वेगवेगळ्या दूरचित्रवाहिन्यांवर छांगूर बाबा प्रकरणावर तपशीलवार बातमीपत्रे सुरू आहेत. या बाबाला धर्मांतर घडविण्याचे रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्याने विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील अल्पवयीन हिंदू मुलींना आणि स्त्रियांना लक्ष्य केले होते. हिंदुंची विश्वबंधुत्वाची कल्पना खरोखरच उदात्त आहे, पण वेळोवेळी हिंदुंवर फसवे हल्ले आणि सर्वनाशापासून वाचविण्यासाठी तशा प्रकारचा बंधुभाव अन्य धर्मावलंबी जनतेतही कसा प्रसृत होईल यासाठी नेमके काय करावे, याचे प्रत्येक हिंदू मनुष्याने चिंतन करावे.
सध्या उत्तर प्रदेशातील छांगूर बाबा प्रकरण इलेक्ट्रॉनिक मिडियात गाजते आहे. वेगवेगळ्या दूरचित्रवाहिन्यांवर या प्रकरणावर तपशीलवार बातमीपत्रे सुरू आहेत. काही मुस्लीम तरुणांनी नाव बदलून, स्वतः हिंदू असल्याचे भासवून, किमान 5000 हिंदू मुली व स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे इस्लाममध्ये केलेल्या धर्मांतराचे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. हे प्रकरण उघडकीस आले आहे, यातील काही गुन्हेगार पकडले जातील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, या प्रकरणाची चर्चा काही काळ मिडियातून होईल. मात्र हा सर्व घटनाक्रम हिमनगाच्या केवळ एखाद्या छोट्याशा टोकासारखा आहे, हे समग्र हिंदू समाज, सध्याचे सरकार आणि आपल्या प्रशासन व्यवस्थेने गंभीरपणे नीट समजून घेतले पाहिजे एवढी या विषयाची दाहकता आहे. इतकी वर्षे हे कारस्थान अत्यंत बिनबोभाटपणे सुरळीतपणे चालले होते आणि त्याची कोणालाही खबरबात नव्हती, हा मनाला विषण्ण करणारा विषय आहे. पण अशा घटनांनी हिंदू जनमानस खरोखर जागरूक होणार आहे का?
या प्रकरणात गुंतलेल्या अपराध्यांची एका अर्थाने दादच द्यावी लागेल. त्यांची हिंमत तरी पाहा. या धर्मांतर रॅकेटचा कथित सूत्रधार छांगूर बाबा याने सरकारी अधिकार्यांना भेटताना स्वत:ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संस्थेचा वरिष्ठ पदाधिकारी म्हणून भासविण्याचा प्रयत्न केला आणि संघटनेच्या लेटरहेडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही वापरला, असे तपासकार्यातून उघड झाले आहे.
एका हाताच्या पंजाला सहा बोटे असल्यामुळे छांगूर बाबा म्हणून प्रसिद्धी पावलेल्या मास्टरमाईंड जमालुद्दीन याने स्वत:ला तथाकथित ’भारत प्रतिकार्थ सेवा संघ’ नावाच्या संघटनेचा (अवध क्षेत्र) महासचिव म्हणून भासवले आहे. या प्रकरणातील दुसरा प्रमुख आरोपी ईदुल इस्लाम या संघटनेचे संचालन करीत होता. तपासकार्यातून उघड झाले आहे की, संघटनेचे नाव मुद्दामच धोरणात्मकरित्या रा. स्व. संघाशी संबंधित असल्याचा खोटा आभास निर्माण करण्यासाठी असे वापरण्यात आले होते. आरोपी इस्लामने लोकांचा विश्वास बसावा, यासाठी नागपुरात संघाचे मुख्यालय असल्यामुळे, तेथे एक बोगस सेंटर देखील स्थापन केले. हा जमालुद्दीन आणि इस्लाम अनेक ठिकाणी उठता-बसता संघाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांची खुशाल नावे घेत असे आणि लोकांना भुरळ पाडत असे.
बलरामपूर येथील केंद्रातून कारवाया करण्यात गुंतलेल्या छांंगूर बाबाला या महिन्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडविण्याचे रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याने विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील अल्पवयीन हिंदू मुलींना लक्ष्य केले होते. या प्रकरणाची चौकशी करणार्या स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ)ला असेही आढळून आले की, आरोपी इस्लाम स्थानिक प्रशासन अधिकार्यांशी संगनमत करून गावातील सामुदायिक जमिनींच्या बेकायदेशीर खरेदीत सहभागी होता. यातील रोचक गोष्ट अशी की, त्याचा कर्ताकरविता धनी छांगूर बाबा 2010च्या सुमारास मुंबईतील हाजी अली दर्गा परिसरात केवळ गंडेदोरे ताईत विकण्याचे काम करीत होता, ज्याने अल्पावधीत आपले बस्तान बसवून नंतर स्वत:ला पीर बाबा म्हणूनच घोषित केले होते आणि यानंतर विदेशांतून मिळणार्या पैशाच्या बळावर धर्मांतर घडविणे आणि मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून धनदौलत जमविण्याचा चमत्कार घडविला. या कारवायांत त्याचा मुलगा मेहबूबचेही त्याला मोठे सहकार्य मिळाले होते. हिंदू मुलींना आपल्या जाळ्यांत ओढण्याचे काम करणार्या मुस्लीम गुंडांसाठी या बाबाने रेटकार्डच बनवून ठेवले होते. ज्यातही भेदभावाचे तत्त्व अमलात आणताना ब्राह्मण मुलींना बाटविण्यासाठी 15-16 लाख रूपये आणि उपेक्षित समुदायातील मुलींना बाटविण्यासाठी 8-10 लाख रूपये बक्षीस ठेवण्यात आले होते. ही सर्व खैरात करण्यासाठी त्याला संयुक्त अरब अमिरात आणि आखाती देशांतून भरघोस आर्थिक मदत लाभत होती.
छांगूर बाबाविरुद्ध विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बाबा विरुद्धच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, तो परदेशी निधीच्या मदतीने दहशतवादी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा कट रचत होता. त्याला आखाती देश आणि कदाचित पाकिस्तानसह परकीय स्रोतांकडून 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आर्थिक दृष्टिकोनातून चौकशी करत आहे. बाबाकडे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता असल्याचाही आरोप आहे, ज्यामध्ये बहुतेक अतिक्रमण केलेल्या सरकारी जमिनी आहेत.शिवाय, बाबा आणि त्यांच्या सहकार्यांशी संबंधित 22 बँक खात्यांची चौकशी करताना ईडीला 60 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे पुरावे सापडले आहेत. तपास एजन्सीला असे आढळून आले आहे की या बाबाने मुंबईत संशयास्पद व्यवहाराद्वारे ’रणवल ग्रीन्स’ नावाचे कॉम्प्लेक्स खरेदी केले होते. ईडीने पनामा येथील ’लोगोस मरीन’ नावाच्या कंपनीशी त्याचे संबंध असल्याचे उघड करणारे कागदपत्रे देखील मिळवली आहेत. आता मात्र अखिल भारतीय मुस्लीम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी बाबाविरोधात फतवा जाहीर करून त्याची कृती बेकायदेशीर व इस्लामच्या विरोधात असल्याचे सांगितले आहे.
पण आताही हिंदू समाजाने आपल्या डोळ्यांवर कातडे ओढून स्वस्थ बसून चालणार आहे का? भारताचे इस्लामीकरण करण्याच्या कारस्थानांचा जो भयंकर परिणाम काश्मिरी हिंदूंना भोगावा लागला, त्यांना पिढ्यानपिढ्यांपासून असलेल्या त्यांच्या घरादारांचा सक्तीने त्याग करून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून परागंदा व्हावे लागले, तो 1990 च्या दरम्यानचा घटनाक्रम, त्यातली भयावहता दाखवणारा काश्मीर फाईल्स चित्रपट आला. पण याला सर्वधर्मसमभाव मानणार्या सेक्युलरवाद्यांतर्फे प्रोपोगंडा या सदरात टाकण्यात आले.
केरळ फाईल्स हाही केरळमधील लव्ह जिहादची सूत्रबद्ध कारस्थाने, हिंदू मुली, स्त्रियांचे इस्लाममध्ये घडवून आणलेले धर्मांतरण यावर आधारित घटनाक्रमाची भयावहता दाखवणारा चित्रपट आला. बंगाल फाईल्स हाही चित्रपट लवकरच येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तोही वरील विषयावरच असेल. मिडियातून, चित्रपटांमधून, सोशल मिडियातून हिंदू समाजावर धर्मांध मुस्लिमांकडून होणारे आक्रमण, धर्मांतर, यावर रोज काही बातम्या येतच असतात. मात्र हे केवळ चित्रपट नसून अशा प्रकारच्या वास्तव घटना सतत घडत आहेत, हे हिंदू जनमानसाच्या केव्हा लक्षात येणार आहे?
पाकिस्तानमध्ये फाळणीनंतर राहिलेल्या हिंदूंचे मुस्लिमांनी लचके तोडून त्यांना कसे संपवत आणले, हे सगळ्या जगाला माहिती आहे. भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळे 1971 मध्ये अस्तित्वात आलेल्या बांगलादेशातील हिंदू सतत कमी कमी होत आहेत, ते कायमच तिथल्या मुस्लिम गुंडांच्या भय आणि छळाच्या छायेत वावरत असतात, हेही सगळ्या जगाला माहिती आहे. शेख हसीना यांच्या पदच्युतीनंतर तेथे काय घडले हेही जगजाहीर आहे. पण यातून हिंदूंनी बोध घेतलेला दिसत नाही.
1971 च्या भारत पाकिस्तान युद्धापूर्वी पाकिस्तानी लष्कराने किमान वीस लाख हिंदू वेचून ठार मारले. अमेरिकेच्या हेन्री किसिंजर आणि निक्सन यांच्या पाठिंब्यावर पाकिस्तानी लष्कराने आणि राज्यकर्त्यांनी हिंदूंचा हा भयंकर नरसंहार घडवून आणला. यावर भारतीय राज्यकर्त्यांनी कधीच तोंड उघडले आहे असे दिसत नाही. गॅरी बास नावाच्या अमेरिकन लेखकाने यावर लिहिलेल्या ब्लड टेलिग्राम या पुस्तकात आपला थरकाप उडवणारा तो घटनाक्रम तपशीलवार आला आहे. अफगाणिस्तानमधील हिंदूकुश पर्वताचे नाव तिथे झालेल्या हिंदूंच्या भयंकर संहाराने त्या पर्वताला दिले गेले असे वाचनात आले होते. हा इतिहास आपण लक्षात घेत नाही.
वरील जे घटनाक्रम लिहिले, ते अत्यल्प आहेत. अशा हजारो दुर्दैवी घटना आणि कोट्यवधी हिंदुंचा नरसंहार गेल्या तेराशे वर्षात मुस्लिमांनी केलेला आहे. हे वास्तव असूनही अजूनही भविष्यात अशी एकही घटना घडू नये, यासाठी नेमके काय करायला हवे, यावर हिंदू समाजाचे, राज्यकर्त्यांचे, व्यवस्थांचे काही चिंतन व्हायला हवे आहे, त्यावर आधारित काही कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. तरच या घटनांना पायबंद घालता येईल. अन्यथा अशा प्रकारच्या घटना घडल्यावर त्याबाबत थोडे दिवस हळहळ व्यक्त करून पुढची घटना घडेपर्यंत आपण शांतपणे दैनंदिन जीवनात पुन्हा गढून जाणार आहोत.
थोडक्यात काय, हिंदू मनाला शत्रुमित्रविवेक करावा लागणार आहे. पण हिंदू समाजात अशा आवश्यक विषयावर कधी एकमत होताना दिसत नाही, अगदी स्वतःचे प्राण, धर्म आणि संस्कृती वाचवण्याच्या विषयावर देखील एकमत होऊ नये, हे अत्यंत दुर्दैवी आहे. वरील घटनांची कुठेही पुनरावृत्ती घडू नये, यासाठी नेमके काय करावे? यासाठी सुबुद्ध नागरिकांनी विचार करायला हवा.
छळबळाने केल्या जाणार्या हिंदुंंच्या धर्मांतराविरूद्ध कठोर कायदे करून त्यात अपराध्यांना कठोर शिक्षेची तरतूद करावी. अशा घटना अत्यल्प काळात सिद्ध करून आरोपींना शिक्षेची अंमलबजावणी करता यावी, यासाठी न्यायव्यवस्था वेगवान करावी, त्या व्यवस्थेत आवश्यक ते बदल करावे.
हिंदुंना कायमच भ्रमित करणार्या सर्वधर्मसमभाव यासारख्या वैचारिक सापळ्यांचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा.
हिंदू कुटुंबातून हिंदू धर्माचे, किमान भगवद्गीतेचे संस्कार करावेत. या हिंदू धर्मसंस्काराचा अंतर्भाव शालेय पातळीवरील शिक्षणात जाणीवपूर्वक करावा.
वरील सर्व इतिहासाचे वास्तव जाणीवपूर्वक नाकारणार्या कथित मायावी बुद्धीजीवींना जिहाद्यांचे छुपे हस्तक मानून त्यांना उघडे पाडून त्यांच्यासाठी आवश्यक शिक्षेची कायद्यात तरतूद करावी. असे कितीतरी उपाय, त्यांची नेमकी अंमलबजावणी, त्याचा कालबद्ध आढावा घेण्याची एक काटेकोर पद्धती प्रत्यक्षात आणावी लागेल.
हिंदुंची विश्वबंधुत्वाची कल्पना खरोखरच उदात्त आहे, पण हिंदुंवर वेगवेगळे फसवे हल्ले आणि सर्वनाशापासून वाचविण्यासाठी तशा प्रकारचा बंधुभाव अन्य धर्मावलंबी जनतेतही कसा प्रसृत होईल यासाठी नेमके काय करावे, याचे प्रत्येक हिंदू मनुष्याने चिंतन करावे, काही वास्तव जाणून घ्यावे, स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वतःच्या आचार विचारात जरूर ते बदल करावे, असे या छांगूर बाबा प्रकरणाच्या निमित्ताने अवश्य मांडावे असे वाटते. यापूर्वीही विवेक साप्ताहिकाने ‘तुमचा नातू हिंदू राहील का?’ यावर विशेषांक काढला होताच. हिंदूंच्या लेकीबाळी आणि सुनाच हिंदू राहिल्या नाहीत तर हा प्रश्न पुन्हा गंभीर वळणावर आल्यावाचून राहणार नाही.