@गौरी सुमंत डोखळे
पद्मश्री गिरीश प्रभुणे अमृतमहोत्सव समिती आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या पुढाकाराने 12 जुलै रोजी पद्मश्री गिरीश प्रभुणे काकांच्या कर्मभूमीत म्हणजे चिंचवडला रामकृष्ण मोरे सभागृहात हा हृद्य सोहळा पार पडला.
आज एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा गौरवसोहळा होता... तिथे त्यांचे विद्यार्थी जमले होते, सोबत काम करणारे कार्यकर्ते आले होते, गुरुकुलात राहणारी मुलं होती आणि पालापालांतून फिरणारे त्या लेकरांचे मायबाप होते, गुरुकुलातले अध्यापक होते, वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरदेखील होते, त्यांचे आप्तसखेही होते आणि फारशी ओळख नसलेलेही हजर होते. या निरनिराळ्या लोकांच्या डोळ्यात मात्र दिसत होते ते प्रभुणेकाकांबद्दलचे प्रेम, आदर, कौतुक आणि आपुलकी. सर्वांच्या मनात एकच भाव दाटून येत होता, ‘आप्तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाऊ त्यांना आरती.’
प्रसंग ही असाच खास होता. निमित्त होते ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या आप्तेष्टांनी आयोजलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे. आपल्याच समाजातील असे काही लोक जे अनेक वर्षांपासून वंचित राहिले होते, प्रचंड वेगाने धावणार्या मुख्य प्रवाहापासून जे तुटून फार मागे पडले होते, आपल्याच ज्या बांधवांना तथाकथित प्रगत नागरी लोक विसरले होते, अशा भटके-विमुक्त जातीजमातीतील लोकांना पुन्हा मुख्य धारेशी जोडणार्या, त्यांच्या पुनरुत्थानासाठी तनमनधनच नव्हे तर आपले सर्वस्व अर्पण करणार्या गिरीश प्रभुणे काकांचा पंचाहत्तरावा जन्मदिवस गेल्या 19 ऑक्टोबरला झाला. या अनुषंगाने एक गौरव समारंभ करावा, असे त्यांचे जवळचे मित्र पद्मश्री रमेश पतंगे यांच्या मनात होते. अमृतमहोत्सवी जन्मदिवस साजरा करणं हे नुसतं निमित्त; खरं तर हा सोहळा होता एक क्षण थांबून मन मोकळं करण्याचा. जे प्रेमाचे, आदराचे चार शब्द बोलायचे राहून गेले होते, मनात असलेली कृतज्ञतेची भावना मनातच राहिली होती ती व्यक्त करण्यासाठी, या समाजऋषीच्या खडतर तपाला नमन करण्यासाठी, समाजसेवेच्या यज्ञात मग्न असलेल्या या ऋत्विकाचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि एवढेच नाही तर त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन असेच नवीन तपस्वी निर्माण व्हावे यासाठी हा समारंभ करावा असं रमेश पतंगे यांना मनोमन वाटत होतं. इतर अनेकांच्याही मनात हीच सुप्त इच्छा होती. त्यानुसार पद्मश्री गिरीश प्रभुणे अमृतमहोत्सव समिती आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या पुढाकाराने 12 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता काकांच्या कर्मभूमीत म्हणजे चिंचवडला रामकृष्ण मोरे सभागृहात हा हृद्य सोहळा पार पडला.
व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी, पद्मश्री रमेश पतंगे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, विवेक प्रकाशनाच्या पुस्तक विभागाचे संपादक रवींद्र गोळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंहजी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकरराव जगताप, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमित गोरखे, अप्पा गवारे, आमदार उमाताई खापरे, भारतीय जनता पक्षाचे शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगेश बहल आणि प्रभुणेकाकांच्या कार्यात जीवनभर सहकार्य करणार्या त्यांच्या अर्धांगिनी अरुंधती प्रभुणे असे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्याशिवाय प्रभुणेकाकांसोबत काम करणारे कार्यकर्ते, यमगरवाडी आणि गुरुकुलममध्ये घडलेले त्यांचे विद्यार्थी, गुरुकुलचा अध्यापक वर्ग आणि काकांच्या सहवासाचा परिसस्पर्श झालेले कितीतरी जण यावेळी त्यांना शुभेच्छा द्यायला आले होते.
भारतमातेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर काकांच्या गुरुकुलातील हिर्यांच्या तेजाची एक छोटीशी झलक सर्वांनी पाहिली ती गुरुकुलमच्या विद्यार्थिनींनी म्हटलेल्या स्वागतगीत आणि शुद्ध आणि सुस्पष्ट उच्चारांसह आत्मविश्वासाने ‘ॐ ईशावास्यमिदमसर्वम्....‘ हे ईशोवास्योपनिषद म्हणत या चिमुरड्या मुलींनी सर्वांचं मन जिंकलं. तबला, हार्मोनियमची साथ देणार्यादेखील गुरुकुलच्या विद्यार्थिनीच.
काकांची या सर्व कामासाठी चालू असलेली धडपड, धावपळ, कष्ट हे जवळून पाहिलेल्या सुनील भंडगे यांचा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना कंठ दाटून आला. लोकांच्या मनात काकांविषयी असलेली आपुलकीच त्यांच्या या तरळलेल्या अश्रुतून जाणवली.
त्यानंतर या सोहळ्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वांच्या मनात असलेली आदराची आणि कृतज्ञतेची भावना औपचारिक रीतीने व्यक्त करण्याचा क्षण. भैयाजी जोशी यांनी सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन गिरीश प्रभुणेकाकांचा आणि त्यांच्या सोबत कायम उभ्या असलेल्या अरुंधतीकाकूंचा सत्कार केला. निरंतर लोकांमध्ये राहणार्या काकांच्या कौतुक सोहळ्याला लोकपरंपरांचे कोंदण न लागेल तरच नवल. प्रत्यक्ष अयोध्येमध्ये राममंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ज्यांनी सेवा दिली असे प्रसिद्ध चौघडावादक रमेश पाचंगे यांनी या सत्काराच्या वेळी अप्रतिम असे चौघडावादन केले. उपस्थित सर्वांना गिरीश काकांच्या कार्याचे थोडक्यात दर्शन घडवणारी एक अतिशय सुंदर चित्रफित दाखवण्यात आली. या सुरेख चित्रफितीचे लेखन आणि संकल्पना रवींद्र गोळे यांची होती.
गेली 25 वर्षं वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने काकांच्यासोबत असणार्या रवींद्र गोळे यांनी गिरीश प्रभुणेकाकांवर लिहिलेल्या ‘गिरीश प्रभुणे...जसे कळले तसे’या पुस्तकाचे भैय्याजी जोशी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. मुंबईतील दैनिक तरुण भारतने देखील काकांवर एक विशेष पुरवणी प्रकाशित केली. तिचे वाटपही यावेळी करण्यात आले. काकांच्या असामान्य कार्याला लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेले हे जणू नमनच होय.
या हृद्य सोहळ्यात आपल्या ‘परभुने‘काकांना भेटायला, त्यांना शुभेच्छा द्यायला, त्यांचे आशीर्वाद घ्यायला जमलेल्या लोकांचे प्रेम आणि आदर हे जसे पाहण्यासारखे होते तसेच या कार्यक्रमाचे दुसरे वैशिष्ट्य होते ते म्हणजे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे विचार ऐकणे. या दिग्गजांना ऐकणे ही श्रोत्यांना पर्वणीच होती. या अमृतवाणीमधून प्रेरणा घेऊनच नवीन कार्यकर्ते तयार होत असतात. त्यामुळेच जास्तीतजास्त लोकांना काकांच्या कार्याचे महत्त्व समजावे त्यातून प्रेरणा मिळावी, हा देखील या सोहळ्यामागील एक विचार होताच.
सत्कर्मावर दृढ विश्वास असणारे गिरीश प्रभुणे जीवनभर कर्मशीलता हेच पूजेचे साधन मानून समाजरूपी ईश्वराच्या सेवेचं तप करत आहेत. हे व्रत त्यांनी शरीर, बुद्धी, मन या सर्वांच्या पलीकडे जाऊन आंतरिक शक्तीच्या बळावर घेतले असल्याने लहान-मोठ्या अडचणी त्यांना थांबवू शकल्या नाहीत. ही साधना अखंड, अविरत चालू आहे, असे गौरवोद्गार भैयाजी जोशी यांनी काढले. “समाजाचे प्रश्न बघण्यासाठी आपल्या दोन चक्षूंच्या पलीकडे असणारी जी अंतःकरणाची दृष्टी लागते ती गिरीशजींकडे आहे. चाकोरीबद्ध मळलेली वाट सोडून निराळी वाट चोखाळण्याचे साहस आणि ठेचा लागल्यावर निराश न होता मार्ग बदलून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची लवचीकता त्यांच्याकडे आहे. हीच आत्मिक शक्ती या समाजतपस्व्याचं खरं बलस्थान आहे,’‘ असं भैयाजी म्हणाले.
पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या प्रधान आचार्या पूनमताई गुजर गुरुकुलमच्या अगदी स्थापनेपासून म्हणजे 2006 पासून या कार्याशी जोडल्या आहेत. त्यांनी सांगितले की,“समाजातील तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीच्या उत्थानाची भूमिका असलेले आमचे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम भारतीय शिक्षण पद्धतीचा आधार असलेल्या गुरुकुल पद्धतीने आणि कौशल्याधारित शिक्षणपद्धतीने चालते.” काकांचा शैक्षणिक दृष्टिकोन कसा आहे, हे त्यांनी फार सुंदर उदाहरणाने सांगितलं. त्या म्हणाल्या,“काका म्हणतात की शिक्षण हे नदीच्या प्रवाहासारखं हवं. नदी ही जशी प्रवाहात येणारे सगळे खाचखळगे भरत, वाटेत येणार्या दगडधोंड्यांना देखील आपला ओलावा देत पुढे जाते तशीच आपली शिक्षण पद्धती हवी.”
यमगरवाडी प्रकल्पाचे पहिले समन्वयक, ज्यांनी गेली 30-40 वर्ष प्रभुणेकाकांबरोबर काम केलं आहे त्या महादेव गायकवाड यांनी काकांची समाजातील भ्रमंती, त्याचा अभ्यास आणि त्यावरील चिंतन किती सखोल आहे यावर प्रकाश टाकला. या यमगरवाडी प्रकल्प उभारणीत अनेक कार्यकर्त्यांबरोबर तुकाराम माने यांचे अबोल आणि अफाट योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले. काकांच्या या अतुलनीय कामाचं अर्धे श्रेय मात्र त्यांच्या पत्नी अरुंधती काकू यांना जातं याचा गायकवाड यांनी आवर्जून उल्लेख केला.
यमगरवाडी प्रकल्पाचा पहिला विद्यार्थी परमेश्वर काळे आणि त्याच प्रकल्पातून शिकून इंजिनिअर झालेली पहिली मुलगी ललिता जाधव हे देखील यावेळी हजर होते. ललिता जाधव म्हणाली, “आम्हाला साधं माणसासारखे जगता येत नव्हते तेव्हा काकांनी आम्हाला जवळ केलं. त्यांच्या परिसस्पर्शाने माझ्यासारख्या किती तरी मुलींच्या जीवनाचं सोनं झालं. त्यामुळे माझ्यासाठी काकाच परमेश्वरस्वरूप आहेत.”
पद्मश्री रमेश पतंगे यांनी आपले मित्र गिरीश प्रभुणे यांचे लोकांना फारसे माहीत नसलेले पैलू सांगितले. 1992 मध्ये झालेल्या कारसेवेच्यावेळी जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळी काकांनी पतंगेजींच्या सांगण्यावरून तेथील वृत्तांकन केले होते. अमरनाथ यात्रेकरूंच्या आंदोलनाच्या वेळीही गिरीश प्रभुणेच हे काम योग्य रीतीने करू शकतील अशी त्यांना खात्री होती आणि काकांनी आपल्या मित्राच्या सांगण्यावरुन साप्ताहिक ‘विवेक’साठी ही दोन्ही कामं उत्तम पार पाडली होती, असे पतंगे म्हणाले.
या सोहळ्याचे उत्सवमूर्ती गिरीश काका यांनी त्यांच्या या कार्याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिले. ‘संघाने मला घडवलं’, असं ते म्हणाले. “मी या भटके-विमुक्त समाजासाठी काही करू शकलो कारण संघाचे आशीर्वाद आणि संघाचे ज्येष्ठ प्रचारक दामुअण्णा दाते, मुकुंदराव पणशीकर इ. माझ्या पाठिशी उभे राहिले म्हणून हे काम करू शकलो.
ही तर कामाची नुसती सुरुवात आहे अजून कितीतरी कामे बाकी आहेत”, असेही या अखंड सेवेचे व्रत घेतलेल्या तपस्व्याने खास नमूद केले.
खासदार श्रीरंगआप्पा बारणे, आमदार शंकरराव जगताप आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखरसिंह यांनी देखील आपण अनुभवलेले काका कसे आहेत, त्यांच्याकडून काय शिकायला मिळाले, हे आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाची रंगत अजून वाढवली ती फुलपगारे बाई यांच्या वैयक्तिक गीताने. सर्वांचे आभार संजय तांबट यांनी मानले. या सुंदर सोहळ्याची सांगता पसायदानाने झाली.
चापेकर स्मारक समिती, सामाजिक समरसता मंच, माणूस, असिधारा, ग्रामायण, यमगरवाडी प्रकल्प, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् अशी कितीतरी कार्य करीत आपलं सगळं आयुष्य समाजातील वंचितांच्या उत्थानासाठी वाहून घेतलेल्या काकांना उदंड आणि निरामय आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.