@सुरेश जाखडी
रामाची भक्ती केल्याने, रामाला शरण गेल्याने माया अंतर्गत सर्व भ्रम नाहीसे होतात म्हणून स्वामी रामाला ’सकळभ्रमविरामी’ असे विशेषण लावतात. राम मायारूपी सर्व भ्रम नाहीसे करणारा असल्याने कायमस्वरूपी सुख समाधान मिळवण्यासाठी शरणागतता व रामाची भक्ती आवश्यक आहे. रामाचा आश्रय केल्यावर सारे भ्रम नाहीसे होऊन अतींद्रिय ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येईल.
आनंद मिळावा, सुख मिळावे यासाठी माणूस आयुष्यभर धडपड करीत असतो. शरीरसुख देणार्या भौतिक प्रापंचिक घटकांच्या, आणि मानसिक सौख्यासाठी देहबुद्धी वाढवणार्या तसेच अहंभावाचे पोषण व्हावे म्हणून स्तुतिपाठकांच्या शोधात माणूस आयुष्यभर भटकत असतो. पण अशाश्वताच्या मागे धावून शाश्वत सुखसमाधान माणसाला मिळत नाही. तरीही अनुभवाने शहाणे न होता, माणूस त्याच प्रापंचिक गोष्टीत आनंद मिळण्याच्या लालसेने अडकून पडतो. सामान्य माणसाची ही स्थिती जाणून स्वामींनी ’अनुदिनी अनुतापे’ या करुणाष्टकातील 13व्या श्लोकात सांगितले आहे की, सुख सुख म्हणतां तें दुःख ठाकोनि आले।’ प्रपंचात हे सर्वांच्या अनुभवास येते. एखादी कृती सुख देणारी आहे असे वाटून ती करायला जावे, तर त्यामागील, प्रथमदर्शनी न दिसणारे, दुःख समोर उभे राहाते व ते भोगल्यावाचून गत्यंतर नसते.
कवी कुसुमाग्रज यांनी एका कवितेत म्हटले आहे की, ’व्यवहाराच्या या बाजारात दुःख सुखाचा सदरा घालून आपल्याला भेटत असते?’ ते खरे आहे. पण तरीही झाल्या गोष्टींचा पश्चात्ताप आपल्याला होत नाही. त्यापासून आपण धडा घेत नाही. आपण देहबुद्धीमुळे सुखाचा भास निर्माण करणार्या दुःखाला जवळ करतो. परंतु समर्थांसारख्या सत्पुरुषांना ही जाणीव बालवयात येते आणि प्रपंचाचे खरे स्वरूप कळून त्याविषयी विरक्ती निर्माण होते. असे विरक्त पुरुष संतुष्ट मनाने रामभक्तीचे विश्रांतिस्थान शोधतात, ’अनुदिनी अनुतापे’ या करुणाष्टकातील पुढील श्लोक या आशयाचा आहे. तो श्लोक असा -
उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं।
सकळभ्रमविरामी रामविश्रामधामीं ॥
घडि घडि मन आतां रामरूपीं भरावें।
रघुकुळटिळका रे आपुलेसें करावें ॥14॥
अन्वयार्थ- हे रामा, (प्रापंचिक) विषयांपासून (निवृत्ती झाल्याने) मला विरक्ती (उपरति) प्राप्त झाली आहे. (त्यामुळे) मी परमसंतुष्ट, तृप्त आहे, (माझ्या ठिकाणचे) सर्व भ्रम नाहीसे झाल्याने (मी) रामरूपी विश्रांतिस्थानी (आलो) आहे. आता क्षणोक्षणी (घडी घडी), (माझे) मन रामरूपाने भरून जाऊ दे, रघुकुलश्रेष्ठ रामा, (तू) मला आपलेसे करावे. (ही मनोकामना.)
सामान्य माणसाचे जीवन पाहिले तर व्यावहारिक जगतातील भौतिक आकर्षक गोष्टीत सुख आहे, असे वाटून त्याचे आचरण करताना सुख दूर राहून दुःख त्याच्या वाट्याला येते. हे दुःख भोगून झाल्यावर भौतिकतेत सुख शोधण्याच्या आपल्या कृत्यांचा त्याला पश्चाताप होताना दिसत नाही. झाल्यागेल्याचा खेद वाटत नाही, उपरती होत नाही. ज्या प्रापंचिक घटकांमुळे आपण सुख फार थोडे, पण दुःखच जास्त अनुभवले, त्यापासून आपण दूर व्हावे, त्यांच्या वाट्याला जाऊ नये असे विरक्तीचे विचार त्याच्या मनात येत नाहीत. विरक्तीच्या अभावाने त्याचे मन भौतिक आकर्षणात पुन्हा पुन्हा सुख शोधत राहाते. ती मानसिक अवस्था जुगारात हरलेल्या माणसासारखी असते. जुगारात जिंकू असे वाटल्याने माणूस जुगार खेळायला प्रवृत्त होतो. परंतु त्यात हरल्यावरही केव्हा तरी जुगारात आपण नक्की जिंकू या हव्यासापोटी तो कर्जबाजारी होईपर्यंत जुगार खेळतच राहातो. तीच गत अशाश्वत भौतिकात सुख शोधणार्यांची होते. त्यामुळे क्षणभंगुर प्रापंचिक गोष्टीत सुख शोधणारा कधीही पूर्ण समाधानी होऊ शकत नाही.
मी देहच आहे असे ठामपणे वाटत असल्याने वासनातृप्ती, गर्व अहंकार, ताठा, मीपणा, या विकारांनी माणूस ग्रासला जातो. खरे समाधान शोधण्याचा त्याचा मार्ग चुकल्याने सामान्य माणूस दुर्गुणांच्या विकारांच्या आहारी गेलेला असतो. त्यातच तो सुखसमाधान शोधण्याचा प्रयत्न करतो. पण खरे सुख त्याच्या वाट्याला येत नाही. तरीही वासना, कामना, अहंभाव इत्यादिकांचा त्याग करून आपण पूर्ण समाधान देणार्या रामाला भक्तिभावाने शरण जावे असे माणसाला वाटत नाही. गत आयुष्यातील दुर्गुणांचा खेद वाटून माणसाला खरोखर पश्चात्ताप झाला तर अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध अंतःकरणात विषय विकारांना स्थान नसल्याने तेथे विरक्तीची स्थिती अनुभवता येते. वैराग्यातील भक्तिमार्गातील आनंदाची प्रचिती येते. तथापि देहबुद्धीच्या प्रभावाने विरक्ती अनुभवण्यात अनेक अडचणी येतात. त्यांचे निवारण न करता आल्याने देहबुद्धी, अहंकार सोडावा की न सोडावा याबाबत मनात संभ्रम निर्माण होऊन जीवनातील शाश्वत समाधानाचा शोध लागत नाही. भ्रम मनात अस्थिरता निर्माण करतात. मनाची शांतता भंग पावते.
आनंद मिळवण्यासाठी आपण प्रापंचिक गोष्टींच्या मागे धावतो ते बरोबर की विरक्तीचा अनुभव घेऊन विकारांचा, वासनांचा त्याग करावा व रामभक्ती करावी हे बरोबर, याचा निश्चय न झाल्याने संभ्रमावस्था निर्माण होते. मन मुळात चंचल, त्यात पुन्हा भ्रम निर्माण झाल्यास त्याची अवस्था समाधानी असू शकत नाही. रामाची भक्ती केल्याने आपले भ्रम नाहीसे होऊन मन शुद्ध होते, असे स्वामी म्हणतात. त्यासाठी सर्वप्रथम भ्रम म्हणजे काय हे नीट समजून घेतले पाहिजे. स्वामींनी दासबोधात दशक 10, समास 6 हा ’भ्रम निरुपण’ नावाचा समास लिहिला आहे. त्यात स्वामींनी भ्रमाचे अनेक प्रकार सविस्तरपणे सांगितले आहेत. सर्वसाधारणपणे ज्ञान आणि अज्ञान या दोन कल्पना आमच्या परिचयाच्या आहेत. एखादी वस्तु जशी आहे तशी ती सर्वांगाने जाणणे याला ज्ञान म्हणतात आणि ज्ञानाचा जेथे अभाव असतो त्याला अज्ञान असे म्हणतात. समर्थ यापुढे जाऊन विचार करतात. एखादी वस्तू जशी नाही; तशी ती वाटणे आणि तेच सत्य आहे असे सांगत सुटणे याला समर्थ ’विपरीत ज्ञान’ असे म्हणतात. थोडक्यात, मुळात वस्तुची माहिती नसताना आपल्या कल्पना त्या वस्तुवर लादून आपण सांगू तेच खरे ज्ञान, याला विपरीत ज्ञान म्हणतात. विपरीत ज्ञानाने भ्रम निर्माण होतात. भ्रमाचा निरास केल्यावर मायेतील फोलपणा समजतो व अतींद्रिय परब्रह्माचा अनुभव घेता येतो. रामाची भक्ती केल्याने, रामाला शरण गेल्याने माया अंतर्गत सर्व भ्रम नाहीसे होतात म्हणून स्वामी रामाला ’सकळभ्रमविरामी’ असे विशेषण लावतात. राम मायारूपी सर्व भ्रम नाहीसे करणारा असल्याने कायमस्वरूपी सुख समाधान मिळवण्यासाठी शरणागतता व रामाची भक्ती आवश्यक आहे. रामाचा आश्रय केल्यावर सारे भ्रम नाहीसे होऊन अतींद्रिय ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येईल. अंतःकरणात खर्या विश्रांतीचा अनुभव येईल. स्वामी विनंती करीत आहेत की, हे रामा क्षणाक्षणाला माझे मन तुझ्या रूपाशी एकरूप होऊ दे. त्यामुळे माझे वेगळे ’मीपण’ विलय पावेल. माझ्या मनात अहंकार, विषयवासना, स्वार्थ इत्यादी विकारांना स्थान राहाणार नाही. मी मनातीत झाल्याने मला ब्रह्मानुभूतीचे समाधान मिळेल. माझ्या शांत मनाला तुझ्या रूपाने खरे विश्रांतिस्थान प्राप्त होईल, तेव्हा रघुकुलाचा आदर्श असलेल्या रामा, तू मला आपलेसे करून टाक, तुझ्या रूपात विलीन होणे ही माझ्या दृष्टीने खरी मुक्ती होय.