तत्त्वज्ञान सांगू नका. त्याचे तत्त्वज्ञान त्याला माहीत आहे आणि त्याचे तत्त्वज्ञान आपल्या सर्वांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, कारण ते त्याच्या जगण्यातून निर्माण झालेले आहे. त्याचे विकासाचे चिंतन तोच तुम्हांला सांगेल,’ हे 100% खरे आहे.
 
 
 
 
 
मुरघास निर्मितीत योगदान
 
आंबडपाल, निवजे गावातील शेतकरी लोकांनी 200 टन मुरघास केला आहे. शेतात मका लावला असून, मका बोंडावर आल्यानंतर तो बारीक चॉप केला. रीनिफॉर्म बॅक्टेरीआचे कल्चर त्याच्यात टाकले. असे केल्यानंतर हा चारा 2 वर्ष जशास तसा टिकतो. यासाठी मुरघास बनविणारी 2 मशीन ’भगीरथ’ व डॉ. हेडगेवार प्रकल्प, माणगाव यांनी उपलब्ध करून दिली. मुरघास बनविण्याच्या एका मशीनची किंमत 4 लाख रुपये असते. सरकारी योजनेचाही लाभ याच्यामध्ये आहे. पंतप्रधान अन्नसुरक्षा योजनेतून दत्तात्रय सावंत यांना 35% अनुदान या मशीनसाठी मिळाले. दुधाळ जनावरांना मुरघास म्हणजे अमृतासमान असते. यामधील उपकारक जंतू, लॅक्टीक अ‍ॅसिड यामुळे ऋअढ, डछऋ वाढते. दूध धंद्यातील बिघडणारे अर्थशास्त्र सुधारण्याची ताकद मुरघासमध्ये आहे.
 
 
निवजे गावातील अभय परब, विठ्ठल शिरसाट, ज्योती पावसकर, दत्तात्रय सावंत, अंकुश माजगावकर हे केवळ दूध व्यवसाय करीत नाहीत, तर आपल्यासारखे अनेक नवयुवक तयार व्हावेत म्हणून दुधाचे प्रशिक्षण केंद्रही निवासी पद्धतीने या गावामध्ये चालविले जाते. सेलम हळद संदर्भातील काम हे वैशिष्ट्यपूर्ण आहे .स्वतःपुरती हळद पावडर स्वतः पिकवावी असा यामागचा हेतू. पंधरा वर्षांपूर्वी विटा (जि. सांगली) वरून सेलम (हळद) कुरिअरने मागवले. आत्ता लोकांना हळद बियाणे पुरेसे उपलब्ध आहेत. अनेक कृषी केंद्र आत्ता बियाणे आणून विकत आहेत. याचा श्रीगणेशा भगीरथने केला. ’सिंधू आत्मनिर्भर अभियान’ कोविड काळात सुरू झाले. रवींद्र चव्हाण तेव्हा पालकमंत्री होते. त्यांनी 25 हजार किलो बियाणे बचतगटांना उपलब्ध करून दिले, हे विशेष. ’भगीरथ’ या सर्वांमध्ये मार्गदर्शनाचे काम करते. 3-4 वर्षात गावांमध्ये त्यांची स्वतःची टीम उभी राहते. ’भगीरथ’ एकाच गावात कधी अडकून राहत नाही. संन्याशाने म्हणे तीन दिवसांच्यावर एकाच गावात राहू नये असे लोक सांगतात. कोकणात एक पारंपरिक म्हण आहे. जावई व मासा तीन दिवसांच्या वर राहता कामा नये, मग वास येतो.
 
 
कार्यपद्धती
 
’भगीरथ’ची कार्यपद्धती खूप विचारपूर्वक केलेली आहे. खरं तर ती आम्ही केलेली नसून, ती विचारपूर्वक झालेली आहे. काम करता-करताच कार्यपद्धती विकसित झालेली आहे. व्हिजन, मिशन हे लिहिले जातेच, पण व्हिजन, मिशन हे जेव्हा समाजासोबत काम करीत असताना लक्षात घेऊन लिहिले जाते, तेव्हा ते केवळ डॉक्युमेंटेशन राहत नाही तर तो एक वस्तुपाठ ठरतो. समाजाला मदत करत असताना समाजाला अपंगत्व येता कामा नये, तर आपल्या मदतीतून समाज स्वयंपूर्ण झाला पाहिजे हा ’भगीरथ’चा विचार आहे. स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर व्यवस्था उभी करणे ही आदर्श स्थिती आहे. विकास ही लोकचळवळ झाली पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान हा त्याचा प्राण पाहिजे. सामाजिक काम हे भावनेपोटी जर उभे राहिले, तर फार काळ टिकत नाही. यावर अजूनही लिहिण्यासारखे खूप आहे.
 
 
’भगीरथ’चा रोडमॅप केलेला आहे. आतापर्यंत 20 वर्षे झालीत, पुढील 25 वर्षे नजरेच्या टप्प्यामध्ये आहेत. ही विकासाची गंगा अंत्योदयासाठी आहे. महात्मा गांधी, पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे खरं तर हे स्वप्न होते. आम्ही त्याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही नाव खरं तर ज्या प्रमाणात चर्चेमध्ये आली पाहिजे होती, त्या प्रमाणात ती चर्चेमध्ये आली नाहीत. आपण अन्य विषयांच्या चर्चाच खूप केल्या. पण या माणसांच्या मेंदूमध्ये नक्की काय चालत होतं, ते आम्हांला पचवता आलं नाही. विकसित भारत, विश्वगुरू भारत म्हणत असताना या दोन महानुभावांच्या भारतीय चिंतनाचा आवाका कृतिरूप करण्याची जबाबदारी आपली आहे. अन्यथा आम्ही शहरीकरणाच्या दिशेने जाऊ, ग्रामीण विकास हे स्वप्नवत वाटेल. ते होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कुणाचे तरी ध्वज खांद्यावर घेऊन आयुष्यभर जिंदाबाद, मुर्दाबाद करून स्वतःची डोकी उद्ध्वस्त करण्यापेक्षा जगन्नाथाच्या रथाचे आपण पाईक होऊया. तो रथ कसा पुढे जाईल ते पाहूया. समर्थ भारत यातूनच निर्माण होईल असे आम्हांला वाटते, नाही का?
 
- डॉ. प्रसाद देवधर
लेखक भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत.