@देविदास देशपांडे
राज यांच्याच शब्दांत म्हणजे ठाकरे ब्रँड कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु ज्यांची स्वतःचीच बाजारातील पत संपली आहे, त्यांचा ब्रँड नष्ट करण्याचे प्रयत्न इतरांनी कशाला करायला हवे? तेव्हा तगून राहण्यासाठीची ही ठाकरे बंधूंची धडपड शनिवारच्या मेळाव्याने जगजाहीर झाली. नाव विजय मेळावा असले, तरी प्रत्यक्षात तो केविलवाण्या धडपडीचा कौटुंबिक सोहळाच ठरला.
तीसपेक्षा अधिक वर्षांपूर्वीची गोष्ट. हिंदुजा समूहाच्या वतीने इंडसइंड बँकेचा उद्घाटन समारंभ मुंबईत आयोजित करण्यात आला होता. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही बोलावण्यात आले होते. त्यावेळचा एक किस्सा बाळासाहेबांनी नंतर रंगवून सांगितला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या समारंभाला सगळे गुजराती-सिंधी-मारवाडी उद्योगपती आले होते. बाळासाहेब शिवसेना चालवतात म्हणजे काय करतात, हे त्यांना काहीच कळत नव्हते. त्यातील एक-दोघांनी त्यांच्या खास अमराठी शैलीत बाळासाहेबांना विचारलेही, तुमची कसली कंपनी हाय? त्याला काही तरी थातुरमातुर उत्तर दिल्याचे बाळासाहेबांनी सांगितले. परंतु नंतर त्यावर टिप्पणी करताना दिवंगत पत्रकार नारायण आठवले यांनी लिहिले होते, खरे तर बाळासाहेबांनी त्यांना सांगायला हवे होते की, मी मराठी माणसाच्या नावावर पेढी चालवतो.
हा किस्सा आठवायचे कारण म्हणजे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी ठाकरे बंधूंनी केलेला शिमगा. तीन-चार दशकांच्या काळात मराठी माणसाचा नामघोष करत राजकारणाची पेढी चालविणार्या या दोन्ही बंधूंचे दिवाळे निघाल्याचे त्यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केले. किंबहुना, ही कबुली देण्यासाठीच या भव्य इव्हेंटचा घाट घालण्यात आला होता जणू.
या सभेत ज्या अजीजीने उद्धव ठाकरे टाळीसाठी हात पुढे करत होते त्यातून त्यांची हतबलताच दिसत होती. उद्धव यांच्यापेक्षा कांकणभर का होईना राजकीय समज जास्त असलेल्या राज यांनी त्या टाळीला खुबीने टाळले.
या सभेत ज्या अजीजीने उद्धव ठाकरे टाळीसाठी हात पुढे करत होते त्यातून त्यांची हतबलताच दिसत होती. उद्धव यांच्यापेक्षा कांकणभर का होईना राजकीय समज जास्त असलेल्या राज यांनी त्या टाळीला खुबीने टाळले. म्हणजे ’जितं मया जितं मया’ करत उत्साहाने उद्धवराव आले खरे, पण फजितीशिवाय त्यांच्या हातात काही आलेच नाही. जे बाळासाहेबांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखविले, असे सूचक वक्तव्य करून राज यांनी आपली पेढी दिवाळखोर झाल्याचेही जगजाहीर केले, तसेच त्याच दमात तुम्ही देवेंद्रांशी पंगा घेऊ नका, हे उद्धव यांनाही सुचविले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या अनुषंगाने राज्य सरकारने मराठी आणि इंग्रजीसह तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवणे सक्तीचे करण्याचा आदेश जारी केला. त्यानंतर महाराष्ट्रात भाषायुद्धाला पुन्हा सुरुवात झाली. अपेक्षेप्रमाणे सर्व विरोधी पक्षांनी या निर्णयावर टीकेची झोड उठविली. त्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांचा समावेश होता. परंतु या सर्वांपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा आवाज सर्वात प्रभावी ठरला. हिंदीची ही सक्ती मनसे खपवून घेणार नाही आणि प्रचंड आंदोलन उभारेल, असा इशारा त्यांनी दिला. राज यांच्या या इशार्यानंतर लगेचच, मराठी विरुद्ध हिंदी भाषेच्या वादाला तीव्र वळण मिळाले. मुंबईचे हृदय मानल्या जाणार्या मराठीबहुल भागात दादरमध्ये पोस्टर्स लागले. ‘हम हिंदू हैं, लेकिन हिंदी नहीं‘ असे लिहिलेल्या या पोस्टर्सनी लक्ष वेधून घेतले.
राज्यभरात झेप घ्यायची तर मराठी मतांचे भांडवल पुरेसे नाही, हे बाळासाहेबांनी ओळखले आणि 1980च्या दशकापासून त्यांनी हिंदुत्वाची कास धरली. मराठीचा मुद्दा मागे पडला, केवळ मागे पडला नाही तर नामशेष झाला.
मराठी विरुद्ध हिंदी हा संघर्ष राज्याच्या राजकारणात दीर्घकाळापासून आहे. विशेषतः उत्तर भारतीयांची मुंबईत संख्या वाढत गेली तशी हिंदीच्या वर्चस्वाबाबत मराठी मनांमध्ये रोष निर्माण झाला. आधी शिवसेनेने व नंतर मनसेने याच वैषम्याचा फायदा घेतला आणि मराठी मतदारांमध्ये असुरक्षितता निर्माण केली. त्यांच्या राजकारणाचे ते मुख्य सूत्र होते. मात्र राज्यभरात झेप घ्यायची तर मराठी मतांचे भांडवल पुरेसे नाही, हे बाळासाहेबांनी ओळखले आणि 1980च्या दशकापासून त्यांनी हिंदुत्वाची कास धरली. मराठीचा मुद्दा मागे पडला, केवळ मागे पडला नाही तर नामशेष झाला. अन्यथा याच काळात मुंबईतला मराठी टक्का घसरला नसता. आज दोन तुटपुंज्या सेना ज्यांच्या नावाने खडे फोडत आहेत त्या अमराठी भाषकांची सद्दी वाढली नसती.
पुढे बाळासाहेबांनी उद्धव यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविली व त्यांचे राज यांच्यासी पटेनासे झाले. (याच उद्धव यांनी ’मी मुंबईकर’ अभियान राबवून मराठीहिताच्या मुद्द्याला तिलांजली दिल्याचे मान्य केले होते.) त्यातून राज यांनी स्वतंत्र पक्ष काढला आणि काकांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनीही मराठीच्या मुद्द्यावर राजकारणास सुरुवात केली. बाळासाहेबांच्या ’हिंदूहृदयसम्राट’ या उपाधीला पर्याय म्हणून ’मराठीहृदयसम्राट’ ही उपाधी त्यांना मिळाली. ’मराठी प्रथम’ हा बाणा त्यांनी राबविला. त्यातून काही काळ त्यांना लक्षणीय राजकीय यशही मिळाले. थोडक्यात काका बाळासाहेब यांच्यानंतर मराठीहिताचे कंत्राट राज यांनी घेतले.
मात्र नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर राज ठाकरे व मनसेचे राजकारण उतरणीला लागले. सलग तीन निवडणुकांमध्ये त्यांना दारुण अपयश आले. याच काळात उद्धव यांनी टोपी फिरविल्यामुळे हिंदुत्वाचे राजकारण करणारा भाजपचा मित्रपक्ष दुरावला. ती जागा भरून काढण्यासाठी राज यांनी मराठीऐवजी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला. हिंदुहृदयसम्राट हे बिरुद त्यांना लागले. परंतु त्यांचा हाही डाव अयशस्वी झाला. उलट देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडून दोन नवे सहकारी पक्ष मिळविले. या सर्व प्रकरणात मनसेची स्थिती दिशा हरविलेल्या गलबतासारखी झाली.
उद्धवसेनेने सध्या कमरेचे हिंदुत्व सोडून डोक्याला गुंडाळले आहे. पक्षाला एवढी गळती लागली आहे, की धरले तर चावते, सोडले तर पळते अशी स्थिती आहे. हिंदीसक्तीच्या विरोधातच काय, कुठलेच आंदोलन करण्याएवढे त्राण त्यांच्या पक्षात राहिलेले नाही.
फडणवीस सरकारच्या हिंदीबाबतच्या निर्णयामुळे राज यांना उभारी घेण्याची नामी संधी मिळाली. नव्हे, या निर्णयाच्या काही दिवस आधीच देवेंद्र व राज यांची झालेली भेट ही त्यासाठीच होती की काय, अशी शंका येण्याजोगी आहे. उद्धवसेनेने सध्या कमरेचे हिंदुत्व सोडून डोक्याला गुंडाळले आहे. पक्षाला एवढी गळती लागली आहे, की धरले तर चावते, सोडले तर पळते अशी स्थिती आहे. हिंदीसक्तीच्या विरोधातच काय, कुठलेच आंदोलन करण्याएवढे त्राण त्यांच्या पक्षात राहिलेले नाही.
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे तो हिंदीला प्रखर विरोध करू शकत नाही. किंबहुना, आपले मालक राहुल गांधी यांची हांजी-हांजी करणे आणि मोदींना शिव्या देणे या पलीकडे त्या पक्षाला काही धोरण नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला संघर्षाचा इतिहासच नाही. हिंदीसक्तीच्या तथाकथित मुद्द्यावर गदारोळ माजला होता तेव्हाही त्यांची तळ्यात-मळ्यात वक्तव्ये सुरूच होती. या विषयात त्यांची किंवा त्यांच्या गटाची काय भूमिका आहे, हे आजही कोणी ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरून विरोध करणारा एकमेव पक्ष राहिला मनसे. शिवाय मराठीवरचा आपला हक्कही राज ठाकरेंनी कायम ठेवला आहे. तीच संधी राज यांना मिळाली. मुंबईत पक्षाच्या (जे उरले-सुरले राहिलेत अशा) वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन हिंदीसक्तीला विरोध करण्याची त्यांनी रणनीती आखली. नाही म्हणायला समाजात फुटीरपणा पेरायला टपलेल्या काही डाव्या संघटना-भणंगांची साथही त्यांना मिळाली. तेव्हा विनाकारण तणाव नको म्हणून सरकारने हिंदी तृतीय भाषेचा आदेश मागे घेतला.
या सगळ्यात उद्धवराव व त्यांची सेना कुठे होती? परंतु वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी त्यांनी विजय मेळावा घेतलाच. लगोलग राज यांच्याशी हातमिळवणी करावी, हा अंतस्थ हेतू होताच. उबाठा सेनेच्या बुडत्या जहाजातून विजेच्या वेगाने बाहेर पडणार्या शिलेदारांना जवळ ठेवायचा तोच मार्ग राहिला आहे. त्यासाठीच मग आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी हे पालुपद त्यांनी लावले होते. मात्र राज यांनी शिताफीने तो विषयच टाळला.
नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे शिवसेना आणि मनसे एकत्र येणार, ही चर्चा पुन्हा-पुन्हा डोके वर काढते. विशेषतः भाजप व फडणवीसांशी मैदानात दोन हात करण्याची शक्ती नसलेल्या बाजारबुणग्यांना त्याची फार हौस. पूर्वी या दोन पक्षांच्या एकत्र यायची चर्चा होत असे, आता दोन्ही पक्षांचे बळ एवढे खालावले आहे, की त्या पक्षांऐवजी उद्धव आणि राज या दोघांच्याच एकत्र येण्याची चर्चा होते. शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होतो आणि काही दिवसांच्या चर्चांनंतर पुन्हा ही कढी शिळी होते.
जेव्हा राज यांची शक्ती खालावली तेव्हा मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही, अशा शेलक्या शब्दांत उद्धव यांचे चिरंजीव आदित्य यांनी मनसेची संभावना केली होती.
उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही चुलत भाऊ वेगळे झाले त्याला पुढील वर्षी दोन दशके पूर्ण होतील. या काळात दोन्ही नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी काढली, एकमेकांवर यथेच्छ टीका केली. राज यांनी 2006 पासून उद्धव यांच्या राजकीय यशात खोडा घालण्याचे अनेक प्रयत्न केले, ते बर्यापैकी यशस्वीही झाले. जेव्हा राज यांची शक्ती खालावली तेव्हा मी संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही, अशा शेलक्या शब्दांत उद्धव यांचे चिरंजीव आदित्य यांनी मनसेची संभावना केली होती. परंतु मागील अडीच वर्षांत घडामोडी अशा घडल्या, की उद्धव यांची गढीही ढासळली. संपलेला पक्ष या यादीत त्यांचा गट आज जाईल की उद्या, अशी स्थिती आहे.
म्हणूनच दोन्ही भावांना एकत्र येण्याची निकड भासू लागली. राज यांच्याच शब्दांत म्हणजे ठाकरे ब्रँड कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु ज्यांची स्वतःचीच बाजारातील पत संपली आहे, त्यांचा ब्रँड नष्ट करण्याचे प्रयत्न इतरांनी कशाला करायला हवे? तेव्हा तगून राहण्यासाठीची ही ठाकरे बंधूंची धडपड शनिवारच्या मेळाव्याने जगजाहीर झाली. नाव विजय मेळावा असले, तरी प्रत्यक्षात तो केविलवाण्या धडपडीचा कौटुंबिक सोहळाच ठरला.