डेक्कन एज्युकेशन विद्यापीठ हे भारतीय ज्ञानपरंपरा अंमलात आणणारे महाराष्ट्रातील पहिले व एकमेव विद्यापीठ आहे. सेल्फ फायनान्स या तत्त्वावर हे विद्यापीठ चालते, हे त्याचे वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यामुळे एकाच वेळी अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना देता येतात. विद्यापीठाचे वेगळेपण आणि तिथे उपलब्ध असलेले अभ्यासक्रम या संदर्भात डॉ. रवि आचार्य यांच्याशी साधलेला संवाद...
डेक्कन एज्युकेशन विद्यापीठाची स्थापना करण्यामागचा नेमका उद्देश काय होता? तुम्ही या सर्व प्रक्रियेत सुरुवातीपासून होता का?
- डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये मी 2022 साली रुजू झालो, तेव्हा अक्षम असणार्या विभागावर लक्ष केंद्रित करण्याचे काम मला देण्यात आले होते. त्या वेळी डॉ. शरद कुंटे अध्यक्ष होते, तर आठवले सर उपाध्यक्ष होते. हे काम करत असतानाच विद्यापीठ स्थापनेची चर्चा चालू होती. त्या वेळी विद्यापीठ स्थापनेची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. त्याआधी व्ही.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात 36 वर्षे काम केल्याचा अनुभव माझ्या गाठीशी होता. त्यामुळे डेक्कन विद्यापीठ स्थापनेची जबाबदारी मी स्वीकारली. विद्यापीठाची स्थापना ’सेल्फ फायनान्स’ तत्त्वावरच करण्याचा विचार मांडला गेला आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाने याला परवानगी दिली.
व्यावसायिक शिक्षण जगभरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलं तरी आपल्याकडे त्याचा फारच अभाव आहे. त्यामुळे व्यावसायिक शिक्षणात सेल्फ फायनान्स यावा याबाबतही नियामक मंडळाचे एकमत झाले. सेल्फ फायनान्स विद्यापीठांमध्ये व्यावसायिक शिक्षण मिळण्याची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देता येते. तिथे व्यावसायिक प्रशिक्षणालाच महत्त्व असते, तसेच आपल्याला इथेही करावं लागणार आहे हेदेखील तेव्हाच ठरत गेले.
भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी केलेल्या कायद्यांमुळे सेल्फ फायनान्स विद्यापीठांना निर्णयाचं स्वातंत्र्य मिळालं आहे. कोणते विषय घ्यायचे, कोणत्या स्वरूपात घ्यायचे, कधी घ्यायचे, त्याची उद्दिष्टे काय असतील या संदर्भातील संपूर्ण तपशील असणारे अहवाल तयार केले. (याला डी.पी.आर. म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतात.) हा अहवाल तयार करताना डॉ. रवींद्र आचार्य (अध्यक्ष - डेक्कन एज्युकेशन विद्यापीठ), डॉ. प्रसन्न देशपांडे, डॉ. आनंद काटीकर आणि डॉ. आशिष पुराणिक यांची समिती कार्यरत होती. त्याचबरोबर विद्यापीठाची समिती, फर्ग्युसन महाविद्यालयाचे; तसेच बी.एम.सी.सी. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ सदस्यांनीही सहकार्य केले. हा तपशीलाचा अहवाल इथल्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने केला गेला. त्यासाठी बाहेरून तज्ज्ञ बोलवण्याची गरज पडली नाही. समितीसमोर हा अहवाल सादर केला गेला. संस्थेचे तत्कालीन कार्यवाह धनंजय कुलकर्णी यांनी त्या काळात खूप मदत केली. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या सहकार्याने 23 सप्टेंबर 2023 रोजी विद्यापीठाची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही विद्यापीठाच्या निर्मितीत मोलाचे सहकार्य केले. सरकारी कायद्यानुसार राज्यपालांची स्वाक्षरी विद्यापीठ निर्मितीसाठी महत्त्वाची असते. राज्यपालांनीही डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. साडेतीन महिन्यांमध्ये तयार होणारे असे आमचे पहिलेच विद्यापीठ आहे.
विद्यापीठात कोणकोणते अभ्यासक्रम घेतले जातात?
- विद्यापीठ तयार होत असताना व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने पाच विषय घेण्यात आले. त्यामध्ये स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ सायन्सेस अॅण्ड मॅथेमॅटिक्स आणि स्कूल ऑफ डिझाईन अॅण्ड आर्ट्स अशी पाच स्कूल्स तयार केलेली आहेत. या पाच विभागांमध्ये त्या त्या विभागांनुसार 38 अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यापैकी चीफ डिझाईन हा महत्त्वाचा विषय आहे. ह्युमॅनिटीजमध्ये सायकॉलॉजी या विषयाचा समावेश आहे. सायकॉलॉजी हा फर्ग्युसन महाविद्यालयाचा आत्मा. तिथल्या डॉ. रुईकर इथे विद्यापीठात रुजू झाल्या, त्या विभाग प्रमुख म्हणून आता काम पाहत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अतिशय उत्तम सुरू आहे.
आम्ही विद्यापीठामध्ये नवीन प्रकारची प्रयोगशाळा विकसित केली आहे. हृदयाचा ई.सी.जी. ज्या प्रकारे काढतात, तसा मेंदूचा ई.सी.जी तिथे काढला जातो. हा ई.सी.जी केल्यावर तुमच्या शरीरातले दोष कळून येतात. मनामध्ये चाललेल्या अनेक गोष्टींचा आढावाही घेता येतो.
विद्यापीठातील सायन्सेस अॅण्ड मॅथेमॅटिक्स या विभागामध्ये डेटा सायन्स, बी. एस्सी. कॉम्पुटर सायन्स, बी.एस्सी. अॅनिमेशन, एम. एस्सी. स्टॅटिस्टिक्स हे विषय शिकवले जातात. लाईफ सायन्सचा एक विशेष विभाग विद्यापीठामध्ये आहे. त्या विभागासाठी 13 कोटींचे शासकीय अनुदान मिळालेले आहे. ज्यात इकोलॉजी आणि कॉन्झर्वेशन विषयासाठी बी.एच.एन.एस.चे माजी संचालक डॉ. आपटे यांनीही मार्गदर्शन केले. तो प्रकल्पही उत्तम प्रकारे चालू आहे.
सेल्फ फायनान्स पद्धतीच्या विद्यापीठांमुळे शिक्षण क्षेत्राला वेगळे वळण मिळू शकते का? त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्र व समाजावर होऊ शकतो का?
डेक्कन एज्युकेशनचे हे सेल्फ फायनान्स विद्यापीठ तीन खांबांवर उभे आहे.
1) भारतीय ज्ञान परंपरा,
2) इकॉलॉजी आणि कॉन्झर्वेशन
3) डिजिटल तंत्रज्ञान.
भारतीय ज्ञानपरंपरा हा आमच्याकडचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. भारतात एकूण 14 विद्यापीठांपैकी 14वे विद्यापीठ आपले आहे. 30 वर्षांहून जुन्या असणार्या विद्यापीठांमध्ये आमचं विद्यापीठ अतिशय नवीन आहे. भारतीय ज्ञानपरंपरा अंमलात आणणारे हे महाराष्ट्रातील पहिले व एकमेव विद्यापीठ आहे.
वनांचल विकास करण्याच्या हेतूने वनवासी कल्याण आश्रमासोबतही काम सुरू आहे. वनांचल विकास केंद्राची कल्पना अशी आहे की, पूर्वीची जंगले सुरक्षित करायची, जंगलामधील रहिवाशांचे व्यवस्थापन करायचे, त्यांना सुविधा पुरवायच्या, कोणत्याही प्रकारचे जंगल नष्ट होणार नाही, याची काळजी घ्यायची. जंगलाचे संवर्धन करण्यासाठी माणसे तयार करायची असा सगळा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
बिझनेस मॅनेजमेंटच्या अंतर्गत बी.बी.ए, एम.बी.ए.पर्यंतचे शिक्षणही उपलब्ध आहे. या मुलांना पहिल्या वर्षापासून इंटर्नशीप अनिवार्य केली आहे. त्यासाठी त्यांना क्रेडिटही देण्यात येणार आहे.
डिझाईन अॅण्ड आर्ट्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन्स हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. डिझाईनिंगमधला हा सर्वांत मोठा 4 वर्षांचा अभ्यासक्रम आहे.
बी.एस्सी. अॅनिमेशनचा अभ्यासक्रमही विकसित केला गेला असून एफ.टी.आय.आय.च्या धर्तीवर बी.ए. इन फिल्म मेकिंग, बी.ए. इन फिल्म ड्रॅमॅटिक्स असे अभ्यासक्रमही सुरू होत आहेत. त्यासाठी आवश्यक ती जागा, साधनसामग्री, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
सेल्फ फायनान्स विद्यापीठाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना देता येतात. उदा. चाणक्य मंडळाचे अविनाश धर्माधिकारी यांच्याबरोबर विद्यापीठात एक प्रकल्प सुरू आहे. राष्ट्रासाठी समर्पित आय.ए.एस. अधिकारी घडवणं, शासकीय कामे करतील अशा व्यक्ती तयार करणं, भारतीय परंपरेला साजेसे नेतृत्व तयार करणं हे काम मुख्यत: डेक्कन विद्यापीठात होणार आहे. या आधी एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी करणार्या मुलांना शिक्षण वेगळ्याच महाविद्यालयातून घ्यावे लागत होते; परंतु सेल्फ फायनान्स विद्यापीठामध्ये ही सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होते. हे उपलब्ध करून देण्याचं काम या विद्यापीठात पहिल्या दिवसापासून होत आहे. पब्लिक पॉलिसी, सी.एस.आर., सी. एस. आर. पॉलिसी यांसारख्या आवश्यक असणार्या गोष्टींसाठी बी.ए. सिविल सर्व्हिस आणि पब्लिक पॉलिसी, एम.ए. सिविल सर्व्हिस इन पब्लिक पॉलिसी या अंतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबरीने एम.एस.डब्ल्यूसारखा अभ्यासक्रमही विद्यापीठात सुयोग्य रीतीने विकसित केला गेला आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागांमध्ये पर्टिक्युलर मेन्सा अभ्यासक्रमही सुरू केला गेलेला आहे.
एकूण 5 स्कूल मध्ये, 38 विषयांमध्ये, प्राध्यापक आणि विद्यार्थी काम करत आहेत. पहिल्याच वर्षांत आमचे जवळजवळ 90% प्रवेश पूर्ण झाले आहेत. हा रेकॉर्ड आहे.
आमच्याकडे 60 प्राध्यापक आहेत. सगळे डॉक्टरेट प्राध्यापक आहेत. डॉक्टरेट असलेल्या प्राध्यापकाशिवाय विद्यापीठाला मान्यता मिळत नाही. यावर्षी 120 प्राध्यापक येतील. साधारणपणे 2000 विद्यार्थी एका वर्षाला या पद्धतीने 4000 विद्यार्थी येतील. कारण 23-24 साली विद्यापीठ उशिरा सुरू झाल्यामुळे तेव्हा 300 विद्यार्थी होते. त्यानंतर दर वर्षाला 2000 प्रवेश यायला सुरुवात झाली आहे. 24-25 साली आमच्याकडे 2000 विद्यार्थी होते. 25-26 साली आमच्याकडे 2000 विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. आणि ती संख्या आम्ही पूर्ण करू अशी खात्री आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रमोद रावत, उपाध्यक्ष एडव्होकेट अशोक पलांडे आणि सर्व नियामक मंडळ सदस्य विद्यापीठाला मार्गदर्शन करत आहेत.