आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे!

विवेक मराठी    09-Jul-2025   
Total Views |

as
पुढील काही वर्षांत भारताने अंतराळ क्षेत्रात अनेक लक्ष्ये निश्चित केली आहेत. त्यांतील एक म्हणजे 2027 सालची गगनयान मोहीम. त्याची तयारी सुरू असली आणि अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू असले तरी ते ‘सिम्युलेटर’च्या साह्याने. गगनयान मोहिमेचे अंदाजपत्रक सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे आहे. ती मोहीम यशस्वी करायची तर भारतीय अंतराळवीराने काही काळ तरी अंतराळात प्रत्यक्षात जाऊन अनुभव घेऊन येणे निकडीचे हे ‘अ‍ॅक्सिअम -4’ मोहिमेत स्थान मिळविण्यासाठी 548 कोटी रुपये खर्च करण्याचे मुख्य प्रयोजन! शुक्ला यांना आता अंतराळ मोहिमेतील सर्व प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि तो गगनयान मोहीम बिनचूकपणे पार पडण्यासाठी लाभदायी ठरेल.
काही योगायोग विलक्षण असतात. ‘अ‍ॅक्सिअम-4’ मोहिमेतील अंतराळवीरांना घेऊन फाल्कन-9 यान अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रावरून 26 जून रोजी झेपावले. त्या चारपैकी दोन अंतराळवीरांनी हे क्षेत्र का निवडले यात कमालीचे साम्य होते. या मोहिमेचे नेतृत्व करीत असलेल्या अमेरिकेच्या पेगी व्हिटसन या ज्येष्ठ अंतराळवीर आहेत. त्यांनी आजवर विविध मोहिमांत अंतराळात सुमारे पावणे सातशे दिवस वास्तव्य केले आहे. त्यांना अंतराळ क्षेत्राचे आकर्षण निर्माण झाले ते चंद्रावर 1969 साली मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्याची दृश्ये त्यांनी लहानपणी दूरचित्रवाणीवर पाहिल्यापासून. ‘अ‍ॅक्सिअम-4’ मोहिमेचे सारथ्य भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला करीत आहेत. त्यांना या क्षेत्राने भुरळ घातली ती भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी चाळीस वर्षांपूर्वी गाजवलेल्या कामगिरीने प्रेरित केल्यामुळे. या दोघांव्यतिरिक्त या मोहिमेत पोलंड आणि हंगेरी या दोन राष्ट्रांचे अंतराळवीरही आहेत. यात देखील योगायोग असा की भारताप्रमाणेच पोलंड आणि हंगेरी या राष्ट्रांनी आपला पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवून चार दशके उलटली आहेत. त्या दोन्ही राष्ट्रांनीही भारताप्रमाणेच 1980च्या दशकात तत्कालीन सोव्हिएत महासंघाच्या सहकार्याने आपले अंतराळवीर अवकाशात पाठवले होते. गेल्या चार दशकांत अंतराळ तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाला आहे. भारताने देखील अंतराळ मोहिमांत महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन केले आहे. या सर्वच दृष्टीने ‘अ‍ॅक्सिअम-4’ मोहीम भारतासाठी अनन्यसाधारण महत्वाची ठरते. तेव्हा या मोहिमेच्या वैशिष्ट्यांचा धांडोळा घेणे औचित्याचे.
 
 
सुमारे वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या प्रस्तावित गगनयान मोहिमेतील चार भारतीय अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली होती. त्यांत प्रशांत बाळकृष्णन नायर, अजित कृष्णन आणि अंगद प्रताप या भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन पदावरील अधिकार्‍यांचा समावेश होता त्या प्रमाणेच त्यावेळी विंग कमांडर असलेले शुभांशु शुक्ला यांच्या नावाचाही अंतर्भाव होता. या सर्व भावी अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू असतानाच ‘अ‍ॅक्सिअम-4’ अंतराळ मोहिमेत भारतातर्फे शुभांशु सहभागी होतील अशी घोषणा झाली. सुरुवातीच्या विलंबानंतर फाल्कन-9 यान अंतराळात झेपावले तेव्हा शुक्ला यांनी एक नवा इतिहास रचला. यापूर्वी राकेश शर्मा हे 1982साली सोव्हियत महासंघाच्या इंटरकॉसमॉस मोहिमेसाठी निवडले गेले होते. 1984सालच्या 3 एप्रिल रोजी ते अंतराळात झेपावले आणि पुढील 7 दिवस, 21 तास आणि 40 मिनिटे ते अंतराळात होते. भारताच्या दृष्टीने ती अभिमानास्पद घटना होती यात शंका नाही. तथापि गेल्या चाळीसेक वर्षांत त्यापुढे भारताचे पाऊल पडले नव्हते. अर्थात अंतराळ मोहीम, अंतराळ संशोधन हे सगळे अत्यंत खर्चिक असते याचीही जाणीव ठेवायला हवी. पण गेल्या काही वर्षांत भारताने याही क्षेत्रात दमदार पाऊले टाकली आहेत. शुक्ला यांना ‘अ‍ॅक्सिअम-4’ मोहिमेत सामील करण्याच्या निर्णयाचा हेतू हा भारताला पुढील आव्हानांसाठी तयार करणे हाच होय.
 
 
Axiom Mission 4
 
अ‍ॅक्सिअम कंपनी व्यावसायिक स्तरावर या मोहिमा आखते आणि त्यामुळे त्यात सामील व्हायचे तर खूप मोठी रक्कम मोजावी लागते. शुक्ला यांना या मोहिमेत स्थान मिळावे यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि भारत सरकारने तब्बल 548 कोटी रुपये खर्च केले आहेत. यात अंतराळवीराचे प्रशिक्षण, मोहिमेचा खर्च, संशोधन व प्रयोगांसाठीचा निधी या सर्वांचा समावेश आहे. ही रक्कम पाहता भारताने जाणीवपूर्वकच शुक्ला यांना या मोहिमेत सामील केले असणार याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. शुक्ला यांना भारतीय हवाई दलात 2024 साली ग्रुप कॅप्टनपदी बढती मिळाली. हवाई दलात त्यांना लढाऊ विमानांच्या उड्डाणांचा सुमारे दोन हजार तासांचा अनुभव आहे. बेंगळुरूस्थित ‘इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन’ या संस्थेद्वारे भारताच्या आगामी अंतराळ मोहिमेसाठी चार जणांची निवड झाली. त्यांत शुक्ला एक होते. त्या अंतराळवीरांची नावे जगासमोर अलीकडेच आली असली तरी त्या अंतराळवीरांच्या प्रशिक्षणाला 2020 सालापासूनच सुरुवात झाली होती. रशियातील युरी गागारिन अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रावर त्यांना अत्यंत कठोर प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतरच शुक्ला यांची निवड ‘अ‍ॅक्सिअम -4’ मोहिमेसाठी झाली. अंतराळात झेपावणारे ते दुसरे भारतीय ठरले असले तरी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पाऊल टाकणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत.
 
 
या मोहिमेत चार देशांचे अंतराळवीर सामील झाले असले तरी तेथे करण्यात येणार्‍या प्रयोगांत तीसपेक्षा जास्त देशांनी आर्थिक हातभार लावला आहे. या पंधरा दिवसांत हे अंतराळवीर एकूण साठेक प्रयोगांना चालना देतील. त्यात भारताच्या पुढाकाराने होणार्‍या सात प्रयोगांचा समावेश आहे. या प्रयोगांबरोबरच शुक्ला ‘नासा’च्या साथीने पाच प्रयोगांमध्ये सामील होतील. भारतातर्फे होणार्‍या प्रयोगांत इस्रो, मूलपेशी विज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ स्टेम सेल सायन्स), केरळ कृषी विद्यापीठ, बेंगळुरूस्थित भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स), धारवाडस्थित कृषिविज्ञान विद्यापीठ व आयआयटी अशा संस्थांची भागीदारी असणार आहे. त्यावरूनच या प्रयोगांचे मोल लक्षात येईल. अंतराळात डोळ्यांच्या, बुबुळांच्या हालचालींमधील फरक, शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीत मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम, अंतराळात शरीरात होणारे चयापचय, मानवी स्नायूंवर होणारे परिणाम, सहा वेगवेगळ्या प्रकारच्या बियांमधील कोंब फुटीची आणि वाढीची प्रक्रिया, शेवाळ्यासारख्या वनस्पतीवर होणारे परिणाम, प्रकाशसंश्लेषणास कारणीभूत जिवाणूंचे अंतराळातील वर्तन, काही सूक्ष्म प्राण्यांवर होणारे परिणाम असे अनेक प्रयोग केले जाणार आहेत. या प्रयोगांचे निष्कर्ष केवळ अंतराळात या सगळ्यावर काय परिणाम होतो यापुरते मर्यादित नाहीत. पृथ्वीवर देखील शेतीपासून वैद्यकीय उपचारांपर्यंत नवीन दृष्टी या प्रयोगांचे निष्कर्ष देतील. पण त्याहून व्यापक फलनिष्पत्ती ठरेल ती म्हणजे भारताच्या आगामी अंतराळ मोहिमेच्या दृष्टीने भारताची तयारी जास्त भक्कम आणि चोख होण्यास त्यातून मदत होईल.
 
 
चाळीसेक वर्षांपूर्वी भारताचा पहिला अंतराळवीर अवकाशात झेपावला तरी अंतराळविज्ञान आणि संशोधन क्षेत्रात भारताचे स्थान तसे दुय्यमच होते. पोलंड किंवा हंगेरी ही सोव्हिएत महासंघावर विसंबून राष्ट्रे कधी पुन्हा अंतराळवीर पाठवू शकतील अशी कोणी अपेक्षा केली नसेल तशीच ती काही वर्षांपूर्वीपर्यंत भारताकडून देखील कोणी केली नसेल. पण आता भारताने या क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. 2023 साली भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि इतिहास घडला. याचे कारण चंद्राच्या पृष्ठभागावरील ते ठिकाण अतिशय आव्हानात्मक मानले जाते. तेथे ’सॉफ्ट लँडिंग’ करणारा भारत पहिला देश ठरला. पुढील काही वर्षांत भारताने अंतराळ क्षेत्रात अनेक लक्ष्ये निश्चित केली आहेत. त्यांतील एक म्हणजे 2027 सालची गगनयान मोहीम. त्याची तयारी सुरू असली आणि अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू असले तरी ते ‘सिम्युलेटर’च्या साह्याने. याचा अर्थ अंतराळासारखी स्थिती येथे निर्माण करून. त्याचे महत्त्व असले तरी प्रत्यक्ष अंतराळात जाऊन अनुभव घेऊन येणे याचे मोल निराळेच. गगनयान मोहिमेचे अंदाजपत्रक सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे आहे. ती मोहीम यशस्वी करायची तर भारतीय अंतराळवीराने काही काळ तरी अंतराळात प्रत्यक्षात जाऊन अनुभव घेऊन येणे निकडीचे हे ‘अ‍ॅक्सिअम -4’ मोहिमेत स्थान मिळविण्यासाठी 548 कोटी रुपये खर्च करण्याचे मुख्य प्रयोजन! शुक्ला यांना आता अंतराळ मोहिमेतील सर्व प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि तो गगनयान मोहीम बिनचूकपणे पार पडण्यासाठी लाभदायी ठरेल. मानवाला अंतराळात पाठवण्याअगोदर गगनयान मोहिमेच्या पहिल्या दोन चाचण्या मानवविरहित असणार आहेत तर तिसर्‍या फेरीत रोबो अंतराळात पाठवण्यात येईल. कदाचित शुक्ला यांच्या अनुभवांचे संचित मानवविरहित मोहिमांची संख्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
 
 
Axiom Mission 4
 
गगनयान मोहिमेतील दुसरा फायदा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर अंतराळ क्षेत्रात भारताचे स्थान अधिक बळकट होईल. येत्या दहा वर्षांत अंतराळक्षेत्राशी निगडित जागतिक अर्थव्यवस्था पावणे दोन ट्रिलियन डॉलरची होण्याचा अंदाज आहे. अर्थव्यवस्था विस्तारली की त्यातून संशोधन वाढीस लागते, रोजगार निर्मिती होते हे तर खरेच. पण अंतराळ हे आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे क्षेत्र झालेले असताना त्यातून व्यूहात्मक (स्ट्रॅटेजिक) वर्चस्व निर्माण करण्याची देखील चढाओढ लागली आहे. आपण कोणत्याच निकषावर मागे राहू नये या दिशेने भारत वाटचाल करीत आहे. ‘अ‍ॅक्सिअम-4’ मोहिमेत भारतीय अंतराळवीराचा समावेश म्हणजे त्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरणार आहे. स्वबळावर मानवाला अंतराळात नेणार्‍या देशांत आजवर रशिया, अमेरिका व चीन या राष्ट्रांचा समावेश आहे. गगनयान मोहीम फत्ते झाली तर या मानाच्या पंक्तीत सामील होणारा भारत हा चौथा देश ठरेल. साहजिकच भारताकडे जग अधिक आदराने पाहील. आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन सहकार्य गटात भारताचा समावेश सन्मानाने होईल. रशिया, युरोप, जपान येथील आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थांशी भारताची भागीदारी आहेच; पण भारताला प्रधान स्थान मिळायचे तर गगनयान मोहीम यशस्वी होणे निकडीचे. किंबहुना भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने भारताच्या गगनयान मोहिमेतील तंत्रज्ञान आपण आपल्या भावी अंतराळ मोहिमांत वापरू अशी ग्वाही ‘नासा’ तसेच ‘ब्ल्यू ओरिजिन’ सारख्या अमेरिकेच्या खासगी अंतराळ संस्थेने दिली आहे. शुक्ला यांचा समावेश ‘अ‍ॅक्सिअम -4’ मोहिमेत करण्याचे किती दूरगामी अनुकूल परिणाम भारताच्या दृष्टीने होणार आहेत याची कल्पना यातून येऊ शकेल.
 
 
‘अ‍ॅक्सिअम -4’ मोहिमेत ‘जॉय’ नावाचे एक खेळणे देखील नेण्यात आले आहे. अशा खेळण्यांना ‘झिरो ग्रॅव्हिटी इंडिकेटर’ म्हणतात. ते खेळणे वजनाने अत्यंत हलके असल्याने शून्य गुरुत्वाकर्षणाची स्थिती आली की ते खेळणे लगेच तरंगू लागते. तशी स्थिती धारण केल्याचा संकेत अंतराळवीरांना आणि जमिनीवरील नियंत्रण कक्षाला लगेच मिळतो. याची परंपरा जगातील पहिला अंतराळवीर युरी गागारिन यांच्यापासून सुरू झाली. त्यांनी एक लहान बाहुली नेली होती. ‘अ‍ॅक्सिअम -4’ मोहिमेत जे खेळणे शुक्ला व अन्य तिघा अंतराळवीरांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले आहे ते आहे ‘हंस’. सिंह व डायनोसॉर अशा विविध प्राण्यांच्या पर्यायांचा विचार करून अखेरीस खेळण्यातील हंसावर शिक्कामोर्तब झाले. भारताच्या अंतराळवीराचे नाव शुभ आणि हंस हेही भारताच्या दृष्टीने शुभचिन्ह. याचे कारण ते सरस्वती देवतेचे वाहन आहे. तेव्हा भारतासाठी आणि शुक्ला यांच्यासाठी ते केवळ खेळणे नव्हे तर त्याच्याशी भावनिक नातेही आहे. भारताचे हे बदलते रूप आहे.
 
 
विद्यमान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक 2030पर्यंत निवृत्त करण्याची योजना ‘नासा’कडून आखली जात आहे. 1998पासून ते कार्यरत आहे. शुक्ला त्याच स्थानकावर गेले आहेत. भारताने अवकाश स्थानकाची स्थापना 2035पर्यंत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि त्यास ‘भारतीय अंतरिक्ष स्थानक’ असे नाव देण्याचे निश्चित केले आहे. त्याचे संचालन इस्रो करेल. 2040मध्ये चंद्रावर मानव पाठवण्याचे ध्येय भारताने ठेवले आहे. हे सगळे नियोजनाप्रमाणे होण्याच्या दृष्टीने शुक्ला यांचा आताच्या मोहिमेतील सहभाग हा मैलाचा दगड ठरणार आहे यात शंका नाही.
 
 
मूळच्या लखनौ येथील एका मुलाने घेतलेली ही झेप केवळ वाखाणण्यासारखीच नव्हे तर अनेकांना प्रेरणादायी अशीच. राकेश शर्मा यांनी अंतराळातून भारत ’सारे जहाँ से अच्छा’ दिसतो असे म्हटले होते. ‘नकाशावर दिसतो त्यापेक्षा अंतराळातून भारत खूप मोठा आणि भव्य दिसतो,‘ असे शुक्ला यांनी अंतराळातून पंतप्रधानांशी संवाद साधताना म्हटले आहे. भारताच्या भव्य कामगिरीच्या आलेखाला गगनही ठेंगणे वाटावे अशी भारताची अंतराळ क्षेत्रातील वाटचाल आहे आणि भारताच्या तशाच आकांक्षाही आहेत याची ग्वाही ‘अ‍ॅक्सिअम-4’ मोहिमेत शुभांशु शुक्ला यांच्या सहभागाने मिळाली आहे.

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार