ज्येष्ठ संघ कार्यकर्ते सुनीलजी खेडकर यांचे रविवार, 13 जुलै 2025 रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या समर्पित संघकार्याची व व्यक्तिमत्वातील गुणांची उजळणी व त्यांचे स्मरण घडविणारा लेख.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आयुर्वेद भास्कर कै. वैद्य परशुराम य. वैद्य खडीवाले तथा दादा यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणार्या ’दर्शन योगेश्वराचे - आयुर्वेद भास्कर दादा वैद्य खडीवाले’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन झाले. तेव्हा मोहनजींनी संघ कार्यकर्त्याच्या कार्यपद्धतीबद्दल मांडणी करताना सांगितले की,विविधतेने नटलेल्या जगाच्या मुळाशी एकच तत्त्व आहे. ते ओळखून वागणे म्हणजे आपलेपणा होय. आपलेपणाच्या सूत्रात सगळ्यांना गुंफणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे आणि संघ कार्यकर्त्याने याच सूत्राचा अवलंब करणे अपेक्षित आहे. हेच सूत्र घेऊन आयुष्य जगले सुनीलराव...
सुनीलराव खेडकर म्हणजे आम्हां सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे ज्येष्ठ सखा - मार्गदर्शक. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये समन्वयाचे आणि समरस संघ कार्यकर्त्याचे दर्शन वारंवार घडायचे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी तर ते एक आदर्श व्यक्तिमत्व होते.
सुनीलराव खेडकर यांनी आपल्या संघजीवनात मुंबई येथील सांताक्रूझ भाग सहकार्यवाह, संभाजी भागाचे बौद्धिक प्रमुख, पुणे महानगराचे बौद्धिक प्रमुख, पुणे महानगर बालगोकुलम् या उपक्रमाचे संयोजक, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य, भारतीय विचार साधनाचे सहकार्यवाह व पुणे महानगर प्रचार प्रमुख अशा विविध जबाबदारी सांभाळल्या. शीख संप्रदायाचा त्यांचा विशेष अभ्यास होता.
ते मुळचे मुंबईचे होते पण मागील तीसहून अधिक वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्यास होते. अभियंता म्हणून त्यांचे शिक्षण झालेले होते. विविध कंपन्यांमध्ये त्यांनी व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित जबाबदार्या सांभाळल्या. मात्र संघकामाला वेळ देता यावा, मनाप्रमाणे काम करण्याच्या त्यांच्या मनोदयातून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि त्यानंतर तांत्रिक क्षेत्र व व्यवस्थापन सल्लागार म्हणून स्वत:च्या व्यवसायाला सुरुवात केली होती. विविध संस्थांचे सल्लागार म्हणूनही ते कार्यरत होते. याच काळात पुणे महानगराचे प्रचार प्रमुख हे दायित्व त्यांच्यावर सोपविण्यात आले. या कालावधीत सुनीलरावांसोबत मला पुणे महानगर सहप्रचार प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा सारा काळ माझ्यासाठी संघकाम आणखी चांगल्या पद्धतीने शिकण्याचा होता. ते एक उत्तम संवादक - व्याख्याते म्हणून परिचित होते. अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे त्यांनी आयोजित केली होती.
मुंबईचे माहेरपण...
सुनीलराव मूळचे मुंबईचे स्वयंसेवक. मुंबई महानगरातील सांताक्रूझ भागात बालपणापासूनच त्यांच्या संघजीवनाची सुरुवात झाली. ते पुण्यात जरी वास्तव्यास असले तरी त्यांचे मुंबईपण आणि तिथल्या आठवणीत ते कायम रमत. ते आपला परिचय करून देताना मुंबईतील संघ कामाविषयी व अनुभवांविषयी आवर्जून सांगत. पण हे सांगताना त्यांचे पुणे महानगर, पुण्यातील सहवास आणि कामाविषयीचा तळमळ-समर्पित भाव कधी तसूभरही कमी झालेला जाणवला नाही. प्रत्येक भेटीत व बैठकीदरम्यान नगर-भाग-जिल्हा आणि महानगरातील रचनेतील प्रत्येक श्रेणीतील व खात्यातील कार्यकर्त्यांविषयी आत्मीयतेचा भाव. त्यांची चौकशी- कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची चौकशी ही त्यांची कार्यपद्धती ठरलेली असायची.
विशेष म्हणजे घरातील सदस्याच्या एखादा छंद-आवड वा त्याच्या उल्लेखनीय कामगिरीची ते नेहमी आठवण काढत- कौतुक करत. इतरांना त्या व्यक्तीविषयी सांगताना या वैशिष्ट्यांचा आठवणीने व आवर्जून उल्लेख करायचे.
ज्येष्ठ लेखक, विचारवंत व संघ स्वयंसेवक पद्मश्री रमेशजी पतंगे हे कार्यवाह आणि सुनीलराव सहकार्यवाह असे संघ रचनेतील दायित्व व कामातील अनुभवाविषयी ते नेहमी सांगत. अशाच काहीशा आठवणी ते प्रमोदजी बापट यांच्याविषयी देखील सांगत असत. त्यांच्या आठवणीत त्यांना संघकार्यात उत्तमोत्तम कार्यकर्ते - प्रचारकांचा सहवास लाभल्याची जाणीव सातत्याने व्हायची.
प्रचार विभागाची ओळख ते माध्यमाचा जाणकार
एखाद्या विषयाची आपल्याला फारशी माहिती नाही. पण त्या संबंधीची जबाबदारी आपल्यावर सोपविली की, आपण ती कशा रितीने स्वीकारावी, त्यात गुणात्मक व व्यवस्थापन- नियोजनाच्या दृष्टीने पारंगतता कशी मिळवावी यासंबंधी सुनीलराव सर्व कार्यकर्त्यांसाठी एक आदर्शवत उदाहरण होते.
दररोजची शाखा आणि त्यासंबंधी विविध खात्यांमध्ये जबाबदारी सांभाळल्यानंतर सुनीलरावांकडे प्रचार विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी सहप्रमुख म्हणून साधारणपणे आम्ही पाच ते सहा वर्षे एकत्रितरित्या काम केले. तो काळ माझ्यासाठी कामात दररोज नवनवीन गोष्टी शिकण्याचा होता.
सुनीलराव नेहमी म्हणत,“हे पहा...मला पत्रकारिता - प्रचार विभागाविषयी तुझ्याइतका अनुभव आणि माहिती नाही. पण ते शिकवण्याची जबाबदारी तुझी...”आणि ते काम मी आनंदाने करत असे.
प्रचार विभागातील या कामाच्या प्रवासात त्यांनी संघ व माध्यम व माध्यमकर्मीशी संवाद, त्यासाठीची प्रक्रिया - पत्रकारिता- विविध माध्यमांमधील पत्रकारांशी परिचय, त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क, बातमी, विविध विषयांवर लेख या विषयांत काही वर्षांमध्येच चांगली पारंगतता प्राप्त केली होती.
मूलतः हाडाचा कार्यकर्ता असलेल्या सुनीलरावांना या गोष्टी शिकण्यासाठी व त्या अंमलात आणून संपर्क वाढविण्यासाठी फारसा वेळ लागला नाही, हे इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
हळूहळू प्रचार विभागातील दररोजच्या कामातील बारकावे देखील त्यांनी उत्तमरित्या जाणले होते. पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे विश्व संवाद केंद्र सक्षम करण्याच्या कामात देखील त्यांनी मोठी भूमिका बजावली. तिथे काम करणारी कार्यकर्ता मंडळी-त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, कामाचा विस्तार कशा रितीने व्हायला हवा यासाठी व्यवस्थापन व पत्रकारिता अशा दोन्ही अंगाने ते विचार करायचे.
त्यांचा हा सारा प्रवास पाहिला तर वाटते अभियांत्रिकी- तांत्रिक सल्लागार क्षेत्रातील शिक्षण असूनही ते एक माध्यम क्षेत्राचे जाणकार म्हणून त्यांनी तज्ज्ञता प्राप्त केली होती.
कोरोना काळात व नंतर अधिक सक्रियता...
कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक वेगवेगळ्या पातळ्यांवर परिस्थितीशी दोन हात करीत होते. कोरोना काळात व त्यानंतरच्या काळात देखील आपल्या प्रकृतीची काळजी घेत सुनीलराव सक्रिय होते.
संघ स्वयंसेवकांकडून होत असलेले सेवा कार्य समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आम्ही दररोज सेवा कार्याचे डिजिटल बुलेटिन काढले. सुरुवातीला पुणे महानगर स्तरावर व नंतर प्रांतभरात सुरू असेलली सेवा कार्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी, गरजूपर्यंत पोहोचावी, त्यांना देखील या सेवा कार्याचा लाभ घेता यावा या उद्देशाने हा उपक्रम आम्ही सुरू केला होता.
या डिजिटल बुलेटिन कामासाठी कोरोना काळात दुपारी बारा वाजल्यापासून आकडेवारीचे एकत्रिकरण करणे, त्या माहितीची मांडणी ठरवणे, ग्राफिकल प्रेझेंटेशन करणे व ती सर्वत्र पाठवणे ही सारी प्रक्रिया आमच्याकडून वेळेत पूर्ण करून घेण्याचे काम सुनीलराव नेटाने करीत आणि तेही कुठेही कोणालाही न दुखावता, रागवता....हे विशेष!
सुनीलराव आपल्या कामाप्रती व संघ कामाप्रती इतके शिस्तप्रिय व कटाक्षाने वेळ पाळणारे होते की, काम आणि संघ बैठकांच्या वेळा ते तंतोतंत पाळत. कधी कामासाठी त्यांना पुण्याबाहेर प्रवास करावा लागत असे... त्याचे नियोजन करताना समोरच्यांच्या देखील छोट्या- छोट्या गोष्टींचा विचार ते करत. कोरोना काळानंतर सुनीलरावांच्या तब्येतीच्या तक्रारी हळूहळू वाढत होत्या, तरीही आपली तब्येत सांभाळून घरी नित्यनियमाने आपल्या आईची काळजी घेणारे, शुश्रुषा करणारे सुनीलराव देखील आम्ही पाहिले. त्यांच्यातील श्रावणबाळाचे रूप खरंच अनुकरणीय होते.
जबाबदारी असताना व त्यात बदल झाल्यानंतरही त्यांना कौटुंबिक जबाबदारीचा भाग म्हणून काही कालावधीसाठी कन्येसह जर्मनी आणि अमेरिकेला जावे लागले. पण तिथून ते फोन करून प्रचार विभागाच्या कामाची आस्थेने व हक्काने चौकशी करीत. मार्गदर्शन करीत. हा अनुभव मला आणि पुणे महानगर प्रचार प्रमुख राजूजी चौथाईंना अगदी त्यांच्या अखेरपर्यंत आला.
या सार्या सहप्रवासात सुनीलराव एवढ्या लवकर आम्हाला सोडून जातील असे कुणाही कार्यकर्त्याला वाटले नाही. त्यांचे जाणे धक्कादायक असेच होते. पण त्यांनी शिस्तबद्धतेची व बारकाईने नियोजनाची दिलेली शिकवण ही आम्हां सर्व कार्यकर्त्यांसाठी आयुष्यभराची शिदोरी आहे...एवढे मात्र निश्चित.
सुनीलरावांना मनभरून आलेल्या असंख्य आठवणींसमवेत भावपूर्ण श्रद्धांजली.
लेखक मुक्त पत्रकार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघपश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार मंडळ सदस्य आहेत.