आद्य सरसंघचालक पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 100 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज रोवले. हिंदू समाजाला संघटित करून समर्थ, शक्तिशाली, वैभवसंपन्न समाज निर्माण करायचा संकल्प डॉ. हेडगेवारांनी संघाच्या रुपाने साकार केला. त्यांनी पाहिलेले हिंदू समाजसंघटनेचे स्वप्न आज लाखो स्वयंसेवक साकार करत आहेत. संघाची शताब्दी साजरी करत असताना कोणत्या विचारातून संघाची स्थापना झाली? त्यामागे डॉक्टरांचा काय विचार होता हे उलगडणारे ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार‘ नाटक रंगभूमीवर दाखल झाले आहे.
महामहोपाध्याय प्रा. डॉ. दे. खं. खरवंडीकर यांचे हे उद्गार. याचा अर्थ असा की, संघटनेमध्येच सामर्थ्य असते, हे ओळखून लोकांचे कल्याण करणारा संघ ज्यांनी स्थापन केला त्या केशवांना पुन्हा पुन्हा नमस्कार असो. हिंदुसमाज सुसंघटित करणे हेच सर्वश्रेष्ठ कर्तव्य मानून प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. 100 वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार यांनी रोवलेल्या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. आपल्या अफाट संकल्पशक्तीच्या जोरावर डॉ. हेडगेवार यांनी जगातले सगळ्यात मोठे संघटन उभे केले. आज भारतातच नाही तर जगभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काम करत आहेत. डॉ. हेडगेवार यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत. कोणतेही संघटन उभे करणे हे सोपे नसते. संघाचे बीजही एकाएकी रोवले गेलेले नाही. त्यामागे एक विचार, दूरदृष्टी आणि चिंतन आहे. प.पू. आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा संघ स्थापन करण्यामागचा विचार अनेक पुस्तकांतून, ग्रंथातून मांडण्यात आला आहेच. पण संघशताब्दीच्या निमित्ताने ’युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार‘ या नाटकाच्या माध्यमातूनही तो मांडण्यात येत आहे.
नागपूरच्या नादब्रम्ह निर्मित, युगसंधान प्रस्तुत या नाटकाचे लेखन डॉ. अजय प्रधान, दिग्दर्शन सुबोध सुर्जीकर यांनी केले आहे, तर याची निर्मिती पद्माकर धानोरकर यांची असून आणि संगीत शैलेश दाणी यांनी दिले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यभरात या नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यात येत आहेत.
प. पू. डॉ. हेडगेवार यांचे संपूर्ण कार्य तीन तासांच्या नाटकातून मांडणे तसे अवघड आहे. पण त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेसाठी कारणीभूत ठरले ते प्रसंग, महत्त्वाच्या भेटी यातून मांडण्यात आले आहेत. भारतमातेला दास्यातून मुक्त करण्याची डॉ. हेडगेवार यांनी घेतलेली प्रतिज्ञा, त्यासाठीची त्यांची तळमळ, राष्ट्रनिष्ठा हे संपूर्ण नाटक पाहत असताना आपल्याला जाणवते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. पहिल्या महायुद्धानंतरचे क्रांतीचे मनोरथ अपूर्ण असले तरी त्यातून उदास न होता डॉक्टरांनी मध्य प्रांतातील काँग्रेसच्या राजकारणात लक्ष घालायला सुरूवात केली होती. नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.
काँग्रेसमध्ये असूनही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे अतिरेकी विचार, अहिंसेचा पराकोटीचा आग्रह आणि महात्माजींनी केलेला खिलाफत आंदोलनाचा पुरस्कार या विचारसरणीला त्यांचा कडवा विरोध होता. वेळोवेळी हा विरोध त्यांनी दर्शवला होता. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर झालेले काँग्रेसचे कलकत्त्यातील अधिवेशन, महात्मा गांधींचे काँग्रेसमध्ये वाढते प्रभुत्व याचा संदर्भही पाहायला मिळतो. सप्टेंबर 1920 मध्ये डॉ. हेडगेवार, डॉ. बा. शि. मुंजे आणि योगी अरविंद यांच्या भेटीचा प्रसंगही महत्त्वाचा आहे. काँग्रेसचे अधिवेशन होण्यापूर्वी डॉ. हेडगेवार, बळवंतराव मंडलेकर आणि इतर मंडळींनी ’निर्भेळ स्वातंत्र्य हेच आमचे उद्दिष्ट आहे‘ असा ठराव संमत केला. तोच ठराव काँग्रेसनेही स्वीकारावा असे सांगण्यासाठी डॉ. हेडगेवारांसह चौघे जण महात्मा गांधी यांना जाऊन भेटले. या भेटीत महात्मा गांधी आणि डॉ. हेडगेवार यांच्यातली चर्चा ही महत्त्वपूर्ण होती. केवळ हिंदू-मुस्लीम ऐक्य हा शब्दप्रयोग डॉ. हेडगेवार यांना खटकत होता. कारण हिंदुस्थानात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी, यहुदी अशा अनेक धर्मांचे लोक राहत असताना या सगळ्यांची एकी अशी कल्पना न मांडता केवळ हिंदू-मुस्लीम ऐक्य असे का? यात दूरदृष्टीचा अभाव वाटतो अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी विरोध व्यक्त केला. यामुळे मुस्लिमांची वाढती धर्मांधता व कट्टरता पुढील काळात रक्तरंजित घटनांना आमंत्रण ठरू शकते. या शब्दप्रयोगाने ऐक्याऐवजी फुटीरतेची भावना वाढीला लागेल, अशी सार्थ चिंता मला वाटते असे डॉक्टरांनी सांगितले. तशी काहीच भीती मला वाटत नाही असे सांगून महात्मा गांधींनी डॉक्टरांची बोळवण केली. हा प्रसंग डॉ. हेडगेवार यांच्या दूरदृष्टीची ग्वाही देतो.
इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, अहिंसा परमो धर्मः यावर डॉक्टरांचा विश्वास होता पण अहिंसा जर पळपुटेपणाकडे नेत असेल तर या गोष्टीला त्यांचा विरोध होता. पुढे मे 1921 मध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधातील आक्षेपार्ह भाषणाप्रकरणी डॉक्टरांवर खटला भरण्यात आला. नाटकातील कोर्ट रुम ड्रामा आपल्याला खिळवून ठेवतो. काटोल भागाचे सर्कल इन्स्पेक्टर गंगाधरराव यांची उलटतपासणी डॉक्टरच घेतात. ’हिंदुस्थान हा हिंदुस्थानच्या लोकांकरिताच आहे. आम्हाला हिंदुस्थानात स्वराज्य पाहिजे‘. हे वाक्य ऐकताना डॉक्टरांची राष्ट्रनिष्ठा किती प्रखर होती याची जाणीव होते.
डावीकडून दिग्दर्शक सुबोध सुर्जीकर, लेखक डॉ. अजय प्रधान आणि निर्माते पद्माकर धानोरकर
या सगळ्या घटनानंतर महत्त्वाचा प्रसंग म्हणजे डॉ. हेडगेवार आणि डॉ. मुंजे यांच्यातील संवाद. असंख्य उलाढालीनंतर आणि असामान्य विचारमंथनातून एक अमृतकुंभ डॉक्टरांच्या हाती लागला तो म्हणजे ’हिंदुराष्ट्रवाद‘. या चर्चेतूनच हिंदूंची बिगर राजकीय संघटना आकार घेऊ लागली. मुस्लीम तुष्टीकरणात अडकलेले बापू आणि काँग्रेसी नेते हिंदूंच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करत होते. त्या काळात निद्रिस्त आणि भीतीच्या सावटाखाली असलेल्या हिंदू समाजाला जागृत करण्याची गरज प.पू. डॉ. हेडगेवार यांनी ओळखली. 1925 च्या प्रारंभी हिंदुराष्ट्राच्या पुनरुद्धाराच्या कार्याला प्रारंभ करण्याचा त्यांनी मनोमन निश्चय केला आणि चारित्र्यसंपन्न राष्ट्रनिर्माणाचा नवा अध्याय सुरू झाला. हिंदुराष्ट्राच्या संघटनेचा विचार मनात आल्यानंतर डॉक्टरांनी योगी अरविंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली. तात्यारावांकडूनही संघटनेविषयी मार्गदर्शन घेतले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि योगी अरविंद यांच्या तोंडून ही संघटना कशी असेल असा एक प्रसंग दाखवण्यात आला आहे. मानसिकता बदलायला वेळ लागेल पण तोपर्यंत स्वयंसेवकांना तयार करा, राष्ट्रनिर्माणासाठी संघटना तयार करा जी समाजाला दिशा देईल. भगवा ध्वज सर्वोपरी मानून शस्त्रसज्ज तरुणांची संघटना तयार करा. हा प्रसंग पाहताना अंगावर काटा येतो. एकामागून एक प्रसंग, भेटी यातून संघटना कशी आकाराला आली हे सांगत नाटकाचा पहिला अंक संपतो.
दुसर्या अंकांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीच्या दिवशी झालेला शुभारंभ, संघाची शिस्त, रचना, नियम, प्रशिक्षणवर्ग यावर भर दिला आहे. संघटनेची बांधणी करताना ती बिगर राजकीय असेल यावर डॉक्टरांनी विशेष भर दिला. मोहिते वाड्यात संघशाखा, रामटेकचा रामनवमी उत्सव हे प्रसंगही आपल्याला पाहायला मिळतात. हिंदुस्थानच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात ज्या सामूहिक जीवनाची प्रकर्षाने उणीव भासत होती ती उणीव भरून काढणारी यंत्रणा सिद्ध झाली.
प.पू. डॉ. हेडगेवार यांच्या भूमिकेला न्याय अभिनेते सतीश खेकाळे यांनी पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. त्यांची शरीरयष्टी, वेशभूषा तंतोतंत असून त्यांनी भूमिकेला 100 टक्के न्याय दिला आहे. त्यांचा रंगमंचावरचा वावर, हिंदुत्वाविषयी असलेली तळमळ, राष्ट्रनिष्ठा यातून डॉ. हेडगेवार त्यांनी आपल्यासमोर उभे केले आहेत. मृत्यूशय्येवर असतानाच्या अखेरच्या काही प्रसंगात डॉक्टरांना होत असलेल्या असह्य वेदना, संघाच्या कामासाठी असलेली तळमळ सतीश खेकाळे यांनी उत्तमपणे दाखवली आहे. डॉ. हेडगेवार यांच्या भूमिकेबरोबरच पू. गोळवलकर गुरूजी यांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल तेलपांडे यांनीही ती भूमिका उत्तम निभावली आहे. तसेच डॉ. मुंजे, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अरविंद घोष, लोकमान्य टिळक या चरित्र भूमिकांनाही कलाकारांनी योग्य न्याय दिला आहे. आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची कारकीर्द रंगमंचावर आणणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे आणि ते शिवधनुष्य सगळ्याच कलाकारांनी उत्तमपणे पेलले आहे. नाटक संपल्यानंतर कलाकारांसह प्रेक्षकांचेही डोळे पाणावतात.
दुसर्या अंकात संघाच्या वाटचालीबरोबरच संघाचे दुसरे सरसंघचालक पू. माधवराव गोळवलकर आणि पू. डॉ हेडगेवार यांच्या नात्यातील ऋणानुबंधही पाहायला मिळतात. नंतरच्या काळात डॉक्टरांची प्रकृती खालावली. प. पू. डॉक्टरांची प्रकृती ठीक नाही हे कळताच सुभाषचंद्र बोस यांनी घेतलेली भेट, संघाचे विविध वर्ग, तब्येतीमुळे वर्गांना उपस्थित राहू शकत नसल्याने होत असलेली तळमळ, गोळवलकर गुरूजींची असलेली साथ हे नाटकाच्या माध्यमातून दाखवले आहे. तब्येत खालावलेली असतानाही अधिकारी शिक्षावर्गात डॉक्टरांनी केलेले भाषण ऐकताना डोळ्यात पाणी येते. प.पू. डॉक्टरांच्या निधनाचा प्रसंग पाहताना मन सुन्न होते. 21 जून 1940 रोजी अखंड हिंदुस्थानच्या मनात हिंदुत्वाचे धगधगते यज्ञकुंड प्रज्वलित करणारे वादळ शांत झाले. पण तो यज्ञकुंड आजही धगधगत आहे.
दोन अंकी नाटकाच्या माध्यमातून डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची संपूर्ण कारकीर्द मांडणे अवघड आहे. पण त्यांची हिंदुत्वाची संकल्पना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्यामागचा विचार हे मात्र या नाटकातून उत्तमरित्या मांडले आहे. संपूर्ण भारतात संघ आणि डॉ. हेडगेवार यांचे विचार पोहोचवण्यासाठी हे नाटक हिंदीत आहे. नेपथ्य म्हणून अनेक गोष्टी न वापरता एलईडी स्क्रीनचा योग्य पद्धतीने वापर केला आहे. त्याग, सेवा, समर्पण, संघर्ष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आजपर्यंत संघावर वाईट हेतूने अनेक आरोप केले गेले, बंदी आणली, गैरसमज पसरवण्यात आले. तरीही न डगमगता संघाने आपले मार्गक्रमण सुरूच ठेवले. 1925 साली करण्यात आलेल्या नियमांत आजही बदल न करता संघ काम करत आहे. यावरूनच डॉक्टरांची दूरदृष्टी किती होती हे लक्षात येते. संघशताब्दीनिमित्त संघविचार समजून घेण्यासाठी, संघाचा प्रवास समजून घेण्यासाठी संघ स्वयंसेवकांनी आणि संघाबद्दल कुतूहल असणार्या सगळ्यांनी हे नाटक आवर्जून बघावे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत.
सा. विवेकमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. रेडिओ, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमात काम करण्याचा अनुभव. विविध माध्यमातून योग आणि आहार विषयक लेखन. नाट्य, नृत्य, संगीत क्षेत्राची आवड. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनाचा अनुभव...