- रमेश पतंगे
गेली शंभर वर्षे संघ कार्यकर्ते विविध क्षेत्रात आपल्या शक्तीनिशी हे काम करीतच आहेत. काम करणार्या कार्यकर्त्यांची संख्या आज आहे त्यापेक्षा दसपटीने वाढली पाहिजे. काही ना काही कारणाने जे या राष्ट्रीय कार्यापासून दूर राहतात, त्या सर्वांनी हे समजून घ्यायला पाहिजे की, आपला नातू, पणतू आणि खापरपणतू या भारतभूमीवर सुरक्षित राहायचा असेल, सुखाने जगायचा असेल, समृद्धी निर्माण करून जगायचा असेल तर प्रत्येकाला सक्रिय झाले पाहिजे. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा निर्णय हा न्यायालयीन निवाडा आहे. न्यायालय पुराव्याची छाननी करून सत्य काय आणि असत्य काय हे ठरविते. त्यांचे काम संपते. परंतु या निर्णयाने निर्माण केलेले, पुढे आणलेले प्रश्न न्यायालयांना सोडवायचे नसून ते जागरूक हिंदूना सोडवायचे आहेत. या निर्णयाचा हाच संदेश आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट निकाल सतरा वर्षानंतर लागला. “बॉम्बस्फोटासारख्या भीषण गुन्ह्यात कोणत्याही आरोपीला शिक्षा झाली नाही, ही गोष्ट संपूर्ण समाजासाठी, विशेषतः पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायी, हताश करणारी आणि मानसिक आघात करणारी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे”, असे निरीक्षण विशेष न्यायालयाचे न्या. ए. के. लाहोटी यांनी सात आरोपींची सुटका करताना नोंदवले. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. कारण कोणताही धर्म हिंसेची शिकवण देत नाही. न्यायालय प्रचलित जनभावनांच्या आधारावर निकाल देत नाही. गुन्हा जितका गंभीर स्वरूपाचा असतो, तितका दोष सिद्ध करण्यासाठी पुराव्यांचा दर्जा अधिक ठोस आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे.” असे मत न्या. लाहोटी यांनी मांडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले,“या निकालाने काँग्रेसप्रणित युपीए सरकारचे हिंदू दहशतवाद आणि भगव्या दहशतवादाचे षडयंत्र उघड झाले आहे. काँग्रेसप्रणित युपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा आणि भगव्या दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्याकरिता हिंदू आणि भगवा आतंकवाद आहे, असा केलेला प्रचार प्रसार किती खोटा आहे, हे आज उघड झाले आहे. ज्याप्रकारे काँग्रेस आणि यूपीएने षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न केला तो खोटा होता हे कोर्टाने पुराव्यानिशी सांगितले आहे. संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. यात ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यासह संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे.”
“ज्यांच्यासोबत आज उद्धव ठाकरे बसले आहेत त्यावेळी त्यांचेच सरकार होते आणि त्यांच्याच पोलिसांनी हे केले आहे. ठाकरेंनी भगव्या आतंकवादाचा नरेटिव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला, याबद्दल अभिनंदन करायला हवे होते. परंतु कदाचित तेही लांगूलचालन करणार्यांच्या सोबत गेल्याने असा प्रश्न विचारत असतील.” अशी टीकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
9/11 च्या हल्ल्यानंतर ‘इस्लामिक दहशतवाद’ हा शब्द मोठ्या प्रमाणात पुढे आला. त्याचे उत्तर म्हणून ‘भगवा दहशतवाद’ आणून त्यातून लांगूलचालन करण्याचा यूपीए सरकारचा प्रयत्न होता. त्या दबावाखाली या घटना झाल्याचे स्पष्ट आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या निकालावर वृत्त वाहिन्यांवर भरपूर चर्चा चालू आहेत. आर्णव गोस्वामी याने नेहमीप्रमाणे त्यांच्या आक्रमक शैलीत मालेगाव बॉम्बस्फोटाची शल्यचिकित्सा केली आहे. ज्या वाचकांनी ती ऐकली नसेल ती जरूर ऐकावी. आज तक वर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत श्री गुरूमूर्ती यांची प्रदीर्घ मुलाखत आहे, तीदेखील वाचकांनी मुळात ऐकली पाहिजे.
मालेगाव बॉबस्फोटातील मुख्य मुद्दा मालेगावच्या मशिदीत बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला? तेव्हाच्या काँग्रेस नेतृत्वाने ज्यात राहुल गांधी, दिग्विजय सिंह, चिंदबरम, सुशालीकुमार शिंदे इत्यादी सर्व काँग्रेसची वरिष्ठ नेतेमंडळी येतात, त्यांनी ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द शोधून काढला आणि सिद्ध करण्याची जबाबदारी ए. टी. एसवर टाकली. ज्यांना आरोपी म्हणून पकडले त्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (नि.) रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी यांचा समावेश होता. यामधील प्रज्ञासिंग ठाकूर या संन्यासिनी आहेत.
गुरूमूर्तींनी आपल्या मुलाखतीत समझौता एक्सप्रेस आणि मालेगाव बॉम्बस्फोट यांना एकत्रित करून हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग करून भारतात केवळ इस्लामी दहशतवाद नसून हिंदू दहशतवाद आहे, हे सिद्ध करण्याचा कसा प्रयत्न केला, याची अतिशय सखोल माहिती दिलेली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात आरडीएक्स वापरले गेले, ते पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे असते. ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स पुरविले असा बिनबुडाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर प्रचंड दडपण आणून पकडलेल्या आरोपींनी गुन्हा कबूल करावा म्हणून त्यांचा सर्व प्रकारे छळ करण्यात आला.
एका गंभीर प्रश्नाचा आपण विचार करूया. तो प्रश्न असा आहे की, पं. नेहरू यांच्या काळापासून काँग्रेस मुस्लिमधार्जिणी आणि प्रखर हिंदुविरोधी झालेली आहे. महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर या हत्येचा खोटा आरोप पं. नेहरू यांनी संघावर लादला. संघावर बंदी घालण्यात आली. तपस्वी श्रीगुरूजी यांना अटक करण्यात आली. विसाव्या शतकातील हे महापाप आहे पं. नेहरूंच्या अंगरख्यावरून कधीही न धुतले जाणारे आहे. हा हिंदुविरोधाचा वारसा गांधी घराण्याच्या काँग्रेसने काहीही बदल न करता पुढे चालविला आहे.
आज काँग्रेस सत्तेवर नाही. मात्र ते जर का सत्तेवर असते तर हिंदू संघटनांची दुर्दशा करण्याचे त्यांनी सोडले नसते, हे खरे. सत्तेचा गैरवापर करून असंख्य खोटी कथानके रचून उद्देशिकेतील ‘सेक्युलर सोशालिझम’ शब्दांचा आश्रय घेऊन या नेतृत्वाने भयानक गोष्टी केल्या असत्या. सत्तेवर नसतानादेखील ते खोटी कथानके बेंबीच्या देठापासून ओरडून समाजात पसरवित असतात. संघाला संविधान बदलायचे आहे. संघाला मुसलमान आणि ख्रिश्चन यांना जगू द्यायचे नाही. संघाला अस्पृश्यता आणायची आहे. असली कथानके 2019च्या निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणात पसरविली गेली होती.
मालेगाव बॉम्बस्फोटाचा निर्णय चांगला आहे. त्याचे सर्व हिंदूंनी स्वागत केले आहे. परंतु या निकालाच्या आनंदात गाफील राहता कामा नये. हिंदुविरोधी शक्ती कोर्टाच्या एका निर्णयाने शांत बसणार्या नाहीत, याची एक झलक ऑपरेशन सिंदूर यावर जी चर्चा झाली आणि त्यात काँग्रेसच्या खासदारांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती आपण फार बारकाईने वाचली पाहिजेत आणि त्याचे अर्थदेखील समजून घेतले पाहिजेत. त्यामागील मानसिकता समजून घेतली पाहिजे. जो गाफील राहिला, त्याचा नाश झाला. आणि जो झोपून राहतो, तो पुन्हा परत उठत नाही. हा इतिहासाचा नियम आहे. म्हणून हिंदू समाजाच्या हिताची चिंता करणार्या सर्वांनी अतिशय सावध राहायला पाहिजे.
नुसते सावध राहूनही उपयोगाचे नाही, तर प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात सक्रिय असले पाहिजे. सर्वसामान्य हिंदू माणूस हा तसा झोपलेला असतो. आपल्या रोजच्या प्रांपचिक जीवनात तो गढलेला असतो. छोट्या-मोठ्या समस्यांनी गांजलेला असतो. अशा सर्वसामान्य माणसांकडे प्रचंड शक्ती असते. एकेकटा माणूस घेतला तर तो फारसा शक्तीमान नसतो, पण समूहरूपाने त्याचा विचार केला तर त्याची शक्ती प्रचंड असते. या समूहशक्तीच्या जागरणाला कोणताही पर्याय नाही. तसेच कोणताही शॉटकर्ट नाही. लोकांशी नित्य संपर्क ठेवून त्यांना आपल्या सार्वजनिक हितासंबंधी सतत जागे करीत राहिले पाहिजे. वेगवेगळ्या समाजमाध्यमांचा उपयोग केला पाहिजे. त्यावर आपल्यापरिने आपण सक्रिय झाले पाहिजे आणि आपल्या राष्ट्रीय हिताविरूद्ध जी सगळी कटकारस्थाने चालू असतात, त्याबद्दल निरंतर जागरण करीत राहिले पाहिजे.
गेली शंभर वर्षे संघ कार्यकर्ते विविध क्षेत्रात आपल्या शक्तीनिशी हे काम करीतच आहेत. काम करणार्या कार्यकर्त्यांची संख्या आज आहे त्यापेक्षा दसपटीने वाढली पाहिजे. काही ना काही कारणाने जे या राष्ट्रीय कार्यापासून दूर राहतात, त्या सर्वांनी हे समजून घ्यायला पाहिजे की, आपला नातू, पणतू आणि खापरपणतू या भारतभूमीवर सुरक्षित राहायचा असेल, सुखाने जगायचा असेल, समृद्धी निर्माण करून जगायचा असेल तर प्रत्येकाला सक्रिय झाले पाहिजे. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा निर्णय हा न्यायालयीन निवाडा आहे. न्यायालय पुराव्याची छाननी करून सत्य काय आणि असत्य काय हे ठरविते. त्यांचे काम संपते. परंतु या निर्णयाने निर्माण केलेले, पुढे आणलेले प्रश्न न्यायालयांना सोडवायचे नसून ते जागरूक हिंदूना सोडवायचे आहेत. या निर्णयाचा हाच संदेश आहे.