गुरुपौर्णिमेचे महत्त्व

विवेक मराठी    09-Jul-2025
Total Views |
vivek
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरू-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय! गुरू-शिष्य अशा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून पाहायला मिळतात. आज गुरू-शिष्य परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. यासाठी भारत पुनःश्च हिंदू राष्ट्र बनणे आवश्यक आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
अर्थ : गुरू हेच ब्रह्मा, गुरू हेच सर्वव्यापक भगवान विष्णू आणि गुरू हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.
 
 
हिंदू शास्त्रामध्ये वरील श्लोक सांगितला आहे. गुरुंशिवाय तरणोपाय नाही. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरू आणि गुरुंंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरुंंबद्दल सांगता येतील. भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी गुरुतत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्र (हजार) पटींनी कार्यरत असते. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत तसेच गुरू-शिष्य परंपरा याविषयी पाहाणार आहोत.
 
तिथी - गुरुपौर्णिमा हा उत्सव सर्वत्र आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो.
उद्देश - गुरू म्हणजे ईश्वराचे सगुण रूप! वर्षभर प्रत्येक गुरू आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. त्या गुरुंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्धेश आहे.
 
 
महत्त्व - गुरुपौर्णिमा या शुभदिनी दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत एक सहस्र (हजार) पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग यांचा इतर दिवसांच्या तुलनेत एक सहस्र पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची (ईश्वरकृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.
 
 
गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत - प्रत्येक गुरुंचे शिष्य या दिवशी त्यांच्या गुरुंची पाद्यपूजा करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा मनोभावे अर्पण करतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपरंपरेत महर्षी व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरू मानले आहे. सर्व ज्ञानाचा उगम महर्षी व्यास यांच्यापासून होतो, अशी भारतीयांची धारणा आहे. कुंभकोणम् आणि शृंगेरी ही शंकराचार्यांची दक्षिण भारतातील प्रसिद्ध पीठे आहेत. या ठिकाणी व्यासपूजेचा महोत्सव साजरा होतो. व्यासमहर्षी हे शंकराचार्यांच्या रूपाने पुन्हा अवतीर्ण झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे; म्हणून संन्यासी लोक या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात.
 
 
गुरुपूजनाचा विधी - स्नानादी नित्यकर्मे आटोपून ‘गुरुपरम्परासिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये ।’ असा संकल्प करतात. एक धूतवस्त्र अंथरून त्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेघा काढतात. ते म्हणजे महर्षी व्यास यांचे व्यासपीठ होय. मग ब्रह्मा, परात्परशक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांचे त्या व्यासपीठावर आवाहन करून त्यांची षोडशोपचारे पूजा करतात. याच दिवशी दीक्षागुरू आणि मातापिता यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे.
गुरू-शिष्य परंपरा : एकदा एका विदेशी व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना प्रश्न विचारला, “भारताचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास कसे कराल?” तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी सांगितले, “गुरू-शिष्य परंपरा !” ‘गुरू-शिष्य परंपरा’ ही हिंदूंची लक्षावधी वर्षांची चैतन्यमय संस्कृती आहे; परंतु काळाच्या प्रवाहात रज-तमप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे या महान अशा गुरू-शिष्य परंपरेची उपेक्षा होत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते, तसेच गुरू-शिष्य परंपरेची महती समाजाला सांगता येते. थोडक्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरू-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय! गुरू-शिष्य अशा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून पाहायला मिळतात, उदा. प्रभू श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि भगवान श्रीकृष्ण. चंद्रगुप्त मौर्य याला आर्य चाणक्य यांनी गुरू म्हणून मार्गदर्शन केले आणि एका बलशाली राष्ट्राची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच पातशाह्यांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपले आदर्श आहेत. आज गुरू-शिष्य परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. गुरू-शिष्य परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत पुनःश्च हिंदू राष्ट्र बनणे आवश्यक आहे.
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’ आणि ’गुरुकृपायोग’
- प्रतिनिधी