इस्लामपूर ते ईश्वरपूर - सांस्कृतिक भावविश्वाशी नाळ जोडणारे नामांतर

विवेक मराठी    25-Jul-2025
Total Views |
 @सत्येन सुभाष वेलणकर
आपल्या शहराचे, गावाचे नाव परकीय आक्रमकांच्या पाऊलखुणा सांगत असेल, त्याच्या अत्याचारी स्वभावाचे उदात्तीकरण करत असेल तर ती एक प्रकारची भावनिक विटंबनाच आहे. त्यामुळे आपली भावनिक सांस्कृतिक आपुलकी जपण्यासाठी अशी नामांतरे आवश्यकच असतात आणि ती आपली नाळ पुन्हा या मातीशी घट्ट जोडणारी असतात. आपले नाते इस्लामशी नसून ईश्वराशी आहे, निजामाशी नसून रायगडाशी आहे आणि औरंग्यासोबत नसून छत्रपती संभाजी महाराजांशी आहे, हे भावविश्व याच्यातून साकारत असते.
 
raigadwadi
 
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली. याचप्रमाणे किल्ले रायगडाच्या पायथ्याजवळ असलेल्या ‘छत्री निजामपूर’ या गांवाचेदेखील नामांतर करण्याची मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून आपल्या नावांमधून क्रूर व पाशवी परकीय आक्रमकांच्या अत्याचारांच्या खुणा सांगणार्‍या या गावांचे नामांतर करण्याचा राज्य सरकारचा हा निर्णय स्तुत्य असून महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायनीतीला धरूनच आहे, असे म्हटले पाहिजे. हे सर्व कसे समर्पक आहे ते आता पाहू -
 
 
अनेक वर्षांपासून इस्लामी आक्रमकांच्या टाचांखाली भरडल्या जाणार्‍या महाराष्ट्राला स्वतंत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापण्याचे प्रचंड अवघड कार्य पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांची उक्ती आणि कृती, त्यांच्या कार्यात सहभागी असलेले स्वकीय लोक, त्यांचे शत्रू आणि तटस्थ लोक यांनी समकालीन कागदपत्रांमध्ये त्यांच्याविषयी केलेली विधाने आणि लिहून ठेवलेल्या गोष्टी, आणि त्यांच्यानंतर त्यांच्या राजकीय वारसदारांनी केलेले कार्य आणि त्यांचे विचार याचा अभ्यास केल्यावर दिसून येते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केले त्याचा हेतू प्रामुख्याने हिंदूंचे आणि हिंदुत्वाचे संरक्षण व प्रसार आणि त्यासाठी आवश्यक असलेला जुलमी आणि पाशवी इस्लामी सत्तांचे उच्चाटन हा होता.
 
 
परकीय आक्रमणांमुळे एतद्देशीय जनता, आपली संस्कृती आणि भाषेवर झालेले अत्याचार दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज किती आग्रही होते, हे त्यांच्या आयुष्यातल्या पुढील घटनांवरून दिसून येते -
 
नेतोजी पालकर यांना इस्लामी धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात आणले:
 
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटल्यानंतर औरंगजेबाने सरनौबत नेतोजी पालकर यांना कैद केले आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले, परंतु त्यानंतर नेतोजी पालकर मोगलांची नोकरी सोडून परत छत्रपती शिवाजी महाराजांकडे आल्यावर, महाराजांनी 19 जून 1676 रोजी त्यांना विधिपूर्वक संस्कार करून पुन्हा हिंदू धर्मात आणले. (संदर्भ :- जेधे शकावली, शिवचरित्र प्रदीप, पृ. 28 ; शिवचरित्र साहित्य खंड 8, पृ. 78,82.)
 
 
भाषाशुद्धी
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून जो राज्यव्यवहारकोश रचण्यात आला त्याच्या प्रास्ताविकात असे सांगितले आहे की, भूतलावरून म्लेच्छांचा म्हणजेच मुसलमानांचा पूर्ण उच्छेद केल्यावर शिवछत्रपतींनी यवनांच्या म्हणजेच मुसलमानांच्या भाषेने लोपून गेलेल्या राज्यव्यवहारसरणीचा विबुध भाषेत प्रसार करण्याकरिता रघुनाथ पंडिताची नियुक्ती केली. (संदर्भ :- शिवचरित्र प्रदीप, पृ. 143.)
 
 
इस्लामी राज्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेल्या देवळांचा जीर्णोद्धार:
 
यवनांनी म्हणजे मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेले शोणाचलपतीचे देऊळ त्याने म्हणजे रघुनाथ नारायण हणमंते याने विधिपूर्वक प्रतिष्ठापित करून श्रीमुष्ण, वृद्धगिरी व रुक्मसभाधिप यांचे पूजोत्सव पुन्हा सुरू केले. असे देखील राज्यव्यवहारकोशाच्या प्रास्ताविकात नमूद केलेले आहे. (संदर्भ :- शिवचरित्र प्रदीप, पृ. 143.)
 
 
19व्या शतकाच्या सुरवातीला नारायण पिल्लई यांनी जुन्या कागदपत्रांच्या आधारे कर्नाटकातील विविध राजवटींचा इतिहास तमिळ भाषेत लिहिला. त्याच्या निवडक भागाचे भाषांतर फ्रेंच भाषेत झाले आहे. त्या फ्रेंच भाषांतरात असे नमूद केले आहे की, तिरुवन्नमलई येथील शंकराचे देऊळ (म्हणजेच शोणाचलपतीचे देऊळ) आणि समोत्तिर पेरुमलाचे (म्हणजे भगवान विष्णूचे) देऊळ मुसलमानांनी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशिदी बांधल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या दोन्ही मशिदी पाडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा शंकराचे देऊळ स्थापन केले. (संदर्भ :- Histoire Detaillee des Rois du Carnatic,, पृ. 71.)
 
 
या तिन्ही घटनांमधून आपल्याला एका समान धागा दिसतो. इस्लामी राज्यकर्त्यांनी हिंदू माणसाला भ्रष्ट केले, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा हिंदू धर्मात आणले. इस्लामी राजवटींच्या प्रभावामुळे इथली भाषा दूषित झाली होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोशाची रचना करवून ती पुन्हा शुद्ध केली. इथली देवळे मुसलमानांनी भ्रष्ट करून त्या ठिकाणी मशिदी बांधल्या होत्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पाडून त्या ठिकाणी पुन्हा एकदा देवळे उभी केली. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा हा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांना धरूनच आहे. आता या दोन्ही गावांच्या नावांबद्दल ऐतिहासिक साधनांमध्ये कोणती माहिती आली आहे त्याचा आढावा घेऊ.
 
 
इस्लामपूर
 
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव नक्की केव्हा बदलण्यात आले या संबंधीची नेमकी नोंद मिळत नाही, परंतु ते औरंगजेबासारख्या एखाद्या इस्लामी राज्यकर्त्याच्या काळातच केले गेले असावे असे दिसते. औरंगजेब इस्लामचा कडवा अनुयायी असल्याने त्याच्या राजवटीचा हेतू, या देशातील संस्कृती व परंपरा पुसून टाकून त्याठिकाणी इस्लामी धर्म व परंपरा रुजवणे हा होता हे त्याच्या कारकिर्दीतील समकालीन कागदपत्रांमधून आपल्याला समजते. औरंगजेबाने भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक गावांची व किल्ल्यांची नावे बदलून त्यांना इस्लामी नावे दिली. वानगीदाखल मोगलांच्या दरबारी इतिहासात आलेल्या खालील नोंदी पहा -
 
 
क अमीरूल उमरा म्हणजे शायिस्ताखान याने चाकणचा छोटा भुईकोट 1660 मध्ये काबीज केला. त्यावेळी औरंगजेबाच्या हुकुमावरून त्याला ‘इस्लामाबाद’ असे नाव देण्यात आले. (संदर्भ :- आलमगीरनामा, फार्सी पृ. 588-89, मराठी अनुवाद- शिवचरित्रवृत्तसंग्रह खंड 3, पृ. 26.)
 
 
* 1670 साली मथुरेतील केशवरायाचे देऊळ औरंगजेबाच्या हुकुमावरून पाडण्यात आले आणि त्याठिकाणी मशीद बांधण्यात आली. मथुरेला ‘इस्लामाबाद’ असे नाव देण्यात आले. (संदर्भ :- मआसिर-इ आलमगिरी फार्सी पृ.95-96. इंग्रजी अनुवाद, पृ. 60.)
 
 
* 1689 साली मोगलांनी रायगड काबीज केला तेव्हा औरंगजेबाच्या हुकुमावरून रायगडाचे नाव ‘इस्लामगड’ असे करण्यात आले. (संदर्भ :- मोगल दरबारची बातमीपत्रे, सेतुमाधवराव पगडी, खंड 1, विभाग पहिला, पृ.5.)
 
 
* औरंगजेबाचा तळ अनेक वर्षे पंढरपूरच्या आग्नेयेला 25 किलोमीटरवर भीमा नदीच्या काठी असलेल्या ब्रम्हपुरी येथे होता. औरंगजेबाने 1695 साली त्या गावाला ‘इस्लामपुरी’ असे नाव दिले. (संदर्भ :- मआसिर-इ आलमगिरी फार्सी पृ.373. इंग्रजी अनुवाद- पृ. 226.)
 
 
* भिवंडीला सुलतानी राजवटींमध्ये ‘इस्लामाबाद’ असे नाव देण्यात आले होते. हे इस्लामी नाव शिवछत्रपतींच्या स्वराज्यात टिकले नाही म्हणूनच औरंगजेबाने हा भाग काबीज केल्यानंतर त्या नावाचे पुनर्जीवन केले. 1 नोव्हेंबर 1704 रोजीची मुघल अखबारातली नोंद पुढीलप्रमाणे आहे - बादशाहाने म्हणजे औरंगजेबाने आज्ञा केली की, चाकण उर्फ इस्लामाबादचे नाव ‘मुमीनाबाद’ ठेवण्यात यावे आणि कल्याणभिवंडीचे नाव ‘इस्लामाबाद’ ठेवण्यात यावे, (संदर्भ:- मोगल दरबारची बातमीपत्रे, सेतुमाधवराव पगडी, खंड
 3, विभाग पहिला, पृ.460.)
 
 
सध्या सांगली जिल्ह्यात असलेल्या इस्लामपूरपासून 8 किलोमीटरवर असलेले बोरगांव हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नोकरीत असलेले बाळाजी आवजी चिटणीस यांचे सुपुत्र खंडो बल्लाळ यांना इनाम म्हणून देण्यात आले होते. या संबंधीची माहिती ऐतिहासिक जुने लेख, पुस्तक दुसरे, चिटणीस घराण्याची संक्षिप्त माहिती या पुस्तकात व 1969 साली प्रसिद्ध झालेल्या सांगली जिल्ह्याचा गॅझेटियर मध्ये देखील आली आहे.
 
 
औरंगजेब महाराष्ट्रात आणि या परिसरात असताना त्याचा मुक्काम बोरगांव येथे झाला होता हे आपल्याला मोगल दरबारच्या बातमीपत्रांवरून समजते. त्या संबंधीची 2 डिसेंबर 1699 ची नोंद पुढीलप्रमाणे आहे -
 
 
आज बादशहा सकाळी तख्त-ए रवांवर स्वार होऊन निघाले. सव्वातीन कोसाचा प्रवास करून ते बोरगांवला (?) पोहोचले. (संदर्भ:- मोगल दरबारची बातमीपत्रे, सेतुमाधवराव पगडी, खंड 1, पृ.57.)
 
 
औरंगजेबाने बोरगांवचे किंवा त्या परिसरातील एखाद्या गावाचे नाव बदलून ‘इस्लामपूर’ ठेवले अशी निश्चित नोंद मोगल कागदपत्रांत आढळत नाही, त्यामुळे हे नाव औरंगजेबाने ठेवले का त्या आधीपासून ते तसे होते हे समजत नाही.
 
 
1969 साली प्रसिद्ध झालेल्या सांगली जिल्ह्याचा गॅझेटियर मध्ये या गावाला ‘उरण-इस्लामपूर’ असे म्हटले आहे. त्यामुळे या गावाचे मूळ नाव ‘उरण’ असावे असे वाटते.
 
 
raigadwadi
 
 
छत्री निजामपूर
 
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या छत्री निजामपूर या गावाचे नाव देखील निजामपूर केव्हा झाले याची नेमकी नोंद मिळत नाही. परंतु रायगड पूर्वी अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. पुढे तो चंद्रराव मोर्‍यांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर तो शिवाजी महाराजांनी काबीज केला. त्यामुळे निजामपूर हे नाव निजामशाही काळात ठेवले गेले असावे असे वाटते. या गावाच्या नावाविषयीची एक रंजक नोंद प्रसिद्ध साहित्यिक गो. नि. दांडेकर यांच्या दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकात आढळते. ती पुढीलप्रमाणे आहे -
 
 
ज्या शिखरांनी रायगड वेढलेला, ज्यांमुळं फार कमी ठिकाणं वगळता त्याचं दर्शन दुर्लभ, ती सगळी शिखरं पैल उभी. मधून वाहणारी काळ नदी. तिचं झिलमिल पात्र. ऐल तीरावर छत्र निजामपूर. याचा उच्चार कित्येक जण छत्री निजामपूर असा करतात. कथा सांगतात, कीं शिवाजीराजे टकमकावर उभे होते. एक सेवक त्यांच्यावर छत्र धरून उभा, वार्‍याच्या झोतानं तो उडाला. राजांनी त्याला सांगितलं की, हातींची छत्री घट्ट धरून ठेव, सोडूं नकोस! ते जणू एखादा पॅरॅशूटच हाती असावं, असा तो तरंगत चालला. वार्‍याचा जोर कमी झाल्यावर तो निजामपुराच्या रानात उतरला म्हणून याचं नाव छत्री निजामपूर !
 
 
पण बहुधा ही कविकल्पना असावी. लिंगाण्यापलीकडे एक गांव आहे त्याचं नाव अन्नछत्र, पूर्वीची शिवकालीन वाहती वाट राजगड ते रायगड अशी होती. राजगडावरून राजधानी हलली, ती याच वाटेने रायगडावर पावती झाली. वाटेवर त्या काळी खूप राबता असायचा. त्या सर्वांसाठी अन्नछत्र गांवी जेवण मिळायचं. सरकारी खर्चानं. ते वर घाटावर. इथं खाली कोकणांत उतरल्यावर तशीच भोजनाची व्यवस्था निजामपुरीं म्हणून ते छत्र निजामपूर!
 
 
कोणतीही संस्कृती विविध घटकांतून साकारत असते. यामध्ये धर्म, भाषा आणि इतिहास यांचा फार मोठा वाटा असतो. या सांस्कृतिक खुणा मिटवून टाकण्यासाठीच आक्रमकांनी हा नामांतराचा खटाटोप केला. कालांतराने ही नावे लोकांच्या जिभेवर रूळत गेली. आपला गाव या संकल्पनेशी प्रत्येकाची एक आपुलकी असते, आपलेपणा असतो तो आपलेपणा परकीय आक्रमकांच्या पाऊलखुणांशी जुळणे ही एक प्रकारे भावनिक विटंबनाच होय. त्यामुळे अशा प्रकारची नामांतरे ही आपली भावनिक सांस्कृतिक आपुलकी जपणारीच असतात, आपली नाळ पुन्हा या मातीशी जोडणारी असतात. आपले नाते इस्लामशी नसून ईश्वराशी आहे, निजामाशी नसून रायगडाशी आहे आणि औरंग्यासोबत नसून छत्रपती संभाजी महाराजांशी आहे, हे भावविश्व याच्यातून साकारत असते.