मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या सर्व घटकांना व वर्गांना एकत्र धरून ठेवले आहे. त्यांच्या या सर्वसमावेशक नेतृत्वाला आता एक तप पूर्ण होत आली आहे. या तपपूर्तीत असंख्य अडचणींचा सामना त्यांना करावा लागला... पण आज त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली नेतृत्व निर्माण केले आहे. देवेंद्र फडणवीस हे आता केवळ राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर वेळोवेळी दाखवलेला विश्वास, त्यांना दिलेल्या महत्त्वाच्या जबाबदार्या आणि त्यांनी पार पाडलेली कामगिरी यामुळे ते राष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाचा चेहरा म्हणून उदयास येत आहेत.
इ. स. 2014 हे भारतीय राजकारणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारे वर्ष. काँग्रेसची भ्रष्टाचारी आणि नतद्रष्ट राजवट संपून नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवर भारताला सन्मानाचे स्थान मिळवून देण्याच्या दिशेने त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली. मे महिन्यात त्यांनी घडविलेल्या या ऐतिहासिक सत्तांतरानंतर सहा महिन्यांच्या आत भाजपने महाराष्ट्रात सत्ता संपादन केली. देवेंद्र फडणवीस या तरुण तडफदार आणि आश्वासक नेत्याने भाजपला सत्तेच्या सोपानावर नेऊन बसविले.
मोदी यांनी ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्याच धर्तीवर फडणवीस यांनी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्याला अग्रगण्य व सुरक्षित राज्य म्हणून प्रस्थापित करण्यासाठी एक-एक पावले उचलायला सुरुवात केली.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा महाराष्ट्रात जवळजवळ अनागोंदी माजली होती. शेती असो वा उद्योग, पाणी असो वा कायदा-सुव्यवस्था या सगळ्याच पातळ्यांवर अराजकाला एक पाऊल कमी अशीच अवस्था होती. पदावर आल्या आल्या त्यांनी प्रशासनाला गती देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मार्ग पत्करला तो लोकांना आपल्या कामात सहभागी करून घेण्याचा. हे सरकार आपले आहे आणि आपण त्याचे भागीदार आहोत, ही भावना लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. उदाहरणादाखल, प्रशासनामध्ये युवकांचा सहभाग मिळविण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम घ्या. युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनासाठी उपयोग व्हावा, असा स्तुत्य उद्देश घेऊन ही योजना सुरू झाली. ज्या युवा पिढीच्या नावाने आपण तर्हेतर्हेची चर्चा करतो त्यांना थेट सरकारसोबत आणण्याचे हे अभिनव पाऊल होते.
त्याच प्रमाणे जलयुक्त शिवार ही त्यांची तेवढीच महत्त्वाकांक्षी योजना. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंहजी यांनीही त्या योजनेचे कौतुक केले. ज्या लातूरला रेल्वेच्या वाघिणीतून पाणी आणावे लागत होते, तिथे नदीच्या पाण्यावर शेती होऊ लागली ती या योजनेच्या बळावरच. या अभियानाद्वारे राज्यातील सुमारे 5 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. दुर्दैवाने 2019च्या निवडणुकीनंतर राजकारणाला वेगळे वळण लागले. त्यानंतर आलेल्या सरकारने या सर्व कामांवर बोळा फिरविला. जलयुक्त शिवार अभियानाची कामे नीट झाली असती तर राज्याला यंदा दुष्काळाचा सामना करावा लागला नसता, अशी कबुली गेल्या वर्षी आ. भास्कर जाधव यांना गेल्या वर्षी विधिमंडळात द्यावी लागली. यातच सर्व आले.
फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीसाठी दूरदृष्टीने जे प्रकल्प आखले व ज्या योजना राबवायला सुरुवात केली त्यांची जंत्री द्यायची म्हटली तर खूप मोठी होईल. मात्र त्या सोबतच राजकीय नेतृत्व म्हणून फडणवीस यांनी सर्व प्रतिकूलतेवर मात करत सर्व समाजघटकांमध्ये व वर्गांमध्ये आपली विश्वासार्हता निर्माण केली. ती तेवढीच महत्त्वाची आहे.
तसे पाहायला गेले तर राज्याच्या राजकारणात फडणवीस यांच्याकडे फारशी अनुकूलता अशी नव्हतीच. एक तर त्यांच्याकडे राजकीय वारसा नाही. असलाच तर तो कार्यकर्त्याचा वारसा आहे. जातीपातीने ग्रासलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात असा एखादा नेता पुढे जाणे तर सोडाच, पण त्याने टिकाव धरणेसुद्धा अवघड. परंतु फडणवीस यांनी ते साध्य करून दाखविले. ’सब का साथ, सब का विकास’ ही पंतप्रधान मोदी यांची उक्ती त्यांनी शब्दशः खरी करून दाखविली. म्हणूनच आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर येण्यापूर्वीच, साधारण 2012-13 पासून, आमदार म्हणून फडणवीसांनी तेव्हाच्या आघाडी सरकारच्या कुचकामी कारभाराचे वाभाडे काढले होते. त्यांच्या व्यासंगी नेतृत्वाची प्रचिती तेव्हाच सर्वांना आली होती. परंतु विरोधी आमदार म्हणून आक्रमकता दाखविणे वेगळे आणि शासक म्हणून सर्वसमावेशकता बाळगणे वेगळे. पण तरीही भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वांनी त्यांंच्या नावाला मुख्यमंत्री पसंती दिली, तेव्हा ते आपला प्रभाव पाडू शकतील का, अशी शंका सगळ्यांनीच व्यक्त केली होती. ती शंका पहिल्या काही महिन्यांतच दूर झाली.
राज्याच्या राजकारणात नेहमीच वरचढ ठरलेला मराठा समाज फडणवीस यांना कितपत स्वीकारेल, अशी शंका त्यावेळी अनेकांनी बोलून दाखविली होती. मात्र आपल्या निष्पक्ष आणि समावेशक कारभारातून फडणवीस यांनी ती शंकाही दूर केली. स्वपक्षातील नव्हे तर अन्य पक्षातील मराठा व अन्य समाजातील नेतेही त्याच्याबद्दल आस्थेने बोलू लागले. हा नेता द्वेष्टा नाही तर प्रेमाने आपलेसे करणारा आहे, हे सर्वांच्या लक्षात आले. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले. परंतु त्या सर्व मोर्चांना त्यांनी अत्यंत संयमाने आणि आदराने हाताळले. मराठा समाजाच्या अडचणी आणि वेदना समजून घेऊन त्यांच्या निराकरणासाठी सारथी महामंडळाची स्थापना केली. आज त्याच महामंडळाच्या माध्यमातून अनेक अधिकारी घडत आहेत. मराठा आरक्षणासारखा अत्यंत गुंतागुंतीचा बनलेला प्रश्न फडणवीस यांनी कौशल्याने हाताळला. त्यांनी केलेल्या तरतुदीमुळेच मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकले. नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या प्रश्नाचा पुन्हा विचका झाला व सर्वोच्च न्यायालयात तो प्रलंबित पडला हा भाग वेगळा.
मराठा समाजाप्रमाणेच अन्य मागासवर्ग, वनवासी व धनगर समाज यांनाही फडणवीस यांनी आपल्याबरोबर घेतले व त्यांच्या मनात घर केले. फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात ओबीसी मंत्रालय सुरू केले. तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना वटहुकुम काढण्यात आला होता. हा वटहुकुम कायद्यात बदलण्याची जबाबदारी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) आघाडी सरकारवर होती. आघाडी सरकारने सत्तेवर आल्यावर 15 महिन्यांच्या कालावधीत आवश्यक ती कार्यवाही न केल्याने अखेर सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. या नाकर्तेपणामुळे आज महाराष्ट्रात स्थानिक संस्थांच्या निवडणुका होऊ शकत नाहीत.
कोरोनाच्या काळात तेव्हा मुख्यमंत्रीपद बळकावून बसलेले उद्धव ठाकरे स्वतःच्या मातोश्री बंगल्याबाहेर यायला तयार नव्हते. परंतु फडणवीस हे पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात फिरून लोकांची विचारपूस करत होते. उद्धव ठाकरे यांचा, कद्रूपणा असा की त्यांची ही सक्रियता पाहून त्यांनी सरकारी अधिकार्यांनी विरोधी पक्षनेत्यांना माहिती देऊ नये किंवा त्यांच्याशी सहकार्य करू नये, असा आदेशच काढला.
त्याच काळात राज्यात जोरदार पाऊस झाला आणि शेतकर्यांचे खूप नुकसान झाले. तसेच निसर्ग चक्रवादळाचा कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा बसला. त्याही वेळी नुकसानग्रस्त लोकांना भेटायला जाणारे फडणवीस हेच होते. भर पावसात फडणवीस यांनी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. शेतकर्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.
नक्षलवादाचे निर्मूलन
फडणवीस यांच्या एका कामगिरीबद्दल अजूनही फारसे बोलले जात नाही, ती म्हणजे विदर्भ, विशेषतः गडचिरोलीतून नक्षलवादाचा बिमोड. देवेंद्रजींच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट झाला, नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आला आणि विकासाची वाटचाल सुरू झाली आहे, असे कौतुकोद्गार या वर्षाच्या सुरुवातीला स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काढले. त्याला कारणही तसेच आहे.
आपल्या पहिल्या कारकीर्दीपासूनच गडचिरोलीवर फडणवीस यांनी लक्ष केंद्रीत केले. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा आहे, असे त्यांनी जाहीर केले. स्वतः त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेतले. त्याचे परिणाम समोर आहेत.
गेल्या दोन वर्षांत नक्षलग्रस्त भागांत 6 आऊटपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत, गेल्या दीड वर्षांत 28 माओवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले, 31 माओवाद्यांना अटक झाली, तर 44 लोकांनी आत्मसमर्पण केले. हे एक विक्रमी यश आहे. अलीकडेच गडचिरोलीत 12 माओवाद्यांनी फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यावेळी जिल्ह्यात आता केवळ 40 नक्षलवादी उरले असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. इतकेच नव्हे तर गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा कोणी मुख्यमंत्री नाही. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात मी स्वत: शेवटच्या टोकापर्यंत दौरे केले आहेत. कदाचित गडचिरोलीत थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री आहे, असे त्यांनी सांगितले. आज त्या जिल्ह्यात समाजिक, आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यातील दहा हजार वनवासी तरुणांच्या हाताला सरकारने काम दिले आहे.
गडचिरोलीत तब्बल तीन वेळा मुक्काम, तेथील सी-60 जवानांचा गणवेश घालून त्यांच्यात मिसळणारा असा हा नेता आहे. मग या नेत्याचे पद विरोधी पक्षनेत्याचे असो, मुख्यमंत्र्याचे असो अथवा उपमुख्यमंत्र्याचे असो. नेतृत्व कसे असायला हवे, हे फडणवीस यांनी दाखवून दिले. नेता हा जमिनीवर चालणारा असावा लागतो. आपल्या मतदारांच्या, अनुयायांच्या किंवा सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात ज्याला सहभागी व्हावंसं वाटत नाही, तो नेता नसतोच. ही जी तळमळ असते ती अशी सांगून-सवरून किंवा पीआर एजन्सी नेमून तयार होत नसते. ती स्वभावाचा भाग असते. तीस वर्षांमध्ये नगरसेवकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत प्रवास करणारा नेता हा असा जमिनीतून वर आलेला असतो.
महाराष्ट्र ते राष्ट्र
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली नेतृत्व निर्माण करणार्या फडणवीस यांना 2019 ते 2022 या काळात वळचणीत ढकलण्याचा प्रयत्न झाला. राज्यातील हितशत्रूंनी विश्वासघात करून त्यांचे पद बळकावले, पण म्हणून त्यांच्या कर्तृत्वाला त्यांना बांध घालता आला नाही. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते या न्यायाने महाराष्ट्राबाहेर कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली.
ऐन कोरोना महामारीच्या काळात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाने त्यांना प्रभारी केले. बिहारमधील निवडणुकीत भाजप आणि संयुक्त जनता दल यांच्यातील समन्वय, प्रचारधोरणे आणि प्रचारयंत्रणेचे नियोजन फडणवीस यांनी केले. या निवडणुकीत एनडीएने विजय मिळवून सत्तेत पुनरागमन केले.
त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत पुन्हा प्रभारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. फडणवीस यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद, उमेदवारी नियोजन, आणि प्रचाराचे समन्वयन यशस्वीपणे पार पाडले. उत्पल पर्रीकर यांची बंडाची भूमिका, कथित सरकारविरोधी भावना अशा अनेक अडचणींमधून मार्ग काढत फडणवीस यांनी भाजपला विजयापर्यंत नेले. गोव्यात भाजप 20 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला, इतकेच नव्हे तर निवडणुकीनंतर शिताफीने वाटाघाटी करून सत्ता स्थापनेतही त्यांनी कौशल्य दाखविले.
परंतु त्यापेक्षाही मोठी कामगिरी त्यांनी करून दाखविली ती देशाच्या एका टोकाला असलेल्या केरळमध्ये. तिथे भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून काम करताना फडणवीस यांनी आपले कमाल कौशल्य कामाला लावले. भाजपसाठी आजवर अत्यंत अवघड असलेल्या या राज्यात त्यांनी जी मेहनत घेतली त्याचेच फळ म्हणजे गेल्या वर्षी आलेला सुखद धक्कादायक निकाल. त्यातूनच केरळच्या इतिहासात भाजपची मतांची टक्केवारी दोन अंकी तर झालीच, परंतु पहिल्यांदाच भाजपचे खातेही उघडले. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुरेश गोपी आज केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत.
थोडक्यात, महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली नेतृत्व निर्माण करणारे देवेंद्र फडणवीस हे आता केवळ राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर वेळोवेळी दाखवलेला विश्वास, त्यांना दिलेल्या महत्त्वाच्या जबाबदार्या आणि त्यांनी पार पाडलेली कामगिरी यामुळे ते राष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाचा चेहरा म्हणून उदयास येत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा राष्ट्रवादी राजकारणाचा दमदार आवाज म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिले जात आहे.
जमिनीतून वर आलेला वृक्ष ज्याप्रमाणे आपली मुळे धरून ठेवतो, तसेच फडणवीस यांनी समाजाच्या सर्व घटकांना व वर्गांना एकत्र धरून ठेवले आहे. त्यांच्या या सर्वसमावेशक नेतृत्वाला आता एक तप पूर्ण होत आले आहे. तप या शब्दात 12 वर्षे हा अर्थच आहे, परंतु त्यांनी ज्या कसोट्या आणि आव्हानांचा सामना केला आहे, त्यातून त्यांची ’तपश्चर्या’ हाही अर्थ आहे. त्यानिमित्ताने त्यांचे अभिनंदन. राज्यात त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार आले आणि राज्याच्या विकासाला पुन्हा तशीच चालना मिळाली, हे त्यांच्या या तपश्चर्येचेच फळ आहे!!
त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन व शुभेच्छा.
देविदास देशपांडे